सुरक्षितता वगैरे...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

उद्याच्या दिवशी काहीही काम करावं लागणार नाहीये. उद्या 'सेफ्टी डे' आहे असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा मी चकीत झाले होते. जिथे तासावर कामाचे पैसे मिळतात अश्या ठिकाणी 'सेफ्टी डे' पायी आख्खा दिवस बिनकामाचा घालवूनही कामाचे तास धरले जाणार होते. हे कळल्यावर मी अजून जास्त चकीत झाले.
युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामधे शिकत असताना, समर सेमिस्टरमधे, सॅन्टा फे ऑपेरा या समर थिएटर कंपनीत त्या वर्षी मी इंटर्नशिप करायला गेले होते. त्यावर्षी सॅन्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमधे स्टिचर अप्रेंटिस होते. तो माझा पहिलाच उन्हाळा होता तिथला. काम चालू झाल्याच्या दोन तीन दिवसातच हा सेफ्टी डे असणार होता. 'कैत्तरी फिरंगी फ्याड!' हे आलंच डोक्यात. पण प्रत्येकाला सेफ्टी डे ला हजेरी लावणे कंपलसरी होते त्यामुळे बघू तरी काय गंमत असं म्हणत दुसर्‍या दिवशी ऑपेराच्या रांचवर पोचले.
सेफ्टी लेडी नावाने ओळखली जाणारी एक इंस्ट्रक्टर लेक्चर द्यायला आली होती. आल्याआल्या तिने एक मोठे बुकलेट दिले. ज्यामधे ऑपेरा रांचवर किंवा ऑपेराच्या विविध शॉप्समधे वापरल्या जाणार्‍या वस्तू आणि त्यांच्यासंदर्भाने शक्य असलेले धोके आणि त्यासाठी घ्यायची काळजी, मस्ट डूज, मस्ट डोण्टस यांच्याबद्दल तपशीलात वर्णन होते.
हातशिलाईची सुई, सर्जींग किंवा ओव्हरलॉकिंगचे मशीन, प्रॉप शॉप वा सीन शॉपमधे वापरली जाणारी महाकाय आणि भयावह मशिनरी, कॉश्च्युम क्राफ्ट, प्रॉप शॉप, डाय शॉप, मिलिनरी, मेकप वगैरें विभागात वापरली जाणारी रसायने हे सगळंच किती आणि कसं धोकादायक आहे ते सांगितलं गेलं. हे सगळं वापरताना घ्यायची काळजी व नियम सांगितले गेले. उदाहरणार्थ हातशिलाई करताना थिंबल वापरणे कंपलसरी, सर्जर किंवा ओव्हरलॉक मशीन वापरताना हातांची पोझिशन कशी ठेवायची? सर्व मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्स कंपलसरी, विविध स्प्रे पेंटस वापरताना उघड्यावर/ मोकळ्या हवेवर वापरायचे आणि हातमोजे-सेफ्टी गॉगल्स-रेस्पिरेटर घालूनच ते काम करायचे, अ‍ॅसिटोन हाताळताना रेस्पिरेटर आणि अ‍ॅसिटोनला दाद न देणारे हातमोजे घातलेच पाहिजेत, काही मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्सबरोबर कानात रबरी बोळे वापरलेच पाहिजेत वगैरे.
हे नियम पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी काही लोक कायम रांचवर असणार होते. नियम न पाळणार्‍यांना मेमो मिळणार होते. सर्व नियम पाळून चुकून अपघात झालाच म्हणजे अगदी एखाद्या तुलनेने कमी घातक वस्तूचा/ रसायनाचा कण डोळ्यात गेला तरी तो अपघातच. तर तो झाला तर काय खबरदारी घ्यायची याचेही प्रशिक्षण झालेच. इतका छोटा अपघात असला तरी त्याची नोंद सेफ्टी रजिस्टरमधे झाली पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित रिव्ह्यू नोंद करून ठेवला जायला हवा हे ही कंपलसरी होते.
हे सगळं शिकवलं जाताना सेफ्टी लेडी जी होती ती भरपूर विनोदांची पखरण करत शिकवत होती त्यामुळे काही गोष्टी फारच पक्क्या स्मरणात राह्यल्या. उदाहरणार्थ 'सेन्सटायझेशन' ही प्रक्रिया. एखाद्या वस्तूच्या वारंवार वापराने त्या वस्तूची अ‍ॅलर्जी निर्माण होते हा या शब्दाचा थोडक्यात अर्थ. हे अर्थात ठराविक केमिकल्स/ वस्तूंच्या बाबतीतच होते. त्या केमिकल्सची यादी बुकलेटात होती. ती अर्थातच डोक्यावरून गेली. त्यातल्या एका केमिकलचे नाव घेऊन तिने सांगितले "हे म्हणजे तुम्ही वापरता ते रबर लॅटेक्स, जे ग्लोव्ह्ज आणि मेकपमधे वापरले जाते." हे एवढं सिन्सियरली सांगून मग 'आणि बघा ते लॅटेक्स कशात वापरतात ते... ' अशी टिप्पणी हवेत सोडून दिली. तिसर्‍या सेकंदाला संपूर्ण जनता खिदळत होेती. आणि सेन्सटायझेशन आमच्या डोक्यात पक्के झालेले होते.
सेफ्टी डे झाला. कामे सुरू झाली. पहिल्या वर्षी मी केवळ स्टिचिंगमधे होते आणि अप्रेंटिस असल्याने हातशिलाईच करायला लागायची बहुतेकवेळा त्यामुळे या सेफ्टी गाइडलाइन्सचा फारसा मुद्दा आला नाही. नंतरच्या उन्हाळ्यात मी कॉश्च्युम क्राफ्टमधे गेले. मग त्यावर्षी विविध प्रकारचे मास्कस ते रेस्पिरेटर्स आणि ते कश्याकश्यापासून सुरक्षितता देऊ शकतात वगैरे सगळ्यांबद्दल शिकवले गेले. रेस्पिरेटर्सची फिटींग्ज करून, माझ्या चेहर्‍याच्या आकाराला योग्य असा रेस्पिरेटर मला दिला गेला. दोन तीन प्रकारचे ग्लोव्ह्ज दिले गेले. नियमही समजावले गेले.
स्प्रे पेंट करण्यास सज्ज अशी मी. Wink
safety-gear.jpg

पण माझा पिंड भारतीय होता. नियम पाळण्याची चालढकल, 'चलता है!', 'इतनेसे क्या होनेवाला है!' हे सगळं हाडीमाशी खिळलं होतं. मग एकदा घामामुळे वैतागून सेफ्टी गॉगल्स बाजूला ठेवून स्प्रे पेंट करायला घेतले आणि नेमकी वार्‍याने दिशा बदलली. वाळवंटातला वारा तो, वेग आणि ताकद भरपूर. खालच्या दिशेने केलेला स्प्रे वार्‍याने उडून डोळ्यात गेला. डोळे धुणे बिणे झाल्यावर, सेफ्टी रूममधे अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट वगैरे झाला. माझाच निष्काळजीपणा होता वगैरे मी लिहून दिले. मग माझ्यावर अजूनच करड्या नजरेने लक्ष ठेवण्यात यायला लागले. कुठल्या तरी केमिकलचा वापर करताना ठराविक ग्लोव्ह्ज घातले नाहीत म्हणून मला मेमो मिळाला. यानंतर मला सेफ्टी रूममधे असे न वागण्याबद्दल आणि मी किती मोठ्या रिस्कस घेते आहे याबद्दल सांगण्यात आले. मेमोज नंतरची स्टेप पे क्ट ही होती त्या दडपणाने का होईना मला अक्कल आली आणि मी माझ्याच भल्याचे नियम पाळू लागले. हे कदाचित ऑपेरा कंपनीने कुठल्याही लॉसूटपासून किंवा तत्सम कॉम्प्लिकेशन्सपासून स्वतःचा 'अ‍ॅस वाचवणे' असेल पण नियम योग्य आणि गरजेचे होते आणि माझ्या भल्याचेच होते यात वाद नाही.

कट टू ’मेरा भारत महान!’
आपापल्या कामाच्या परिघातले, स्वत:च्या भल्यासाठी असलेले नियम पाळताना फार कमी लोक दिसतात. विविध यंत्रे, रसायने यासंदर्भाने असे नियम असतात ते पाळायचे असतात याबद्दलची जागरूकता बहुतेक मोठे कारखाने कदाचित सोडले तर बाकी कुठेही नाही. छोट्य़ा उद्योगांच्यात, शेतीसारख्या उद्योगात तर अजिबातच नाही.
सुरक्षिततेचे नियम हे आपल्याला चोचले, फ्याडं, जास्तीचा शहाणपणा वगैरेच वाटत असतात. पळवाटा काढण्यात तर आपण माहिर असतो. धबधबा, कडे, समुद्र याठिकाणी फिरायला गेलेल्यांचे अपघाती मृत्यू किंवा लोकलच्या टपावर चढल्याने वीजेचा धक्का बसून झालेला मृत्यू ही काही अतिशय चपखल उदाहरणे. हातशिलाई करणार्‍याच्या उजव्या हाताजवळ(माणूस डावरा असेल तर डाव्या हाताजवळ) बसू नये नाहीतरे सुई डोळ्यात जाईल. असं मला लहानपणापासून आजी आणि आई सांगत आल्या. आयुष्यात भरपूर हातशिलाई केलेली असल्याने त्याचे कारण आणि महत्व मला कळते. साध्या शिवणकामात असे नियम आपल्याकडे आहेत तर याचा अर्थ इतर सर्व ठिकाणीही पारंपरिकरित्या असे नियम असणार कदाचित त्याला देवाधर्माचा रंग लावलेला असेल पण नियम असणार.
मग हे सगळं कुठे गेलं? स्वतःच्या जिवाबद्दल आपण इतके निष्काळजी का आणि कधी झालो? वापरायच्या वस्तू अचानक बदलल्या गेल्याने गोंधळ होणे शक्य आहे पण नियम पाळणे आणि सुरक्षित राहणे याचे महत्व वाटेनासे का झाले? एवढा स्वतःचा जीव स्वस्त का वाटायला लागला?
इतकी अति माणसे सर्वत्र असल्याने जोवर आपला वा जवळच्यांचा जीव जात नाही तोवर माणसाच्या जीवाचे महत्व समजत नाही असे म्हणायचे का?
मला काही होणार नाही हा फालतू आत्मविश्वास कुठे जन्म घेतो नक्की? किंवा मला काही का होईना कुणाला फरक पडणारे हा न्यूनगंड आधी जन्माला येत असावा का?
प्रश्न बरेच, उत्तरे नाहीत. प्रश्नांकडे लक्ष जाणे अवघड दिसते. मधे अजून बरेच महत्वाचे प्रश्न उभे असावेत ज्यांचा पूर्ण खातमा झाल्याशिवाय यंत्रणा लक्ष देणार नाही. तर तुम्ही आम्ही निदान आपापल्या परिघापुरते सुरक्षिततेचे नियम पाळत राहण्याचे बघूया.

विषय: 
प्रकार: 

पण नियम पाळणे आणि सुरक्षित राहणे याचे महत्व वाटेनासे का झाले? >>>>> आपल्याकडच्या पुरूषार्थाच्या कल्पना विचित्र आहेत. कुठल्याही प्रकारची काळजी घेणे, नियम पाळणे वगैरे भित्रेपणाचं लक्षण समजलं जातं. ड्रायव्हिंग करताना सिट ब्लेट लावणे किंवा लहान बाळासाठी कारसिट वापरणे ही तर अगदी नेहमीची उदाहरणं. आता सिटबेल्टबद्दलचे नियम झाले आहेत पण जिथे नियम नाहीत अश्या ठिकाणी कोणी सिट बेल्ट लावताना दिसलं की हमखास 'हे अमेरिकन फॅड' म्हणून नाकं मुरडली जातात.
ह्यावरून अजून एक गोष्ट आठवली. बॅडमिंटन, फुटबॉल सारखे खेळ खेळताना पायात बुट असावेत अशी साधारण पद्धत आहे. आमच्या एका मित्राची आई 'पुरूषासारखे पुरूष तुम्ही कशाला हवेत बुट, होऊ द्या की टक्के टोणपे खाऊन पाय टणक..' असले फंडे (अगदी ह्याच शब्दांत!!) आम्हांला सांगायची.. शेवटी कॉलनीत रहाणार एक डॉक्टर अनवाणी खेळण्यावरून ओरडले तेव्हा त्याला बुट घालायची परवानगी मिळाली!

काही इंजिनियरींग कॉलेजच्या वर्कशॉप्समध्ये सुरक्षा नियमांची सक्ती केली जाते हे चांगलं आहे.

टु व्हिलर चालवताना हेलमेट वापरणे हा एक मोठा चर्चेचा विषय आहे.

छान लिहिलेले आहे. पण:

>>>मग हे सगळं कुठे गेलं? ......प्रश्न बरेच, उत्तरे नाहीत.<<<

हा पॅरा जरासा बाळबोध वाटला. राग नसावा. स्वतःचा जीव स्वस्त वगैरे वाटत नसतो असे मला वाटते. आपल्याकडे दैनंदिन जीवनातील स्ट्रगल फारच अधिक असल्यामुळे सुरक्षिततेसाठीच्या उपायांना तुलनेने कमी प्राधान्य मिळते. असे असल्यामुळे मग हा प्रबोधनाचा आणि जागरुकता वाढवण्याचा विषय ठरू लागतो, ठरत राहतो. जागरुकता वाढत असल्याची चिन्हे दिसतही आहेत. (पुण्यात तरी) सीट बेल्ट आता बहुतांशी चालक लावताना दिसत आहेत. हेल्मेट्स वाढलेली दिसत आहेत. कंपन्यांच्या ऑपरेशनल एरर चेकिंग सिस्टिम्स आता इतक्या स्ट्राँग झाल्या आहेत की डेव्हिएशन्सना विशेष वावच राहिलेला नाही.

हाच विषय थोडा एक्स्टेंड करून रोगराई होऊ शकेल अश्या पद्धतीची जीवनशैली आढळण्याबाबत बोलू लागलो तर (मला) असेही वाटते की आपल्याकडे एकुणातच रोगप्रतिकारक शक्ती बहुधा अधिक डेव्हलप झालेली असावी. ह्याबाबत तज्ञ मंडळी योग्य ते सांगतील.

चांगलं लिहिलं आहेस, नी.

सुशिक्षित लोक स्वतःच्या सुरक्षेबद्दल उदासीन असतात, हे आहेच, पण ते आपल्या आणि इतरांच्या लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल उदासीन असतात, हे चीड आणणारं आहे.
पुण्यात संध्याकाळी पीएमटीच्या बसेसना लटकलेली मुलं बघितली ही भीती वाटते. अभिनव, गरवारे या शाळा निकालानंतर शाळेवर रोषणाई करतात, पण शाळेतल्या मुलांना रस्ता कसा ओलांडावा हे शिकवत नाहीत. या शाळांमधले शिक्षक, मुलांचे पालक आपली मुलं घरी कशी येतात, ते बघत नसतील का कधीच?
पुण्यातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळांमध्ये मुलं बिनदिक्कत गॉगल, बूट असं काहीही न घालता रसायनं हाताळतात, रसायनं हुंगतात.

छान लिहिलं आहे..
भारतात सुरक्षिततेचे नियम रोजच्या जीवनात फारसे पाळ्ले जात नाहीत., सेफ्टी गियर्स ही डोकेदुखी समजली जाते, आपण जेव्हा सुरक्षिततेचे नियम पाळातो तेव्हा ' कुणा गावाचं आलं पाखरु' अशा नजरेने बघितलं जातं Proud

सुशिक्षित लोक स्वतःच्या सुरक्षेबद्दल उदासीन असतात, हे आहेच, पण ते आपल्या आणि इतरांच्या लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल उदासीन असतात, हे चीड आणणारं आहे. >> +१

सेफ्टी गियर्स बद्दल भारतीय मानसिकतेमधे एक विचित्रसा गंड का आहे ? भारतात एक ह्या गोष्टि कॉमन नाही म्हणून सोडून देउ शकतो पण अमेरिकेतही तुमच्या आजू बाजूची चार टाळकी काय वापरतात ते बघून ते वापरण्याचेही नाही. सगळीकडे 'चलता है' हा attitude !

कट टू बद्दल अगदी अगदी. मायबोलीवरच हेल्मेटसक्ती बीबीवर झलक पाहिलीच की. स्वतःच्या सुरक्षिततेकरता हेल्मेट असली तरी वापरायला लोकं किती कावकाव करतात. दारू पिऊन गाडी चालवण्याबद्दलही तेच. एखादा नियम काढला की हुश्शार (भारतीय) लोकं त्यातून शंभर पळवाटा कशा काढता येतील हे बघतात.

सगळीकडे 'चलता है' हा attitude !
कारण सगळीकडे चालवून घेतात.
अमेरिकेत नाही, हे वर नीधप ने स्पष्ट केलेच आहे.
तसे अमेरिकेतहि अनेक लोक गाडी चालवताना सेलफोनवर बोलतात. ते कायद्याविरुद्ध आहे, पण सध्या चालते. अर्थात जर त्यामुळे अपघात झाला तर त्याचे हाल कुत्रा खाणार नाही.
दारू पिऊन तर कित्येक कित्येक लोक इथे गाडी चालवतात, पण अपघातात सापडले की मेले.
अमेरिकेत सगळ्याचाच बाऊ करतात.

भारतात अशा शिक्षा होणारच नाहीत किंवा कमी होतील, असे करण्याच्या सोयी आहेत.
(सोयच म्हणायचे, उगाच लाच नि वशिला यासारखे नकारात्मक शब्द वापरण्यात अर्थ नाही. माझ्या मते अमेरिकेत जश्या काही सोयी खूप आहेत सगळ्यांना गाड्या परवडतात, मेडिकल मदत वगैरे) ज्या भारतात नाहीत, तश्या या भारतातल्या सोयी अमेरिकेत नाहीत. )

भारतात रहाणारे कित्येक जण सुखात आनंदात असतात, त्यांना अश्या गोष्टींचे महत्व वाटतच नाही,

सर्वांना धन्यवाद.
फेसबुकवर एकांनी शेतकर्‍यांच्या रोजच्या कामांच्या संदर्भात होऊ शकणारे अपघात, त्याचे परिणाम वगैरे स्टेटस टाकले होते. त्यावरून कामाच्या ठिकाणी विशेषत: छोटे उद्योग, शेती व तत्सम ठिकाणचा असलेला ’सेफ्टी अवेअरनेस’ (किंवा अनवेअरनेस खरंतर) या संदर्भाने लिहायचे होते. जिथे जिथे विविध रसायने, यंत्रे, इतर प्राणी यांचा समावेश कामाच्या प्रक्रियेमधे असतो तिथे बहुतेक सगळीकडेच औदासिन्य दिसते सेफ्टी या संदर्भात.

लिहिता लिहिता माझा सगळा ओघ एकूणच सुरक्षितता या मुद्द्याकडे वळला. हरकत नाही अर्थात.

लेख पटला. सोय आणि सुरक्षा ह्या दोन गोष्टींमध्ये निवड करायची असल्यास आपण भारतीय नेहमीच सोयीला जास्ती प्राधान्य देतो हे ह्यामागचं मूळ कारण आहे. मात्र ही जी सोय आपण बघतो ती बरेचदा तात्पुरती असते आणि सुरक्षेमुळे दीर्घ पल्ल्यात सगळ्यांचाच फायदा आणि सोय होऊ शकते हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे दररोज स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाशी खेळ करणारी अनेक लोकं आपल्याला सगळीकडे दिसतात.
Our thinking is short sighted and so is our behavior. We must work hard to overcome our flaws - both within individuals and within our systems.
सतत प्रबोधन, अधिकाधिक गोष्टींचे प्रमाणीकरण व नियमन तसंच त्या नियमांची अधिकाधिक अंमलबजावणी आणि ते नियम पाळण्यासाठी अनुकूल अशा पायाभूत सोयी उपलब्ध करणे हेच ह्यावरचे उपाय आहेत.

नियम पाळण्यासाठी अनुकूल अशा पायाभूत सोयी उपलब्ध करणे

भारतात सगळ्यात आधी हे करणे गरजेचे आहे. नियम पाळले गेलेच पाहिजेत असे स्ट्रक्चर उभे करणे आवश्यक आहे. तरच नियम पाळले जाणार.

इथे लोकांच्या पाठीत बांबु बसल्याशिवाय त्यांच्या हातुन काहीच कामे होत नाहीत. प्रबोधन बिबोधन नंतर.. प्रबोधन करणारे शेकडो होऊन गेले पण लोक ढिम्म.. तिथे बांबुच हवा.

माझ्या ऑफिसात वाहतुकीचा नियम तोडला की तिथल्यातिथे डेबिट नोटवर सहि घेतली जाते आणि पगारातुन ५०० रुपये कापले जातात. सगळीकडे कॅमेरे बसवलेले आहेत ज्याच्यात नियम तोडलेला पकडला जातो. त्यामुळे ५० रुपये घेऊन सुटका मिळणार नाही आणि नियम जराही तोडला तरी तो पकडला जाणारच याचा धसका इतका आहे की लोक शिव्या देत का होईना पण नियम पाळतात.

छान लिहिलं आहेस नीरजा...

पुण्यातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळांमध्ये मुलं बिनदिक्कत गॉगल, बूट असं काहीही न घालता रसायनं हाताळतात, रसायनं हुंगतात.>>> इथे मुंबईतही हे काही नसतं. गॉगल बिगल जाऊच दे. ११वीला पहिल्याच रसायनशास्त्र प्रॅक्टिकलला H2SO4 सारखी अ‍ॅसिड्स कशी हाताळावी हे पण सांगितलं गेलं नसल्याने माझा पार्टनर मुलगा बिन्धास्त सगळ्या बाटल्या उघडून बाटलीत वाकून बघून वगैरे रॅकवर ठेवत होता. त्यात त्याने सल्फ्युरिक अ‍ॅसिड टेबलावर सांडून ठेवलं होतं. मी रॅकवरची बाटली काढताना त्या टेबलाला टेकले गेले आणि लॅबकोट, ड्रेस वगैरेचा भुगा करत अ‍ॅसिड पोटापर्यंत चर्रकन पोहोचलं होतं. आग आग झाल्यावर सरांकडे धाव घेतल्यावर "थोडंसंच आहे ना? थोड्यावेळाने थांबेल." असं म्हणून मला परत प्रॅक्टिकल टेबलवर पाठवलं गेलं होतं. मीच नंतर अक्कल आल्यावर अ‍ॅसिडच्या बाबतीत सगळी वर्षं सावध राहिले होते. काही मुलं बेसिनमध्ये काही बाही पावडरी टाकून पेटवून पण द्यायची Sad तेव्हा मात्र सर ओरडले होते.

केमिस्ट्री लॅबमधली बीकर्स वगैरे अ‍ॅसिटोन रिन्स करून घ्यायची असतात. ते करताना त्या फ्युम्सचा त्रास होतो, हातावर पडले तर विचित्र गार सेन्सेशन होते. अ‍ॅसिटोन हे अ‍ॅसिडसारखे घातक नसले तरी त्याच्या सततच्या एक्स्पोजरमुळे बरेच घातक परिणाम होतात.
मला तरी आठवत नाही कॉलेजात त्यासाठी कुठली सेफ्टी गिअर्स वापरायला सांगितल्याचे.
एप्रन कंपलसरी, केस बांधलेले, ओढण्या काढून ठेवलेल्या किंवा मग बांधून ठेवलेल्या यापलिकडे काही नियम नसत.
अर्थात हे २० वर्षांपूर्वीचे. हल्ली काय असतो प्रकार कॉलेजांमधे माहित नाही.

चांगलं लिहीलं आहेस नी. वरच्या सर्वांशी सहमत. स्वत:ची सुरक्षितता इतकी स्वस्त का वाटते कोण जाणे.
एक अतिशय विचित्र घटना गेल्या महिन्यातली. एका ओळखीच्या बाईंचे यजमान अचानक गेले. कमी शिकलेल्या त्यांना नवर्याच्चा जागी कामावर घेतलं. मुलगा तरूण. कॉलेज शिकणारा. यजमान जाऊन दोन तीन महिनेच झाले असतील. मुलगा ढोल ताशाचा पथकाचा सराव करून रात्री घरी परतत होता बाईकवरून. ताशाच्या दोन काडया कमरेच्या बेल्टमधे खूपसुन लावलेल्या. काहीतरी झालं आणि अपघात झाला. फक्त हाड मोडून वगैरे निभावलं असतं. पण दुर्दैव असं की गाडी स्किड होताना त्या ताशाच्या काड्या छातीत घुसल्या!!! काय भयंकर परिणाम! गेला जागीच. त्या आईने हे कसं सहन करावं? सुन्न व्हायला झालं होतं. आपल्याकडे यानं काय होईल असा विचार करण्याची क्षमताच नाही की फक्त विचार करायचाही कंटाळा आहे? Sad

नीरजा, छान लिहीलं आहेस.

कॉलेजातले दिवस आठवले. केमिस्ट्री लॅबमधले, अश्विनीने लिहीलं आहेच. आम्हालाही कधीही लॅबमध्ये अ‍ॅसिडस वगैरे हाताळताना ग्लोव्हज घालण्यास सांगितले गेले नव्हते. फक्त अ‍ॅप्रन कंपलसरी असायचा.

आपण सुरक्षिततेचा नियम नाही पाळला तर काय परिणाम होऊ शकतात, याचा विचार करण्याच्या क्षमतेचा अभाव बरेचदा दिसून येतो किंवा असा विचार करण्याची गरजच काय ही बेदरकारी वॄत्ती. ट्रेनच्या टपावर बसून किंवा चालत्या ट्रेनवर ऊभी रहाणारी तरुण मुले बघून याची प्रकर्षाने जाणीव होते.

ऑफिस कँपसमध्ये स्पीड लिमिट कंपलसरीली ३० किमी असून ते न पाळले गेल्यास जागीच थांबवून दंड वसुल केला जातो. केवळ याच कारणाने हा नियम पाळला जातो.

बापरे आशुडी, काटा आला अंगावर वाचुन. सुरक्षिततेचे नियम पाळणे दुर, आपल्याला कशाने दुखापत होऊ शकते हेही आपल्याला माहित नसते..

सायन्स लॅबचा माझा संबंध फक्त शाळेपुरता. तेव्हा एका मुलीने स्वतःच्या झिप-या जाळून घेतलेल्या कुठलातरी प्रयोग करताना. पण तेव्हाही इथे अपघात होऊ शकतो आणि तो व्हायच्या आधीच आपण खबरदारी घ्ययला हवी हे माहितच नव्हते. आम्हाला तर शक्य नव्हते पण शिक्षकांनाही माहित नव्हते.

आणि जिथे माहिती असते तिथेही किती निष्काळजीपणा दाखवावा? या वर्षी, आमच्या गावातला एक दहावीतला मुलगा विजेचा धक्का लागुन गेला. १० पर्यंत शिक्षण झाले म्हणजे विजेने धक्का बसुन प्राण जाऊ शकतात हे शाळेत कानावर पडले असेलच ना? तरीही हा मुलगा बाबाला टेम्पोत उस भरताना मदत करत असताना वरुन जाणा-या विजेच्या तारांचा आधार घेत होता. सोमवारी उस भरला तेव्हा नेहमीप्रमाणे सोमवारची विज गुल झालेली. मंगळवारी तारांमधुन विज खेळत होती. हा परत तारेचा आधार घेऊन उभा राहायला गेला आणि हात लावताच उडाला.

भारतात एकंदर मनुष्य जीवाची किंमत खूप कमी आहे. हेलमेट डोक्या ऐवजी हातात घालून २० किमी आणि मग ऑफिस च्या दारात ते डोक्यावर घालून गेट मध्ये शिरणारे वीर आहेत. हर्नेस न बांधता उंच खांबावर काम करणारे लोक आहेत.एका गाडीवर एक माणूस, दोन दोन्ही पाय एका बाजूला ठेवून बसलेल्या सुळसुळीत साडीतल्या बाया, एका बाईकडे पोर, समोर टाकीवर एक पोर असे जाणारे लोक आहेत.यातल्या काही केस गरिबी मुळे असल्या तरी त्यात थोडी सुधारणा होऊ शकते.

छान लेख नीधप आणि विषयसुद्धा खूप महत्वाचा. स्वत:च्या सुरक्षेसाठी केले गेलेले नियम पाळण्यात भारतीयांना नेहेमीच अडचण असते.
>>>>> आपल्याकडच्या पुरूषार्थाच्या कल्पना विचित्र आहेत. कुठल्याही प्रकारची काळजी घेणे, नियम पाळणे वगैरे भित्रेपणाचं लक्षण समजलं जातं. >>>> सहमत आहे

केवळ सुरक्षेचेच नाही पण नियम म्हटले की ते मोडायचेच असतात अशी काहीशी प्रवृत्ती दिसते.

>>>> सतत प्रबोधन, अधिकाधिक गोष्टींचे प्रमाणीकरण व नियमन तसंच त्या नियमांची अधिकाधिक अंमलबजावणी आणि ते नियम पाळण्यासाठी अनुकूल अशा पायाभूत सोयी उपलब्ध करणे हेच ह्यावरचे उपाय आहेत. >> +१

मला वाटते, अमेरिकेत एव्हढे स्तोम करतात कारण नाही केले नि कुणाला इजा झाली, तर लग्गेच अनेक मिलियन डॉ. ची फिर्याद होईल कंपनीवर. भारतात तो धोका नाही.
बरं दुसर्‍या कुणाच्या मूर्खपणामुळे लॅब मधे कुणाला काही दुखापत झाली तर त्याची जबाबदारी पण शाळेवर, की शाळेचे दिवाळे. कुणि मुलगा वेडपटपणा करत असेल, (नि शाळेत असले नग असतातच हे कुणाहि शिक्षकाने अध्याहृतच धरायला पाहिजे) तर त्याला तसे करू न देणे ही शिक्षकाची जबाबदारी! नि पर्यायाने शाळेची!!

हे असले धंदे भारतात नसतात, मग जरा आपणच सांभाळून घ्यावे झाले. नाहीतरी जे होते ते देवाच्या इच्छेने होते असे सांगतातच ना. तीच तर आपल्या पूर्वजांची उच्च संस्कृति नव्हे का?

बूमरँग यांची प्रतिक्रीया पुरेशी प्रातिनिधीक आहे की आपण सेफ्टी किती गंभीरतेने घेतो.

लेखातील प्रत्येक गोष्टीशी सहमत!
आपण च जर असा दृष्टीकोन ठेवला तर पुढ्च्या पिढीला आपण काय शिकवणार सेफ्टी?

सुशिक्षित लोक स्वतःच्या सुरक्षेबद्दल उदासीन असतात, हे आहेच, पण ते आपल्या आणि इतरांच्या लहान मुलांच्या सुरक्षेबद्दल उदासीन असतात, हे चीड आणणारं आहे.>>> + १

इतरत्र अमाप पैसा खर्च करायचा आणि हेल्मेट, कारसीट इत्यादि वापरायचा कंटाळा करायचा, लहान मुलांना बिनदिक्कत पुढच्या सीटवर बसवून प्रवास करायचा, सीटबेल्ट वापरायचा नाही, दुचाकीवर सुळसुळीत कपडे घालून संस्कृतीरक्षणार्थ एकीकडे दोन्ही पाय सोडून अलगदपणे बसायचे, इ. यादीला अंत नाही. आणि वर जे हे नियम पाळतात त्यांना हसायचे, कुणी हे नियम बरोबर आहेत म्हणले की त्याच्याशी फालतू वाद घालायचे.....
कुटुंब, पालक, शाळा-कॉलेज, ऑफिसेस, संस्था, सरकार अशा समाजाच्या सर्व स्तरांवर आपण सुरक्षा ही फडतूस महत्वाची गोष्ट समजतो. आणि दुर्दैवाने हा अ‍ॅटिट्यूड कधी फारसा बदलेल असं वाटत नाही.
मुळात आपल्याला माणसाच्या जिवाची किंमतच नाही. आणि चुकीच्या वागण्याची जबाबदारी स्वीकारायची मानसिकता नाही. त्यामुळे मग अपघात झाला की फक्त इतर घटकांच्या चुका दिसतात, पण स्वतःची चूकही त्यात कारणीभूत असते ते सोयिस्करपणे विसरून जायचे असते.

सुरक्षितता ? ते काय बोंवा ??

पूर्वी चेतन सुभाष गुगळे यांनी येक महान लेख लिहिला होता

http://www.maayboli.com/node/47813

क्रेझी जर्नी (अर्थात धुळे दिल्ली आणि दिल्ली धुळे प्रवास थेट)

ही जर्नी क्रेझी नाही तर विकृत होती

ज्या वाहनाची असे काम करण्याची क्षमताच नाही त्यात अस प्रवास करायचा - तो पण ड्रग्स घेवून . रात्री सोबत न देता झोपणारी आणि आजीबात सुरक्षित नसलेल्या गाडीला आदिक वेगात पळवायला सांगणारी बायको ... किती गोष्टी सांगाव्यात...

असो हे गुगळे साहेब सध्या गायब झालेले दिसतात.