हादगा

Submitted by Arnika on 30 November, 2015 - 08:27

वहानांच्या गर्दीतून डुलत वाट काढताना कितीतरी वेळा हत्ती पाहिले होते. लहानपणी शहराबाहेर तंबू लागायचे तेव्हा सर्कशीतही. मग झू मधे हत्तीच्या पाठीवर बसून फेरी मारून आले होते. आपल्यासमोरचा जिवंत प्राणी अख्खा दिसावा म्हणून मान पाठीला टेकवावी लागते याचीच गंमत वाटायची. लांबलांब पापण्या, सोंडेचं वेटोळं, शांत आणि सुजाण डोळे, असं गणपतीसारखंच, पण हालचाल करणारंही कोणीतरी असतं याचं किती अप्रूप!

रस्त्यात हत्ती दिसला की त्याला केळी आणि माहुताला नाणं द्यायचं, आणि वळणावरून त्याचं शेपूट दिसेनासं होईपर्यंत बघत बसायचं! कुठे नेत असेल त्याला माहुत? तो झोपत असेल? एवढ्याशा माणसाने पाठीवर हलकी चापटी मारल्यावर ते केवढंच्या केवढं जनावर का ऐकत असेल त्याचं? मीच एका दिवसात दोन केळी खाऊन संपवेन; त्याला जरा जास्त द्यायला हवी होती का? कोकणात इतकी हिरवळ असतानाही म्हशींना ओला चारा मिळायची पंचाईत होते. ठाणं तर सगळं राखाडीच होतं; तिथे त्या हत्तीला चारा कसा काय मिळायचा? त्याच्या शेपटीचा पुंजका नजरेआड जाईपर्यंत डोक्यात चक्र फिरत रहायची, आणि मग माझ्या डोळ्यासमोर पुढचा आठवडाभर त्याचे शांत डोळे उरायचे.

मला त्या उगाच लाडक्या असलेल्या प्राण्याला खूप जवळून बघायचं होतं. हत्तींना हत्तींसारखं वागताना बघायचं होतं. गेली कित्येक वर्ष हत्तींच्या अभयारण्यात जाऊन काम करावं आणि रोज आसपास त्यांचा वावर असेल अशा जागी जाऊन थोडा वेळ घालवावा असं वाटत होतं. ते कधीपासून, का, कशामुळे वगैरे बोलता बोलता सांगेनच... मग गेलं वर्षभर बरीच शोधाशोध करून टेनेसीपासून श्रीलंकेपर्यंत असलेल्या अभयारण्यांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल वाचायला लागले, आणि शेवटी थायलंडमधल्या Elephant Nature Park ला जायचं नक्की केलं. च्यांग-माइ शहराच्या उत्तरेकडे डोंगराळ भागात ही जागा आहे. गेल्या महिन्यात दोन आठवडे तिथे राहून सगळ्या प्राण्यांमधे वावरताना आणि काम करताना लिहून ठेवलेले काही वेचे...

१०.१०.१५
लंडनपासून पंधरा तासांचा प्रवास करून मी शेवटी मुळंच गाठलेली आहेत! च्यांग-माइ म्हणजे कोकण आहे. शुद्ध कोकण. समुद्र, नारळ, शांतता, देवळं अशा वरवरच्या गोष्टींबद्दल म्हणत नाहीये मी. गेल्या आठ-नऊ तासांत मी पाहिलेला माणसांचा वावर, त्यांची बोलण्या-चालण्याची ढब आणि तेवढ्या वेळात समजू शकेल इतपत समजलेली त्यांची वृत्ती हे सगळं कुठेतरी माझ्या ओळखीचं वाटतंय. उद्या अभयारण्यात जाण्यापूर्वी आजची रात्र च्यांग-माइच्या जुन्या भागात रहायची सोय आहे. खोलीबाहेर जमिनीलगत बांधलेला एक लाकडी झोपाळा आहे. मळभ येऊन अंधारल्यामुळे वाटतंय की काय कुणास ठाऊक, पण आजुबाजूच्या घरांमधला उजेडसुद्धा कोकणासारखा मिणमिणता वाटतोय.

मगाशी पाणी आणायला म्हणून आळीतल्या दुकानात गेले आणि मिनिटभर मी कुठे आल्ये तेच कळेना. कशेळी बांधावर पळसुल्यांचं दुकान आहे तसंच्या तसं दुकान इथेही! जरा पायऱ्या उतरून खाली जायचं. तिथला रंग आणि मांडणीही तशीच होती; गावातल्या खूप जणांचा गप्पांसाठी राबता होता. एका कोपऱ्यात छोटासा टीव्ही आणि जमिनीवर मांडी घालून सात फुटावर ठेवलेल्या टीव्हीकडे माना पाडून बघणारी बाळं आणि म्हातारी माणसं. थाइ भाषेतला ‘वाजवा रे वाजवा’ किंवा असा काहीसा सिनेमा लागला होता. त्यातली मारामारी बघत बघतच एका लहान मुलाने माझ्याकडून पैसे घेतले. आठ-दहा माणसं टीव्हीकडे, आणि मी त्यांच्याकडे बघत बसले! इथल्या लोकांना उगाच त्यांच्या घरांचे आणि पोराबाळांचे फोटो काढलेले आवडत नाहीत म्हणून फोटो राहिला. तशाही त्या क्षणी जाणवलेल्या किती गोष्टी मला फोटोत बांधता आल्या असत्या कुणास ठाऊक!

तो अरुंद, घरगुती रस्ता बघून मला जेवणाची खात्री वाटायला लागली. दोन गाळे सोडून एक अस्ताव्यस्त, पण स्वच्छ घर लागलं. बाहेर एक म्हातारं फ्रेंच जोडपं जेवत होतं. माझ्या बाजूच्या टेबलवर मांजरीची दोन पिल्लं मुटकुळं करून गाढ झोपली होती, आणि माझं ताट पुढ्यात आल्यावर त्या वासाने चार डोळे एकदम उघडले! काय जेवण! आहाहा... शंभर रुपयात भात, मासे आणि कोशिंबीर! चव अफलातून होतीच, पण मला किमतीचं फार सुख वाटलं; खोटं कशाला बोला?

संध्याकाळी सात वाजता अंधुक उजेडात गावात एक फेरी मारून आले. पुढे बैठ्या घरांच्या रांगेत चार म्हाताऱ्या पाय मुडपून ओसरीवर बसल्या होत्या. इतक्यात बिनबाह्यांचा शर्ट घातलेली एक गोरी मुलगी समोरून चालत गेली. चार माना गर्रकन्‍ वळल्या आणि आठ डोळे एकमेकांशी ‘हल्लीची पिढी’ असं काहीसं बोलून गेले. मला अगदी घरी आल्यासारखं वाटलं...

११.१०.१५
आज नेचर पार्कला जायला निघायचं म्हणून काल रात्रभर झोप येईना. तिथे किती हत्ती असतील? ते आपल्या किती जवळ असतील? काय काय काम असेल? पुन्हा चक्र फिरायला लागली.

लेक नावाची एक बाई गेली वीस वर्ष हे अभयारण्य चालवत्ये. सर्कशीतून, रस्त्यावरच्या भिकाऱ्यांकडून, लाकडाच्या व्यापाऱ्यांकडून ती हत्तींना सोडवून आणते आणि इथे त्यांचा सांभाळ करते. प्रत्येक हत्ती आणायला आडवळणाचे कायदे आणि सरकारी कागदपत्र. असे ‘निकामी’ झालेले म्हातारे किंवा आजारी हत्ती, पाय मोडलेली, दुबळी हत्तीची बाळं ही बाई पैसे देऊन विकत का घेते आणि त्यांच्यासाठी इतक्या जमिनीची खरेदी का करत्ये हे कोणालाच कळायचं नाही! पार्कातल्या पासष्ट हत्तींना बघायला जायचंच होतं, पण हत्तीच्या तोंडात सहज मावेल इतक्या लहानखुऱ्या लेकलाही मला भेटायचं होतं! च्यांग-माइहून पार्कात जाताना बसमधे लेकची मुलाखत ऐकत होतो आम्ही.

ती जोकीया नावाच्या एका आंधळ्या हत्तीणीबद्दल सांगत होती. तिचा मालक तिला विकायला सहज तयार झाला. लेकने विचारलं, “हिचे डोळे कसे गेले?” आधी मालक सांगायला तयार होईना. फार खोदून खोदून आजुबाजूच्या माणसांना विचारल्यावर कळलं, की ही हत्तीण डोंगरावर ओंडके वाहून न्यायची. गाभण असतानाही वीस महिने तिची मजुरी चालूच होती. डोंगरावर ओंडके नेत असताना एक दिवस हत्तीण व्याली आणि तिचं शंभर किलोचं बाळ बाहेर येताक्षणी डोंगरावरून घरंगळत खाली गेलं आणि मेलं. ज्योकीया कधी त्या दुःखातून सावरलीच नाही. ती काम करायला तयार होईना; जागची हलेना! शेवटी मालकाने वैतागून गलोल घेतली आणि हिच्या डोळ्यावर दगड मारला. तरीही बधेना म्हंटल्यावर दुसऱ्याही डोळ्यावर...

लेक स्क्रीनवर बोलत होती आणि गोष्ट सांगत असताना जोकीया तिच्या तोंडावरून सोंड फिरवत होती. बसमधले आम्ही पंधरा जण एकमेकांना अनोळखी असूनही ढसाढसा रडत होतो. माणसांचा इतका वाईट अनुभव आल्यामुळे आणि दृष्टी गेल्यामुळे जोकीया चिडचिडी झाली होती. सुरुवातीला ती लेकला सारखी ढकलून द्यायची. एकदा लेकच्या बरगड्या मोडल्या; ती हज्जारदा पडली आणि हॉस्पिटलमधे जावं लागलं, पण तिने जोकीयाची पाठ सोडली नाही. स्पर्शाने, आवाजाने, खाऊ-पिऊ घालून, औषध-पाणी करून तिने जोकीयाला आपलंसं केलं. शांत केलं. गेली पंधरा वर्ष स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जोकीयाची काळजी घेतल्ये तिने.

माणूस इतका त्रास देऊ शकतो; क्रूर होऊ शकतो? आणि माणूस इतका जीवही लावू शकतो? कित्येक वेळा पडून धडपडून एका अनोळखी प्राण्यासाठी आयुष्य खर्ची घालू शकतो? सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेच प्रश्न आणि तसाच अविश्वास दिसत होता, पण एकीकडे आपण कशा जागी चाललोय, तिथे काय दर्जाचं काम चालतं आणि आपली मदत कशासाठी होणारे हे कळल्यावर सगळेजण सुखावलोही होतो.

तासाभरात गाडी जंगलरस्त्याला लागली आणि घाट चढल्यावर हिरवळीत रांगोळी काढल्यासारखे राखाडी ठिपके दिसायला लागले. आधी विरळ, मग अजून अजून दाट आणि मग अगदी स्पष्ट! बस पुढेपुढे जायला लागल्यावर ते हलायला लागले. त्यांना सोंड आली. मग मागे शेपटीचा पुंजका. मधेच लकाकणारा एखादा सुळा. सुपासारखे कान. एक नाही, दोन नाहीत, तीन नाहीत, सतरा हत्तींचा कळप! रस्त्यात सहज कुत्रे-मांजरी दिसाव्यात इतके सहज दिसलेले, चाऱ्याभोवती गोल करून उभे असलेले हत्ती.

बस आवारात लागली आणि आमचा म्होरक्या म्हणाला, “सामान अंगणात नेऊन ठेवतील ड्रायव्हर! तुम्ही पाणी भरून घ्या आणि ट्रकपाशी या कलिंगडं उतरवायला.”
“कुठला ट्रक?”
“ते हौदासमोरचे दोन ट्रक.”
“एवढे मोठे? किती कलिंगडं आहेत?
“तीन हजार किलो.”
आम्ही खिरापतीभोवती गोळा झालो. हादगा सुरू झाला होता...

क्रमशः
------
पुढील दोन भागः
दोन-पायी पाहुणे http://www.maayboli.com/node/56618
घर की बातें http://www.maayboli.com/node/56642

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहलयसं..
हत्ती आवडत असला तरी त्याच्याजवळ जायला अजूनही घाबरते मी.. तो तोल वगैरे गेला तर म्हणून Uhoh

अहाहा,
काय सुंदर लिहिलंयस गं!
कधी वाचून झालं तेच कळलं नाही.
ती लेक तर ग्रेट आहेच ; पण केवळ लहानपणीपासून हत्तींबरोबर वावरायचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून इतका प्रवास करून दूर देशी जाणारी तू ही थोर आहेस.

क्रमशः आहे ना? >> +१११
जोकीया ची गोष्ट वाचताना स्क्रीन कधी धूसर झाला कळलंच नाही Sad
पुन्हा एकदा, फार सुंदर लिहितेस तू! लिहित रहा!

खूपच सुरेख, मनाला स्पर्शून जाणारं लिहिलं आहेस अर्निका! पुढच्या अनुभवांची प्रतीक्षा आहे.

मस्त लिहीलंयस! पुढे काय झालं वाचायची प्रचंड उत्सुकता लागली आहे.
जोकीया बद्दल वाचून कसंतरी झालं. इतकी क्रूर असतात माणसं?!

सुंदर .. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत .. Happy

(सॅन होजे टेक म्युझियम च्या आयमॅक्स् ला हत्तींवरची एक डॉक्युमेन्टरी बघितली होती .. नीट आठवत नाही थायलंड ची होती की इन्डोनिशिया ची .. त्याची आठवण झाली ..)

Born to be Wild 3D ही ती डॉक्युमेन्टरी ..

खुप सुंदर लिहील आहे. डोळ्यासमोर चित्र उभ राहिलं! जोकीयाबद्दल वाचून वाईट वाटलं..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

क्रमशः आहे ना? >> +१११
जोकीया ची गोष्ट वाचताना स्क्रीन कधी धूसर झाला कळलंच नाही अरेरे
पुन्हा एकदा, फार सुंदर लिहितेस तू! लिहित रहा! >>>>>> +१११११११११

खुपच छान लिखाण!!!

जोकीया ची गोष्ट वाचताना स्क्रीन कधी धूसर झाला कळलंच नाही अरेरे
पुन्हा एकदा, फार सुंदर लिहितेस तू! लिहित रहा! >>>>>> +१००

Pages