ताडोबा अभयारण्य पावसाळ्यानंतर पुन्हा पर्यटकांसाठी १६ ऑक्टोबरपासुन खुले होणार ही बातमी वाचल्यासरशी मी ही १६ ऑक्टोबर याच दिवशी ताडोबाला सकाळची जंगल सफारी मिळतेय का याची चाचपणी चालू केली. ४-५ मित्रांनाही विचारुन बघितलं येण्याबद्दल. पण सगळ्यांचच तळ्यात मळ्यात चालू होतं.माझ्या दुर्दैवाने सकाळऐवजी दुपारची सफारी मिळत होती. १ल्या दिवसाच्या सगळ्या सकाळच्या सफारीज फुल्ल झाल्या होत्या.दुपारची का होईना पण १ल्याच दिवसाची सफारी मिळतेय म्हटल्यावर मी लगेचच बुक करुन टाकली, त्याच बरोबर पुढच्या ४ दिवसाच्या सफारीपण बुक केल्या. हॉटेल आणि रेल्वे बुकिंगला फारसे प्रयास पडले नाहीत.
हल्ली पावसाळ्यातपण स्पॉट बुकिंग देतं वन विभाग पण मर्यादित जिप्सीच सोडतात आणि त्याही काही ठराविक गेटनेच. वरुणराजाच्या कृपेवर ह्या सफारी अवलंबून असतात.
सप्टेंबरमध्ये आयत्यावेळी ठरवूनही सफारी, हॉटेल आणि रेल्वे बुकिंग मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानले. १५ ऑक्टोबरला छ.शि.ट.हून मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने निघालो. गाडीही वेळेवर सुटली आणि दुसर्या दिवशी चक्क नियोजित वेळेआधी अर्धा तास नागपूर पोचली. नागपूर स्टेशनवर मॅक्स कॅबचा प्रशांत पिक अपसाठी येणार होता, त्याला आधीच कळवलं होतं दुरांतोने येत असल्याबद्दल, तो ही माझीच वाट बघत होता. बॅग डिकीत टाकून ताडोबाच्या रस्त्याला लागलो. जाता जाता वाटेत एका टपरीवर चहा झाला. प्रशांतशी गप्पा मारत मोहर्ली गावात पोचलो. युनायटेड २१ नामक रिसॉर्टमध्ये ५ दिवस राहणार होतो. १० च्या सुमारास रिसॉर्टवर पोचलो, हॉटेल व्हाउचर रिसेप्शनिस्टकडे देउन डायनिंग हॉलमध्ये जाउन ब्रेकफास्ट उरकून घेतला. रिसॉर्ट नवीनच बांधलं होतं, एकूण १५ तंबू होते, बाजुलाच कॉटेजेसचं बांधकामपण चालु होतं. माझ्यासाठी १०१ क्रमांकाचा तंबू राखुन ठेवला होता. बॅग ठेवली आणि तासभर ताणुन दिली. साडेबाराच्या सुमारास उठलो, मस्तपैकी आंघोळ केली, कॅमेरा, लेन्स, कॅमेरा बॅटरी वगैरे जामानिमा तयार केला. तोपर्यंत लंच रेडी आहे असा निरोप आला. जेवणानंतर सफारीसाठी तयार व्हायचं होतं. बाहेर उनही चांगलंच कडकडीत होतं. नागपूरचं उन चांगलंच भाजुन काढणार अशी लक्षणं होती.
सव्वा दोनच्या सुमारास रुपेश ड्रायव्हर जिप्सी घेउन आला. कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या घेउन जिप्सीत बसलो. रिसॉर्ट्पासुन नॅशनल पार्कचं गेट ४ किमीवर होतं. गेटवर पोचलो तर आधीच ७-८ जिप्सीज उभ्या होत्या. सफारी बुकिंग केल्याचा फॉर्म आणि ओळखपत्रं घेउन वनविभागाच्या ऑफिसमध्ये जाउन दुपारच्या सफारीसाठी नोंद करुन आलो. ऑनलाईन सफारी बुकिंग करताना ज्या ओळखपत्राची नोंदणी केलीय तेच ओळखपत्रं गेटमधुन आत जाण्यापूर्वी सादर करावं लागतं. दुपारच्या सफारीची वेळ ३ ते ६ आणि सकाळच्या सफारीची वेळ ६ ते १०.३० अशी होती. प्रत्येक जिप्सीसोबत वनविभाचा एक गाईड सोबत असतो. दुपारच्या सफारीसाठी दशरथ गाईड मिळाला होता. गेटवर नोंदणीवगैरे सोपस्कार आटोपून रुपेश आणि दशरथसोबत चहा घेतला. दशरथ मोहर्ली विभागातला एक जुनाजाणता गाईड आहे, दशरथ आहे आजच्या सफारीला म्ह्टल्यावर निर्धास्त होतो.
ताडोबा नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी मोहर्ली, खुटवंडा, कोलारा, नवेगाव, पांगडी आणि झारी असे सहा गेट आहेत. त्यापैकी मोहर्ली गेटमधुन एकूण २७ वाहनांना एकावेळेस पार्कमध्ये जायची परवानगी आहे. बाकीच्या गेटमधुन ४, ६ आणि ९ एवढीच वाहने सोडतात.
ठीक ३ वाजता जिप्सीजना एक एक करुन आत सोडायला सुरुवात केली. आमचीही जिप्सी पार्कमध्ये प्रवेश करती झाली.
"आज सकाळीच ३ गाड्यांना सोनम आणि तिचे ३ बच्चे दिसले होते" दशरथने सांगितलं.
"सुरुवात तर चांगली झाली म्हणायची, आता बघुया सोनम दिसते का?" - मी.
"आधी सगळ्या वॉटरहोल्सना राऊंड मारुन येउ, मग कॉल कुठे येत असला तर बघु." - दशरथ
जामुनझोरा, पांढरपौनी ह्या एरियातुन फेरी मारुन आलो, ताडोबा तलावालाही फेरी मारुन आलो. पण सगळीकडे शांतता होती. बाकीच्या जिप्सीजमधली मंडळीही मान हलवून काहीच न दिसल्याच्या खुणा करत होती. दुपारची सफारी व्यर्थ जाणार अशीच चिन्हे होती. पावणेसहाच्या सुमारास परत फिरलो. दुपारच्या सफारीला काहीच पदरात पडलं नव्हतं. दुसर्या दिवशी नशीब साथ देइल ह्या आशेवर रिसॉर्टवर परतलो. जेवून झाल्यावर पावणेपाचचा अलार्म लावून झोपलो.
सकाळी पावणेपाचच्या गजराने जाग आली. सव्वा पाचच्या सुमारास संजु जिप्सी घेउन हजर झाला. साडेपाचच्या सुमारास गेटवर पोचलो,नेहमीचे नोंदणी सोपस्कार आटोपले. आज मनोहर होता गाईड. मनोहर आणि संजुसोबत चहा घेतला. ६ वाजता पार्कमध्ये प्रवेश केला. सगळे पाणवठे पालथे घातले. कुठेही कसलीही हालचाल नव्हती, सगळं जंगल एकदम शांत होतं. नाही म्हणायला हरणं, सांबर बागडत होती. त्यांचे काही फोटो घेतले.
ताडोबाच्या जंगलात काही मोठी कोळीष्टकं दिसली.
सकाळच्या आणि दुपारच्याही सफारीत वाघोबा काही दिसले नाहीत. थोड्याशा नाराजीतच रिसॉर्टवर परतलो. प्रत्येक सफारीत काही ना काही नवीन बघायला मिळतंच. खरं सांगायचं तर वाघ दिसणं ह्यात नशीबाचा भाग जास्त. वाघाची बाहेर पडण्याची वेळ आणि आपली जिप्सी नेमकी त्याचवेळेस त्या ठिकाणी असणं हा केवळ योगायोग साधणं मस्ट. नाहीतर बर्याचदा ७-८ सफारी करुनही वाघ न बघितलेले लोकही भरपूर आढळतील.
दुसर्यादिवशी परत त्याच उत्साहात पार्कात शिरलो. ड्रायव्हर आणि गाईड तेच होते. फिरत असता एका जिप्सीच्या गाईडने 'तारा'ने एका सांबराची शिकार केल्याची बातमी दिली. बातमी दिलेल्या गाईडची जिप्सी जिथे उभी होती त्याच्याच बाजुला आम्हीही जिप्सी उभी केली. शिकार खाउन वाघ पाण्यासाठी बाहे पडणार एवढं निश्चित होतं, फक्त कधी आणि कोणत्या दिशेने बाहेर येइल ह्याची खात्री नव्हती. कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये वाघांना नावं ठेवण्याची कामगिरी गाईड्सची. ताडोबाच्या जंगलात सध्या 'तारा,सोनम,बजरंग,माया,शिवाजी,माधुरी,गब्बर,नामदेव'असे वाघ गुण्यागोविंदाने राहत आहेत. आमच्या जिप्सीला ३ वेळा सोनमने गुंगारा दिला. सोनम आणि ३ बच्चे काही जिप्सीजना नियमित दिसत होते. बजरंगची आणि आमची काही सेकंदांनी चुकामुक झाली. मनोहरच्या मते आपण ईथेच थांबु, तारा निश्चित बाहेर येइल पाणी प्यायला. मागेच नाला आहे. ईथुनच जाईल. अर्धा तास वाट पहात आम्ही बसुन होतो. रणथंबोर, कान्हा वगैरे जंगलात वाघ एखाद्या ठिकाणाहून चालु लागला की सांबर, भेकर किंवा लंगुर अलार्म कॉल देउन ईतर प्राण्यांना सावध करतात. ताडोबाला काहीवेळा कॉल शिवायच वाघ बाहेर पडल्याचं मनोहर म्हणाला. तसाही आमच्या हातात बराच वेळ होता, गेटबाहेर पडायला अजुन तासभर अवकाश होता. बाकीच्या जिप्सीज न थांबता जात होत्या. बराचवेळ कोणतीच जिप्सी फिरकली नाही, बर्यापैकी शांतता झाल्यावर 'तारा' बाजुच्या उंचच उंच गवतातुन अचानक समोर अवतीर्ण झाली. एक क्षण डोळ्यावर विश्वासच बसेना, लगेच कॅमेरा सरसावून भराभर फोटो काढले.
केवळ २-३ मिनिटंच 'तारा'दर्शन झालं पण हेड ऑन आल्यामुळे फोटोही मनासारखे मिळाले. जवळजवळ तासभर वाट बघितल्याचं सार्थक झालं. 'तारा'ला सध्या कॉलर लावलीय. फोटोतही दिसतेय. दुपारच्या सफारीत परत व्याघ्रयोग असेल तर उत्तम म्हणत रिसॉर्टवर आलो. दुपारच्या सफारीत वाघ काही दिसला नाही पण गौर ( Indian Bison ), शिकरा, हरियाल ( महाराष्ट्राचा राज्य पक्षी ) असे काही पक्षी दिसले.
शिकरा
हरियाल
लंगुर
अजुन २ दिवस म्हणजे ४ सफारीज बाकी होत्या, 'तारा,सोनम,माया,बजरंग'यांच्या एरियात मी होतो. न जाणो कोण कधी दर्शन देइल? तिसर्या दिवशी माझी सकाळची सफारी खुटवंडा गेटमधुन होती. आधीच्या सगळ्या सफारीज मी मोहर्ली गेटमधुन केल्या होत्या. ह्या गेटला ड्रायव्हर आणि गाईड वेगळे होते. नेहमीप्रमाणे ६ वाजता गेटमधुन जिप्सीज पार्कमध्ये सोड्लया. ह्या गेटमधुन फक्त चारच जिप्सीज सकाळी आणि चार संध्याकाळी सोडतात. ह्यादिवशी पार्कमध्ये जायला फक्त माझीच जिप्सी होती. गाईड योगेश आणि ड्रायव्हर अनंत. ह्या गेटमधुन ताडोबाच्या जंगलातल्या मेनरोडवर ५ मिनिटात पोचलो. तसेच ताडोबाच्या तलावाच्या दिशे निघालो असता एका वळणावर समोरुन 'तारा'च चालत येत होती.
अनंत्ने लगेच जिप्सी थांबवून रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात मागे वनविभागाची जिप्सी आल्यामुळे आम्हाला जिप्सी एका बाजुला घ्यावी लागली. 'तारा' आमच्याच दिशेन चालत येत असल्यामुळे फोटो काढतच होतो. जिप्सी एका बाजुला घेतल्यामुळे एक क्षण आमच्याकडे नजर टाकून 'तारा' आमची जिप्सी क्रॉस करुन पुढे निघुन गेली.
पार्कमध्ये शिरलयावर पहिल्या १० मिनिटातच 'तारा' दिसल्यामुळे सफारी सार्थकी लागली होती. पुढे जंगली कुत्रे ( wild dogs / Dhole ) दिसले.
नंतरच्या सफारीत फारसे कोणी प्राणी दिसले नाहीत. नाही म्हणायला ताडोबा तलावातली सुसर दिसली.
ताडोबा ट्रीप सार्थकी लागल्याच्या समाधानात रिसॉर्टवर परतलो, परतीच्या प्रवासासाठी बॅग भरायची होती, प्रशांत माझीच वाट बघत होता. वेळेत नागपूर गाठणं जरुरी होतं. पुन्हा एप्रिलमध्ये ताडोबा यायला हवं असं ठरवत निघालो.
सुंदर! वघोबाच्य पोजेस मस्त
सुंदर!
वघोबाच्य पोजेस मस्त टिपल्या आहेत!
@ मॄण, वेडावणारी गौरी नव्हती,
@ मॄण,
वेडावणारी गौरी नव्हती, गौरोबा होते.
सांबर पण वेडावून दाखवतय ते बघितलंस का?
झक्कास फोटो !!
झक्कास फोटो !!
फार सुंदर फोटो !!!! मी गिरला
फार सुंदर फोटो !!!! मी गिरला जाऊन आलेय पण इथे ही जायच आहे मला एकदा >
ओह वॉव.. रुबाबदार आहेत जंगल
ओह वॉव.. रुबाबदार आहेत जंगल चे राजा राणी
इतर जनता ही इंटरेस्टिंग.. रच्याकने काही पर्टिक्युलर सीझन असतो का या सफारी करता?
सही आहेत फोटो!
सही आहेत फोटो!
@ वर्षुताई, सगळी नॅशनल
@ वर्षुताई,
सगळी नॅशनल पार्क्स पावसाळ्यात बंद असतात. १५ जुन ते १५ ऑक्टोबर या काळात ताडोबा बंद असतं. बाकी वर्षभर केव्हाही जाता येतं. साईटिंगसाठी एप्रिल ते जुन हा सगळ्यात उत्तम काळ.
मी गोंदिया जिल्ह्यातील
मी गोंदिया जिल्ह्यातील नागझीरामध्ये tiger safari ला गेलो होतो.. पण डिसेंबर महिना असल्याने जंगलातिल सर्वच नैसर्गिक पाणवठे तुडुंब भरलेले असल्याने बहुतेक प्राणि बाहेर पडत नाहीत.. त्यामुळे वाघ बघायला मिळाला नाही.. तेव्हा तेथिल लोकांनी सांगीतले की मे महिन्यामध्ये पाणवठे कोरडे पडत असल्याने सर्व प्राणि मानव निर्मित पाणवठ्यावर येतात.. जेथे टँकर किंवा पाइप लाइन ने पाणि पुरवीले जाते.. या जागा मोजक्याच असल्याने प्राणि हमखास बघायला मिळतात..
सहीच!!!! लक्की यु!!! आम्ही
सहीच!!!!
लक्की यु!!!
आम्ही चार वर्षांपूर्वी दोन सफारया करून आलो पण वाघोबा ताडोबाच्या जंगलात दडून बसले होते.
लय भारी!! मस्त फोटो........
लय भारी!! मस्त फोटो........
मस्तं. सगळेच फोटो खूप छान
मस्तं. सगळेच फोटो खूप छान आहेत, वाघोबा तर भलताच मॅजेस्टिक दिसतोय.
तोषानु.. मस्त लिवलास.. नि
तोषानु.. मस्त लिवलास.. नि फोटुव छान इलेत..
आशु, थांकु. आधिक माहितीकरता..
आशु, थांकु. आधिक माहितीकरता..
भारीच! आज पाहिलं हे
भारीच!
आज पाहिलं हे
अप्रतिम .. फोटो आणि लिखाण ...
अप्रतिम .. फोटो आणि लिखाण ... ( शेवटून ४ था फोटो जो वाघ कॅमेरा कडे बघत चाललाय ... तो अस तर म्हणत नसेल ना " काय रे ! काय करता aआहात .. इकडे ? )
भारी फोटोज आणि मस्तं वर्णन
भारी फोटोज आणि मस्तं वर्णन
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
आशुतोष अप्रतिम वर्णन आणि
आशुतोष अप्रतिम वर्णन आणि अनुभव.... प्र.ची जबरी..
मी देखिल नागपूरची, दोनचा ताडोबाची सफर झाली, आणी दोन्ही वेळा व्याघ्र दर्शन झाले..
तोषा मस्तच लिहिलयस , फोटोस
तोषा मस्तच लिहिलयस , फोटोस तर अप्रतिम !!!
मस्त फोटो. तारा कसली देखणी
मस्त फोटो. तारा कसली देखणी आहे.
आज बघितले हे फोटो. भारी आलेत.
आज बघितले हे फोटो. भारी आलेत. वाघोबाचे तर जबरदस्तच.
मस्त रिपोर्ट आणि प्रचि
मस्त रिपोर्ट आणि प्रचि त्याहून मस्त.
सर्व फोटो फार छान ..
सर्व फोटो फार छान ..
ताडोबात आजपासून सायकल सफारी
ताडोबात आजपासून सायकल सफारी सुरु.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/cycli...
सायकलवरुन वाघोबा डबलसीट येतो म्हणून हट्टास पेटले तर!!!!
Pages