ती

Submitted by नितीनचंद्र on 18 September, 2015 - 04:59

तीला कधी कुणी नटलेले पाहीले नाही. ना कधी अधुनीक कपड्यात पाहिले. सदान कदा ती घाणेरड्या आणि मळकट गाऊनमधे तीच्या दुकानात उभी असलेली. नजर कुठेतरी शुन्यात.

खरतर ज्या समाजात भरपुर हुंडा देऊन अपंग मुलीना पिवळे होताना मी पाहिले आहे. हीच्या बापाला त्याचे सोयर -सुतक नव्हते. हीचा बाप महा- कवडी चुंबक. " ती"च्या पेक्षा एक थोरली सुध्दा घरात वावरत होती. फरक इतकाच ती आधीच्या जमान्यातली असल्यामुळे गाऊन ऐवजी साडी. चेहर्‍यावर भाव तेच. खायला कमी नव्हत पण जगायला एक कारण लागत त्याचाच अभाव.

जेव्हा "ती" मोठी झाली तेव्हाच तीची शाळा बंद झाली. धोतर नेसलेल्या आणि व्यापारी लालसर टोपी घातलेल्या बापासमवेत दोघी दुकानात असायच्या. काही मोजकी गिर्‍हाईके त्यांच्याकडुन वाण-सामान खरेदी करायची. यात बीजवर, लहान वयात पत्नी वारलेले आणि आता कर्तव्य नसलेले या निमीत्ताने त्या दुकानात जास्त. एका काडेपेटीसाठी अर्धातास दुकानात घालवुन कोणी मोठीवर तर कोणी तिच्यावर इंप्रेशन मारु पहायचे.

बाप समजुन उमजुन गप्प असायचा. लोक म्हणायचे याला हुंडा द्यायचा नाही म्हणुन मुली घरात आहेत पण त्या बापाच खर दु:ख त्यालाच माहित असाव. त्यांची मस्करी न करणार्‍यांशी आणि जास्त खोलान न जाणार्‍यांशी त्यांचे जमायचे. चंची उघडुन देवाण - घेवाण व्हायची पण तितकेच. माझ्या मुलीला स्थळ पहा म्हणुन त्यांनी कुणाला भिड घातल्याचे कुणी ऐकले नाही.

असाच बराच काळ लोटला. बाप निवर्तला आणि दिदी नेमकी कोठे गेली माहित नाही. ती एकटी पडली. जवळ जवळ शंभर खणांचे घर खायला उठले. पैशाची अजुन तरी कमतरता नव्हती. मग तीने एक गावतली मुलगी घरकामाला जोडली. दुकानाच्या फळ्या आता बंद असायच्या. त्या मागच्या माझघरातला झोका हलताना दिसायचा त्यावर ती बसलेली असायची.

ती बाजारहाटाला बाहेर पडली की टारगट मुल शेरे मारायची. " अरे इथ काय जमतय का बघ. सगळेच प्रश्न सुटतील. घरभाड नको का खानावळ "

ती असल्या शेर्‍यांना पचवत घरी परत यायची. संध्याकाळी कधी आपल्या बदसुरत कामवालीच्या सोबत परत बाहेर फिरायला पडायची. हे अस खुप दिवस चालल.

एक दिवस तिच्या जीवनात पडलेला फरक सगळ्या गावाला कळला. वठलेला वृक्ष अचानक पालवी फुटावा तसा चमत्कार आजुबाजुच्या लोकांना दिसला. याच कारणही सगळ्या लोकांना समजल. एका बिल्डरने तिच्याशी संधान बांधुन तीची हवेली पाडुन फ्लॅट काढायचा निर्णय घेतला. इसार म्हणुन काही रक्कम दिली अशी चर्चा झाली. महत्वाची चर्चा अशी रंगली की त्या बिल्डरला फक्त तिच्या हवेलीत नाही तर तिच्यातही रस वाटला.

बिल्डर खरा मुळचा पेंटिंग कॉन्ट्रेक्टर होता. ह्या धंद्यात बराच पैसा कमवुन त्याला ही लाईन गवसली. नेमक्या प्रॉपर्टी असलेल्या विधवा, कुमारीका आणि टाकलेल्या बरोबर गळाला लावायचा. एक हजार स्वेकर फुट चा फ्लॅट आणि काही लाख हातात ठेऊन तो करोडोची प्रॉपर्टी डेव्हलप करायला घ्यायचा. ह्या स्त्रीला खोटी प्रतिष्ठा सुध्दा प्राप्त करुन द्यायचा. कुणाला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळवुन दे तर कुणाला मंडळाचे अध्यक्ष पद मिळ्वुन दे अश्या पध्दतीने काही काळ का होईना पण त्या स्त्रीच्या हृदयात स्थान मिळवायचा.

एकदा प्रोजेक्ट संपला की प्रॉपर्टी आणि स्त्री नविन शोधायचा. हा खेळ त्याच्या हातचा मळ झाला होता. क्वचीतच त्याच्या प्रोजेक्टला सुरुंग लागायचा. बोलता बोलता अशी मेख मारुन जायचा की प्रॉपर्टीचे कितीही वाद असले तरी मार्गी लागायचे. २४ महिन्यांचा करार फार तर ३० महिन्यात संपवुन तो सगळी अकाऊंट्स क्लोज करायचा.

आजकाल झुळझुळत्या साड्या घालुन कधी पंजाबी सुट घालुन ती फिरताना दिसत होती. नुसती फिरत नाही तर ती चक्क हसत होती. अनेक वर्षांच्या बुजलेल्या जाणिवा प्रकट झाल्या होत्या. स्त्री सुलभ नटण्याचा हव्यास आणि आणि आपल्याही जीवनात कोणाच तरी स्थान आहे ह्याचे प्रकटीकरण झाल्याने आवश्यक ते बदल दिसु लागले होते.

बिल्डरने मग दर्शनीबाजुला पाटीच लावली आणि तिथच घात झाला. "ती" चे अनेक लांबचे नातेवाईक होते ज्यांना तीने कधी जुमानले नाही. त्यांना प्रॉपर्टीच्या जवळ फिरकु दिले नाही, त्यांनी तिचा मुळ गावी असलेला एक काका शोधला. त्याला पुढे घालुन बिल्डरला नोटीस दिली. सबब प्रॉपर्टीची मालक ती एकटी नाही. अर्धवट काकाला संपत्तीचा मोह झाला. फुकट सल्लागारांनी वाढवलेली किंमत ठरवुन त्याने अर्धा हिस्सा मागीतला.

बिल्डरने बराच प्रयत्न करुन तो वाद मिटवायचा प्रयत्न केला पण काहींना तो वाद तसाच चालु रहाण्यात रस होता. बराच काळ गेल्यानंतर बिल्डरने हे खाते अक्कलखाती टा़कुन नव्या खात्याचा शोध सुरु केला.

बर्‍याच काळानंतर आलेली पालवी आता जळाली होती. तिलाही समजले की बिल्डरला खरा रस आपल्यात नव्हता, आपली प्रॉपर्टी डेव्हलप करण्यात होता. वाद संपेल आणि तो परत येईल याची जेव्हा खात्री राहिली नाही तेव्हा तिने सारा श्रुंगार गुंडाळुन ठेवला.

पुन्हा एकदा ती आपल्या झोपाळ्यावर विराजमान झाली. मोडकळीस आलेल्या घराच्या आढ्याकडे नजर लाऊन आणि काय करायच म्हणुन जुनगाऊ, मळक्या गाऊनमधे; जगाशी काही देण- घेण नसल्यासारखी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users