*%गोष्ट चिमणा - चिमणीची%*%
(स्थळ ः घरासमोरच्या झाडावरील घरटे )
-----+++-----+++-----+++-----+++---
चिमणी ः अहो ऐकलं का ?
चिमणा ः काय गं, मोठ्याने बोल जरा.
चिमणी ः काय हो , हा बाहेर कसला आवाज येतोय .
चिमणाः अगं आपल्या घरट्यासमोरील घरात तो क्लास चालतो ना. छोट्या मुलांचा, त्यांचा आवाज आहे तो.
चिमणी ः किती ओरडतायत. शी ! वैताग आहे नुसता .
चिमणा ः अगं थांब थांब, अगं शेवटी मुलंच ती. आता त्यांच्या ताईने दम दिला की शांत होतील बघ!
चिमणी ः अहो खरंच की, सगळे शांत झाले.
हुश्श! आता बरं वाटलं.
चिमणाः बाकी काही म्हणा, मला या मुलांचे फार कौतुक वाटते. तो छोटा मयूर, तन्वी, सेजल ही मुले किती दूरवरुन चालत रोज क्लासला येतात. सगळा अभ्यास व्यवस्थित करतात. थंडी , पाऊस कशाचीही काळजी करत नाहीत.
चिमणी ः हो पण मला मात्र यांची दया येते, एवढया छोट्या शरीराला ती अवजड दप्तरे,
सेमी इंग्रजी चा अभ्यास, बापरे !
चिमणा ः हो ना पण सेमी इंग्रजी मुळेच मुलांना पुढंच इंग्रजी सोपं जाणार आहे.
चिमणी ः पण चिमणराव त्यामुळे मुलांना मराठी कळेनासं झालंय. त्या सुयश कडेच बघा, त्याला दोन अधिक तीन किती म्हणून विचारले तर सांगता येत नाही , पण टू प्लस थ्री विचारलं तर पटकन उत्तर देतो.
चिमणा ः हा!हा!हा! हो ना. पण आवड खूपच आहे सगळ्यांना अभ्यासाची.
सहावी-सातवीतल्या मुलांना विचारलं की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचय, तर इंजीनिअर, पोलीस, शिक्षक अशी उत्तरे देतात. यावरूनच त्यांची स्वतःच्या भविष्याबद्दलची उदात्त स्वप्ने दिसून येतात.
चिमणी ः हो पण या स्पर्धेच्या युगात यांचा कसा निभाव लागेल याची काळजी वाटते.
त्यांना अजून उच्च शिक्षणाचे वास्तव माहिती नाहीये. तिथे किती संयमाने कष्ट करावे लागतात याची त्यांना कल्पना नाहीये.
चिमणा ः अगं पण आपल्या स्वप्नाकडे पूर्ण लक्ष एकाग्र करून जर कष्ट केले तर काहीच अशक्य नाही !
चिमणी ः पण आजकालच्या मुलांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर नेण्यासाठी
टी.व्ही., मोबाईल, वाईट मित्रांची संगत, व्यसन, अशी बरीच साधने आहेत. जी त्यांना पूर्णपणे उध्वस्त करून शकतात.
चिमणा ः अगं पण आजची मुले खूप शहाणी व समजूतदार आहेत. ती आपली स्वप्ने पूर्ण करताना भरकटतील असे वाटत नाही.
जोपर्यंत त्यांना आपल्याला मोठं व्हायचय, हा विचार आठवत असेल तोपर्यंत तरी ते अभ्यास सोडून दुसऱ्या कशाचा विचार करणारच नाहीत.
चिमणी ः बघू काय होतंय ते. परमेश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे रे बाबा.
चिमणा ः अगं बघच तू, हीच मुले उद्या चांगले शिक्षण घेऊन खूप मोठी होतील.
आपल्या आई बाबांचे नाव मोठं करतील...
चिमणी ः पण तोपर्यंत आपल्याला रोज त्यांचा गोंगाट सहन करावाच लागेल!!!!