"तीट कवितेला - कविता क्र.१० - द्वैत"

Submitted by संयोजक on 26 September, 2015 - 04:48

गुलमोहरात पूर्वी काय काय लिहिलंय हे बघत असताना आम्हाला कवितांचा एक खजिनाच सापडला. काही वाचलेल्या, काही न वाचलेल्या, तर काही वाचलेल्या असूनही परत वाचताना वेगळाच अर्थ गवसलेल्या. अशा कित्येक सुंदर कविता, काळाच्या... आपल धाग्यांच्या उदरात गडप झाल्या आहेत. आता हा खजिना शेअर केल्याशिवाय आम्हाला राहवतय थोडच?
पण नुसता त्या त्या कवितेचा दुवा देण्यापेक्षा एक उपक्रम घेतला तर? ह्या कवितेला तुम्ही शेवटच्या कडव्यानंतर एक कडवं जोडायच. थोडक्यात ती कविता समजून घेऊन, त्यातल्या कल्पनांचा विस्तार करून आणि अर्थातच स्वतःचा स्वतंत्र विचार करून आणखी एका कडव्याची रचना करायची, बरोबरच कवितेला एक नवीन नावही सुचवायच. कशी वाटतेय कल्पना?

यात कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेशी बरोबरी करायचा किंवा त्याच्या कलाकृतीला जरासाही धक्का लावायचा हेतू नाही. फक्त कवी/ कवयित्रीच्या प्रतिभेला दाद देउन आपल्याला अशीच रचना करायची वेळ आली तर आपण कसा विचार करू याचा एक खेळीमेळीत अंदाज यावा आणि उत्तमोत्तम कविता पुन्हा वाचल्या जाव्यात इतकाच उद्देश आहे.

नियम:
१. या उपक्रमा अंतर्गत आम्ही मायबोलीवर पूर्व प्रकाशित कविता, कवी/ कवयित्रीच्या नावासकट प्रकाशित करू. त्या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक कडवं रचायच आहे आणि त्या कवितेला एक नवीन नावही सुचवायच आहे.
२. या उपक्रमात रोज एक नवीन कविता देण्यात येईल.
३. कडवं आणि नाव दोन्ही सुचवणे आवश्यक आहे.
४. तुमचं कडवं आणि नाव इथेच प्रतिसादात लिहा.
५. एका प्रतिसादात एकच कडवं लिहिण अपेक्षित आहे.
६. एक आयडी कितीही वेळा या उपक्रमात भाग घेऊ शकतो.
७. आपल्याला आवडलेल्या नवीन कडव्याला आणि शीर्षकाला 'लाइक' करायची सोय आहे.
आजची कविता:

मूळ नाव: द्वैत
कवी: उल्हास भिडे
कवितेची लिंक: http://www.maayboli.com/node/32115

पानांच्या गर्दीतून वाट काढत
दाट सावलीखालच्या मउशार मातीवर उतरून
माझ्या अवतीभोवती विसावलेले उबदार कवडसे,
शेजारीच खळाळणार्‍या निरागस झर्‍यावर
सांडलेला सोनेरी वर्ख,
मधुनच एखाद्या रानफुलाला
‘भोज्जा’ करत बागडणारी गोड फुलपाखरं,
कुठल्याशा पक्ष्याने
प्रियेला घातलेली सु्रेल साद,
टेकड्यांच्या पिलावळीसहित
दूरवर ठाण मांडून बसलेले डोंगर,
मंद झुळुकेला लयीत दाद देणारं
माळावरचं हिरवंगार गवत,
स्वच्छ निळ्या आकाशात रेंगाळाणारा
एखाद-दुसराच चुकार ढग…...
…….. मोहक, सुंदर, विलोभनीय इ. शब्द
फिके पडावेत असं ते दृष्य,
विधात्याने रेखाटलेलं अप्रतीम चित्र.....

मंत्रमुग्ध होता होता वाटलं......
इथेच संपून जावं, माझ्यातलं 'मी'पण,
विलीन होऊन जावं या सगळ्यात,
साधलं जावं अद्वैत……….
पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!
……………
…… ह्म्म्म्म .....
अद्वैताच्या अंबरातून
द्वैताच्या जमिनीवर अलगद उतरत
एक छानसा आळस देत उठलो तिथून
नि घराच्या वाटेकडे परतताना
चार पावलांनंतर मागे वळून पाहिलं….
...... विधात्याचं ते निसर्गचित्रं
शतपटीने सुंदर भासलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझाही एक प्रयत्न -

माझाही एक प्रयत्न - द्वैत-अद्वैत

नि घराच्या वाटेकडे परतताना
चार पावलांनंतर मागे वळून पाहिलं….
...... विधात्याचं ते निसर्गचित्रं
शतपटीने सुंदर भासलं.

नको वाटत असतानाही घरी पोचलो, वाहनांच्या गर्दीतून वाट काढत
सहज बघीतलं आरशात तर काय दिसावं
…….. मोहक, सुंदर, विलोभनीय इ. शब्द फिके पडावेत
असं माझ्या मनात खोलवर रूतून बसलेलं तेच दृष्य