हा आपल्या हळदीच्या पानात केल्या जाणार्या पातोळ्यांसारखाच एक प्रकार आहे. पण ओडिशा पद्धतीचा आहे.
आम्ही तिथे गेलो आणि हळदीची ताजी पानं असली की एकदा तरी केला जातो. पहिल्यांदा पाहिला तेव्हा ओबडधोबड दिसला त्यामुळे खाऊ की नको असा प्रश्न पडला होता. मात्र एकदा चव घेऊन बघितल्यावर आवडायला लागला!
आता सध्या बाजारात हळदीची ताजी पाने विकायला आली आहेत त्यामुळे लगेच हा पदार्थ इथे द्यावासा वाटला. सकाळी केला त्या आधी काही ठरले नव्हते. अगदी इम्पल्स आल्यासारखी उठून केला त्यामुळे फोटो नाहीत.
साहित्य:
- इडलीचे तयार पीठ ( अधिक टिपा पहा)
- चार पाच हळदीची हिरवी पाने.
खालील दोन पैकी एका प्रकाराचे सारण
सारण प्रकार १ साठी
- ओलं खोबरं
- बारीक किसलेला गुळ / गुळ पावडर सुमारे एक वाटी
- वेलची
- चिमुटभर मीठ
सारण प्रकार २ साठी ( मी हे केले )
- मुगाची डाळ १ वाटी ( टिपा पहा)
- बारीक किसलेला गुळ / गुळ पावडर सुमारे एक वाटी
- काळी मीरी पावडर थोडीशी
-चिमुटभर मीठ
कृती :
सारण १
- नेहेमी सारखे गुळ खोबर्याचे सारण करुन घेणे ( मी हे सारण वापरले नव्हते )
सारण २
- मुगडाळ धुवून कुकरला लावुन बोटचेपी शिजवायची ( खुप शिट्ट्ञा काढू नका, लगेच गाळ होईल )
- कुकर मधली वाफ गेली की लगेच बाहेर काढुन त्यातले पाणी काढुन टाकायचे, ढवळायचे नाही.
- एका पसरट पॅन मधे थोडे तुप घालुन त्यावर डाळ हलक्या हाताने परतवायला घ्यायची
- एखाद मिनीटाने / पाणी जरा आटले की गुळ घालुन पुन्हा परतवायची. चिमुटभर मीठ आणि काळी मिरी पावडर टाकाय्ची
- गुळ नीट विरघळला आणि की गॅस बंद करायचा. याचे पुरण वाटायचे नाही. असेच ठेवले की डाळीचा दाणा थोडा कडक होतो तसाच छान लागतो.
पिठा करताना
- पानं धुवुन त्याचे साधारण चार ते पाच तुकडे करुन घ्यायचे. एकेक तुकडा इडली पात्राच्या स्टँडच्या एका खळग्यात बसेल साधारण इतका हवा ( अधिक टिपा पहा )
- इडलीपात्राच्या एकेका ताटलीतल्या खोलगट भागात एक पानाचा तुकडा ठेवायचा
- त्यावर चमच्याने पीठ- नेहेमीपेक्षा थोडेच- टाकायचे , त्यावर थोडे सारण घालुन वर पुन्हा थोडे पीठ टाकायचे.
- हळदीचे पान रुंद असे तर त्याच पानाच्या उरलेल्या भागाने किंवा दुसरा तुकडा घेऊन त्याने हळुवार झाकायचे
- असे चारही खळग्यात आणि सगळ्या ताटल्यात लावुन इडल्या नेहेमीसारख्या वाफवुन घ्याव्या
- बाहेर काढुन निवल्यावर हळुवार हाताने पानं काढुन टाकावीत आणि गरम गरम खायला द्याव्यात.
अधिक टिपा :
१ - मी तयार इडली पीठ वापरुन केले पण तिथे करताना जे पिठ वापरतात त्यात नेहेमीपेक्षा उडदाची डाळ थोडी अधिक असते असे वाटते. प्रमाणाच्या गोंधळामुळे मला विचारुनही कळले नाहीये. शिवाय पीठ किंचीत घट्ट असते, म्हणजे त्याचे उत्तपे घालता येणार नाहीत असे असते.
२- दोन्ही पैकी कुठलेही एक सारण वापरले तरी चालेल.
३ - मुळ रेसिपी मधे मुगडाळ चांगली खरपुस भाजुन घेतात आणी मग शिजवतात. तिथे भाजलेली मुगडाळ मिळतेच. त्याचा वास मला आवडत नाही
४ -पातोळे करतात त्याच प्रकारे पानात इडल्या वाफवायच्या आहेत. पण इडलीपीठ जरा पातळ असल्याने इडली पात्र वापरावे लागते.
५- मला फारसे प्रमाण सांगता येणार नाही मात्र १ वाटी डाळिच्या सारणात १२ इडल्या झाल्या आणि थोडे सारण उरलेही
खायला द्या
खायला द्या
फोटो टाका.
फोटो टाका.
छान वेगळा प्रकार आहे हा !
छान वेगळा प्रकार आहे हा ! तिथेही पिठ थोडे आंबवूनच घेतात का ? बहुतेक घेत असावेत नाहीतर फुलणार नाही.
पण आंबण्यासाठी फार घट्ट ठेवून चालणार नाही.
छान आहे हा प्रकार. मला
छान आहे हा प्रकार. मला हळदीच्या पानात उकडुन केलेले सर्वकाही चालते, सोबत गुळ खोबरे असेल तर मग भारीच. त्यामुळे हा प्रकार नाक्की करुन पाहिन.
इडली + गुळ + खोबरं +शिजलेली
इडली + गुळ + खोबरं +शिजलेली मुगडाळ खाल्याचा फील येइल का? I am not able to guess the exact taste..!
हो पीठ आंबवुनच घ्यायचे असते.
हो पीठ आंबवुनच घ्यायचे असते. त्याशिवाय हलके होणार नाही. खुप घट्ट नसते फक्त उतप्पे घालताना डावाने सलग ओतता येते तसे पातळ नसावे. ( तसे असल्यास इडल्या छान आकाराच्या न होता जरा इकडेतिकडे पसरलेल्या होतील. चवीत फारसा फरक पडणार नाही .
इडली + गुळ + खोबरं +शिजलेली मुगडाळ खाल्याचा फील येइल का? >>> नाही
एकतर
हळदीच्या पानात वाफवलेले इडली + गुळ + खोबरं किंवा इडली + मुगडाळ पुरण
वाफवताना हळदीच्या पानांचा अशक्या घमघमाट सुटतो.