ताणलेलं सsप्राईज!

Submitted by चिमण on 29 January, 2009 - 11:08

(टीपः- 'सsप्राईज! सsप्राईज!' ही कथा वाचल्यावर काही आंबटशौकीन वाचकांनी 'पिक्चरमधे काय झालं?' अशी निर्लज्जपणे पृच्छा केली. असला भोचकपणा मला मुळीच आवडत नाही. म्हणून खरं तर माझ्या खाजगी गोष्टी वरची ही कथा लिहीणार नव्हतो. पण काय करणार? हल्ली पापाराझींचा इतका सुळसुळाट झालाय ना की त्यामुळे कुठलही गुपित फार दिवस कुपित रहात नाही. असल्या आगंतुक लोकांनी भलते सलते फोटो घालून सनसनाटी मथळ्याखाली उलट सुलट लिहीण्यापेक्षा आपणच सत्य परिस्थिती कथन करावी असं ठरवून मी हे नाईलाजास्तव लिहीत आहे. निदान 'प्रकाश माटेचं काय झालं?' हा प्रश्ण सामना पिक्चरमधल्या मास्तरसारखा तुम्हाला तरी सतावणार नाही अशी आशा आहे. )

कांताची सरप्राईज पार्टी संपली होती. बरेचसे लोक घरी गेले होते. उरलेले आवराआवर करत होते. अनुराधा बरोबर पिक्चर पहायच्या कल्पनेनं एकीकडे माझं मन आनंदानं ग्लासातल्या मल्ड वाईन पेक्षा जास्त जोरानं हिंदकळत होतं. पण दुसरीकडे 'खरंच तिला माझ्याबद्दल काही वाटतंय का?' ह्या शंकेनं उच्छाद मांडला होता. काय करणार? मी एक चिंतातुर जंतु आहे, कन्या राशीचा असल्यामुळं अंमळ जास्तच! कन्या राशीचा असून अजून पर्यंत कुठल्याही कन्यकेबरोबर पिक्चरला जाण्याएवढी जवळिक झाली नसल्यामुळं जास्तच घोर लागला होता. आता हेच पहा ना! ती फुगे फोडत होती आणि फुटल्यावर खळखळून हसत होती. पण माझं मन मात्र, ती फुग्यांच्या ऐवजी माझ्या भ्रमाचा भोपळा फोडतेय असं समजून, दचकत होतं. माझं मन टूथपेस्ट सारखं आहे, त्यातून शंकेची पेस्ट बाहेर आली की ती परत आत जाणं अशक्य! तरीही तिला तसं खिदळताना पहायला मला आवडत होतं. नुसतं तिच्याकडे एकटक पहाणं वाईट दिसलं असतं म्हणून मी तिला एक एक भोपळा.. नव्हे नव्हे.. फुगा द्यायला सुरुवात केली. ही फुगेफोडणी कधीच संपू नये असं वाटत होतं पण शेवटी फुगेच संपल्यावर काय करणार? आणि कृष्णानं द्रौपदीला वस्त्राचा अखंड पुरवठा केला तसा तिला फुग्यांचा करणं मला शक्य नव्हतं. अखेर तमाम पब्लिकच्या डोळ्यात अश्रूंचे लोंढे उभे करणारा, दोन प्रेमी जीवांच्या ताटातुटीचा, प्रसंग आला. तिची व माझी घरी (आपापल्या) जायची वेळ झाली.

'बाय अनु' मी रुध्द स्वरात म्हंटलं आणि चपापलो. पहिल्यांदाच तिला मी 'अनु' म्हंटलं होतं. कानफटीत वाजवण्याऐवजी गोsड हसून तिनं माझा मोबाईल नंबर मागितला.. पिक्चरचं कळवायला.. आणि माझा जीव वाईनच्या रिकाम्या ग्लासात पडला. बापाबरोबर जायच्या आधी तिनं बापाची ओळख करून दिली. 'कन्ये'च्या काळजीमुळे बापानं थंड नजरेनं मला दोनदा आपादमस्तक न्याहाळलं आणि कोरडं हसला. माझ्या डोळ्यात खाटकाकडे बघणार्‍या बकर्‍याचे भाव असणार. ते गेल्यानंतर ग्लासातील जीव गोळा करता करता मला दोन नवीन काळज्यांनी घेरलं.. मी तिला बरोबर मोबाईल नंबर दिला की नाही, ही पहिली.. माझ्या व अनुच्या मिथुन राशीतील युतिला तिचा बाप वक्री जाणार की काय, ही दुसरी. घरी जाताना 'हम थे वो थी और समा रंगीन' गाणं म्हणत गेलो.

मला अजून एक अडचण भेडसावत होती.. प्रेमळ संवाद तिच्याशी कुठल्या भाषेत साधायचा ही. मराठी तिला येत नव्हतं नि गुजराथी मला. नाही म्हणायला एका हिंदी गाण्यामुळे मला गुजराथीतील 'तमे प्रेम करुं छू' एवढं एक वाक्य माहीत होतं. पण प्रेमाच्या नाजुक मामल्यात कुत्र्याला छू करावं तसं तिला छू करणं मला अमानुषपणाचं वाटत होतं. आणि समजा मी ते चुकून म्हणालोच व नंतर ती गुजराथीत काहीबाही बोलली तर मी काय म्हणणार? नुसतं हुं! हुं! की छू! छू!? मग राहिल्या फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा. अनुचं शिक्षण भारतात झालेलं असल्यामुळे जरी तिच्या इंग्रजीला ब्रिटीश उच्चारांचा गंज चढलेला नसला तरी इंग्रजीचं नि माझं गोत्र जुळत नाही. ज्या भाषेत प्रेयसीला सर्रास 'बेबी' म्हणतात ती भाषा मला कशी झेपणार? २५ वर्षाच्या घोडीला.. आपलं प्रेमिकेला.. बेबी म्हणणं म्हणजे बुलडोझरला कानकोरणं म्हणणं नाही का? शेवटी राष्ट्रभाषेला पर्याय नाही हे स्वच्छ होतं. हिंदी पिक्चरच्या कृपेने काही प्रेमळ डायलॉग मारणंही जमलं असतं.

घरी आल्यावर सुद्धा अनु डोक्यातून जात नव्हती. टीव्हीत लक्ष लागत नव्हतं. वाईनच्या जादूमुळे डोळे मिटत होते. मग झोपी गेलो.. एकदम कार्यालयाचं दृश्य दिसलं.. माझं आणि अनुचं लग्न चालू होतं.. भटजीचे 'ब्रेथलेस' मंत्र सुरु होते.. 'दीपम् दर्शयामि.. धूपम् दर्शयामि.. अमुकम् करिष्यामि.. तमुकम् अदनान सामि'.. मधेच भटजी माझ्याकडे पाहून म्हणाला..
भटजी: "मम म्हणा". मी म्हंटल.
भटजी: "हाताला हात लावा". मी त्याच्या हाताला हात लावला.
भटजी(वसकन ओरडून): "माझ्या नाही, कन्येच्या." कुणाच्या हाताला हात लावायचा हे हा भटुरड्या कधी सांगणार?

मी अनुच्या हाताला हात लावला व बराच वेळ तसाच ठेवला. परत भटजी डाफरला 'आता सोडा हात'. मला राग आला तरीही मला 'मी हा हात सोडण्यासाठी धरलेला नाही' असा फिल्मी डायलॉग टाकावासा वाटला. पण एकूण परिस्थिती बघता, होमाऐवजी भटजीच पेटला असता म्हणून, नाही टाकला. राग आवरता घेतला.. नीट लक्ष द्यायचं.. आता अजिबात चुकायचं नाही असं ठरवलं. दरम्यान सतरांदा मम म्हणून आणि हाताला हात लावून मला चांगलीच सवय झाली होती. मधेच भटजींनी परत मम म्हणायला सांगून तूप घालायला सांगीतलं. मी ते अनुच्या हातावर घातलं. हातावर तूप ओघळल्यामुळे ती बिथरली व तिनं अख्खं तुपाचं भांड माझ्या हातावर उपडं केलं. मग भटजीची चिडचिड त्यावर आमची सगळ्यांची बाचाबाची या सगळ्या प्रकारामुळे एकदम प्रचंड कोलाहल सुरु झाला.. मी जागा झालो.. पहातो तर माझा अलार्म रेडीयो सुरु झाला होता.. त्यावर एक रॅप प्रकारातला गोंधळ चालू होता.. माझ्या छातीत धस्स झालं.. पहाटेची स्वप्नं खरी होतात म्हणे.. आता भविष्यात माझं लग्न लागणार की वाट लागणार?

तशाच धस्स-मुस्सळ्या छातीनं ऑफीसला गेलो. ऑफिसातल्या सुंदर सुवासिक बायका मला सिनेमातल्या एक्स्ट्राँसारख्या वाटत होत्या. अनुच्या फोनची चातकासारखी वाट पहात होतो. नेहमी सत्रांदा वाजतो पण त्या दिवशी एकदाही भोकाड पसरलं नाही त्यानं. दोन-तीन वेळा मोबाईल चार्ज केला, दहा वेळा सिग्नल येतोय ना ते पाहीलं. पण छे! प्रेमपीडित लोकांना सरकारी नोकरी ही मोठी शिक्षा आहे. कामच नसल्यामुळं मन गुंतवता येत नाही. मी पण गाढवपणाच केला.. तिचा मोबाईल नंबर घ्यायला पाहीजे होता, म्हणजे मलाच तिला फोन करता आला असता ना.. याला म्हणतात पश्चात बुध्दी बामण. बिनकामाची ओढाताण होऊन एकदाचा दिवस संपला. घरी जाऊन टीव्हीसमोर मख्ख चेहर्‍यांनं बसलो. बरंच काही डोळ्यासमोर हलत होतं पण डोक्यात शिरत नव्हतं. अचानक एका जाहीरातीनं लक्ष वेधून घेतलं. तशी ती पूर्वीही पाहीलेली होती पण त्या दिवशी ती एकदम मनात ठसली. एक्स नु पर्फ्युमची जाहीरात होती ती.

माझ्यासारखा एक फाटका तरुण एक्स फवारून आसमंतात वास मारत निघतो व आजुबाजुच्या सगळ्या बायका कामं टाकून, अंगात आलेल्या बाईसारखे केस मोकळे सोडून, त्याच्या मागे धावतात. नंतर त्या एकमेकींच्या झिंज्या उपटतात की त्याच्याभोवती 'हा! हा! हा!' करत फेर धरून नाचतात हे कुतुहल, जाहीरात आधीच संपवल्यामुळे, अजूनही कधी शमलेलं नाही.. पण केस मोकळे सोडण्यासाठी त्यांनी केलेली मानेची विवक्षित हालचाल आणि त्यांच्या चेहर्‍यांवरचे भाव पाहून अनुला माझ्याबद्दल काही वाटायला लावण्यासाठी हाच उपाय चांगला आहे हे नक्की झालं. हा पर्फ्युम आमच्या डेटला वापरून 'एक्स'पिरिअन्स घ्यायचं ठरवलं.

पुढचे काही दिवस असेच गेले. आमच्या डेटची डेट अजून ठरलेली नव्हती. लक्ष अजिबात लागत नव्हतं. संत पु.ल.देशपांडे यांनी त्यांच्या 'तीन पैशांचा तमाशा' या गाथेत वर्णिल्याप्रमाणे स्थिती झाली होती.

बाईच्या नादानं धूळधाण होते
सगळ्या कामाची माती होते
एकदा का गेली लावून चटका
त्यातून कुणाची नाही सुटका

ती नवीन चटका लावून गेली तो आमचा साप्ताहिक संगीत कत्तलीचा दिवस होता. सहज विचारतोय असं दाखवत मी पिक्चरचं काय ठरलं ते विचारलं.. त्यावर तिचा फोन बंद पडला होता, आता तो सुरु झालाय आणि ती १-२ दिवसात सांगणार आहे असं कळलं. आमची संगीत हमरीतुमरी सुरु झाली. त्या दिवशी प्रथमच तिचा नेहमीचा अघोरी लाडिकपणा माझ्या मनाला गुदगुल्या करून गेला.. आणि माझ्या प्रेमळ कटाक्षांच्या क्रेडिटला गोड स्मितांचा इंटरेस्ट मिळाला. मग आम्ही प्रथमच 'दिल पुकारे आरे आरे आरे' हे गाणं म्हंटलं. ते माझ्या चुकांमुळे फारच रंगलं. ह्या गाण्याच्या सुरवातीला स.दे. नं अप्रतिम संगीत टाकलंय.. ते पुढं कडव्यानंतरही येतं.. मी ते ऐकत बसतो मग मला गाणं म्हणायचं भान कसं रहाणार? शिवाय त्यातली 'जीवन अपना मै भी रंगीन कर लू, मिल जाए जो इन होठोंकी लाली' ही ओळ म्हणायला माझी जीभ काही रेटत नव्हती. त्यात अनुनं 'दिल पुकारि आरि आरि आरि' म्हंटल की माझ्या डोक्यामधे 'वारि वारि जन्ममरणाचे वारि' ह्या स्तोत्राचा इंटरफेरन्स! अनेक रिटेक झाल्यावरसुद्धा ते गाणं न जमल्यामुळे सगळे घरी गेले.

दुसर्‍या दिवशी अनुचा 'शनिवारी ६ वाजता घरी ये' असा मेसेज आला. शनिवारला दोन युगं अवकाश होता. त्यात लाख वेळा तो मेसेज वाचून झाला. कसाबसा शनिवार उजाडला. मिशी नीट कोरायच्या नादात एका बाजुची जास्त उडाली.. मग दुसर्‍या बाजुची उडवली.. समाधान न झाल्यानं परत पहिल्या बाजुची.. करत करत चार्ली चॅप्लिन मिशी झाली.. ती योग्य वाटेना म्हणून तलवार कट मिशी पार सफाचट केली. मी एक्स पर्फ्युम घेऊन आलो होतोच. दिवाळीत आई अंगाला सुवासिक तेल रगडून रगडून लावायची तसं ते लावलं. पाच मिन्टात त्या दर्पानं माझं डोकं भणभणायला लागलं. इतका पर्फ्युम चोपडल्यावर स्वतःच डोकं ताळ्यावर ठेवणं अवघड तिथं बायकांची काय कथा?

बाहेर पडलो. रस्त्यात एका कुत्र्यानं जरा जास्तच सलगी दाखवून वास घेतला. मला वाटलं हा तंगडी वर करणार म्हणून मी पळायच्या बेतात होतो तोच त्यानं माझी पँट धरली. आयला! एक्सचा परिणाम कुत्र्यांवर पण होतो काय? कुत्रं जवळ आलं तरी मुळीच पळायचं नाही हा सल्ला आठवून पळणं रद्द केलं. मग चड्डी सुटली तरी चालेल पण धीर सुटता कामा नये असं मनाला बजावत, मूठी आवळून मी हळूहळू पुढे जायला लागलो. कुणीही माझी मूठ उघडून पाहिली असती तर माझा जीव तिच्यात दिसला असता. पिक्चरच्या आमंत्रणापासून माझ्या जिवात जीव नव्हता.. कधी ग्लासात तर कधी मुठीत. कुत्र्यानं हट्ट सोडला नाही. तो पँट धरून माझ्या मागोमाग यायला लागला. तिकडून एक गौरांगना धावत आली. पळता पळता तिचे केस सुटले. मला तो एक्सचाच इफेक्ट वाटला. माझ्या जवळ येताच तिनं वाईट तोंड केलं.. तिचा लंबवर्तुळाकार चेहरा 'एक्स्'क्लमेशन मार्क मधे बदलला. त्या कुत्र्यानं केलेल्या मानेच्या विवक्षित हालचालीमुळं मला संशय निर्माण झाला. मी चुकून कुत्र्यांचं एक्स आणलं की काय? आणि हे कुत्रं, कुत्रं नसून कुत्री आहे की काय? तिनं कुत्र्याला 'टीना! स्टॉपिट!' असं दरडावताच तिनं माझी पँट सोडली. नक्कीच ती कुत्री होती.

झाल्या प्रकाराने पँटच्या आत पाय थरथरत होते. कसाबसा अनुच्या घरी गेलो, दार खटखटवलं. अनुनं दार उघडलं. ती घरच्याच कपड्यात होती. हे काय? पिक्चर बोंबलला काय? मिशी नसल्यामुळं तिनं क्षणभर मला ओळखलंच नाही. नंतर ती किंचाळली 'हे काय? तुझी मिशी....' ... ढप्प्प्प्प्प्प. काही कळायच्या आत आकाश कोसळल्यासारखी अनु माझ्या अंगावर कोसळली. ह्या निद्रिस्त सुंदरीचं चुंबन घेऊन तिला जागं करावं की तिला उचलून, पळत पळत दवाखान्यात नेऊन, डॉक्टरला 'डाक्टरसाब, मेरी अनुको बचाइये' असं म्हणावं या संभ्रमात मी पडलो. तिकडून तिचा बाप धावत आला. माझी मिशी हरपणं आणि तिची शुद्ध हरपणं यांच्यातला कार्यकारणभाव मला उमजत नव्हता. तिच्या बापानं नाक वर केलं व हवेत हुंगल्यासारखं करून म्हणाला 'तरीच! पर्फ्युमनं अंघोळ करून आलास काय? तिला ऍलर्जी आहे पर्फ्युमची." बावळट चेहर्‍यानं मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. बापानं लगेच हाकललं "ती शुद्धीवर आली तरी परत वासानं बेशुद्ध होईल. जा! वास काढून ये'. वास काय काढून येऊ? तिचा वास काढत काढतच मी इथं आलो होतो ना?

खिन्न मनानं घरी आलो, अंघोळ केली तरी वास काही जाईना.. तो माझ्या रोमारोमात जिरला होता. परत तिच्या घरी जायचं धाडस काही झालं नाही. माझ्या डेटचा बल्ल्या करणारं एक्स नक्कीच आउटडेटेड असणार! अनुच्या हातात हात घालून नवो'डेट' जोडप्यासारखं थेटरभर फिरण्याच्या ऐवजी मी घरी रिमोट हातात घेऊन चॅनल फिरवीत बसलो. माटेच्या डेटला सत्राशे विघ्न, दुसरं काय!

-- समाप्त --

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या लिखाणावरून एवढ्या रुक्ष प्रोग्रामिंग सारख्या फिल्ड वाल्या माणसाला हे एवढ कस बरा सुचत असे मला वारंवार वाटू लागले आहे.:) Happy Happy

Pages