तारीख: शके १९३७, भाद्रपद कृ. दशमी
प्रिय रायगड यांस,
ई-मेलच्या जमान्यात पत्र लिहिणे म्हणजे फारच मागासलेले पणाचे लक्षण आहे हे जरी तितकच खरे असले तरी पत्र ज्याला लिहितोय तो ‘तु’ स्वतः जुन्या काळातील असल्याने पत्र लिहिण्याचे धाडस दाखवतोय.. तसही तुला हजारो पत्रांची सवय असेलच.. असो!! तर तुला सांगायचा मुद्दा असा की सध्या एक नवीन ब्लॉग सुरु केलाय आणि त्यात मी ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणची माहिती देण्याचा प्रयत्न करणारे.. ऐकून तु कदाचित सुखावलाही असशील, पण माझं तेवढ्यावर समाधान झालं नाही..
असंच एकदा विचार करत बसलेलो तेव्हा लक्षात आलं की मी प्रवासवर्णने लिहिणार, त्यात सगळी माहिती देणार, लोकांना झाला तर त्याचा उपयोग होणार पण तरी त्यातून तुम्हा साऱ्या सवंगड्यांचे कौतुक नाही करता येणार. म्हणून मग आता यापुढे एकेका किल्ल्याला मी पत्र लिहायचं ठरवलय.. आणि या पत्रातून निव्वळ कौतुक करणार जमेल तेवढं.. आणि जमल्यास आपला पत्रव्यवहार चालु ठेवणार अधून मधून..
तर पहिला मानाचा किल्ला म्हणून तुझंच नाव डोळ्यासमोर आले, का माहिती नाही पण रोज झोपताना डोळ्यासमोर तुझा तो प्रचंड आकार डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही बघ..!! मला अजूनही आपली पहिली भेट आठवतेय.. कितवीत होतो रे मी?? हो, बरोबर.. इयत्ता चौथी मध्येच होतो.. एका lucky draw मुळे आपली भेट होण्याचा योग आला (इंग्रजी भाषेची सुद्धा सवय कर बरं का!! नाही तर परदेशी पाहुणे काय बोलतील कळणार नाही..) असो! तर निवड झाल्यावर प्रचंड आनंद झालेला.. त्यावेळेला तुझं फक्त नाव ऐकलेलं आणि इतिहासाच्या पुस्तकात असलेला उल्लेख.. पण तेवढ्या गोष्टी प्रेमात पडायला खूप होत्या.. जाणार जाणार करता करता एकदाचा तुझ्यापाशी येवून थडकलो.. आणि अबब!! अरे काय ती उंची!! एकदम अंगावर येत होती.. शत्रूची तर तुला पाहूनच घाबरगुंडी उडत असणार..! मग महाराज तर दूरच राहिले.. इकडून तिकडून कानावर आले की साधारण ९०० मीटर उंची आहे..
बरेच जण म्हणतात की रायगड उंचीने थोटका, पण अरे तु समुद्रसपाटीपासूनच सुरु होतोस आणि त्यामुळे तुला घाटाची नैसर्गिक उंची लाभली नाहीये..!! आम्ही सगळी मुलं मुलं खुबलढा बुरूजाजवळ उभे होतो.. आणि सोबत माहिती सांगायला एक ताई होती, शिल्पा परब नाव होतं तीचे.. यापुढे आम्हाला तीच तुझ्या अंगाखांद्यावर फिरवणार होती.. अजून एक माहिती मिळाली की हा बुरुज अनेक वेळा लढाईला सामोरे गेला म्हणून त्याचे नाव खुबलढा बुरुज ठेवलं.. सध्या मोडकळीस आलेल्या चित दरवाज्यातून आम्ही वर चढायला सुरुवात केली.. सध्या मोडलाय पण भक्कम बुरुजांवरून वरून तुझं पूर्वीचे वैभव लक्षात आले.. एक एक पायऱ्या मोजत आणि अनेक वेळा बसत एकदाचे महादरावाज्याजवळ आलो.. काहीतरी १०००-१२०० पायऱ्या झालेल्या.. आणि म्हणे अजून ३००-४०० अजून होत्या..
दरवाज्यात बसलो आणि तुझा भक्कम पणा लक्षात आला.. हत्तीने जरी धडक मारली तरी तुटणार नाहीत इतके भक्कम बुरुज आणि ते लोखंडी खिळ्यांचे प्रवेशद्वार, बर ते सहजासहजी दिसतही नाही, म्हणजे आधीच दुर्गीम असणारा तु, त्यात अजून भक्कम करून टाकलं.. मानलं बुवा त्या हिरोजी इंदुलकर नावाच्या मनुष्याला आणि तुझी निवड करणाऱ्या माझ्या राजाला.. आणि तु ही निवड सार्थ ठरवलीस म्हणून तुझे विशेष कौतुक!!
दारावर मला काही शिल्प कोरलेली आढळली, अर्थात तेव्हा समजली नाहीत ती.. पण तुझ्या सौंदर्यात भर टाकत होती इतकं आठवतंय. आम्ही अजून थोडया पायऱ्या चढून वर गेलो आणि पाहिलं तर पुढच्या पायऱ्या फुट दीड-फुट उंचीच्या.. आता तर आम्ही सपशेल शरणागती पत्करली.. आणि अक्षरशः तुला नमस्कार करत वर चढलो.. दमवलेस रे बाबा!! पण वर गेल्यावर जे समाधान मिळाले ना ते खरंच नाही सांगता येणार.. आणि तुलाही कौतुक वाटत होते की एवढी मुलं आली कुठून..
थोडं पुढे गेल्यावर शिरकाई देवीचं मंदिर लागलं, तिचे आशीर्वाद घेवून आम्ही पुढे चालायला लागलो. तुला बघायची इतकी घाई लागलेली की श्वास घेण्याचीही उसंत आम्ही घेत नव्हतो..अरे हो मध्ये एक हत्ती तलाव पण दिसला.. आई शप्पथ!! तुझ्यावर हत्ती सुद्धा होते हे ऐकून चाटच पडलो.. कसे नेले असतील रे वर??
आमच्या ताई साहेबांनी आम्हाला मग आधी टकमक टोक दाखवायला नेले.. अरे ते कैदी सुद्धा भाग्यवान रे ज्यांना या कड्यावरून ढकललं.. पण तुझे नाव उगाच बदनाम होतं यामुळे.. तुला सांगतो जेवढा सह्याद्री आत्तापर्यंत फिरलो तिथे मला टकमक कड्या सारखी जागा दिसली नाही.. तुझा तो मावस भाऊ, अरे तोच जो माळशेज घाटावर लक्ष ठेवून असतो!! हा!! हरीश्चंद्रगड, त्याचा कोकणकडा म्हणे अजून चांगला आहे.. असेल!! काहीही झालं तरी शेवटी तुझाच भाऊ तो!
त्या टकमक कड्याच्या अगदी टोकावर जाऊन बसलेलो आम्ही.. आता तिथे रेलिंग लावलेत पण तेव्हा नसणार ना?? मग केवढं भयानक वाटत असेल रे.. एकतर खूप उंचावर, त्यात भयानक वारा, आम्हाला तर खाली सुद्धा बघवत नव्हते.. इतकी खोल दरी!! समोर तुझा दुसरा सवंगडी दिसला.. खरं तर २ सवंगडी दिसले.. एक एकदम डाव्या हाताला आणि दुसरा एकदम उजव्या.. आणि मग त्यांनी हळूच त्यांची नावे पण सांगितली.. डाव्या बाजूला जो होता ना त्याचे नाव ‘कोकणदिवा’, आणि दुसरा ‘लिंगाणा’.. सारचं थरारक!! अगदी अंगावर काटा आणणारे.. टकमक वरून हलुच नये असं वाटत होतं.. पण तुला अजून पहायचं होतं.. जड मनानी परत निघालेलो..
तसच परत मागे आलो आणि बाजारपेठेच्या दिशेने निघालो.. मध्येच एक मोकळं मैदान लागलं.. होळीचा माळ म्हणतात ना रे त्याला?? आणि समोर जावून त्या बाजारपेठेसमोर जावून उभे राहिलो.. बापरे!! आणि पुन्हा एकदा हिरोजीना प्रणाम केला!! त्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानांची संख्या ४३ भरली.. एवढी दुकाने होती का रे वर?? असं पण ऐकलं की म्हणे तिथे घोड्यावरून खरेदी करायचे सगळे..!! पण मला एक कळत नाही, अशी खरेदी करण्यामागे कामाची असणारी घाई की घोड्यावरून खाली उतरायचा आळशीपणा?? शिवकालात तर दोन्हीला थारा नव्हता ना?? तुझ्या उत्तरात थोडा क्लू नक्की दे..!! म्हणजे माझं डोकं लावून मी काहीतरी विचार करेन..
बापरे!! खरं तर एकाच पत्रात सगळं संपवणार होतो.. म्हणजे तुलाही वाचायला सोपं आणि बाकीच्या वाचकांना पण बरे पडेल ना.. तुला काही प्रोब्लेम नाही ना, इतरांनी वाचलं तर?? अर्थात नसेलच.. तरी या पत्रात तुझं फारसं कौतुक नाहीच करता आले.. तुझा बाकीचा भाग पण मला लोकांना दाखवायचाय तर मी तुला पुन्हा एकदा असंच सवडीने पत्र लिहिणारे.. सध्या परीक्षेचे दिवस आहेत त्यामुळे एकाच पत्रावर समाधान मानतोय.. राहवत नाहीये पण इथेच थांबतोय.. जमल्यास उत्तर दे, हो कारण तु हल्ली बराच busy असतोस.. बरेच पर्यटक येतात म्हणे!! चांगलं बोलतात ना रे??!! चांगलं वागतात सुद्धा ना?? नसेल तर मला सांग...
बाकी काही विशेष नाही, परीक्षेचा अभ्यास सुरु असल्याने भटकंती बंद ठेवलीये.. नोव्हेंबर नंतर परत चालु करेन.. आणि पुढचं पत्र पण तेव्हाचं टाकेन.. कारण एका पत्रात तुझी स्तुती करण्याची ताकद माझ्यात नाही!! असो!!
कदाचित थोडसं बालिश झालं असेल पत्र, कारण मूळ गाभा हा ८-९ वर्षापूर्वी लिहिलेला आहे.. पण समजून घेशील..
आणि हो महाराजांना माझा नमस्कार सांग, म्हणावे लवकरच येतो मुजरा करायला!!
बाकी इतर अधिक काय लिहिणे.
कळावे,
तुझा मित्र,
ता.क.- इकडे सध्या काही दिवस पाऊस पडायला लागलाय, तिकडे पडतोय का?? आपली दुसरी मैत्रीण कळसुबाई!!, तिच्या कुशीत म्हणे कारवी फुललेली आहे, तर वाघोली खिंडीतली कारवी कधी फुलणारे सांगशील का??
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
धन्यवाद
धन्यवाद