"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चा परत रुळावर आणण्यासाठी... Proud

मनशक्ती केंद्रात अशा प्रकारचे प्रयोग बरीच वर्षे चालू आहेत त्याबाबत त्यांच्या शोधनिबंधाबद्दल उल्लेख त्यांच्या वेबसाईट्वर आढळला.

A Pre-Natal Project in India
http://www.manashakti.org/research/pre-natal-project-india-0

Effect of rational “Prayer” on Fetus & Mother: A Quantitative Approach
http://www.manashakti.org/research/effect-rational-%E2%80%9Cprayer%E2%80...

ह्यावर मायबोलीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.

हा माझा किस्सा अ‍ॅलोपॅथीवाल्यांचा बहीणीची डिलीव्हरी व्हायची वेळ झाली होती. रात्री पाऊस धो धो पड्त होता, तसेच तीला अ‍ॅडमिट केले. डॉ. सांगितले. १ तर बाळ वाचेल नाही तर आई. तुम्ही एवढे पैसे आणि तुमच्या आईला घेऊन या. मी तडकभरधाव निघालो. १ रस्ता क्रीस करताना रात्री अंधारात म्हैस दिसली नाही. धाडदिशी ठोस मारली. पण मरता मरता वाचलो, आईला घेऊन दवाखाण्यात पोहोचल्यावर ह्याच डॉ. महाशय म्हणतात कशा, एवढी काय गडबड करायची हो.
याच प्रकरणा नंतर पत्नीचे डिलीव्हरीचे वेळेसही डिलीव्हरी करताना पोटातील पाणी संपल्याचे कारण सांगत दोघांनाही धोका असल्याचे डॉ. सांगत होते. सांगायचा मुद्दा हा की अ‍ॅलोपॅथीवाले काय धुतल्या तांदळासारखे उपचार करत नाहीत सोबत दिमतीला एवढी महागडी यंत्र सामग्री असुन. शेवटी त्यांनाही एवढेमोठे हॉस्पीटल चालवावे लागते ना.

तिला तिच्या प्रजातीतील आयुर्वेदिक आणि अ‍ॅलोपथीक अश्या दोन्ही डॉक्टरांनी बाळाच्या उत्तम वाढीसाठी भर पावसात भरधाव जाणार्‍या गाडीची धडक बसवून घ्यायला सांगितलेले होते. नंतर दोन्ही पथींनी सुचवलेला उपाय एकच कसा ह्यावर त्या दोन्ही डॉक्टरांनी वाद घालायला सुरुवात केली.

मुक्तेश्वर दिवा घ्या Light 1

मनशक्तीच्या वेबसाईटवर याचा उल्लेख वैदिक संकल्पना असा केलेला आढळतो. ह्या संकल्पनेमधे तथ्य आहे की नाही हे आधुनिक काळातील विज्ञानास संमत अशा कसोट्यांवर तपासून बघायची धडपड दिसून येते.

दुसरे कोणी गर्भसंस्काराला आयुर्वेदाखाली खपवत असेल तर तो गर्भसंस्काराचा (म्हणजे ह्या संकल्पनेचा) दोष नव्हे ना !

सध्या सगळ्याचा बाजार झाल्यामुळे योग देखिल बाजारात हठ पासून हॉट पर्यंत मिळतो तसेच काहीसे ह्याचे झाले असावे असे वाटते.

कितीही नाही म्हटले तरी हा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारधारांचा सगळय्या पण विशेषतः मन ह्या गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टीकोनातील मुलभूत फरकाचाच मुद्दा आहे.

* अनुभुती / बाळास मातेस झालेला आनंद व त्यायोगे त्याच्या शारिरिक स्वाथ्यात झालेला बदल ह्या गोष्टी / संकल्पना आधुनिक काळातील विज्ञानास संमत अशा कसोट्यांवर कशा तपासून पाहाव्या

* येथे आधी मी साक्षात्कार असा शब्द लिहिला होता त्याने चर्चा अजूनच कुठले वेगळे वळण घेऊ नये म्हणून काढून टाकला आहे. Happy

हर्पेन धन्यवाद

तिथले गर्भसंस्कारासंदर्भातले ठळक मुद्दे

1. To welcome the baby with good thoughts,
2. To impart good values to the fetus,
3. To improve the emotional health of parents,
4. To increase the active participation of the fathers during pregnancy, and
5. To increase the courage and confidence of mothers during labor.

2. To impart good values to the fetus, > याची प्रक्रिया? आणि बाळ pant घालण्याच्या वयात आलं तरीदेखिल या good values impart करता येतांत कां?

बा विठ्ठला, आम्हा पामरांवर कृपा कर. आम्ही ह्यातले तज्ञ नाही.

आम्ही मोबाईल फोन वापरतो म्हणून आम्हाला त्यात लहरी कशा येतात विचारशील तर नाही बुवा सांगता येणार आम्ही आपले फोनवरून बोलायचे काम करतो.

त्यात लहरी / तरंग कसे येतात हे न कळल्याने आम्हाला फोन वर बोलायला बाधा येत नाही

तू वरच्या दुव्यांवर जा, वाच, मनशक्ती केंद्रात विचार आणि काय उत्तर मिळते ते देखिल आम्हाला सांग.

अरेरे, तरीदेखिल भारतात एकही स्टीव्ह जॉब्स्/बिल गेट्स्/झुकरबर्ग झाला नाही?? शिवाजी महाराज देखिल एखादेच??

>>

उघडा डोळे पहा नीट!

मनशक्ती केंद्रात विचार आणि काय उत्तर मिळते ते देखिल आम्हाला सांग.
>>

मिसळ प्रायोजित केली जात असेल तर मी ही प्रश्नावली घेऊन मनशक्तीकडे जाईल Happy

गर्भसंस्कार हे थोतांड आहे असे स्थापित करायला देखिल आधुनिक काळातील विज्ञानास संमत अशा कसोट्यांवर तपासून बघायला हवे की नको. का केवळ त्याला प्राचीन वैदिक संकल्पना आहे असे म्हणून बाद(च) करायचे.

केवळ त्याला प्राचीन वैदिक संकल्पना आहे असे म्हणून बाद(च) करायचे.
>>

एकंदरीत सूर दिसतोय तसाच! पण हे संशोधन हे लोक्स मान्य करतील?

चर्चेतून अजुन एक मुद्धा उपस्थीत होतोय की काय?

की लुटमार करायची असेल तर शास्त्रीय पद्धतीने करा, अंधश्रद्धेच्या आडुन नको?

असेल तर ते विषयांतर नाही का?

मला ते संशोधन मान्य / अमान्य असं ठामपणे म्हणण्या इतकं त्यातले कळत नाही पण मी म्हटले तसे मनशक्ती केंद्राची ह्या संकल्पनेमधे तथ्य आहे की नाही हे आधुनिक काळातील विज्ञानास संमत अशा कसोट्यांवर तपासून बघायची धडपड तरी दिसून येते.

प्रयोगशीलता हाच विज्ञानाचा पाया असतो ना !

अंधश्रद्धेच्या आडुन नको? << यातही परत श्रद्धा आणि अंध श्रद्धा म्हणजे काय कारण लेखाचा उद्देश गर्भसंस्कार हेच मुळात अंधश्रद्धा आहे

@स्_सा :

>>>> गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य! <<<<<

हे असे काही तुम्हाला सांगण्यात आले होते का गर्भसंस्काराच्या कार्यशाळेत?

पराग यांनी वर लॅक्टेशन स्पेशालिस्ट वगैरे लिहिले आहे. कुठे आहेत असे स्पेशालिस्ट? मुंबईत आहेत का ? >>>> मुंबईचं मला माहित नाही. पुण्यात नक्की आहेत. खरच हवं असेल तर नंबर देऊ शकतो. पुण्यात आहेत म्हणजे मुंबईतही असायला हरकत नाही.

दर आठवड्याला होणारी गर्भाची वाढ याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले गेले होते. >>>>> हे तुम्हांला बेबीसेंटर.कॉम ह्या साईट वर वाचयला मिळू शकतं. त्यात LMC विचारतात आणि त्याप्रमाणे आत्ताची गर्भाची अवस्था, आईला काय त्रास होऊ शकतात वगैरे सगळी तपशीलवार माहिती मिळू शकते. त्यात गर्भाचा आकार सध्या कुठल्या फळा इतका आहे हे ही सांगतात. Happy

सिझेरीयन आणि नॉर्मल प्रसूती याबद्दल तपशीलवार माहिती दिली गेली होती. गायनॅक करतात का हे सगळं? हे वरचे लेखक त्यांच्या पेशंटना एक तास सिझेरीयन आणि नॉर्मल प्रसूती याबद्दल तपशीलवार माहिती देतील का? >>>> वरच्या लेखकांबद्दल माहित नाही. पण बरेच गायनॅक करतात. वर लिहिलं तसं चेक अपच्या वेळी करत नसतील पण तुम्ही अपॉईंटमेंट प्लॅन करून गेलात तर नक्की करतात. डॉ.इब्लिस बर्‍याच धाग्यांवर लिहित असतात की क्लिनीक हे शेवटी शॉप अ‍ॅक्टच्या अंडर येतं. म्हणजे तो धंदा आहे. त्यामुळे तुम्ही जर डॉक्टरला फी देत असाल तर तुमच्या शंकाचं त्यांनी निरसन केलच पाहिजे, नाही का? Happy अर्थात इतकं ताणण्याची सहसा वेळ येत नाही असा अनुभव आणि ऐकलेले अनुभव आहेत.

गर्भसंस्कार करून घ्यावेत का नाही ह्याबद्दल मी काहीच लिहिलेलं नाही. पण हे वर लिहिलेली माहिती मिळवणे हा हेतू असेल तर तो डॉक्टरांद्वारेही साध्य होऊ शकतो इतकाच मुद्दा आहे. आणि त्यातुनही कोणी कुठली शिबीरं अटेंड केलीच आणि ते जस्टीफाय करायचं झालच तर चांगलं वाटलं, मंत्र पठणाने मनाला बरं वाटलं, शांत वाटलं इतकं कारणही पुरेसं आहे की. पण त्याला पुढे वैज्ञानिक वगैरे मुद्द्यांच्या ज्या झालरी जोडल्या जातात त्याला आक्षेप आहे कारण शास्त्रीय आधार नाहीये.

हर्पेन ने दिलेल्या लिंकमधले प्रमुख मुद्दे.

>>1. To welcome the baby with good thoughts,
2. To impart good values to the fetus,
3. To improve the emotional health of parents,
4. To increase the active participation of the fathers during pregnancy, and
5. To increase the courage and confidence of mothers during labor.<<

#२ वगळता उरलेले चारहि पॉइंट्स अमेरिकेत होतात, अगदि डॉक्टरच्या रेकमंडेशन्वरुन. मग एव्हढा त्रागा का? नांवात "संस्कार" आहे म्हणुन? Happy

गर्भ संस्कार हे मूळ मन:शक्ती वाल्यांच आहे. बातांनी नंतर त्याचा चलाखीने वापर केला.गर्भ ऐकतो आहे या समजूतीने गर्भीणीला बर वाटत.त्यातच याच यश सामावले आहे

आद्य संस्कारकार बालाजी ताम्बे यांच्या एका लेखातून

१) >>>>आत वाढणाऱ्या गर्भाला मातृभाषेचे ज्ञान काही अंशी गुणसूत्रांतूनच आलेले असते. परंतु ते व्यक्‍त करण्यासाठी व्यावहारिक अर्थ जाणण्याची कोणतीही सोय गर्भापाशी नसते. कुठल्याही ध्वनीची स्पंदने मात्र गर्भाला अवश्‍य कळतात. >>>>>>
गर्भाला शब्दांचे अर्थ कळत नाहीत फक्त स्पंदने कळतात म्हणजे रवींद्र साठे नी म्हणलेला गायत्रीमंत्र आणी अनुराधा पौंडवाल बाईंनी गायलेला
मंत्र वेग वेगळे परिणाम करेल का ?

२)>>>>>>>>आपल्याला कल्पना आहे, की ध्वनी हा तरंगरूपात असतो व त्याचा आघात ज्या वस्तूवर होतो, त्या वस्तूतही तरंग उत्पन्न होतात. विशेषतः जलावर याचे खास परिणाम होताना दिसतात. संपूर्ण मेंदू हा मेंदुजलाने आविष्ट झालेला असतो. रसगुल्ला जसा साखरेच्या पाकात टाकलेला असतो, तसाच मेंदूचा पांढरा भाग मेंदुजलात बुडवलेला असतो. या जलामार्फत मेंदूकडे सर्व संवेदना पोचतात व मेंदूत उठलेल्या विचारांचे तरंग बहुतांशी या मेंदुजलातून स्पंदित (प्रवाहित) होतात व शरीर कार्यरत राहते. बाहेरून आलेल्या ध्वनिकंपनांमुळे प्रथम मेंदुजलावर परिणाम होतो. मेंदुजलावर परिणाम झाला की, संस्कार झाला असे आपण म्हणतो. असे झालेले संस्कार मुलाला समजू लागल्यानंतर किंवा बालक बोलू-चालू लागल्यानंतर दिसून येतात. >>>>>>>
मनुष्य मेंदूजलमुले ऐकतो, अशा कल्पना शरिरशस्त्राबद्दल असतील या डॉक्टरांचा सल्ला या विषयात किती ग्राह्य धरयाचा ?
मूळ लेख सकाळ मध्ये पब्लिश झाला आहे

>आत वाढणाऱ्या गर्भाला मातृभाषेचे ज्ञान काही अंशी गुणसूत्रांतूनच आलेले असते.

या एकाच वाक्यावर डॉ श्री ना नोबेल मिळेल.

गर्भवती स्त्रियांनी चांगले खावे, तिचा मूड चांगला रहावा, पित्यालाही आपल्या जबाबदारीची थोडी जाणीव व्हावी यात चूक नाही आणी आजकाल डॉक्टर लोक हे करतातच. पण अशी भोंदू विधाने करून पैसे कमावणे चूक आहे. अर्थात हा राजीखुशीचा मामला आहे आणी आजकाल लोकांकडे चार पैसे आहेत आणी बाळासाठी करून बघायला काय हरकत अशी भूमिका आहे. कदाचित त्यामुळेच मिड ब्रेन, प्लॅसेंटा वाले जोरात आहेत.

आयुर्वेदाला त्याच्या मर्यदाही आहेत. मुळात ते सायंस नाही. पारा शेंदूर वगैरे अतिशय घातक आहेत हे त्यांना माहित नसते. त्यामुळे सीडी ऐकणे वगैरे ठीक पण औषधे जरा जपूनच घ्यावीत.

बाकी अ‍ॅलोपॅथी वाले लुटतात मग आम्ही का नको हा "झाकिर नाईक" युक्तीवाद झाला. झाकीर नाईक यांना एका मुलीने "इस्लाम मध्ये बहुपत्नीत्व का आहे?" असा थेट प्रश्न विचारला तर त्यांनी महाभारत, रामायण बायबल मधल्या राजांना कशा अनेक राण्या होत्या ते चर्हाट लावले.

कालाय तस्मै नमः

वावावा सुसंस्कृत हिंदूबंधूंच्या नव्या डूआयड्यांचा बोध झाला या धाग्यावरून.

गर्भसंस्कार नामक प्रकर्णाचा उपयोग, वा कोणतीही सिद्धता न करता, केवळ उर बडवून जितं मया करणे हेच दिसले गेल्या ३ पानांत.

पथेटिक चाल्लंय जे काही आहे ते. या असल्या लोकांना गर्भसंस्कार करून देणारे अन लाखांत फी उकळाणारेच लोक भेटोत ही सदिच्छा!

हा सावळा गोंधळ जेव्हा कधी मिटेल, तेव्हा माझ्या देशाची पाउले किती वर्षे मागे गेलेली असतील, त्याच विचाराने जीव तुटतो. बाकी चालू द्या!

राज, वेड पांघरून पेडगावला जाताहेत का? त्यातले २ हाच तर कळीचा मुद्दा आहे. "गर्भावर संस्कार करता येतात. गर्भावस्थेत असल्यापासून संस्काराला सुरुवात करावी., म्हणजे..........." याबद्दलच या वरच्या लेखात लिहिलंय ना?

Pages