http://www.maayboli.com/node/55981
'ध' चा 'मा' होवुन पुर्वी एक खून पुण्यात पडला होता. इथे अमेरिकेत 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचे रोज खून पाडले जायचे. '' आय वान्त तू बीसीत रंडन अँड लोम''....हे नेहमीच.
एकीकडे जपानी लोकांची इंग्रजीशी अशी हाणामारी चालली होती तिथे मी सुद्धा आपल्या परीने जपानी भाषेची मन लावून ऐसी की तैसी करत होते.
'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा. एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती. या बाईला अचानक वेडाचा झटका आला की काय म्हणून पार हबकुन गेले बिचारे....
बरीच वर्षे या लोकांच्या सहवासात राहूनसूद्धा मी काही नीट जपानी शिकले नाही. याला एक कारण असे होते की मला सुरुवातीला वाटलं होतं की या लोकांशी बोलून बोलून माझी भाषा छान पक्की होईल. पण हे लोक त्यांचा इंग्रजीचा सराव व्हावा म्हणून माझ्याशी इंग्रजीतच बोलायचे. आता माझं इंग्रजी त्यांना कुठल्या दृष्टीने सुंदर वाटायचं कोण जाणे. पण अमेरिकन लोकांशी बोलतांना मी "हाय, हाउ आर यू?" किंवा "इट्स अ ब्यूटिफुल डे टुडे" सारखी कठीण वाक्य सटासटा बोलत असल्यामुळे बहुतेक त्यांना तसं वाटत असावं.
जपान जरी मागे राहिलं असलं तरी आमचे जपानी ऋणानुबन्ध मात्र अजुन सुटले नव्हते उलट पुढल्या काही वर्षात ते आणखीच पक्के होणार होते.
या टिपिकल अमेरिकन मिडवेस्टर्न खेडगावात तीन- चार जपानी कंपन्यांचे कारखाने होते. सगळ्या कारखान्यांचे मिळून जवळ पास तीसेक एक्सपॅट जपानी कुटुंबे इथे राहात होती. आमच्या कंपनीचे आम्ही बारा जपानी कुटुंबे होतो. आता जरी जन्माने नसलो तरी आमची गणना तिथे " वुई झापानीझ फॅमीरिस" अशीच व्हायची.
कारखाना अमेरिकेत होता तरी इथे काम करण्याची पद्धत मात्र जपानी. ऑफिस मधे सगळ्या कर्मचार्यांना गणवेश असायचा. सी. ई. ओ. पासून शॉप फ्लोर वरच्या ऑपरेटर पर्यंत सगळे सारख्याच कपड्यात. कोणालाही क्यूबिकल वगैरे ही ऐश नाही. सगळ्यांची टेबलं लाईनीत शाळेतल्या वर्गासारखी, ओपन लेआऊट. बॉसचे टेबल सगळ्यात मधे त्यामुळे त्याचं सतत सगळीकडे लक्ष. या जपानी सी. ई. ओ. ची शिस्त असायची, ती म्हणजे तो स्वत: आणि त्याच्याबरोबरचे हेड ऑफीसचे बारा लोक ह्यांनी सगळ्यांपेक्षा एक तास आधी यायचं आणि सगळे गेल्यानंतर तीन तासांनी जायचं. जपानचं वर्क कल्चर त्याने आपल्या टीम पुरतं तसंच ठेवलं होतं, पण स्थानिक कर्मचार्यांना मात्र त्याचा त्रास नव्हता. तसेही जपानी लोकांना कमीत कमी तेरा तास ऑफिस मधे बसलं नाही की अक्षरश: ताण येतो, मनात अपराधी भावना येते. त्यांच्या बायका तर त्यांच्यापेक्षा वरताण. इतक्या की, नवरा जरा बर्यापैकि वेळेवर घरी आला की हा असा कसा लवकर आला? आता शेजारीपाजारी काय म्हणतील हे टेन्शन त्यांना येतं.
आमचा मैत्रिणिंचा ग्रूप मस्तं जमला होता. त्यापैकी काही जणी इंग्रजी चांगलं बोलायच्या. अर्थातच त्यांच्याशी माझी भाषेमुळे जास्ती मैत्री झाली. सगळ्याजणी छान अगदी साध्या होत्या. ही सगळी कुटुंबे इथे साधारण चार सहा वर्षांसाठी यायची आणि मग पुन्हा जपान ला परत. आधी आपला देश सोडतांना भयंकर कुरकुरणारे हे लोक इथे आले आले की इथल्या अमेरिकन ऐसपैस आयुष्याला भलतेच सरावायचे.
जपानपेक्षा महागाई कमी आणि पगार जास्ती. मग काय? शॉपिंग म्हणू नका, गोल्फ म्हणू नका, मोठ्या गाड्या म्हणू नका आणि मोठाली घरं म्हणू नका - थोडक्यात जीवाची अमेरिका करून घ्यायची पाच वर्षात, असा यांचा हिशोब. पण समस्या मात्र होती. भाषेची समस्या. पुरूष मंडळी बाहेर काम करतांना जरातरी भाषेचा सराव करून घ्यायचे पण बायकांना मात्र घरी राहून असे करणे कठीणच. म्हणजे त्या इंग्रजीच्या शिकवणीला वगैरे जात असत पण प्रगती बर्यापैकी मंद असे. याचा परिणाम असा की हे सर्व लोक नेहमी एका समुहात राहात असत. एखाद्या पाण्यात असलेल्या बेटासारखे ! त्या समुहात, त्या ग्रूपमधे त्यांना सुरक्षित वाटत असे. सगळयांचे एकमेकात खूप छान संबंध होते. या लोकांच्या उपजत कळप प्रियतेची अत्यंत चांगली बाजू ही की या आमच्या ग्रूप मधे कोणालाही अगदी रात्री दोन वाजता जरी काही मदत लागली तरी हे लोक धावत येत असत. आता हीच गोष्ट जपान मधे करतील का ते माहीत नाही पण इथे परदेशात मात्र हे लोकं देश, भाषा आणि कंपनी याची बांधिलकी जिवापाड जपायचे.
अमेरिकेत आल्यावर जपानी पुरूष का कोण जाणे पण स्वत:चं नाव बदलून सोपं अमेरिकन नाव घ्यायचे. उदा. फुमिओ चं जेफ, हिरोशी चं मार्टिन पण बायका मात्र आपलं तेच नाव राहू द्यायच्या. माझ्या बहुतेक सगळ्या मैत्रिणिंची नावं चिकाको, एरिको, नात्सुको, शिएगो, आकिको अशी सगळी 'को' नी संपणारी.
दिसायला, वागायला, बोलायला जपानी लोक फार मृदू असतात. रांग सोडणे, नियम मोडणे किंवा वचवचा बोलणे यांच्यासाठी अशक्य आहे म्हणजे सामाजीक जीवनात ! आता त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात त्यांचे नैसर्गिक मानवी गुण दोष अर्थात दिसणारच.
जपानी स्त्री ही अस्ताव्यस्त अवतारात, गबाळ्या कपड्यांमधे बाहेर कधीच दिसणार नाही. नेहमी फिक्या, नाजूक रंगाचे आणि अत्यंत क्लासी कपडे. परफ्यूम्स अगदी मंद सुवासाची. केस नेहमी छान कापलेले, सेट केलेले. हसणार तरी नाजूक. आपले दात दिसणार नाही अशा बेताने खुदुखुदु, तोंडावर हात ठेवून. मेकअप ची प्रचंड आवड. तो केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवणे म्हणजे यांच्या दृष्टीने भयानक वाईट समजल्या जाणारी गोष्ट. स्त्री असो की पुरूष, यांचं वैशिष्ठ म्हणजे हे सगळे लोक दिसायला आपल्या वयाच्या दहा-पंधरा वर्षे कमीच दिसतात. अंगाने अत्यंत सडपातळ आणि चपळ. तुरुतुरु करत सगळी कामं पटापट करत असतात. दिसण्यावरून, हालचालींवरून यांच्या वयाचा अंदाजच येत नाही.
स्त्रीयांची एक मजेशीर लकब सांगते. या बायका फोन वर जेव्हा बोलतात तेव्हा अतिशय गोड, नम्र आवाजात लाडीक पणे बोलायला सुरू करतात. आता हा गोड आवाज म्हणजे जरा अतीच असतो. अगदी तीस, चाळीस, पन्नास, साठ वय काहीही असो या स्त्रिया फोनवर बोलतांना सोळा, सतरा वर्षाची तरुणी कशी बालिश, लाडीक आवाजात बोलेल त्या आवाजात बोलतात. फोन उचलता क्षणी अगदी लाजत, मुरकत, बावरत बोलणं सुरू होतं..." मोशी, मोशी, हे अमक्या अमक्या चं घर आहे बर्र का, काय काम आहे हो आपलं? सांगा बरं..." साधारण या सुरात.
आता फोन वर जर नवरा असला तर तो आपल्या कमावलेल्या तुसड्या स्वरात सांगतो '' अगं ए बाई,..पुरे झालं...मीच आहे " मग बायको सुद्धा नवर्याच्या मॅचिंग टोन मधे लग्गेच त्याच्यावर खेकसते '' हं...क्कायेय आहे...बोल लवकर, हज्जार कामं पडलीयेत माझी.."
यांच्या अंगात उपजत कला असते . बोटात जादू असते. कुठलीही गोष्ट मग स्वयंपाक करणे असेल, वीणकाम, शिवणकाम, पियानो वाजविणे असु दे नाहीतर अगदी गोल्फ खेळणे असु दे. कुठल्याही गोष्टीत अफाट जीव ओतून काम करतील. ज्या प्रीसीजन ने गोल्फ खेळतील तेच प्रीसिजन इतर सर्व कामांमधे. साधं गिफ्ट पाॅकिंग इतकं सुरेख करतात की त्यांनी दिलेलं गिफ्ट उघडवसंच वाटू नये.
हे लोक नेहमी एका विशिष्ट चाकोरीत, आखलेल्या मार्गात चालतात. प्रत्येक गोष्टीला एक ठरवलेली पद्धत, एक सिस्टम असते. या सिस्टिम च्या बाहेर काही वेगळं करायला या लोकांना मानवत नाही. एखादी नेमुन गोष्ट, आखून दिलेला नियम मात्र हे लोक अगदी इमाने इतबारे पाळतात. इम्पल्शन, सर्प्राइज़ हे शब्द यांच्या शब्द कोषात नाहीत. या लोकांना कुठलीही गोष्ट एकदम पटकन मनात आले म्हणून केली अशी जमत नाही. सगळं नीट ठरवून, वेळापत्रक बनवून.
या पद्धतीला आमचा ग्रूप पण अपवाद नव्हता. काही बेत ठरवायला भेटायचे असेल किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर तर एक विशिष्ठ प्रणाली ठरलेली होती.
तो काळ होता २००० च्या सुरुवातीचा. तेव्हा लॅंडलाइन वापरायचा जमाना होता. आमची एक लिस्ट होती. प्रत्येकीला एक नंबर नेमुन दिलेला असायचा. आता समजा मी पाच नंबरवर आहे आणि काही निरोपा निरोपी करायची असेल तर चार नंबरवाली मला फोन करणार आणि मी सहा नंबर वालीला. सीक्वेन्स हा ठरलेला, वर्षानुवर्षे. कुठे बाहेर जेवायला जायचे असल्यास कोणाची गाडी चालवायची पाळी आहे हे सुद्धा ठरलेलं, कोण कोणाला आणि कधी पिक अप करणार हे सुद्धा मिनिटाच्या हिशोबाने. एकीला सहाला, दुसरीला सहा वाजून चार मिनिटाने तर तीसरीला सहा वाजून आठ मिनिटाने, जेणे करून सहा पंधराला रेस्टोरेंट च्या पार्किंग लॉट मधे सगळे हजर. कुठेही गोंधळ नाही आणि चुक नाही.
आता बिल भरण्याची पद्धत तर सगळ्यात अल्टिमेट होती. म्हणजे अशी की सगळ्यांच्या जेवणाचे एक बिल बनणार. मग त्या बिलाचा किती टक्के हिस्सा कोणी भरायचा हा या आमच्या नवर्यांच्या पदावर अवलंबुन होता. म्हणजे सीइओ ची बायको सगळ्यात जास्ती बिल भरणार आणि मग उतरत्या भाजणीने बाकी सगळ्या. शिस्तीत कॅल्क्युलेटर नी सटासट हिशोब व्हायचे मग हिने १०डॉलर अकरा सेंट्स द्यायचे, तीने सतरा डॉलर दोन सेंट्स अशी अगदी काटेकोर विभागणी व्हायची.
पण कधी कधी वेळेवर कुठे जायचा बेत ठरला की मग जरा पंचाईत व्हायची. कारण पटकन कोणीतरी निर्णय घेणे आणि मुख्य म्हणजे तो बोलून दाखविणे हे यांच्यासाठी सोपं नसतं. त्यामुळे आधी ठरलेलं नसतांना वेळेवर जेवायला जाऊ असे ठरले की मग आमच्या गावात मोजून पाचच्या प्रचंड संख्येत असलेल्या रेस्टोरेंट्स पैकी कुठल्या एकात जायचं यावर सगळ्या जणी एकमेकींना तू सांग, तू सांग म्हणून सुमारे पंचवीस मिनिटे घोळ घालणार. एखादीच्या घरासमोर, टळटळीत उन्हात गोल घोळकयात उभे राहून यांचं पहेले आप, पहेले आप सुरू झाले की मग मात्र माझा पेशंस संपायचा. तेव्हा मी तोंडात येइल त्या रेस्टोरेंट नाव घेऊन कुठे जायचं हे ठरवून टाकायचे आणि त्यांच्या या घोळाच्या भाजीत भस्सकन पाणी ओतायचे. .....
क्रमश:....
वाह, शाब्बास, बेरी गुद्दो !
वाह, शाब्बास, बेरी गुद्दो !
छान झालाय हा सुद्धा भाग.
छान झालाय हा सुद्धा भाग. पुढचे पण पटापट लिहा
कसले छान लिहीलय... अगदी
कसले छान लिहीलय... अगदी नजरेसमोर उभे रहातय.... सगळे नै वाचता आले आत्ता, उद्या परत वाचतो.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्तच!!!
मस्तच!!!
सही आहे
सही आहे
अर्रे मस्त झालंय हे! येऊ दे
अर्रे मस्त झालंय हे! येऊ दे पुढचा भाग!
छान छान छान्,मस्त ओळख करून
छान छान छान्,मस्त ओळख करून देतीयेस जॅपनीज कल्चर ची.. खरंय.. जगात कुठेही जा , टूरिस्ट्स प्लेसेस मधे सर्वात शांतपणे फिरणारे ,हॉटेल मधे शिस्तबद्ध लायनीत, चेक इन काउंटर समोर, पेशंटली आपल्या बारी चा इंतजार करत उभे राहणार जपानी लोकं.. बोलताना ,हसताना यांचे आवाज फुलपाखराच्या पंखांप्रमाणे.. ते भांडताना तू विटनेस केलंयस का कधी तरी??
मस्तच ओळख होतेय जपानची !
मस्तच ओळख होतेय जपानची !
ते भांडताना तू विटनेस केलंयस
ते भांडताना तू विटनेस केलंयस का कधी तरी?? <<<
हसतच भांडतात की काय?
हाहाहा एक नंबर! पुढचे भाग
हाहाहा एक नंबर! पुढचे भाग पटापट येऊ द्या!
ह्या भागात पुढच्या भागाची आणि मागच्या भागाची लिंक देऊन ठेवा म्हणजे वाचताना सोपं जाईल.
ह्या भागात पुढच्या भागाची आणि
ह्या भागात पुढच्या भागाची आणि मागच्या भागाची लिंक देऊन ठेवा म्हणजे वाचताना सोपं जाईल.<<<
+ १०००००
आवडले दोन्ही भाग, तेरा तास
आवडले दोन्ही भाग,
तेरा तास ऑफिस मध्ये बसणे ऐकून जाम टेन्शन आले..
टिपीकल जॅपनीज कंपनीत कामाचा
टिपीकल जॅपनीज कंपनीत कामाचा अनुभव नाही त्यामुळे टीप देताना किंवा बाहेर जेवायच्या वेळेचा पिकप ह्याचा अनुभव नाही पण तुम्ही लिहिलं आहेत त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवता येण्याइतकं पटलंय. हा भागही छान.
मस्त लेख आहे. आवडला. एक
मस्त लेख आहे. आवडला.
एक गोष्ट मात्र वेगळी वाटते. आमच्या काही जपानी मैत्रीणी इतक्या घोळ घालणार्या नव्हत्या. मे बी उसगावातल्या कॉलेजातल्या वातावरणामुळे असेल. काहीही नविन, वेगळे, अगदी छोटी ट्रीप सुद्धा आता ठरवून लगेच करायला अगदी तयार.
मस्तच
मस्तच
मस्त.
मस्त.
पुढचा भाग येऊ दे पटापट.
पुढचा भाग येऊ दे पटापट.
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
दोन्ही भागांच्या
दोन्ही भागांच्या प्रतिसादांसाठी आणि कौतुकासाठी मन:पूर्वक आभार मंडळी.
वरील काही प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे पहिल्या भागाची लिंक इथे देत आहे.
खूप धमाल लिहीले आहे. दोन्ही
खूप धमाल लिहीले आहे.:फिदी: दोन्ही भाग करन्जीप्रमाणे गोड आणी चकलीप्रमाणे खुसखुशीत झालेत. अजून लिहा.
मस्तच गं हा भाग सुद्धा
मस्तच गं हा भाग सुद्धा

घोळाच्या भाजीत भस्सकन पाणी >>
नारुहोदो!! छान लिहीले आहे.
नारुहोदो!! छान लिहीले आहे.
मस्तच लिहीता तुम्ही.. अजून
मस्तच लिहीता तुम्ही.. अजून वाचायला आवडेल
फारच मस्त लिहिलंय .... अजून
फारच मस्त लिहिलंय ....
अजून येऊंदेत ....
हे पण जबर्या. <<आता फोन वर
हे पण जबर्या.
<<आता फोन वर जर नवरा असला तर तो आपल्या कमावलेल्या तुसड्या स्वरात सांगतो '' अगं ए बाई,..पुरे झालं...मीच आहे " मग बायको सुद्धा नवर्याच्या मॅचिंग टोन मधे लग्गेच त्याच्यावर खेकसते '' हं...क्कायेय आहे...बोल लवकर, हज्जार कामं पडलीयेत माझी..">>
वर्णन परफेक्ट आहे सगळं!
अजून लिहा !!
* डोरमॉन/ शिनचॅन इत्यादीचे जुने काही एपिसोड्स पाहिले असल्यास हे वर्णन वाचता वाचता जपान्यांच्या घरांच , बोलायच्या पद्धतीचा देखावा समोर उभा राहिल.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
मस्त
मस्त
मस्तच...
मस्तच...
पहिल्यांदाच जपानची ओळख
पहिल्यांदाच जपानची ओळख होतेय.. खूप छान अनुभव आहेत.. लिहीत रहा.
Pages