ना सहिष्णु ना असहिष्णु --- केवळ सकारात्मक

Submitted by सुमुक्ता on 3 December, 2015 - 08:53

सहिष्णुता --- असहिष्णुता वरून सध्या जे रान माजते आहे. मी ठरविले होते की ह्या विषयावर लिहायचे नाही पण आता राहवत नाही. भारतात असहिष्णुता वाढत आहे असे कोणी म्हटले की फार वाईट वाटते. कारण हे नाही की येथे असहिष्णुता नाहीच आहे. कारण हे आहे की समाजात असे कित्येक लोकं आहेत ज्यांना समाज आपल्यासाठी जबाबदार आहे असे वाटत असते. पण आपण समाजासाठी जबाबदार आहोत असे वाटतच नाही.

मी जगातील तीन खंडामध्ये राहिलेले आणि काम केलेले आहे. आणि मी ठामपणे हे सांगू शकते की जगात असा कोणताही देश नाही…. खरोखरच कोणताही देश नाही……जिथे इतक्या सगळ्या धर्मांना, जातीजमातींना, संस्कृतींना इतक्या सहजपणे सामावून घेतले जाते. अगदी छोटेसे उदाहरण हवे असेल तर: आपल्याकडे दिवाळी, ख्रिसमस, ईद, महावीर जयंती, इत्यादी सणांना राष्ट्रीय सुट्टी असते. त्याशिवाय प्रत्येक राज्यात त्या त्या संस्कृतींप्रमाणे सुट्ट्या मिळतात. अशाप्रकारे सर्व नागरिकांना त्यांचे महत्वाचे सण / दिवस साजरे करण्याची मुभा मिळते. भारत देश ही गोष्ट गेली कित्येक वर्षे करत आलेला आहे. मला तरी भारताव्यतिरिक्त असा एकही देश माहित नाही जो इतका सर्वसमावेशक आहे. हे झाले अगदी छोटेसे उदाहरण. जर खुल्या मनाने आणि सकारात्मकतेने विचार केला तर आपल्याला हे जाणवेल की आपण अतिशय नशीबवान आहोत की आपल्याला आपल्या परंपरा मोकळेपणाने, कसलेही भय न बाळगता पाळता येतात. आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आणि खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष देशाचा एक भाग आहोत.

भारतात अन्याय आणि अत्याचार होतात हे मी कधीच नाकारत नाही. पण ते कुठे होत नाहीत? जिथे अन्याय आणि अत्याचार होत नाहीत अशा एका तरी देशाचे नाव आपल्याला घेता येईल का? अत्याचार सर्व जगभर होतात आणि त्यांना जबाबदार कोणी एक राजकीय पक्ष अथवा कोणी एक देश नाही. संपूर्ण मानवजात ह्या क्रूरकृत्यांना जबाबदार आहे. खरेतर आपण सर्वांनीच हे क्रौर्य दूर करण्यासाठी एक झाले पाहिजे. पण ही जबाबदारी कोणाला हवी आहे? आपण स्वत:ला केवळ पटवत आहोत की आपण किती निष्पाप आणि जगातले इतर कोणीतरी कसे ह्या सगळ्या नृशंसतेला जबाबदार आहे.

शिवाय, आपण समाजात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर भर देण्यावर आणि त्याचा दोष दुसऱ्या कोणावर तरी ढकलण्यात इतके मश्गुल आहोत की आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्याछोट्या मानवतावादी घटना आपल्याला दिसतच नाहीत. ज्या गोष्टींना प्रसिद्धी मिळायला हवी त्यांची उपेक्षा होते आहे. आणि छोटेछोटे प्रश्न उगीचच प्रसिद्धी पावत आहेत. समाजात लोकांचा एक वर्ग असा आहे कि ज्यांना समाजाचे वेगवेगळ्या गटात विभाजन करायचे आहे. आपल्याच नकळत आपण अशा वर्गाचा बळी पडत आहोत. अशा लोकांकडे उगीचच लक्ष देऊन आपण तेच करतो आहोत जे त्यांना आपल्याकडून करून घ्यायचे आहे ---- द्वेषाचा, तिरस्काराचा प्रसार.

आपल्याला जर खरेच असे वाटत असेल की भारतात असहिष्णुता वाढत आहे तर त्यासाठी आपणच जबाबदार आहोत. प्रत्येक व्यक्ती जी ह्या देशाची नागरिक आहे किंवा कधीकाळी नागरिक होती ती ह्या देशाच्या सद्यपरिस्थितीस जबाबदार आहे. आपण हे विसरलो आहोत की आपण विभिन्न समाजाचा एक भाग आहोत. आपल्या सर्वसमावेशकतेविषयी अभिमान वाटून घ्यायला आपण विसरलो आहोत. आपण हे विसरलो आहोत की भारत असा देश आहे ज्याने एकेकाळी संपूर्ण जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश दिला आहे. समाजात जे काही घडत आहे त्या सगळ्याची जबाबदारी घ्यायला जर आपण शिकलो तर आपल्याला आपल्या सभोवती नक्कीच कितीतरी कौतुकास्पद गोष्टी घडताना दिसतील.

आपल्याला खरोखरच आपल्या देशासाठी काही करायचे असेल तर कमीत कमी आपण काय करु शकतो? सकारात्मक गोष्टींवर भर देणे, आपल्या इतिहासाचा अभिमान ठेवणे, इतर लोकांचा सन्मान करणे, नकारात्मकतेचा त्याग करणे, कायद्याचे पालन करणे, ह्या देशाचे नागरिक म्हणून नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडणे, समाजातील विधायक कार्यासाठी हातभार लावणे, एवढे तरी आपण करूच शकतो. फुकटच्या वादविवादामध्ये आणि निषेध मोर्चे वैगेरे काढण्यामध्ये व्यर्थ वेळ दवडल्यास ह्या देशाच्या प्रगतीला निश्चितच खीळ बसेल. त्यामुळे व्यर्थ गोष्टींवर वेळ वाया घालविण्यापेक्षा आपण फक्त सकारात्मक कार्य करण्याकडे लक्ष दिल्यास आपल्या समाजाचे आणि पर्यायाने आपल्या देशाचे निश्चितच भले होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं आणि पटलं. बाकी बीबीप्रमाणे तुमच्या ह्या लेखाची माती झाली/केली नाही म्हणजे मिळवलं.

लिहावेसे वाटले, लिहिलेत, छान केलेत Happy
सध्या आपल्या आसपास निव्वळ राजकारण चालू आहे, आणि हे सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष या दोन्हींकडून चालू आहे. दुर्दैवाने यात होरपळते ती सामान्य जनता, मग महागाई असो वा धार्मिक दंगली.....

ह्या सहिष्णू - असहिष्णू विषयावरचा इतका उत्तम लेख वाचलेला नव्हता. चपखल, परखड आणि सकारात्मक! शिवाय, योग्य वेळी आलेला लेख! खूप आवडला लेख!

खरंय! पण लोकांचा पेशन्स फार कमी झालाय सगळ्याच बाबतीत आणि लोकं खूप लाऊड झाली आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी blown out of proportion केल्या जातात. ह्या गोष्टी अशा वादाला खतपाणी घालतात असं मला वाटतं.

जिज्ञासा +१

अतिशय तणावयुक्त जीवनशैली आणि तणाव व्यक्त करण्यास उपलब्ध असलेली अनेक साधने ह्यामुळे माणसे आपला प्रक्षोभ त्वरीत व्यक्त करत असावीत.

एक निराळे उदाहरणः

एका डेन्टिस्टने सांगितले की ग्रामीण विभागातील माणसे ट्रीटमेन्टच्या वेळी शांत असतात तर शहरी माणसे ट्रीटमेन्ट घेताना सारखी तक्रार करतात. त्या डेन्टिस्टने वापरलेला शब्दप्रयोग 'पेशन्स थ्रेशहोल्ड' की काहीतरी! नक्की आठवत नाही.

'समथिंग सिमिलर' म्हणून हे उदाहरण, बाकी काही नाही.

लेखाची एकूण कल्पना लक्षात आली, लेख चांगला आणि बराचसा पटण्यासारखा आहे.

पण एक दोन पॉइंट्स - भारत सर्वसमावेशक आहे हे खरे, पण फक्त भारतच आहे असे नाही. अमेरिकेतही (आणि बहुधा इंग्लंड मधेही) असेच सामावून घेतले जाते. आपापल्या प्रथा पाळायचे स्वातंत्र्य मूळच्या स्थानिकांप्रमाणेच इतरांनाही आहे.

दुसरे म्हणजे भारतात काही लोक जर वाईट वागत असतील तर त्याला "आपणच" कसे जबाबदार? बाकीच्यांनी कशाला ते बॅगेज आपल्या डोक्यावर घ्यायचे? फालतू गोष्टींनी ज्यांच्या उठसूठ भावना दुखावत नाहीत, जे उगाचच एखाद्या समाजाला घाउक वाईट ठरवणार्‍या पोस्ट्स सोशल नेटवर्क फिरवत नाहीत, उलट शक्य आहे तेथे समजावायला जातात अशांची यात काय जबाबदारी?

>>>आपापल्या प्रथा पाळायचे स्वातंत्र्य मूळच्या स्थानिकांप्रमाणेच इतरांनाही आहे.<<<

अमेरिकेतील मूळचे स्थानिक कोण हे माहीत नाही.

>>>फालतू गोष्टींनी ज्यांच्या उठसूठ भावना दुखावत नाहीत, जे उगाचच एखाद्या समाजाला घाउक वाईट ठरवणार्‍या पोस्ट्स सोशल नेटवर्क फिरवत नाहीत, उलट शक्य आहे तेथे समजावायला जातात अशांची यात काय जबाबदारी?<<<

प्लस वन, पण ह्या विधानात 'नेहमीच्याच' वादाचे पोटेन्शिअल आहे असे वाटते. Proud Light 1

ओके. Happy

'डॉमिनंट मेजॉरिटी' ही टर्म भारतात स्वीकारार्ह नाही असे दिसते. मेजॉरिटीने डॉमिनंट असावे हे मान्य नाही. हे मानवतेतून आलेले आहे. मात्र मानवतेतून आलेल्या भूमिकेचे राजकारण करणे हा गेल्या काही दशकांचा इतिहास असावा.

सो बेसिकली, डॉमिनंट मेजॉरिटी इज अ टर्म दॅट डझ नॉट एक्झिस्ट इन इन्डिया. Happy

सर्व प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!!

जिज्ञासा खरे आहे!! लोकांचा पेशन्स फार कमी झालाय. तसेच बेफ़िकीर म्हणालेत तसे आपली फ्रस्ट्रेशन्स व्हेंट आऊट करायला सगळेच लोक मार्ग शोधत असतात. पण त्यामुळे होतय काय की सगळ्यांचाच वेळ व्यर्थ दवडला जातो आणि निष्पन्न काहीच निघत नाही. प्रगतीसाठी शांतीची आणि सौहार्दाची आवश्यकता असते हे उमजणे फार महत्वाचे आहे.

अमेरिकेतही (आणि बहुधा इंग्लंड मधेही) असेच सामावून घेतले जाते. >>> जेवढी सर्वसमावेशकता भारतात दिसते तेवढी इतरत्र कोठेही दिसत नाही. हा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. आणि डॉमिनंट मेजॉरिटी म्हटले की माझ्यामते सर्वसमावेशकता संपल्यात जमा होते .

दुसरे म्हणजे भारतात काही लोक जर वाईट वागत असतील तर त्याला "आपणच" कसे जबाबदार? बाकीच्यांनी कशाला ते बॅगेज आपल्या डोक्यावर घ्यायचे? फालतू गोष्टींनी ज्यांच्या उठसूठ भावना दुखावत नाहीत, जे उगाचच एखाद्या समाजाला घाउक वाईट ठरवणार्‍या पोस्ट्स सोशल नेटवर्क फिरवत नाहीत, उलट शक्य आहे तेथे समजावायला जातात अशांची यात काय जबाबदारी? >>>>> तसे तर मग सगळे लोकच जबाबदारी नको म्हणतील. जबाबदारी घेणे म्हणजे जी परिस्थिती आहे त्याबद्दल गिल्ट वाटून घेणे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. पण समाजात घडणाऱ्या चांगल्यावाईट गोष्टींची जबाबदारी समाजातील सगळ्यांनीच घ्यायला नको का?

. खरोखरच कोणताही देश नाही
जेवढी सर्वसमावेशकता भारतात दिसते तेवढी इतरत्र कोठेही दिसत नाही. <<<<<<<
सॉरी, पण हे विधान चुकीचे आहे. तुम्हांला सिंगापुराबद्दल जाणून घ्यायला आवडेल, असे वाटते. तुम्ही दिलेल्या सुट्ट्यांच्या उदाहरणासंदर्भातच बघायचे झाले तर चिनी बहुसंख्याक असलेल्या देशात चिनी नववर्षाच्या जोडीने बुद्धपौर्णिमा (वेसाग डे), ईद, ख्रिसमस, गुडफ्रायडे, दिवाळी (लक्ष्मीपूजनाचा दिवस) अशा सर्व सुट्ट्या असतात.

तसंच, कुठलाही धर्म न आचरता 'ओपन थिंकर' म्हणून राहण्याची सोय तिथे आहे. सर्व शासकीय कागदपत्रांत हा पर्याय अस्तो. पुलंच्या पूर्वरंग पुस्तकात सिंगापुरातले त्यांनी पाहिलेले एक उदाहरण आठवले. फाँग नावाच्या माणसाकडे ते बहुधा नववर्ष साजरे करायला जातात, तेव्हा तो चिनी पण त्याची मुलगी ख्रिस्ती झाली अस्ल्याचे आणि तो तेही सण साजरे करत अस्ल्याचे लिहिले आहे.

तसंच तिथे मुस्लिम जनतेसाठी काही फूडकोर्टांतही हलाल स्पेसिफिक जागा ठेवली जाते जिथे पोर्कचे पदार्थ आणता येत नाहीत जे चिनी बहुसंख्याक जनतेचे आवडते मीट आहे.

चांगलं लिहिलंय.

जगात इतरही देशात सर्वधर्मसमावेशकता असली तरी पदोपदी भावना दुखावणार्‍या अतिसंवेदनशील अब्ज+ लोकांना घेऊन लोकांना घेऊन सहिष्णुतेने राहणे अवघड आहे. जसा सुशिक्षीत, सुसंस्कृतपणा वाढतो आहे, दळणवळणाची साधने, इंटरनेट इत्यादी मुळे जग जवळ येत आहे तसे जगातले अनेक देश सहिष्णु होत आहेत. पण हजारो वर्षांपूर्वी जेंव्हा हे प्रचलीत नव्हते तेंव्हापासून भारत सहिष्णु आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील.

दुसरे म्हणजे भारतात काही लोक जर वाईट वागत असतील तर त्याला "आपणच" कसे जबाबदार? बाकीच्यांनी कशाला ते बॅगेज आपल्या डोक्यावर घ्यायचे? फालतू गोष्टींनी ज्यांच्या उठसूठ भावना दुखावत नाहीत, जे उगाचच एखाद्या समाजाला घाउक वाईट ठरवणार्‍या पोस्ट्स सोशल नेटवर्क फिरवत नाहीत, उलट शक्य आहे तेथे समजावायला जातात अशांची यात काय जबाबदारी? >> मला वाटतं फारेंड, "आपण" म्हणजे "समाज" ह्या अर्थाने घ्यावे. समाजात उठसुट भावना न दुखावणारे, सोशल मिडीयावर स्फोटक पोस्टी न फिरवणारे, सारासार विचार करणारे, भडक्/प्रक्षोभक विधाने न करणारे, किंवा त्याला बळी न पडणारे, इतरांवर दोष न ढकलणारे, सर्वसमावेशक असलेलेही घटक आहेत, त्यांच्यामुळे समाज पुढे जात आहे. पण हे अश्या मुठभर समाजाकरता नाही. अजुनही बहुतांशी लोक ह्यात मोडत नाहीत. कलेक्टिव्हली सगळ्यांकरता हे विधान आहे असे मला वाटते. जे चांगले करताहेत त्यांनी करत जावे, त्यामुळे जर हातभार लागला नाही तरी नुकसान तरी होणार नाही. पण जसे जास्तीत जास्त लोक ह्या बोटीत येतील तसाच समाजात सकारात्मक बदल घडेल.

सुमुक्ता,
भारतात सार्वजनिक सुट्ट्या सर्वधर्मीय असतात बरोबर आहे, पण तुमच्या लेखात याशिवाय इतर काहीच उदाहरणं दिसली नाहीत समावेशाची. अमेरिका/ कॅनडात एक ख्रिसमस सोडली तर धर्माशी संबधित कुठलीही राष्ट्रीय सुट्टी नाही. राज्यात/ गावात/ कौंटी मध्ये असलेल्या लोकसंख्येनुसार त्या त्या धर्माच्या सणाला सुट्ट्या कुठेकुठे असतात.

बाकी नकारात्मक गोष्टीवर भर देण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींवर भर द्या हे म्हणणं अजिबात पटलं नाही. तुम्हाला कदाचित तसं म्हणायचं नसेल पण, त्यातुन नकारात्मक गोष्टी दाबून टाका असा अर्थ ध्वनित होतोय. सकारात्मक गोष्टींना जरूर प्रसिद्धी द्या, त्याविषयी बोला. पण जर नकारात्मक काही असेल तर त्याचा अनुल्लेख का? इथे तुलना करायची नाही पण दिल्लीमध्ये झालेल्या बलात्कारानंतर मी इथे काही भारतीयांकडून असं ऐकलेलं की भारताची बदनामी होते अशा बातम्या आल्या की. जे मला प्रचंड खटकलेलं.
आपणच जवाबदार आहोत यात दुमत असण्याचं कारणच नाही. पण निषेध करू नका, मोर्चे काढू नका, नकारात्मक गोष्टी दाबुन टाका आणि इतिहास - परंपरा - आणि एकेकाळी मानवतेचा संदेश दिला याचा अभिमान बाळगा हे काही झेपलं नाही. हे पूर्णपणे डिनायल आहे.
जे आहे ते स्वीकारा आणि वाटत असतील तर आपल्यात बदल करा. असं मला वाटतं.

जबाबदारी घेणे म्हणजे जी परिस्थिती आहे त्याबद्दल गिल्ट वाटून घेणे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता >> येथे जबाबदारी म्हणजे जे चुकीचे आहे ते सुधारण्याची जबाबदारी या अर्थाने असेल तर बरोबरच आहे, पण
प्रत्येक व्यक्ती जी ह्या देशाची नागरिक आहे किंवा कधीकाळी नागरिक होती ती ह्या देशाच्या सद्यपरिस्थितीस जबाबदार आहे
या वाक्यामुळे मला असे वाटले की गिल्ट सुद्धा वाटून घेण्याबद्दल लिहीले आहे - तुमचा अर्थ तसा नसेल तर मग काही वाद नाही.

बाकी सर्वसमावेशकतेबद्दल - अमेरिकेतही मला भारताइतकीच दिसते. मो ने लिहील्याप्रमाणे भारतात अनेक शतके आहे, हे मान्य.

एक नोट - इथे आम्ही हे पॉइंट्स काढतो आहोत म्हणजे लेख चुकीचा आहे अशा टोन मधे नाही. बराचसा लेख पटण्यासारखाच आहे, जे पटले नाही ते फक्त दाखवतोय.

लेख आवडला. सुरेख आहे.

Sad निषेध मोर्चा का नको? शांततापूर्ण मार्गाने एखाद्या गोष्टीसाठी विरोध दाखवायचा असेल तर निषेध मोर्चे हवे. मध्यमवर्गीयांची रस्त्यावर उतरण्याची मानसिकता नसते कारण गोष्टी सोसण्याची थोडीशी क्षमता त्यांच्यात असते (उदा: गॅसचे भाव कडाडले, कांदे महाग झाले, शाळेच्या फी वाढल्या इ इ). मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही असे साधेसे आयुष्य जगणे ह्या वर्गाला परवडते. निम्नवर्गात हातावर पोट असताना अशी क्षमता नाही. बिचारे रस्त्यावर उतरतात. अनेक वेळा पैसे देवून मोर्चा किंवा सभेला माणसे गोळा केली जातात असे ऐकीवात आहे. गरीब लोक जातीलच. जोवर सगळं शांततापूर्ण चालू आहे तोवर ते लोकशाही पद्धतीस अनुसरून आहे.

फुकटचे वादविवादः अशाने अर्नब गोस्वामीला सुशिक्षित बेरोजगार योजनेचा फॉर्म पाठवशील बरं Wink Happy

श्रद्धा तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण सिंगापूर ची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या ह्यात फरक आहे. भारतात फक्त धार्मिक सर्वसमावेशकता नाही तर भाषिक आणि सांस्कृतिक सर्वसमावेशकता सुद्धा आहे. इतके विभिन्न लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र घेऊन चालणे हे खूप मोठे आव्हान आहे. आणि आपण सगळेच हे आव्हान वर्षानुवर्षे पेलत आहोत.

अमितव इतर उदाहरणे देणे मुद्दाम टाळले आहे कारण त्यावरून धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक वादविवादास तोंड फुटेल आणि धागा भरकटेल. नकारात्मक घटना दाबून टाका हे सांगण्याचा लेखाचा उद्देश नाहीच. लेख लिहिताना बलात्कारासारख्या गुन्हेगारी घटनांचा निषेध करू नका असे सांगण्याचा उद्देश नव्हताच. पण सध्या जे असहिष्णुतेवरून चालू आहे त्या घटना लेख लिहिताना मनात होत्या. उदाहरणार्थ आमिर, शाहरुख काही बोलले की सोशल मिडियावर शेकडो पोस्टी फिरवत बसणे, टीव्ही वर फुकट टाईमपास करत वादविवाद घालत बसणे, इत्यादी. अनुपम खेरने जो "मार्च फॉर इंडिया" काढला त्यातून काय निष्पन्न झाले? असहिष्णुतेची सहिष्णुता झाली का? निर्भया केस मध्ये मोर्चा काढल्याने फायदा तरी झाला होता. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे समजायला नको का?

जे आहे ते स्वीकारा आणि वाटत असतील तर आपल्यात बदल करा. असं मला वाटतं.>> निश्चितच. पण त्यासाठी समाजातील शांतता भंग होईल किंवा विविध गटांमध्ये तिरस्कार पसरेल असे काही करू नका. एवढेच. पुष्कळ वेळा आपल्या छोट्या छोट्या क्रिया-प्रतिक्रियांचे गांभीर्य आपल्याला समजत नाही. सोशल मीडियामुळे व्यक्त होण्यास कोणतीच अडचण नाही पण जबाबदारीने व्यक्त व्हावे असा विचार पुष्कळ लोक करताना दिसत नाहीत.

इथे आम्ही हे पॉइंट्स काढतो आहोत म्हणजे लेख चुकीचा आहे अशा टोन मधे नाही. बराचसा लेख पटण्यासारखाच आहे, जे पटले नाही ते फक्त दाखवतोय.>>> जे पटले नाही ते सांगण्यात काहीच गैर नाही. दुसऱ्या बाजूचा विचारही मला कळतो Happy

निषेध मोर्चा का नको? शांततापूर्ण मार्गाने एखाद्या गोष्टीसाठी विरोध दाखवायचा असेल तर निषेध मोर्चे हवे. >>> मी वरती म्हटले तसे कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे कळायला हवे. उद्या उठसूट निषेध मोर्चे निघायला लागले तर सर्वांचा केवळ वेळ वाया जाईल. कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे समजायला हवे.

अशाने अर्नब गोस्वामीला सुशिक्षित बेरोजगार योजनेचा फॉर्म पाठवशील बरं >> Lol

छान विचार आहेत.
असाच मोकळेपणा मी केनया आणि ओमान मधेही अनुभवलाय. ते देश अनुक्रमे ख्रिश्चन आणि मुसलमान असूनही, इतर धर्मांवर बंधने नाहीत. मूळात धर्म हा तिथे इश्यूच नसतो. यु.ए.ई. बद्दलही तसेच असावे पण वरील दोन देशांप्रमाणे तिथे माझे प्रदिर्घ वास्तव्य झालेले नाही.