आजकाल गर्दीच्या ठिकाणी कशामुळे कुणाचा पारा चढेल याचा भरवसा देता येत नाही. माझ्यासोबत किंवा माझ्या समोर घडलेले काही प्रसंग मी सांगतो तुम्हाला.
एक प्रसंग याच ऑक्टोबर महिन्यात घडलेला. पुण्यात विमान नगर मार्गे एयर पोर्ट रोडने कल्याणीनगरला कॅब मध्ये जातांना सिम्बियोसिस च्या थोडे पुढे एका चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता. चालकाच्या समोर असलेल्या काचेतून समोर दिसलेल्या प्रसंगाचं मला जे आकलन झालं त्यानुसार मी हे लिहित आहे. कदाचीत त्या प्रसंगाला अजून दुसरी तिसरी बाजू असू शकेल ती मला माहिती नाही. असो.
...तर समोरच्या चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता. त्या चौकात सिग्नल आणि ट्राफिक पोलीस दोन्ही नसल्याने जो तो आपलेच घोडे पुढे दामटत होता. प्रत्येकाला घाई होती. एकजण (मिशीवाला माणूस) इतर काही लोकांसोबत रस्त्यावर उतरुन जाम झालेली ट्राफिक मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होता. या बाईक ला इकडे जा, त्या कारला तिकडे जा वगैरे असे सांगून! प्रथम दर्शनी तरी तसेच वाटत होते. मात्र त्याने एका कारचालकाला एका बाजूला होण्याची विनंती केली आणि तो बाजूला होत नव्हता, पण ते कशामुळे ते समजले नाही. त्यांच्यात बराच वेळ वाद आणि हातवारे चाललेले दिसत होते. त्या मिशीवाल्या माणसाने केलेली विशिष्ट मार्गाने पुढे जाण्याची विनंती त्या कारचालकाने न ऐकल्यामुळे की काय, त्याने कारकडे पाहून शिवी दिली आणि त्रासिक हातवारे केले. तोपर्यंत आमची कॅब थांबली होती कारण कुठेच हलायला जागाच नव्हती. मी माझ्या चालकाला बजावले, "आपल्याला घाई नाही. उगाच पुढे नेऊ नको. आरामात घे!"
सकाळची दहाची वेळ असल्याने सर्वांनाच कामाला जायची घाई. त्या समोरच्या कारचालकाने अतिशय वेगाने गाडी वळवली, थोडी पुढे नेली आणि थांबवली. त्यातून मागच्या सीटवर बसलेला पांढरा शर्ट घातलेला माणूस जोराने दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्या बाजूचा निळया शर्टवाला माणूस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या निळ्या शर्टवाल्याला ढकलून तो पांढरा शर्ट गाडीतून उतरला आणि वेगाने मागे पळत येऊन त्या शिव्या देणाऱ्या माणसाच्या अंगावर जोराने धावला आणि मारायला लागला, म्हणाला, "तू शिव्या देणार मला? तू?" आणि मग त्याने मिशिवाल्याला त्याने शिवी परत केली. त्याला इतर लोक अडवायला लागले आणि जाउदे जाउदे म्हणून पुन्हा ते लोक आणि निळा शर्ट त्याला अडवायला लागला. पण त्याने मिशिवाल्यावर हल्ला केलाच आणि मारहाण सुरु केली!
काही लोकांनी शेवटी त्या पांढऱ्या शर्टाला पुन्हा त्याच्या कार पर्यंत आणल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला आणि मला वाटले की चला भांडण मिटले. पण कसले काय? तो मिशीवाला पुन्हा त्या पांढऱ्या शर्टाकडे पळाला आणि म्हणू लागला, "तू मारेगा मेरेको? तू मारेगा मेरेको? मार!! ले मार! मार मुझे! मै खुद आया तेरे पास, मार मुझे!! देखता हू कैसे मारता है तू मुझे!" आणि मग पुन्हा शिवी! मग पांढरा शर्ट भडकला आणि तोही मिशिवाल्याला मारायला लागला. ट्राफिक चा जाम बाजूलाच राहिला आणि हा माणसाच्या भडकलेल्या डोक्यांचा जाम झाला होता. माणसांचे डोकेच जाम झालेले दिसत होते. मग बऱ्याच प्रयत्नांनंतर भांडण मिटले. आणि कारण अगदी एवढेसे होते. मुळात काही कारण नव्हतेच! पण त्यावरून एक माणूस दुसऱ्या माणसावर किती आणि कसा आणि इतक्या टोकाला जाऊन हल्ला करू शकतो??
कॅब चालक मला म्हणाला, "एक तर स्वत: रस्त्यावर उतरून तो मिशीवाला लोकांची मदत करतोय ट्राफिक जाम तोडायला आणि पब्लिक त्याला असा प्रतिसाद देताय? पब्लिकची पण कमाल आहे!"
पुढे बऱ्याच वेळाने मार्ग मोकळा झाल्यावर आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला दिसले की रस्त्याच्या मधोमध जेसीबी द्वारे खूप मोठ्ठा खड्डा खोदला जात आहे. त्यामुळे भला मोठा जाम झाला होता. पुढे गेल्यावर तोच मिशीवाला माणूस पुन्हा रस्त्यावर उतरून गाड्याना दिशा दाखवून मदत करतांना दिसला.
मी विचार करू लागलो, "इतकी घाई असते का प्रत्येकाला? की थोडाही उशीर सहन होत नाही? चौकात सिग्नल का नाहीत? सिग्नल नाहीत तर ट्राफिक पोलीससुद्धा नाहीत? मिशीवाल्या माणसाला इतराना मदत करायची होतीच तर शिव्या देऊन कशाला त्या मदतीची किंमत त्याने कमी कशाला केली? आणि एखादा माणूस स्वत: पुढाकार घेवून ट्राफिक हटवत आहे हे पाहून इतर कार चालकांनी आणि इतरांनी त्याचे नको का ऐकायला? की लगेच त्याच्याच अंगावर धावून जायचे? अर्थात वरच्या प्रसंगातल्या सर्व शिव्या अर्वाच्य होत्या ज्या ऐकल्यावर कुणालाही राग येईल. मुळातच गर्दीच्या आणि ट्राफिकच्या ठिकाणी माणूस इतका अस्वस्थ आणि अधीर आणि हिंसक का बनतो? पाच दहा मिनिटांसाठी एकत्र आलेले सगळे अनोळखी व्यक्ती अचानक एकमेकाना मारहाण करायला कसे काय धावू शकतात? अशा संतापाच्या भरात काहीही होवू शकते! सामान्य माणूस हा रस्त्यावरचे वाहन चालवतांना त्याच्या अंगात वाहनाचा वेग आणि धुंदी येऊन तर तो असा वागायला लागत नाही ना? एरवी पायी चालताना तोच माणूस तसा वागला नसता का?" असे एक ना अनेक प्रश्न!
त्यानंतर पुढे काय झाले मला माहित नाही पण ...कारण मी ऑफिसच्या मार्गी लागलो होतो पण...
पुढे गेल्यावर मी मनात कल्पना करू लागलो की पुढे असे झाले असेल तर किती छान होईल!
झाला तो प्रसंग झाला असा विचार करून त्या कारमधल्या पांढऱ्या शर्टाने रागावर नियंत्रण आणले आहे...
आणि तो मिशीवाला त्याला पुढच्या चौकात पुन्हा भेटला तेव्हा त्याने काच उघडून त्याची माफी मागितली आहे...
आणि दोघांनी झाले गेले जाउद्या असे म्हणून एकमेकाना आपापले व्हिजिटिंग कार्ड एकमेकाना दिले आणि ते दोघे एकमेकाना स्माईल देऊन निघून गेले आहेत...
जमलेली गर्दी सुद्धा या मनोमिलानाने सकारात्मक विचार करू लागली आहे आणि सगळे लोक पटापट एकमेकान मदत करून सिग्नल जवळचा जाम लवकर दूर व्हायला मदत झाली आहे. एका सद्गृहस्थाने ट्राफिक कंट्रोलर ला बोलावून स्थिती नियंत्रणात आली आहे आणि सगळेजण थोड्या कमी उशिराने ऑफिसला पोहोचले आहेत....
खरेच असे होईल का? असे झाले असेल का? झाले असेल तर किती छान होईल.
जितका पारा लवकर चढला तितका लवकर उतरला तर किती छान होईल!
पुढच्या भेटीत आणखी एक प्रसंग सांगतो. तोपर्यंत सकारात्मक विचारांचा विजय असो!!
hya prasangapeksha tya nantr
hya prasangapeksha tya nantr chi kalpana chan ahe
मस्त
मस्त
छान सकारात्मक लिहिलंय.
छान सकारात्मक लिहिलंय. शेवटच्या दोन-तीन परिच्छेदातले प्रसंग (कल्पित) वारंवार घडो हीच सदिच्छा
कहने को ये शहर है, पर कानून
कहने को ये शहर है, पर कानून जंगल का चलता है
शेवटी माणूस हा सुद्धा एक जनावरच
लोकं मारामारीतही मजा घेतात, त्याचे किस्से आणि आठवणी जपतात