लेक. वेडी बाई. कुठे आणि कशी तयार झाली ही? पाच फूटही उंची नाही, पन्नास किलोही वजन नसावं. ती खरं तर कोणाच्याही मागे सहज लपेल इतकी लहानशी आहे, पण दोनशे जणांच्या जमावातही तिच्या चेहऱ्यावरचं तेज लपत नाही. अथक, अविरत काम. हत्तींचा वेड्यासारखा ध्यास. किती पर्यटन कंपन्यांनी आजवर कोर्टात खेचलंय, लोकांनी जीवे मारायच्या धमक्या दिल्याएत, हत्तींसाठी तिला कायद्याशी कायद्याने लढायला लागलंय, लोकांच्या पारंपारिक समजुतींच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन काम करायला लागलंय... अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता; हिला हत्तीचा. बाकी कोण काय म्हणतंय याने तिला काहीच फरक पडत नाही. ती बोलता बोलता सहज एक म्हणाली, की “You may make enemies on the way; be ready for that, but make friends wherever you can.”
तिचं बोलणं, तिने सांगितलेल्या गोष्टी, स्वतः हत्तींसमोर जाऊन त्यांना झालेल्या जखमा दाखवणं, या सगळ्याबद्दल लिहायचं टाळलं मी. सुरुवातीला सुन्न होऊन आणि मग त्या आठवणीच नकोत म्हणून. पण लेक ने निघताना एक गोष्ट सांगितली होती, की “यावेळी तुम्ही इथे आलात तेव्हा पैशाने आणि कष्टाने मदत केलीत. यापुढेही जर काही करावंसं वाटलं तर give me your voice!” म्हणून हा माझा वाटा...
या हत्तींना सोडवून आणायची वेळा का आली? त्यांचं काय होत होतं? पूर्वी ते कुठे रहायचे आणि का? त्यांचा जन्म कसा झाला होता?
लेक धबधब्यासारखी बोलत होती. सामान्य माणसं तरसाला कधी मांडीवर घेऊन दूध पाजायला बघाल? जंगलातल्या वाघाच्या बछड्याला मांसाचा तुकडा भरवायला धजावाल? मोकळ्या रानटी गेंड्याच्या शिंगाला लटकून फोटो काढायला जाल? नाहीच जायचं! ते वन्य प्राणी आहेत. त्यांना तुम्हाला खावंसं वाटलं पाहिजे, तुम्हाला कुरवाळू द्यावंसं नाही. आणि ते तसं वाटलं नाही, तर काहीतरी गडबड आहे असं नक्की समजा.
हत्ती पाळीव प्राणी नव्हेत, फक्त शाकाहारी आहेत! त्यांनी माणसाची आज्ञा मानणं अजिबात नैसर्गिक नाहीये. का ते अजस्त्र जनावर तुम्हाला त्याच्या पाठीवर बसू देईल? का तुमचं ऐकून सर्कशीत चित्र रंगवेल नि फुटबॉल खेळून दाखवेल? जंगलात अनावर वेगाने धावणारं धूड पाच फुटी माणसाचं ऐकून वहानांच्या रहदारीतून गुमान का फिरेल? सोंडेच्या एका फटक्याने माणसाचा जीव घेऊ शकेल असं जनावर आंगभर रंगरंगोटी करू देतं आणि हत्तीपोळा साजरा करू देतंच कसं?
हत्तींनी माणसाचं ऐकावं, माणसाची मर्जी मानावी म्हणून एक पद्धत असते त्याचा रानटीपणा मोडून काढायची. Breaking the spirit. हत्तींना लहानशा जागेत बांधून ठेवायचं. त्यांना खायला प्यायला द्यायचं नाही. भाल्याच्या टोकाने ओरबाडायचं. आपण सांगू ते काम केलं नाही तर मारायचं. ‘ट्रेनिंग’ द्यायचं मग. ओंडके वाहून नेण्याचं, सर्कशीत नाचण्याचं, चित्र रंगवण्याचं, माणसं पाठीवरून फिरवून आणायचं, भर रस्त्यात डुलत-झुलत चालायचं आणि भीक मागायचं... जगभरातून पैसे मिळतात. हत्तींच्या पाठीवरून फेरी मारून आलं की एखादा खास फोटो फेसबुकवर टाकायचा म्हणून मग त्याच्या सुळ्याला लटकून फोटो काढायचं वेगळं पॅकेज असतं! म्हणजे त्या तीन पैशाच्या तमाशासाठी, १३९ likes साठी, हत्तीला अजून वेगळं ‘ट्रेनिंग’.
असे दोनशे हत्ती दरवर्षी थायलंडमधून चीनमधे पाठवले जातात. बरं, बावीस महिने पोटात वाढणारी जमात एवढ्या प्रचंड संख्येने जन्माला येते कशी? कुठून? ही अजून एक असह्य कथा. हत्तिणींना बांधून ठेवायचं. त्यांचे मागचे दोन पाय फाकवून साखळीने बांधायचे आणि ‘चांगला’ हत्ती आणून forced breeding करायला लावायचं… बरेचदा अशी जबरदस्तीने झालेल्या बाळांना हत्तीण जन्मल्या जन्मल्याच पायाखाली चिरडून मारते -- आपलं झालं ते या पिल्लाचं होऊ नये म्हणून. पिल्लाला जितकं लवकर आईवेगळं कराल तितकं त्याचं ‘ट्रेनिंग’ सोपं जातं. ट्रकमधे घालून सहा सहा महिन्याची पिल्लं न्यायची. कधी पिल्लं आईच्या दुधासाठी वेड्यासारखी ओरडायला लागली की आवाज सहन न होऊन एखादा मालक त्यांना रस्त्यावरचं फॅंटा विकत घेऊन पाजणार! रस्त्यावर पिल्लांना भीक मागायला उभं करायचं, मग असे ऑथेंटिक प्राणी बघायला जगभरातून लोक गोळा होणार. कधीतरी दारू प्यायलेली मुलं रस्त्यावर गोंधळ घालताना अशा पिल्लांनाही येऊन बिअर पाजून जाणार. हीच माणसं, हत्तीवर जीवापाड प्रेम म्हणून हत्तींची चित्र असलेल्या चड्ड्या आपापल्या देशात आशिया खंडाची आठवण म्हणून घेऊन जाणार... आणि यात त्या हत्तीचं सबंध आयुष्य संपणार. फक्त मरण म्हणजे सुटका म्हणावी इतकं त्रासाचं जगणं... नेचर पार्कात सोडवून आणलेले हत्ती अशा कॅंपातून आलेले आहेत.
एक हत्तीण नेचर पार्कात आली तेव्हा पहिले सहा महिने कांगारूसारख्या उड्या मारायची. तीन महिन्याची असल्यापासून तिचे मागचे दोन पाय एकत्र बाधून ठेवलेले होते. तिला सोडवून आणल्यावर साखळ्या काढल्या, पण त्या पायांचं काय करायचं हेच तिला कळेना! दुसरी खाणकामाच्या धंद्यातून सोडवून आणली होती, ती अजूनही उभ्या-उभ्या पायाने यंत्र फिरवल्यासारखं करत रहाते. अंगात भिनवलेली तशी हालचाल ती डोळे मिटूनही करत असते. मग माहुत येतात, पाठीवरून हात फिरवतात आणि ती काही तासांनी दमून शांत होते. एकीचा मणका forced breeding मुळे मोडलाय. तिचा जीव तिच्या परीने सांभाळत फिरते पार्कात. अजून एकीला गायी-म्हशींसारखं पाळलेलं होतं पूर्वी. मालकाचं तिच्यावर प्रेम भारी होतं, पण तिला रोजचं खायला घालायला म्हणून चारा मिळणार कुठून? पार्कात आणली तेव्हा सरासरीहून चारशे किलो कमी वजन होतं तिचं. इथे आल्यावर तीन महिन्यात कशी बाळसेदार झाल्ये ती आता! इथल्या सगळ्यांची गोष्ट थोड्याफार फरकाने सारखीच...
“या प्राण्यांच्या मालकांची गुजराण पर्यटनामुळे होते. हत्तींमुळे गरिबांची पोटं भरतात त्याचं काय? असे हत्ती जंगलात मोकळे सोडले तर अख्खी इंडस्ट्री नाही खराब होणार?” असं लेक ला पुष्कळ लोक विचारतात. पण हत्तींना ओंडके वहायला, त्यांच्या पाठीवर बसायला, जे काही पैसे मिळतात त्याच्या कित्येक पटींनी जास्त पैसे हत्तींना न्हाऊ-खाऊ घालायला, त्यांना आपापसात खेळताना बघायला, त्यांच्याबरोबर (जरा लांबूनच) जंगलात फेरी मारायला लोक आनंदाने देतात! आज लेक चं नेचर पार्क याच जोरावर उभं आहे! अनेक गरीब माहुतांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं पोट इथे भरतंय, प्राणी सुखात नांदतायत आणि लोकांची ये-जा थांबायचं नाव घेत नाही!
“हत्ती केवढातरी प्राणी आहे, त्याला माणसाच्या वजनाचा का त्रास होईल? लटकलो आपण सुळ्याला आणि त्यावर पाय देऊन चढलो पाठीवर तर हत्तीला जाणवायचंही नाही! मग का नाही पाठीवरून फेरी मारायची?” असं विचारतात खूप जण. खरंय. तेव्हा आपल्या एका फोटोसमोर या गोष्टी नाही बाधक वाटत, पण बिघडलं हेच की जे विकतंय तेच पिकवलं जातंय! माणसाहून जास्त वजन हत्ती स्वतः पाठीवर खेळवतो, पण त्याच्या मर्जीविरुद्ध वागायला लावताना त्याला जे ‘ट्रेनिंग’ सहन करायला लागतं ते बिघडलं. “हत्ती सजवले-रंगवले तर ते प्रेमापोटीच केलं ना?” अगदी खरं, पण सजवलेल्या हत्तीच्या डोळ्यात फक्त भीती दिसत्ये, हे बिघडलं...
हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करणं, गुरं-माणसं त्यापासून वाचवणं, बचावासाठी त्याला काबूत ठेवणं ही झाली एक गोष्ट. पण आपली करमणूक म्हणून मुद्दाम प्राणी जन्माला घालायला लावायचे आणि त्यांचे हे हाल होऊ द्यायचे? आज मी हे हत्तींबद्दल म्हणत्ये, पण वाघ-सिंह आणि इतर बऱ्याच जंगली प्राण्यांचे फक्त माणसाचं मन रमायला हवं म्हणून जगभर असेच हाल चालू आहेत. कुठेतरी आपण विकत घेतो तो experience नक्की कुठून येतोय, त्यात किती जीवांचा हातभार लागलाय या जाणिवेची नाळ तुटत चालली आहे हे बिघडलं...
लेक ने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवून पुन्हा लिहायला नकोशा वाटल्या तरी तिला आम्ही वचन देऊन आलोय, की शक्य तितक्या लोकांपर्यंत हे सगळं आमच्या परीने पोचवण्याचा प्रयत्न करू. तिचं बोलणं ऐकता ऐकता रडू आवरेना, तेव्हा ती हात हातात घेऊन म्हणाली, “अगं पैसे देऊन हत्तींचं शेण उचलायला आलात तुम्ही. इतक्या आपुलकीने त्यांचं सगळं करायला मागताय, मग तुमच्यासारख्यांनीच हताश होऊन हातपाय गाळले तर कोण मांडणार सांग यांचं म्हणणं? तुमच्या हातून होईल ती प्रत्येक मदत प्रत्येक प्राण्यासाठी महत्त्वाची आहे! लोक दुष्ट नाहीत, अजाण आहेत. आपण शक्य तेवढं करत रहायचं हेच खरं.”
तिने हात हातात घेतला तेव्हापासून तिची तीन बोटं माझ्या हातावर उमटल्यासारखी वाटताएत उगाच... खारीच्या पाठीवर असतात तशी! लेककडे बघून कुसुमाग्रज आठवतात सारखे...
सर्वात मधुर स्वर,
ना मैफलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा
ना सागराचा, ना कूजनाचा
ना आमंत्रक ओठातील हसण्याचा
सर्वात मधुर स्वर
कुठे तरी, कोणाच्या तरी
मनगटावरील शृंखला खळाखळा तुटण्याचा.
-----------------
क्रमश:
आईग्गं!! डोळ्यात पाणी आलं
आईग्गं!! डोळ्यात पाणी आलं खरंच. किती भयंकर वागवतात प्राण्यांना!
तुझं खूप कौतुक आहे, अर्निका, तुझ्या या काँट्रिब्युशनबद्दल.
खुपच लागला आहे हा लेख मनाला.
खुपच लागला आहे हा लेख मनाला.
(No subject)
हाही भाग सुंदर उतरलाय. लेकचा
हाही भाग सुंदर उतरलाय. लेकचा संदेश पूरेपूर पोचतोय.
अर्निका, दोनवेळा प्रकाशित
अर्निका, दोनवेळा प्रकाशित झाला आहे हा भाग.
डोळ्यात पाणी आलं . तुझं खूप
डोळ्यात पाणी आलं . तुझं खूप खूप कौतुक
अगदीच वाचवत नाहीये.
अगदीच वाचवत नाहीये.
बापरे.. किती त्रास
बापरे.. किती त्रास
आशियाई हत्तीचे प्रेमळ असणेच
आशियाई हत्तीचे प्रेमळ असणेच त्याच्या मूळावर आले. किती पूर्वापार वापर करतोय आपण त्याचा.
आफ्रिकन हत्ती अजिबात माणसाळत नाहीत, पण तसा त्यांचा माणसाशी संघर्षही नसतो. उलट ते माणसाच्या उपयोगीच पडतात. ( केनयातील वाळवंटात पाणी शोधून देतात ते आणि त्या बद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्यासाठी मुद्दाम पाणपोया राखतात माणसे ) पुर्वी तिथे त्यांची हस्तिदंतासाठी खुप शिकार होत असे. त्या हत्तींचे सुळेही आकाराने खुप मोठे असतात. पण त्यावर केनयातील लोकांनी बंदी आणली. १९९३ साली त्याचा सर्व साठा जाळून टाकला आणि त्यानंतर त्याचा व्यापार होऊ दिला नाही. इथेही पर्यटकांना ते ( लांबूनच ) दाखवले जातात.
सुरेख लिखाण! तुमची तळमळ अगदी
सुरेख लिखाण! तुमची तळमळ अगदी इथे पोहोचतिये. वाचताना शहारा येतो.
कुसुमाग्रजांची किती समर्पक कविता!
दिनेश, खरंय. ते आफ्रिकेतले
दिनेश, खरंय. ते आफ्रिकेतले हत्ती तिथे वेगळं मरण मरताएत पण... हस्तिदंतासाठी शिकार अजूनही चालूच आहे त्यांची काही भागात. एक तृतियांश सुळा जबड्यात लपलेला असतो त्यामुळे सुळा हवा असेल तर हत्ती मारावा लागतो. आणि हत्ती किंवा बाकी वन्य प्राणी लांबूनच बघावेत. ते त्यांच्या त्यांच्या गोतावळ्यात वाढता-वागताना बघायला जी मजा येते ती बाकी कुठेच नाही!
धन्यवाद मंडळी... खरंच नाही आठवावंसं वाटत हे सगळं पुन्हा. आणि नेमका हाच भाग चुकून दोनदा प्रकाशित झालाय बहुतेक इथे. डिलीट करता येतो का?
निनाद, या गोष्टी तिथे असतानाच्या आहेत आणि तेव्हा लिहिल्या त्यात काही फेरफार न करताच इथेही लिहित्ये तीच डायरी. पुढच्या भागात निघताना लिहिलेली सगळी माहिती आणि उरल्या सुरल्या गोष्टीही येतीलच. तुम्ही दिलेल्या संस्थेबद्दल लगेच जाऊन वाचलं. तिथेही जाऊन यायला हवं!
हस्तिदन्ताची तस्करी
हस्तिदन्ताची तस्करी थांबवनण्यासाठी नविन क्लुप्ति...https://www.savetherhino.org/rhino_info/thorny_issues/dyeing_rhino_horn_...
खरच तुझी तळमळ कळकळ पोचते आहे
खरच तुझी तळमळ कळकळ पोचते आहे लिखाणातून. लेक चा संदेश अगदी नीट मिळतो आहे.
काय भयंकर आहे हे..
काय भयंकर आहे हे..
खरच तुझी तळमळ कळकळ पोचते आहे
खरच तुझी तळमळ कळकळ पोचते आहे लिखाणातून. लेक चा संदेश अगदी नीट मिळतो आहे. >>> +१
अगदी मनापासुन लिहिल्याच कळतय.
अगदी मनापासुन लिहिल्याच कळतय.
बापरे, डोळ्यात पाणी आलं,
बापरे, डोळ्यात पाणी आलं, अंगावर काटा आला वाचताना. शेवट सुरेख कवितेने केलाय, मनाला भिडला.
लेक फार ग्रेट आणि ही तळमळ ह्या लेखातून पोचवणारी तुही ग्रेट.
>> खरच तुझी तळमळ कळकळ पोचते
>> खरच तुझी तळमळ कळकळ पोचते आहे लिखाणातून. लेक चा संदेश अगदी नीट मिळतो आहे
+१
लकचा हा विचारही खूप महत्वाचा .. "वाईट कोणीच नसतं, अजाण असतात"
फार सुरेख भाग! लेकची हाक
फार सुरेख भाग! लेकची हाक आमच्या सर्वांपर्यंत तुझ्या माध्यमातून पोचली!
खूप अस्वस्थ होतेय
खूप अस्वस्थ होतेय वाचुन..
forced breeding?? विश्वासच बसला नाही एक क्षणभर..
खरच तुझी तळमळ कळकळ पोचते आहे लिखाणातून. लेक चा संदेश अगदी नीट मिळतो आहे. >>> +११
सर्वच भाग छान लिहीले आहेत.
सर्वच भाग छान लिहीले आहेत. तुझी तळ्मळ पोचली गं. माणसाने स्वार्थी होउन निसर्गाची हानी केली आहे. अॅनीमल क्रुएल्टीचे लेख वाचताना फार वाईट वाटतं. रस्त्यावरच्या जखमी कुत्र्या- मांजरांची सेवा करणारे आमचे शेजारी काका आठवतात अशा वेळी आणि बरे वाटते.
हिमू, हा उपायही लागू पडत
हिमू, हा उपायही लागू पडत नाहीये फारसा. आधी सुळे रंगवूच देत नाहीत हत्ती (का देतील म्हणा), आणि त्यांना बेशुद्ध करून तसं करायचं झालं तर त्यांच्या पूर्ण कळपातले बाकी हत्तीही बिथरतात असं सांगत होता लेक चा नवरा. शिवाय अवाजवी खर्च होतो, आणि एवढं करून पुढे रंगीत सुळे फॅशनेबल होणार नाहीत याची काय्येक खात्री नाही! माणसाच्या मागणीत आणि वागण्यात बदल होणं हाच उपाय आहे. लहान मुलांना तरी या सगळ्याचं खरं महत्त्व, वनसंपत्तीची खरी किंमत आपण शिकवली तरच हे हळुहळू बंद होईल... कारण हस्तिदंताला किंमत तरी का आहे? आपण मोजतो म्हणून... त्यांच्या शेपटीचे केस, गेंड्याची शिंग... सगळ्याची गोष्ट तीच!
छान
छान