शिरवळ्या / शेवया ( सोप्पी पद्धत )

Submitted by इन्ना on 23 October, 2015 - 06:58

मी पाककॄती ह्या सदरात काही लिहीतेय ह्याच मलाच खरतर जाम हसू येतय .
त्यातही हा पदार्थ कोकणातला फार खटाटोपाचा. मुद्दम इथे लिहितेय कारण एक हाती पाऊण तासात बनवून उत्तम ( आजीची आठवण झाली वगैरे कॉम्पीमेंट्स मिळवण्याइतका ) झाला .

दसर्‍याला सहसा बासुंदी करतात आमच्या घरी. ह्यावेळी वेगळ काही कराव म्हणून हा घाट घातला . ( घाट घातला म्हणजे कसं भारदस्त , खूप कठीण पदार्थ जन्माला घातल्याचा फील येतो Wink ) माझ्या स्वैपाकघरातल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असल्यानी , आयत्यावेळी श्रिखंड आणायच मनात योजून ठेवल होतं . आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर मुळ विषयाकडे वळू.

आजची रांगोळी दुर्गेची काढून , दसर्‍याची सुरवात केली
durgaa

कोकणातल्या लोकाना हा पदार्थ माहित असेल , बाकिच्यांसाठी थोडाक्यात वर्णन म्हणजे , तांदळाच्या उकडीच्या शेवया अन नारळाचा गुळ घालून रस.

लागणार साहित्य - शिरवळ्यांसाठी/ शेवयांसाठी
१) तांदळाच पिठ, - ५ वाट्या
२) उकडीसाठी पाणी - ५ वाट्या
३) तेल -४ चमचे
४) चवी पुरत मिठ.
५) सगळ्यात महत्वाचा तो शेवगा उर्फ मोठा सोर्‍या.

साहित्य - रसासाठी
१) कोकोनट मिल्क पावडर ( इथे मॅगीची मिळते)/ तयार नारळाच दुध .
२) कनक गुळाची पावडर
३) वेलची / जायफळ वगैरे जो स्वाद आवडत असेल त्याप्रमाणे.

तांदळाच्या पिठाएवढ पाणी काटेकोर मोजून जाड बुडाच्या पातेल्यात तेल अन मिठ घालून उकळायला ठेवायच. त्यात मोजलेले तांदळाच पिठ घालून वरून झाकण ठेवायच. सुगरणींना सुचना दोन वाफा काढायच्या. पण आपण त्या क्याट्याग्रीत नसल्यानी अन वाफा दोनदा कश्या मोजायच्या ते न कळत असल्यानी , दहा मिनिटानी उकड झाल्याच जाहिर करायच. हवतर त्या मधे दोन दा झाक ण उघडून पहायच , वाफ बाहेर येते. दोनदा. Happy

ही झालेली उकड साधारण अशी दिसते.

ukad

हे झाल की सोर्‍या उर्फ शेवगा असेंबल करून घ्यायचा. खास बेळगाव हून बाबां नी आणलाय. सुरेख पितळी कास्टींग आहे. नट बोल्ट अन पाना सगळ किट अगदी देखणं.

shevagaa 1

असेंबल करून असा दिसतो .

shevagaa 2

हे सगळ करेपर्यंत सोर्‍यात बसतील अश्या आकाराचे उकडीचे लांबट गोळे करून ठेवायचे.
ते साधारण असे दिसतात.
ukaD 3

मग एका पोठ्या पातेल्यात पाणी ककळत ठेउन त्यात हे गोळे सोडायचे. परत सुगरण लोकं हे वाफवून घेतात मोदक पात्रात. पण परत आपण त्या गटात मोडतच नसल्यानी अन वाफ मापक यंत्र नसल्यानी दोन वाफा चार वाफा मोजत बसण्या पेक्षा गटांगळ्या खाणारे गोळे जमतात. हे बुडाला बसलेले गोळे तरंगायला लागले की झाले अस समजायच.

ukaD 4

पहिल्यांदा करताना, उकळून पाणी गढूळ पांढर होउन , बुडाशी दिसणारे गोळे , दिसेनासे होतात.

ukad 5

अरेरे हुकल बहुतेक, आम्रखंडाचे डबे आणायला पाठवाव का ? कशाला नसते उद्योग ओढवून घेते मी ? वगैरे सैर करून आपण येइपर्यंत पहिला गोळा तरंगायला लागतो.

gola

झालेला गोळा असा तुकतुकीत दिसतो.

हुश्श ! म्हणून एका ताटात काढायचे. इथून पुढचा कार्यक्रम फास्ट होतो. चला , पानं वाढलीत च्या हाका मारून लोक स्थानापन्न होईपर्यंत आपण पहिला गोळा शेवग्यात घालायचा. दुसर्‍या वेळी बनवता तेव्हा हा गटांगळ्या वेळ रस करायला सत्कारणी लावायचा . तयार नारळाच्या रसाच पाकिट मिळतं अथवा पावडर मिळते. पावडरीच्या खोक्यावर पाणी किती त्याच प्रमाण लिहिलेल असतं . अश्या बनवलेल्या रसात आपल्या चवी प्रमाणे गुळ घालायच. मी कनक गुळाची पावडर वापरते . खडे विरघळायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात गुळ विरघळून रस तयार होतो. मी कोणताही वेगळा स्वाद ह्यात घालत नाही पण वेलदोडा/ जायफळ पारंपारिक कृतीप्रमाणे घालता येइल. ( दालचिनी जर्रा कंटेंपररी Happy )

ras

तर अश्या रितीने तयारी पुर्ण झाल्यावर , शेवग्यातून प्रॉडक्शन सुरु करायच. मग ऑस्ट्रेलियन शेफ च्या कार्यक्रमात कॉन्टेस्टंटा नी पेश करावेत अश्या थाटात आपण शिरवळ्यांची डिश समोर करायची. समोरचेही स्वतः मोठे ज्युरी असल्याच्या थाटातच बसलेले असतात . पण शिरवळ्या अन रसाचा पहिल्या घासाबरोबर नानी याद आती है. Happy ह्या शेवग्यातून शिरवळ्यांचे घाणे काढणे अक्षरशः बच्चोंका खेल आहे. त्याना तो खेळू द्यावा. Happy

shevayaafinished

माझ्या लहानपणी आजी , उन्हाळ्याच्या सुटीत सगळा गोतावळा जमला की हा घाट घालायची. तेव्हा लाकडी शेवगा होता अन त्यातून शिरवळ्या करने हे मजबूत खांदे असलेल्यांच काम असायच. अन नारळाचा रस देखिल नारळ खवून , वाटून , गाळून वगैरे लांबलचक क्लिष्ट अन वेळखाउ कार्यक्रम होता. मागणी अन पुरवठा ह्यात तारांबळ व्हावी इतका गोतावळा असायचा . शेवग्या चे खूर धरायला एक , गोळे घालायला एक अन शिरवळ्या करायला एक, रस करणारी आजी ( बाकीचे सगळे पातळ पुळकावनी करतात अस वाटायच तिला. ) गप्पा, गाणी , चिडवाचिडवी , अन खाउन तुडूंब आहोत तिथेच आडवे व्हावे इतक आग्रहानी खायला घालणारी आज्जी. एक सुरेख अन फुलफिलिंग ( पोट अन मन दोन्ही) कार्यक्रम !
कालच्या शिरवळ्या सोप्प्या होत्या , चव सेम!! फक्त वातावरण निर्मिती करायला गोतावळा नव्हता एवढीच खंत. पोटं भरल पण मनासाठी आठवणीच फक्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदा पाहतेय हा पदार्थ कोकणची नसल्याने. बरंच काही उकडीचं असल्याने हेल्दी स्वीट म्हणून करुन पाहायला पाहिजे.
रसात बुडवून खातात का या शेवया? की एक चमचा रस एक चमचा शेवया असे काहीतरी?
शेवटच्या फोटोत तिखट आमटी आहे का तोच नारळाचा गूळ घातलेला रस?

व्वा! जबरी! मला लिखाण आणी फोटो खूपच आवडले. ह्याची कृती मी मटामध्ये वाचली होती. पण ते सोर्‍याचे फोटो आज पाहीले. फोटो खरच अप्रतीम आहेत. आता पदार्थ कधी करेन माहीत नाही. पण कृती-लिखाण मात्र आवडले.

अहाहा काय लेखन, काय फोटू, काय तो शायनिंग सोऱ्या, काय त्या सुबक शेवया. कलरफुल नारळाचं दुध.

सुरुवातीची रांगोळी पण सुरेख.

ग्रेट इन्ना ग्रेट ___/\___.

सोर्‍याच मस्त आहे. आधी सोर्‍या म्हणल्यावर वेगळेच डोळ्यापुढे आले. मग त्याचा फोटो बघुन घरच्या अभिषेक पात्राचीच आठवण झाली. क्लासीक दिसतोय प्रकार. Happy

वा, मस्त. मजा आली वाचायला इन्ना. तू सोपं म्हणतेयंस पण मला तरी हा घाटच वाटतोय Happy

शिरवळ्या अतिशय सुरेख दिसत आहेत पण नारळाचं दूध मात्र नीट मिळून आलं नाही असं वाटतंय. ना दु साठी मॅगीची पावडर वापरल्यामुळे का ?

लगोलग आलेल्या प्रतिक्रिया पाहून मस्त वाटल Happy
धन्यवाद.
मी अनु , शिरवळ्या अरणे अन फोटो काढणे एकहाती कार्यक्रम होता. त्यामुले फोटोना पुरेसा न्याय दिलेला नाही. शेवयांबरोबर नारळाचा रस आहे.( रंग फोटोत डार्क दिसतोय. ) हळदीच पान वगैरे ठेउन फिनिश्ड पदार्थाचा मस्त फोटो काढायचा होता पण जमल नाही .
तांदुळ , नारळ अन गुळ हे काँबो मला स्वतःला फार आवडत. अन म्हणूनच हा प्रकारही Happy

भारीये हे प्रकरण. मी अजुन कधी पाहिलेही नाही. आता हे खातात कसे तेही सांग. म्हणजे त्या शेवया रसात बुडवुन खायच्या की एक घास शेवया, एक घास रस असे खायचे Uhoh

अगदी गोड आवडत नसेल तर हा प्रकार कटाच्या झणझणीत आमटीबरोबर पण मस्त लागेल..यम यम यम.
(किंवा रसम बरोबर??? मला बेस्ट इनोव्हेशन चं बक्षीस देणार आहे मीच आता.)

छान लिहिलंय. तांदूळ भिजवून, वाटूनही हा प्रकार करतात. तांदूळ वाटताना त्यात थोडे ओले खोबरे घालायचे आणि मग ते वाटण शिजवायचे. पुढची प्रोसेस हीच. त्या शिरवळ्या पाणचट लागत नाहीत ( हे माझे नाही, उषा नाडकर्णी यांचे मत आहे ).

या शेवयावर लाल मिरच्यांची आणि मोहरीची फोडणी दिलेले ओले खोबरे शिवरूनही खातात. ज्यांना गोड चालत नाही, त्यांना हा पर्याय चालेल.

या शेवयावर लाल मिरच्यांची आणि मोहरीची फोडणी दिलेले ओले खोबरे शिवरूनही खातात. ज्यांना गोड चालत नाही, त्यांना हा पर्याय चालेल. सॉलिड आहे हे दिनेशदा.

मी अनुने सांगितलेलं पण भारी माझ्यासाठी.

गोड नारळ रस नवऱ्यासाठी आणि तिखट ऑप्शन माझ्यासाठी. पण शेवगा कुठे माझ्याकडे Wink .

दिनेशदा, तळ कोकणात /गोव्याला मी खाल्लाय तो ही प्रकार , तांदुळ वाटताना त्यात खोबरही घालतात.
अन उरलेल्या शेवया दुसर्‍या दिवशी फोडणी देउन खायचो आम्ही. तिखटाच्या शेवया खाल्या की मगच कथा सुफल संपूर्ण . Happy

त्या गटात मोडतच नसल्यानी अन वाफ मापक यंत्र नसल्यानी >>>>> इन्नाबाई तुम्ही इन्व्हेन्ट करा ना एखादं वाफमापक यंत्र ! Light 1
असो..........अगं काय मस्त खुसखुशीत लिहिलंस! तरी पदार्थ नाही हो खुसखुशीत..... तो गोडच!
आणि आम्ही अट्टल कोकणे(कोकणस्थ नाही हो!) असल्याने पदार्थ नवा नाही. पण तू घातलेल्या घाटाचं कौतुक! म्हणजे पदार्थ करणे, फुटु काढणे, आणि अगदी चविष्ट लिहिणे!
आणि चक्क वीगन रेस्पीमधेही मोडेल. सध्या माझ्या आस्पास खूप वीगन आहेत. त्यांना काय खाऊ घालावं प्रश्नच असतो.
आणि मला ते यंत्र (शेवया पाडायचं) हवंय! सीरियसली.
आणि हो.......... <<<<<<<अन नारळाचा रस देखिल नारळ खवून , वाटून , गाळून वगैरे >>>>>>> आम्ही घरचे नारळ असल्याने हेच करतो. माझ्या फ्रिजात नारळाच्या दुधाचे क्यूब्ज सापडतात!

फारच सात्विक आणि सुंदर दिसतोय पदार्थ. त्यासोबत आजीचे कौतुक वाचायलाही आवडते.
सोवर्या तर अँटिक पीस म्हणूनही शोभेल. पण असा नसेल तर अंजलीच्या सोवर्यातून होतील का या शेवया?

इन्ना काय सही आहेस ग! माझा आवडता प्रकार आहे हा. आईकडे लाकडाचा शेवगा आहे पण खूप जोर लागतो हे एवढ्या वर्षात ऐकतेय. हा प्रकार आई आणि आजीनेच करायचा असतो अशी समजूत होती म्हणून कधी वाटेला गेलेच नाही. Wink आता हा लेख वाचून रस शेवया कारव्याश्या वाटत आहेत.
हा शेवगा कुठे मिळेल??? मुंबईत मिळेल का?

मानुषीताई कोकणात माझ्या माहेरी आणि सासरी नाही करत हा पदार्थ Sad .

मालवण भागात फेमस आहे. सासरी नारळ आहे माझ्या मग हे का नाही करत काय माहिती. शेवगा नाहीये म्हणून नसतील करत.

माहेर कोकणात असून नारळ नाही तिथे त्यामुळे नसतील करत.

मानुषीतै, मला ह्या रेसेपीची व्हर्साटिलिटी फार आवडते. म्हणाव तर पारंपारिक आहे , जराश्या बदलानी कंटेमपरी होउ शकते . गोडपणा आपल्या चवी प्रमाणे कमीजास्त केला तरी चालतो. दक्षिणेत इडिअप्पम स्ट्यु बरोबर ही खातात. विदेशी मित्रमंडळीत पण आवडणारा पदार्थ आहे. लाइव्ह काऊटर असल्याप्रमाणे इतर तयारी करून ऐनवेळेस शेवया करून पुरेस नाट्य तयार करता येतं Happy वगैरे.

सोर्‍या नसलेल्या उत्साही पब्लीक नी अंजलीचा हातपंप वापरला तरी काम भागेल. १ मि मि भोकाची शेवाची चकती वापरून . Lol
आमच्या घरी माझा भाचा आमच्या शेवग्याला , मामीच सोन्याच नूडल मशिन म्हणतो Wink

इन्ना - लईच भारी की गं अगदी दुर्गेच्या रांगोळी पासून (व्ह्याया शेवगा) शिरवळया पर्यंत
परत कधी करत्येस? तुझी गोतावळा नाही अशी खंत दूर करावी म्हणतो. Wink

इन्ना, फारच मस्तं पाककृती! लिहिण्याची पध्दत भारी आहे. फोटोपण सुंदर! शेवटला आजीबद्दलचा परिच्छेद खूप आवडला. आणखी पाकृ लिहीत जा.

बाय द वे, तो शेवेचा सोर्‍या कसला दणकट आणि वापरायला कंफर्टेबल आहे! असा तिपाईवरचा सोर्‍या कधी बघितला नव्हता.

शिरवळ्या नक्की करून बघणार. ओरिजिनल खाऊन झाल्यावर एक व्हेरिएशन म्हणून उकडीत जिरं, आलं, मिर्ची घालून, बटाट्याचा स्ट्यू किंवा उपासाच्या आमटीशी खाऊ. Happy

तुझी गोतावळा नाही अशी खंत दूर करावी म्हणतो. >>>>>>>> हर्पेन मी तुझ्या पार्टीत!
आणि मला ते यंत्र (शेवया पाडायचं) हवंय! सीरियसली.>>>>> काय हो...... या वाक्याला काय इग्नोरास्त्र ?

Pages