विठठल सापडला

Submitted by नितीनचंद्र on 16 September, 2015 - 04:55

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥

नामदेव महाराज रचित आणि राम फ़ाटक या संगीतकाराने लावलेली चाल जेव्हा पद्मश्री कै भीमसेन जोशींच्या आवाजात ऐकणे होते तेव्हा तल्लीन होऊन फ़क्त विठुरायाच सर्वत्र दिसु लागतो अशी या अभंगाची खासीयत. काही रचना ह्या प्रासादीक असतात अस म्हणतात. ह्या अभंगात आपल्या भक्तीच्या पराकोटीच्या अवस्था वर्णन केलेल्या आहेत. भक्ती कशी असावी याचा हा अभंग वस्तुपाठ आहे. अभंगाला वस्तुपाठ म्हणणे म्ह्णजे सजीव भावाला एका निर्जीव वस्तुत रुपांतरीत केल्यासारखे होईल परंतु या पेक्शा वेगळा शब्द अद्याप मला गवसलेला नाही.

भक्ती रसात रंगुन जाताना एखादा भक्त सर्वस्व विसरुन केवळ आराध्य याचेच चिंतन करतो यासाठी त्याच्या हाडा- मासातच नाही तर सभोवार सर्वत्र त्याला आराध्य दिसते याची ही कल्पनाच नाही तर हा अभंग असल्यामुळे इथे साक्ष असा शब्द वापरणे उचीत ठरावे.

माता - पिता विठ्ठल, माझा बंधु हा सुध्दा विठ्ठल आणि गोत्र सुध्दा विठ्ठल म्हणायला स्वस्वरुपाचा पडलेला विसर किंवा त्याग केल्याशिवाय हे शब्द मुखातुन येणे केवळ अशक्य.

आपले गुरु आणि गुरु देवता विठ्ठल, निधान विठ्ठल आणि निरंतर याच अर्थ आज एकाची भक्ती केली आणि उद्या दुसरा देव असे नाही तर निरंतर फ़क्त विठ्ठल अशी भक्ती फ़क्त संतच करु जाणे. सामान्य माणसाला साधायच्या गोष्टी अनेक असल्याने भक्तीच्या संकल्पना बदलत रहातात. बुध्दी गणपतीजवळ मागायची, ऐश्वर्य महालक्ष्मी कडे मागायच असा प्रकार आपला असतो. संतांना साध्य आणि साधन भक्तीशिवाय दुसर काहीच नसत.

संतांना आपल्या आराध्याशिवाय काहीच दिसत नसत. अस म्हणतात की एकदा समर्थ रामदास पंढरपुरला गेले. पांडुरंगाच्या समोर उभे राहिल्यावर त्यांना जे स्फ़ुरले ते अदभुत होते.
इथे कारे उभा श्रीरामा
मनमोहन मेघ श्यामा ॥ध्रु॥
काय केली शरयू गंगा
इथे आणिली चंद्रभागा
काय केली अयोध्यापुरी
इथे वसविली पंढरी ॥१॥
काय केले वानरदळ
इथे जमविले गोपाळ
काय केले धनुष्यबाण
कर कटावरी ठेवून ॥१॥
काय केली सीतामाई
इथे राही रखुमाबाई
रामदासी ऐसा भाव
तैसा झाला पंढरिराव ॥३॥

समर्थांना पांडुरंगाचे दर्शन घेताना त्यांच्या आराध्याचा विसर पडला नाही हे ही पराकोटीच्या भक्तीचे लक्षण मानायला हवे.

अध्यात्म हे अतर्क्य आहे. नामदेव महाराज असे एक संत होते ज्यांना संतपदाला जाण्यापुर्वी लहानपणी विठ्ठलाने प्रत्यक्श दर्शन दिले अशी आख्यायीका आहे. तरी सुध्दा विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होते आणि मुक्ताबाईने नामदेवमहाराजांच्या संतत्वाची परीक्शा केल्याचे वर्णन सुध्दा काही कथांमधे आहे. अश्या रितीने फ़क्त सगुण उपासनेने नाही तर बाह्य संतत्वाचा बाह्य दर्शन करु शकणारे, ज्यांच्या अंगी दया, क्षमा आणि शांती याचा अंगिकार झाला आहे असे संतत्व त्यांना प्राप्त झाले होते त्या शिवाय आपल्या आराध्याच्या भक्तीत रममाण होणे केवळ अशक्य प्राय गोष्ट आहे.

मायबोली वाचताना दाद यांनी लिहलेल्या "काळ देहासी " या रचनेची सांगीतीक मांडणी आणि नामदेवांचे शब्द व त्या अंगाने आलेले विवेचन वाचण्यात आले होते. तो अभंग विवेचनाला फ़ारच कठीण होता. खळेकाकांची चाल ही वेगळी आणि त्याचे विवेचन ही "दाद" दिदीच करु जाणे. परंतु हे लेखन करण्याआधी आपल्या पेक्षा मायबोलीवरच्या जाणत्या मंडळींनी ह्याच अभंगावर काही लिहले नाही ना याची खात्री करुन घेतली.

हा अभंग नक्कीच प्रासादीक आहे कारण समजण्यास अवघड काहीच नाही. प्रसाद म्हणजे घट्ट पाकात बांधलेले बुंदीचे लाडु नाहीत जे तोडताना खाणारा घामाघुम होईल. अभंगाला दिलेली चाल आणि वाजवलाय तो ताल सुध्दा सहज साधा आहे. ते स्वर फ़क्त भीमसेनजी ज्या आर्ततेने लावायाचे ती ताकद अन्य कुणा गायकात असणे अशक्य वाटते. खास करुन "नामा म्हणे मज विठठल सापडला" याची आर्तता इतकी प्रचंड आहे की त्यांना सापडलेला विठठल, ऐकणारा अनुभवुन जातो.

भक्ती हे सुध्दा अनुभुतीचे साधन आहे असे म्हणले तर गैर नसावे. अनुभव हा दुसर्या व्यक्तीचा असु शकतो परंतु त्याच्या जोडीला स्व: लागतो तेव्हाच तो ऐकण्या लायक असतो. अन्यथा ती कथा होते. लेखन सर्वस्वी स्वानुभवातुन आलेले नसते. कवितेतले भाव सुध्दा कवीने स्वत: ला भावलेले म्हणुन लिहलेले असतात. स्वानुभवातले असतील असे नाही. एका कविने त्याची झोपाळ्या वरची गाजलेली कविता त्याला खुर्चीत बसुन स्फ़ुरल असे एकदा दुरदर्शनवरच्या मुलाखतीत सांगीतल्याचे स्मरते आहे.. मला झोपाळा आवडत नाही असे त्याचे म्हणणे होते.

अभंगाचे तसे नाही. अभंग हा स्वानुभवच नाही तर अनुभुती आहे ज्यात तसाच अनुभव दुसरी व्यक्ती तन्मयतेने घेईल अशी क्षमता आहे. वारकरी आपल्या किर्तन परंपरेत अभंगाला किती महत्व देतात याचे कारण यामुळे समजते.

ज्याला विठ्ठल सापडला त्याला कळीकाळाचे भय नाही असा संदेश नामदेव महाराज अभंगाच्या शेवटी देतात. पण त्या आधीच्या सर्व पायर्या म्हणजे भक्ती, संतत्व हा खेळ नाही. जन्मो- जन्मांतरीची साधनाच हे फ़ळ देऊन जाते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, अप्रतिम, फारच छान ! _/\_
नितिनचंद्रजी, जसा नाम्याला विठ्ठल सापडला,
अगदी तसाच आपल्याला या पदाचा अर्थ सापडलेला दिसतो आहे.

नितिनचंद्रजी,
फारच सुंदर लिहिलयत.
भीमसेनजींनी खरच ताकदीने गायलाय नामदेव महाराजांचा हा अभंग.
भक्ताची अद्वैत स्थिती कशी होते आणि स्वतःला विसरून सगळीकडेच विठूराया कसा दिसायला लागतो हे या अभंगातून कळते. शेवटी प्रत्येक वस्तूमध्ये, प्राणिमात्रामध्ये भगवंत दिसणे, याकरता आधी आपल्यात तो दिसायला हवा, जाणवायला हवा. देहबुद्धी नष्ट झाल्याची ही खूण आहे, जिच्याशिवाय भगवंत भेटणे शक्य नाही. 'मी नाही.. तुच आहेस' हीच ती वृत्ती, हेच अद्वैत. तुकाराम महाराजही म्हणतात 'आपुले मरण पाहिले म्या डोळा'
देहबुद्धी नष्ट झाली म्हणजेच वासना मेली. वासना मरणे हाच मोक्ष. वासना नष्ट झाली की मायेचा भर ओसरतो. एकदा ही स्थिती आली की भगवंत दिसायला लागतो.

दाद यांच्या 'काळ देहासी आला खाऊ' चे विवेचन वाचायचे आहे. लिंक देऊ शकाल का?

पु. ल. देशपांडे यांचे ‘विठ्ठल तो आला आला’ हे नाटक आठवले. विठ्ठल काय बोलतो, हे तिथल्या भक्तांनाच समजत नाही. विठ्ठल काहीही बोलणे शक्य नाही आणि आपण विठ्ठलाला कितीही थापा मारल्या तरी त्या सहज खपून जातील, असे मंदिरातल्या भक्तांना वाटत असते. विठ्ठल वैतागून जोरात शिटी वाजवतो, तरीही भक्त स्वत:च्या भक्तीच्या धुंदीत. पण कुणीतरी एक शुद्धीवर असलेला भक्त ओरडतो, ‘अरे, शिटी कुणी वाजवली? विठ्ठलानेच!’ बाकी भक्त त्याच्यावर खेकसतात, ‘वेड लागलंय का तुला? विठ्ठल कसा शिटी वाजवेल? त्याचे काम मुकाट्याने युगानुयुगे कमरेवर हात ठेवून उभे राहण्याचे आणि भक्तांच्या मागण्या ऐकण्याचे आहे!’ पण पुलंच्या नाटकातला विठ्ठल सतत विटेवर उभे राहण्याची शिक्षा झुगारून देतो.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-lord-vitthal-come-4326789-NOR.html

प्रकाशजी, दरवेळेस भक्तिरसाच्या/श्रद्धाविषयाच्या धाग्यावर "तद्दन निरिश्वरवादी/नास्तिक लोकांच्या" वैखरी मांडल्याच पाहिजेत काय?
पुलंचे म्हणताय, तर पुलंचे बाकी कितीही चांगले असले, तरी त्यांना पंढरीच्या वारकर्‍यांमधे "दैन्य/दु:ख" इतकेच दिसत होते. वरच्या नाटुकल्यात उपहासात्मक पद्धतीने भक्तांचा "वेडगळपणा" दाखवायचा प्रयत्न केलाय.
हे दिलय, ते त्यांच्या वा तुमच्या द्रुष्टीने सुयोग्य असेलही, पण ते इथे अस्थानी आहे हे नक्की. असो.

लिंबुजी
मला या ठिकाणी पुलंच विठठल तो आला आला हे आठवल. लागूंच परमेश्वराला रिटायर करा! हे नाही आठवल. आपण याच्या कडे व्हॅल्यू अ‍ॅडिशन असे पाहिले नाहीत. हा माझा आवडता अभंग आहे. अभंगांमधे भक्त विठ्ठलाशी संवाद साधतो तर पुलंच्या या नाटकात विठ्ठल भक्ताशी संवाद साधतो.आपल्याला अस्थानी वाटल असेल ही पण हे विषय सोडून नाही..पुलंचा उपहास हा दांभिकतेवर भाष्य करतो. भक्तांना आत्मपरिक्षण करायला लावायचा तो ही एक मार्ग आहे.एखाद्या कौतुक समारंभात कर्तव्याची जाणीव करुन देणारे भाष्य हे काहींना गालबोट लावल्यासारखं वाटत हे मात्र खर आहे.पण कौतुकार्थी जर प्रगल्भ असेल तर तो ते सकारात्मक घेतो.

परंतु हे लेखन करण्याआधी आपल्या पेक्षा मायबोलीवरच्या जाणत्या मंडळींनी ह्याच अभंगावर काही लिहले नाही ना याची खात्री करुन घेतली.>>>>>>यावर आधी एक कोणीतरी लेख लिहिला होता असे आठवतेय.तोही छान होता.
पण तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहु शकता. इतरानी लिहिला असेल इ. विचार करु नका. हा लेख तुमचा विचार आहे.. तुमच्या भावना.. Nothing wrong with that..

चांगले लिहिलेय. मनापासुन.
हा अभंग "अहिर भैरव" वर आधारीत आहे. माझ्या अत्यंत आवडीचा अभंग. लता, पं. भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकताना असे वाटते की ही माणसे गात नाहीत ..थेट देवाशी संवाद साधतात. मग देवाची उदंड कृपा त्यांच्यावर झाली तर काय नवल!