प्राजक्ताच् झाड़

Submitted by कविता केयुर on 26 September, 2015 - 13:52

प्राजक्ताच् झाड़

उमाकाकू आज जरा खुशीतच होत्या, कारणही तसंच होतं म्हणा. चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद बरच काही सांगत होता. काका गेल्यावर जवळपास दोन अडीच वर्षांनंतर मनमोकळ हसणाऱ्या उमाकाकू आज सर्वांनीच पाहिल्या ; दुध टाकणारा गोविंद, कचरा उचलणारा रामदिन, बाजूच्या सुलभा काकुंपासून अगदी कामवाल्या रेणू पर्यंत प्रत्येकाला जाणवल होत आज काहीतरी विशेष आहे पण कोणीही समोरून काहीच विचारल नाही त्यांना.

उमा काकूंना चार मुली, चौघींचीही लग्न झाली. प्रत्येकीच आयुष्य छान मार्गी लागल्यावर आता थोडा वेळ आपल्यासाठी जगावं असा विचार मनाशी पक्का केला आणि दुर्दैवानं त्याच वेळी काकांनी साथ सोडली. जणू पत्त्यांचा बंगला क्षणांत कोसळावा तस झाल. यातून सावरून आपल्या मुलींकरता काकू परत आयुष्याकडे वळल्या होत्या. मुलींनी आईला आधार दिला अन् तिच्याकरता त्याही सर्व दु:ख बाजूला ठेवून लवकर सावरल्या.

स्वत:ला परत गुंतवून घेण्याकरता उमाकाकू जवळच्याच लायब्ररी मध्ये नुकत्याच चार तास जाऊ लागल्या होत्या. कॉलेज मधून निवृत्त झाल्यावर तशा त्या घरीच असायच्या पण आता परत बाहेरच्या जगांत रमण्याचा प्रयत्न करत होत्या. जोड़ीला देवळातला ग्रुप , हास्य क्लब आणि पुस्तकं यांच्या सोबतीनं त्यांचा दिवस कसा जाई ते समजत नसे पण तिन्हीसांजा होताच एकटेपणा जाणवू लागे मग TV ची सोबत असे. शनिवार आणि रविवार मुली, जावई, नातवंड यांच्यात त्या अगदी रमून जात.

आज त्यांचा एकसष्टावा वाढदिवस होता आणि मुलींनी संध्याकाळी जेवायला बाहेर जाण्याचा बेत कालच रात्री फोन करून सांगितला होता आणि म्हणूनच उमाकाकु आज खुश होत्या. त्यांना ओढ लागली होती सांजवेळेची … ती ओढ व तो आनंद झिरपत होता त्यांच्या चेहऱ्यावरुन.
  
दिवसभराची काम संपवून नुकताच चहा झाला आणि उमाकाकु मुलींनी आधीच आणून दिलेली नवीन साडी नेसून तयार झाल्या. सातचे ठोके पडले घड्याळात तरी अजून कस आल नाही कोणी, म्हणून काकू खिडकीतून बाहेर पहात होत्या आणि दारावरची बेल वाजली. 'आले वाटत सगळे', असा विचार करत दार उघडल तर समोर चिन्मय आणि अतुल, दोघे लाडके जावई. जावई म्हणणं योग्य होणार नाही, खरं तर मुलच. "हे काय ? तुम्ही दोघच ? माझ्या लाडक्या मुली आणि पिल्ल कुठेत ?" काकूंचा प्रश्न अपेक्षितच होता दोघांना. अतुल म्हणाला , "आई सगळे जण परस्पर येतायेत हॉटेल मध्ये आम्ही तुम्हाला घ्यायला आलो आहोत, चला." काकू म्हणाल्या, "अरे मी इथे सर्वांची वाट पहात होते. बरं पण ठीक आहे. मी तयारच आहे, चला." अस म्हणत काकू निघाल्या. "संध्याकाळी घरांत अंधार नको म्हणून दिवा चालू ठेव रे" अशी सूचना करून चिन्मयला त्यांनी कुलूप लावायला दिल. सर्वाना भेटण्याच्या ओढीने चिन्मय आणि अतुल बरोबर उमाकाकू गाडीतून निघाल्या.

आज जरा गारच होती हवा, खिडकीतून येणारा वारा क्षणांत काकुंना मागे घेऊन गेला. मुलगा नाही म्हणून सहन केलेला त्रास कुठेतरी सलत होता आत. कोणालाही हेवां वाटावा अशा मुली, जावई, नातवंड अजून काय हवं… यापेक्षा वेगळी का असते आयुष्याची कमाई !! नवऱ्याच्या मागे राहिलेल्या एकट्या स्त्रीला किती अवघड असतं राहण पण याच खऱ्या कमाईमुळे आज आयुष्य अगदी हळुवार झालं होत. आकाशात रंगांची सूर्यास्ताला झालेली उधळण जणू आपलीशी वाटू लागली त्यांना… कारण त्या रंगांत आनंद, समाधान, अभिमान अशा कितीतरी छटा होत्या. इतक्यात गाडीचा ब्रेक लागला आणि उमाकाकू दचकल्यां.

"आई आलो आपण ", या चिन्मयच्या वाक्याने त्यांची तंद्री मोडली आणि डोळयांच्या कडा टिपत हॉटेल आलं म्हणून ऊमाकाकू गाडीतून खाली उतरल्या अन् धक्काच बसला त्यांना, एक सुखद … अविस्मरणीय !!!
गोखल्यांच्या गणेश सभागृहासमोर गाडी थांबली होती आणि समोर होत्या त्यांच्या चारही लाडक्या लेकी… पैठणी, नथ, मोगऱ्याचे गजरे, दागिने अन् प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणार कौतुक. बोलण्याकरता उमा काकुंच्या तोंडून शब्दच बाहेर पडेनात, आईचा हात धरून काकूंच्या मुली त्यांना आत घेवून जाऊ लागल्या. दोन्ही बाजूला काढलेल्या फुलांच्या    रांगोळ्या आणि समोर दरवाज्यात आजीची वाट पहात उभी असलेली पिल्ल. चिमुरड्या हातांनी आजीसाठी फुलांच्या पायघड्या घालून केलेल ते स्वागत पाहून त्यांची आजी अगदी भारावून गेली. हॉलमध्ये पाऊल टाकताच उमा काकूंचा स्वत:वरच विश्वास बसेना, आपण स्वप्नात तर नाही ना असा भयानक विचार मनाला शिवून गेला कारण समोर होत्या त्यांच्या बालपणीच्या व कॉलेजच्या मैत्रिणी, ऑफिस मधला ग्रुप, सोसायटी मधील जिवलग मैत्रिणी आणि हास्यक्लब चे सवंगडी. सारेजण उमा काकूंचा ६१ वा वाढदिवस साजरा करायला खूप कौतुकाने आले होते. त्यांची आयुष्य भराची पुंजी एका क्षणांत आज समोर एकवटली होती.

६१ दिवे लाऊन आईच औक्षण करताना मुलींचे डोळे भरून आले. इतके दिवस जिने वाढदिवस, कोजागिरी, श्रावणी शुक्रवार अशा कितीतरी प्रसंगी त्यांना ओवाळल होत त्या आईला आज तिच्या मुली ओवाळत होत्या. एका क्षणांत खूप काही मिळाल होत, त्या माऊलीला आणि तिच्या मुलींनाही….नातवंडांच्या घोळक्यांत आजी आज अगदी भरून पावली होती. प्राजक्ताच झाड आज खऱ्या अर्थाने बहरले होते. 

Group content visibility: 
Public - accessible to all site users