तर्कजिज्ञासा: विलोम परिणाम अर्थात काउंटर इंट्यूटीव्ह (Counter intuitive)

Submitted by निकीत on 9 December, 2015 - 21:03

आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना कधी कधी आपल्या "इंट्यूशन" च्या किंवा "गट फ़ीलींगच्या" अगदी विरोधी घडतात किंवा त्या घडल्यावर त्याचे बरेच अनपेक्षित परिणाम (अनइंटेण्डेड कोन्सिक्वेन्सेस) दिसून येतात. अशा काही रोचक काउंटर इंट्यूटीव्ह गोष्टींची उदाहरणे इथे देत आहे.

१. पाळणाघरात लेट फी लावावी का ?
हे उदाहरण अनेकांनी "फ़्रीकॉनॉमिक्स" या पुस्तकात वाचले असेल. इस्त्राईल मधील काही पाळणाघरांची ही गोष्ट. या पाळणाघरांची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी होती. पण अनेक पालक त्यांच्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी उशीराने येत असत. काहींसाठी तर ६ वगैरे अगदी नेहेमीचीच वेळ असे. पाळणाघरातील कर्मचारी या बेशिस्तीने जाम वैतागले होते. त्यामुळे त्यांनी ठरवले की उशीराने यॆणार्या पालकांना दंड आकारायचा. त्याप्रमाणे त्यांनी दर अर्धा तास उशिरासाठी ५ डॉलर दंड आकारायला सुरुवात केली. त्यांना वाटले दंड भरायला लागू नये म्हणून सर्व पालक वेळेवर येऊ लागतील. पण झाले उलटेच. आधीपेक्षा जास्त पालक उशीरा येऊ लागले आणि राजीखुशी दंड भरू लागले !

freakonomics 1.jpg

तर असे का झाले असावे ? याचं उत्तर इंसेण्टिव्ह थियरी मध्ये दडलेलं आहे. दंड करण्याआधी उशीरा येणाऱ्या पालकांवर एक दडपण असे - की पाळणाघारतील कर्मचारी त्यांचा चांगुलपणा म्हणून आपल्या पोरांना उशीर झाला तरी सांभाळतात. या "मोरल इंसेण्टिव्ह" मुळे थोडेच पालक उशीरा येत असत. पण पाळणाघराने मात्र दंड लावून या " मॉरल इंसेण्टिव्ह" च्या जागी आर्थिक किंवा "इकॉनॉमिक इंसेण्टिव्ह" आणला. आपण पैसे मोजतोय म्हणजे उशीराने जाणं हा आपला हक्क आहे अशी पालकांची समजूत झाली आणि आधी जे उशीराने येत नव्हते ते देखील उशिराने येऊ लागले. या अनपेक्षित परिणामामुळे, पाळणाघराने हा दंड बंद केला - म्हणजे पूर्वीचा "मॉरल इंसेण्टिव्ह" चालेल असे त्यांना वाटले. पण त्याने काही फ़रक पडला नाही - कारण उशीराने आलेले चालते हा एव्हाना एक "सोशल नॉर्म" बनून गेला होता.


२. साप पकडणाऱ्याला इनाम

केरळमधील एका खेड्यात काही कारणाने सापांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे सर्पदंशाने जखमी किंवा मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या देखील बरीच वाढली. आता या सापांची संख्या कमी कशी करायची यावर काही स्थानिक नेत्यांनी एका शक्कल लढविली. त्यांनी साप पकडून आणणाऱ्याला दोन रुपये बक्षीस द्यायचे ठरविले. आणि काय आश्चर्य ? ताबडतोब लोकांनी साप पकडून आणण्याचा धडाकाच लावला. हा हा म्हणता शेकडो साप ग्रामपंचायतीत आणून लोकांनी मारले आणि दर सापामागे दोन-दोन रुपये वसूल केले. आता एव्हढे पैसे वाटल्यावर ग्रामपंचायतीकडील पैसे संपले. स्थानिक नेत्यांनाही वाटले लोकांनी एव्हढे साप पकडले त्यामुळे ही समस्या आता दूर झाली असेल. त्यामुळे त्यांनी बक्षीस देणे बंद केले. आणि अहो आश्चर्य ! लगेचच सापांची संख्या आधी होती त्यापेक्षा वाढली !

snakecharmers.jpg

तर असे का झाले असावे ? याचं उत्तरही इंसेण्टिव्ह थियरीतच दडलेलं आहे. दोन रुपये मिळतायत म्हणून अनेक लोकांनी आपापल्या घरात साप पाळण्यास आणि त्यांची पैदास करण्यास सुरुवात केली ! पण बक्षीस देणे बंद केल्यावर मात्र ही सापांची पैदास अर्थात परवडेनाशी झाली. मग या लोकांनी हे साप दिले सोडुन आणि सापांची संख्या आधीपेक्षाही वाढली. थोडक्यात कोणत्याही धोरणाची अंमलबजावणी करताना त्याचे मॉनिटरींग आणि ईव्हॅल्युएशन आवश्यक ठरते.

३. स्मार्ट एसी लगाओ… बिजली बचाओ
काही वर्षांपूर्वी कॅलिफोर्निया मधील वीज कंपन्यांनी ऊर्जा बचतीसाठी एक नवीन प्रोग्रॅम सुरु केला. यात तुमच्या घरातील विजेची उपकरणे तुम्ही इंटरनेटवरून ऑन / ऑफ करू शकता (स्मार्ट अप्लायन्स) अशी सोय काही ग्राहकांना करून देण्यात आली. ह्याचा उद्देश असा की ग्राहक वीजेच्या वापरा बाबत अधिक जागरूक होतील, इंटरनेटवरून घरातील कोणती उपकरणे चालू आहेत याचा अंदाज घेतील आणि घराबाहेर असताना जर काही उपकरणे चालू राहिली असतील तर ती बंद करू शकतील. या सर्वांमुळे वीज वाचेल आणि कंपन्याना महागडी वीज बाहेरील राज्यांकडून विकत घ्यावी लागणार नाही अशी अपेक्षा होती. जुलै - ऑगस्टच्या कडक उन्हाळ्यात हा प्रोग्रॅम सुरु केला. आणि अहो आश्चर्य! पहिल्या महिन्यातच वीजेचा वापर कमी होण्याऐवजी वाढलाच !

AIR-CONDITIONING.jpg

तर असे का झाले असावे? कडक उन्हाळ्यामुळे घर गार करून ठेवण्यसाठी, लोक जेव्हा ऑफिस मधून निघत तेव्हाच इंटरनेटवरून एसी ऑन करून ठेवत असत. घरी येण्यासाठी लागणाऱ्या पाऊण ते एक तासात घर छान गार होत असे ! एरवी याच लोकांनी एसी घरी परत आल्यावर लावला असता पण या प्रोग्रॅम मुळे एसीचा वापर सुमारे एक तासाने वाढला आणि पर्यायाने वीजवापरही वाढलाच !

४. विमानांची दुरुस्ती कुठे करायची ?
हे उदाहरण दुसऱ्या महायुद्धातील आहे आणि बऱ्याच जणांना माहिती असेल. जर्मनीवर बॉम्बहल्ले करून जी ब्रिटीश विमाने परत येत असत त्यांना अनेक ठिकाणी विमानभेदी बंदुकांनी मारलेल्या गोळ्या लागलेल्या असत. तर या विमानांची दुरुस्ती नेमकी कशी करायची आणि कुठे अजून स्टील वापरून ती रीइन्फ़ोर्स करायची हा प्रश्न रॉयल एअर फोर्सला पडला होता. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ एब्राहम वाल्डला पाचारण केले. वाल्डसाहेबांनी या सर्व परतून आलेल्या विमानांचा अभ्यास केला आणि आपले उपाय सांगितले. त्यांनी सांगितले की ज्या भागाला गोळ्या लागल्या आहेत ते रीइन्फ़ोर्स कराच पण ज्या भागांना लागलेल्या नाहीत ते अधिक क्षमतेने रीइन्फ़ोर्स करा !

plane-bullet-holes1.jpg

असे का ? तर ही गोळ्या लागलेली विमाने सुखरूप परतली होती. म्हणजे ज्या भागांवर गोळ्या लागल्या होत्या ते भाग अजूनही उडण्यायोग्य होते. म्हणजे जी विमाने कोसळली असतील ती कदाचित उरलेल्या भागांवर गोळ्या लागल्यामुळेच कोसळलेली असण्याची शक्यता आहे. म्हणूनच ते भाग (परतलेल्या विमानांचे गोळ्या न लागलेले भाग) अधिक रीइन्फ़ोर्स करा !

५. ट्रॅफ़िक जाम होत आहे ? नवीन रस्ते बांधा !

maxresdefault.jpg

अशी कल्पना करा की आपण आपल्या घरातून ऑफिसला आपल्या खाजगी वाहनातून चाललो आहोत. खालच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे घर म्हणजे बिंदू "START" आणि ऑफिस म्हणजे बिंदू "END". म्हणजेच ऑफिसला जायला आपल्याला दोन रस्ते आहेत - एक जातो "A" मार्गे आणि दुसरा जातो "B" मार्गे. पण ह्या दोन्ही रस्त्यांवर एकेक चिंचोळा भाग आहे (START ते A, अणि B ते END हे चिंचोळे भाग). हे चिंचोळे रस्ते पार करायला लागणारा वेळ हा ट्रॅफिक वर अवलंबून आहे; रस्त्यावर असणारी वाहने जर T इतकी असतील तर T भागिले १०० इतकी मिनिटे लागतात. दुसरा रस्ता पार करायला ४५ मिनिटे लागतात (कितीही ट्रॅफिक असला तरी). आता कल्पना करा आपल्यासारखेच इतर ४००० जण एकाच वेळी निघतात - तर घरापासून ऑफिसला पोचायला किती वेळ लागेल ? दोन्ही रस्त्यांवरून सारखाच वेळ लागत असल्याने निम्मे (२०००) जातील A मार्गे आणि निम्मे (उरलेले २०००) B मार्गे. म्हणजे ६५ मिनिटे लागतील. (४५ + २०००/१०० = ६५). आता हा वेळ वाचविण्यासाठी महानगरपालीकेने A ते B जोडणारा एका रस्ता बांधला. या रस्त्यावरून A ते B हे अंतर जायला काहीही वेळा लागत नाही (शून्य मिनिटे). आता ह्या नवीन रस्त्यामुळे ऑफिसला जायचा वेळ वाचला का ? नाही. उलट, वाढला ! ज्या अंतरासाठी ६५ मिनिटे लागायची त्यालाच आता ८० मिनिटे लागू लागली !

750px-Braess_paradox_road_example.svg_.png

स्त्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Braess%27_paradox#/media/File:Braess_parad...
असे का झाले ? तर घरून निघणारा माणूस विचार करणार की सर्वच्या सर्व ४००० लोक जरी START पासून A ला चिंचोळ्या रस्त्यावरून गेले, तरी वेळ लागणार जास्तीत जास्त ४० मिनिटे (४०००/१००). त्यामुळे ४५ मिनिटांच्या रस्त्यावरून कोणीही जाणार नाही. तसेच, A पाशी पोहोचल्यावर सर्वच जण नवीन रस्त्यावरून B मार्गे जाणार कारण त्या रस्त्यावरूनही जास्तीत जास्त ४० मिनिटे लागणार. म्हणजेच एकूण वेळ = ८० मिनिटे ! या सगळ्यात जर एखादा ४५ मिनिटांच्या रस्त्यावरून जरी गेला तरी त्याला वेळ लागणार ८५ मिनीटे; कारण उरलेले ३९९९ लोक चिंचोळ्या रस्त्यावरूनच जाणार ! ह्याला ब्रेस पॅराडॉक्स (Braess' Paradox) म्हणतात. कोरिया, न्युयॉर्क अशा अनेक ठिकाणी नवीन रस्त्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जामची उदाहरणे आहेत.


६. मायबोलीवर निघणाऱ्या धाग्यांना काही निर्बंध असावेत का ? असल्यास काय ?

या प्रश्नावर आमचा विचार चालू होता पण फारच काउंटर इंट्यूटिव्ह उत्तरे येऊ लागल्याने प्रश्नच बाद करण्यात आला आहे Happy

तुमच्या क्षेत्रामधील अशी इंटेरेस्टिंग काउंटर इंट्यूटिव्ह गोष्टींची उदाहरणे काय आहेत ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कचर्‍यातून कला" साठी घरी खास सामान आणून त्याचा कचरा करणे हे क्लासिक उदाहरण असेल. पुन्हा ते चिप्स वा वेफर्स खाऊन मुले ओव्हरवेट व्हायला मदत हा बोनस !

इथे अमेरिकेत टॉयलेट ला फ्लश असतो त्यातून दरवेळी ठराविक लिटर्स पाणी जात असते. नवे फ्लश इको फ्रेंडली म्हणून कमी पाणी सोडतात. पण मग लोक दोनदोनदा फ्लश करून इको फ्रेंडली प्रयत्नावर अक्षरशः पाणी ओतताअत.

एका व्यक्तीने पी एम पी एम एल या प्रवासी वहातुक करणार्‍या सार्वजनीक संस्थेला माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती विचारली होती जी काही वस्तु खरेदी संदर्भात होती.

संबंधीत अधिकार्‍याने ही माहिती दिली नाही म्हणुन त्याला काही हजार रुपयांचा दंड करण्यात आला. हा दंड भरल्यावरही ती माहिती त्या व्यक्तीला मिळाली अथवा नाही याबाबत निश्चित माहिती नाही.

काही जणांकडुन असे समजले की त्या वस्तुच्या खरेदीत काही कोटींचा घोटाळा होता. वस्तु पुरवठा करणार्‍याने ही माहिती दडवायला सांगीतले तसेच दंडाची रक्कम सुध्दा त्यानेच भरली.

भारतात असे घोटाळे उघड झाले की संबंधीतांचे पेन्शन रद्द करण्याचे प्रावधान आहे. पण घोटाळे माहितीच्या कायद्याने सुध्दा उघड होत नाहीत. या उलट माहितीचा अधिकार आल्यापासुन चर्चा अशी आहे की खरेदी टेंडर मध्ये खरेदी करणारे अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन याची हमी देऊन गैरव्यवहार ठरवले जातात.

असेच सेन्सर ने हात खाली धरल्यावर आपोआप चालू होणारे आणि ऑटो स्टॉप नळांचे पण. हे एअर पोर्ट वर असतात.आमच्या कँटिन मध्ये आहेत. कोणाकडून नळ चालू राहून पाणी वाया जात राहू नये हा मुख्य उद्देश. पण त्यामुळे ज्यांचे हात खराब नाहीत आणि जे काट्या चमच्यानेच खातात ते लोक पण तितका वेळ पडणारे पाणी वापरुनच हात धुतात,एरवी त्यांनी लवकर नळ बंद केले असते.

पाणी ओतून देणार्‍यांनी ते झाडाच्या कुंडीत ओतावं. >> अगं, कुंड्यांची संख्या अशी कितीक असणार? झाडांना घालून सुद्धा भरपूर उरेल असा साठा करतात लोक.
कप धुण्याचं तर आहेच, पण भांडी घासणार्‍या बायकासुद्धा अनेकदा सांगूनही फुल्लं नळ सोडतात.

पण माझा मुद्दा वेगळा होता. मी फक्त शहराबद्दल नाही म्हणत. बर्‍याच ठिकाणी, खेडेगावात, जिथे ५-६ दिवस पाणी येत नाही, तिथे पाणी आलं की शिळं (?) पाणी ओतून देतात आणि ताजं भरतात.
तर असं ५-६ दिवसांनी पाणी सोडून पाणी कपात करण्यापेक्षा रोज १५मि./अर्धा तास सोडल तर जास्त पाणी वाचेल का? असं विचारायच होतं.

ऑटो स्टॉप नळांचे पण. >> हो. आमच्या कँटिन मध्ये आहेत.ऑटो स्टॉप वाले. या नळांमुळे मिनिमम लिटर पाणी वाया जातेच. जे अदरवाईज गेले नसते.

पिंपळे सौदागर शिवार गार्डन चौक ते नाशिक फाटा रस्ता हा सर्व ३-४ किलोमीटरचा पट्टाच काऊंटर इन्ट्युटिव्ह चे योग्य उदाहरण आहे. बसेस ना यु टर्न घ्यायला सोपे पडावे म्हणून अगदी मोठे मोठे गोल राऊंड अबाउट सगळीकडे उभारले. वस्ती आणि रहदारी वाढल्यावर लोकांचे हाल व्हायला लागले. आता सर्व राउंड अबाउट एक एक करुन पाडून छोटे गोल करणं चालू आहे. हे राउंड अबाउट सुरुवातीला करायला आलेला खर्च, नंतर त्याचा मोठा वाटणारा भाग पाडायला आलेला खर्च, जमिनीला असलेला खड्डा बुजवायला आलेला खर्च हे सर्व प्लॅनर च्या सुरुवातीच्या विचाराच्या सर्व उलटे झाल्याचे प्रतिक आहेत. चार मोठे राउंड अबाउट फोडले आहेत.

मि_अनु >> +१ खरंच ते राउंड एव्हढे मोठे कारायची काय गरज होती ?

आणि त्यातल्या गोविंद गार्ड्न ते नाशिक फाटा ब्रिज या छोट्या पॅच मध्ये तब्बल ५ (येतांना ६) सिग्नल्स आहेत. आणि त्यावरून जाणार्‍या बिआर.टी बसेसची फ्रिक्वेन्सी काय? एकमेव बस 'भोसरी ते हिंजवडी' जाते तिथून. तेवढ्या करता इतके सिग्नल्स आणि ट्रॅफिक जाम.
खरतर बिआर.टी बस आली की बिआर.टी सिग्नल अ‍ॅक्टिवेट होईल अशी काहीतरी सोय पाहिजे, यु एस मध्ये पादचार्‍यांना असते तशी. पण त्यातूनही अजून काहीतरी Counter intuitive घडायच Wink

भोसरी हिंजवडी ३२४ ची फ्रीक्वेन्सी वाढवणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळेत खूप गर्दी होते. ती बस खूप ग्रेट आहे कारण विश्वशांती कॉलनी,गोविंद यशदा चौक, कोकणे चौक या स्टॉप ना ती एकमेव बस आहे. ३३२ इ.इ. काटे झिंजुडे मळा(स्वराज्य गार्डन) वरुन जातात. (अवांतर माझे पुरे..बॅक टु काउंटर इन्ट्युटिव्ह)

मुंबईतल्या पादचारी भुयारी मार्गाचे उदाहरण द्यायला हवे. चर्चगेटचा भुयारी मार्ग पुर्वी इशियाटीक ते स्टेशन एवढाच होता. मग तो वाढवला, पण आता तो बहुतांशी फेरीवाल्यांनीच व्यापलेला असतो. बहुतेक जण तो टाळून रस्ताच क्रॉस करतात. आणि पुर्वी जो भाग वापरात होता, तोही आता टाळला जातोय.
सायनचा मात्र बर्‍यापैकी वापरात आहे.

( हे उदाहरण चालेला का, चांगल्याच ओळखीचे आहे आपल्या. नक्को म्हणालो तरी रोज काढत राहतात.. मायबोलीवरचे धागे हो. )

वाचले सर्व, इन्टरेस्टिंग आहे. विचार करायला लावते आहे.
मला विमानदुरुस्तीचे उदाहरण फारच आवडले.

शेवटचा सहाव्वा प्रश्न...... करायची का चर्चा स्वतंत्र धाग्यावर?

निकित. - उत्तम धागा व उदाहरणे. नविन सिद्धांताची माहिती मिळाली. धन्यवाद.

पण याला शीर्षक काउंटर इंट्युटिव च्या जागी काउंटर प्रॉडक्टिव हे योग्य आहे. मग मराठीत त्याचे वर म्हणल्याप्रमाणे " करायला गेलो एक" असे होइल.

काउंटर इंट्युटीव म्हणजे पूर्वी पृथ्वी सपाट असल्याचा समज (कारण आपल्याला ती दिसते सपाटच) पण खरे पहाता ती गोल असणे, किंवा सुर्य पृथ्वीभोवती फिरताना दिसणे पण प्रत्यक्ष सत्य उलट असणे. आपल्याला झालेला भास किंवा समज याच्या विरूद्ध परिस्थिती असणे.

काउंटर प्रॉडक्टिव मधे तुम्ही दिलेली उदाहरणे. करायला गेले विजेची बचत, पण झाले उलटेच.

मस्त विषय. चर्चाही रंजक आहे.
काऊंटर इंट्यूटिव्हचे एक उदाहरण नेहमी अॉफिसमधे पाहायला मिळते ते हे की - काम लवकर व्हावे यासाठी काही अडलं, गरज पडली तर मला विचार असं आपण सांगतो. मदत करून प्रश्न सोडवतोही बरेचदा. याची सवय होऊन लोक स्वत: प्रश्न सोडवण्याऐवजी प्रश्न पडला की लगेच आपल्यावर सोपवून मोकळे होतात. आपले काम बाजूलाच राहते. वेळही जास्त लागतो आणि ती व्यक्ती यातून काहीच शिकत नाही.

नीटपणे समजुन घेऊन वाचला पाहिजे, इंटरेस्टिंग आहे.
<<
यावर हातभर नेहेमीची ब्रिगेडी कम्युनिस्ट इ. पोस्ट येणे हे काउंटरप्रॉडक्टिव्हचे उत्तम उदाहरण होईल Wink

.

धन्यवाद. शीर्षकात बदल केला आहे.
"करायला गेलो एक..." मध्ये एक विनोदी / मिश्किल झालर आहे ती पूर्णपणे भावली नाही.
काउंटर प्रॉडक्तिव्ह मध्ये उदाहरण क्र. ४ तसेच प्रतिसादातील काही उदाहरणे बसत नाहीत . तसेच अनेक तर्कविलोम (काउंटर इंट्यूटीव्ह लॉजिक) घटना ह्या काउंटर प्रॉडक्टीव्ह असतीलच असे नाही.

वर दिलेली बरीच उदाहरणं डेव्हलपमेंट/टेस्टिंग च्या 'रिग्रेशन' या कल्पनेशी जास्त चांगली जुळणारी आहेत.

इतरत्र काहीतरी वाचतांना हे आठवलं..

भरपगारी प्रसुती रजा आता साडेसहा महिने होणार

इथे या निर्णयामुळे महिलांचे सबलीकरण होण्याऐवजी कंपन्या स्त्री कर्मचार्‍यांना घेणे अधिकाधिक टाळतील असे वाटते.

आधीच प्रायवेट सेक्टरमध्ये मुलींना आणायची-सोडायची जबाबदारी कंपन्यांवर टाकलेली आहे. उशीरा थांबवलेले चालत नाही. मुलांना-पुरुषांना कसंही ओरडलं तरी मॅनेजरला त्रास होण्याची शक्यता शून्य. मात्र बायकांशी वागताना फारच सांभाळून बोलावं लागतं. आता सहासाडेसहा महिने भरपगारी सुटी देण्यापेक्षा त्या पदावर पुरुष असलेले नक्कीच उत्तम. (हे इतर कुठुनतरी घेतलेलं आहे) असा विचार केला जाण्याची शक्यता खुप वाटते.

यालाच कोब्रा इफेक्ट म्हणतात असेही कळले.

छान धागा आहे.
सुरुवातीला दिलेला पाळणाघरात लेट फी सारखं प्रकरण मी लायब्ररी मध्ये होताना पहिले आहे. त्या लायब्ररीत ठराविक दिवसानंतर दर एका दिवशी एक रुपया 'दंड' म्हणून आकारला जात असे.
एक रुपया हि किंमत बऱ्यापैकी कमी असल्याने लोकं ती 'दंड' एवजी 'भाडे' समजून बिनधास्तपणे पुस्तके वापरत.
हि रक्कम जास्त असती तर प्रयोग यशस्वी झाला असता असे मला वाटते..

छान धागा आहे.
मूळ उदाहरणे चांगली दिली आहेत आणि प्रतिसाद सुद्धा चांगले आहेत.

Pages