सर्व शिक्षा अभियानाच्या रगाड्यातून हे प्राणी कसे काय वाचले कोण जाणे. मात्र
सक्तीने करून घेतलेल्या सर्व्हेक्षणात ही मंडळी दिसली तेंव्हा माझे डोळेच पांढरे
होण्याचे बाकी होते.
एका शेताच्या बांधावरच्या कुडाच्या कोपी समोर तीन लहानगी खेळताना दिसली.
शाळकरी वयाची होती आणि तरीही शाळेच्या बाहेर?
"तुमचे आईवडील कुठे आहेत?"
माझ्या सहज प्रश्नाने पाखरांना शिकाऱ्याची चाहूल लागावी तसे ते भुर्र झाले.
कोपीत डोकावले तेंव्हा ६०-६५ वर्षांचा अगदी
जराजर म्हातारा कानाला हात लावून मिचमिच्या डोळ्यांनी नुसताच माझ्याकडे बघू लागला.
कोपीत किंचितच उजेड होता.आत सामान असं काहीच नव्हतं. चार दोन बारदानी , गोधड्या, काही कपडे, चिंध्या,
आणि चार-सहा भांडी. चूल तर त्या टीचभर अंगणातच होती. शेजारी लाकूडफाटा.
"बाबा ही मुलं कोणाची आहेत?" मी विचारले.
"आं sss" कानाचा हात तसाच ठेवत म्हातारा बोलला.
"बाहेर खेळणारी मुलं कोणाची आहेत?"
मी जरा मोठ्याने.
"व्हत्या त्सांग दोन माजी आन याक माह्या पोरावालं"
"शाळेत जातात का?"
"नाहा "
''का?''
मग बाबा जे बोलला त्याचा आशय असा.
ठाकर समाजाचं हे कुटुंब. बाबाची ही पाचवी बायको होती जिची ही मुलं होती. बाईआता ह्यात नव्हती.
बाबा आपल्या दुसऱ्या बायकोच्या मुलासोबत तिथे राहत होता. त्या मुलाचीही एक मुलगी होती.
असे ते तिघे बाहेर खेळत होते. मुलगा वाट्याने शेती करत असल्याने हंगामा नुसार त्यांची कुटुंब यात्रा चालली
होती. कधी या गावात तर कधी त्या गावात. मुले शाळेच्या वयाची झालीत हे त्यांच्या गावीही नव्हते.
जरा वेळात त्याचा मुलगा आल्या नंतर मी त्याला .
बालकांचा शिक्षण हक्क कायदा , शिक्षणाचे महत्व वगैरे सरकारी बाबी समजावून मुलाना शाळेत
पाठवण्याची गळ घातली. त्याच्या शेतमालकाची मुलेही शाळेत येत होतीच २ किमी चालायला
फार नव्हते.
दुसऱ्या दिवशी ते तिघेही शाळेत आले.
मी सरकारी बडग्यातून मोकळा झालो होतो. आता माझ्या परिसरात
एकही मुलगा शाळाबाह्य नसल्याचा मला आनंद होता.
पहिल्यांदाच शाळेत आल्याने त्यांना बुजल्या सारखे वाटत असावे म्हणून मी त्यांना बोलतं करण्यासाठी काही विचारणार
तो माझ्या लक्षात आलं की त्यांच्या अंगावरचे अपडे अनेक दिवस धुतलेलेच नव्हते.
त्यांनी स्वत:ही कितीतरी दिवस अंघोळ केली नसावी असा मळ गळ्याखाली , हाता पायांवर दिसत होता.
दात उगवल्यापासून घासलेलेच नसावेत इतके खराब. नाक , डोळे. विचारूच नका. केससुद्धा घरीच कापलेले.
मला काही काळ काहीच सुचेना.
मग भात शिजवणाऱ्या (शालेय पोषण आहार) बाईला दहा रुपये देऊन तिच्या मदतीने त्यांना हातपंपाखाली अंघोळ घातली .
आता जरा बरे वाटत होते. रोज अंघोळ करावी , स्वच्छता ठेवावी वगैरे त्यांच्या जगात नसणाऱ्या बाबी मी त्यांना समजावू लागलो.
खरी कसोटी पुढे होती. मी आणि माझा सहशिक्षक आम्ही दोघेही त्यांना हळू हळू प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू लागलो.
पण ही मुलं काहीच प्रतिसाद देत नव्हती. ती नाव सांगत नव्हती की काही बोलत नव्हती. शाळेत बसले की दरवाजाकडे
तोंड करून बसतात. फळ्याकडे बघायाचंच नाही असं जणू त्यांनी ठरवूनच घेतलंय.
त्यांनी त्या दिवशी घातलेले कपडे अद्यापही धुतलेले नाहीत. त्यांच्या भावाने दिलेल्या दाखल्यावरून
मुलाचे नाव ठका, मुलीचे डाली आणि दुसरीचा दाखलाच नाही. बरं ह्याला काही विचारावे तर ह्याचा तंबाखूचा तोबरा.
आणि अगदी असहाय्य करणारा दर्प.
महिना झालाय चित्र बदलायचे नाव नाही. उलट परवातर या नव्या विद्यार्थिनीने वर्गातच सुसू केली.
माझ्या शिक्षणशास्राच्या दोन्ही डिग्र्या आणि बालमानसशास्राचे ज्ञान पार तोंडघाशी पडलेय.
त्यांच्या शेतमालकाच्या मुलांना काही प्रश्न विचारून समोर आलेल्या बाबी अशा -
त्यांना टीव्ही पाहायला आवडतो. ते मोबाइलची गाणीही आवडीने ऐकतात.
घरी भरपूर बोलतात, खेळतात.
मी माझा मोबाईल त्यांना देऊन पहिला. खरोखर त्यांची भिरभिरणारी नजर स्थिरावली.
मग लक्षात आलं इलेक्ट्रॉनिक ग्याझेटचा वापर करून आपण आपल्या अध्यापनात सुधारणा घडवू शकतो ज्याचा या सर्वच आदिवासी
मुलांना फायदा होईल. माझ्या कडे १००% आदिवासी ( ठाकर) मुलं आहेत. मग त्या दृष्टीने मी पष्टेपाडा , ता. शहापूर जि. ठाणे . कर्डेलवाडी शिरूर, जि. पुणे
अश्या तंत्रस्नेही शाळांना भेट देऊन माहिती मिळवली. आणि शाळेत उपयोगात आणता येणारी डिजिटल क्लासरूम
ही संकल्पना राबवायचे ठरवले आहे. त्यासाठी भरपूर खर्च आहे, शासन अशा उपक्रमांचे फक्त कौतुक करते मदत नाही.
मी माझा प्रयत्न करतोय मित्रांनो. तुमच्या सदिच्छा आणि मदतीची गरज आहे.
https://www.youtube.com/watch?v=bcvoY09Ejqg
हे काही व्हिडीओज आहेत मित्रांनो... तुम्हाला थोडीशी रुपरेषा स्पस्ट होईल.
स्वाती , तुम्ही दिलेली माहीती उपयुक्त आहेच.. त्याचाही मी विचार करतोय... आपण सर्व माझ्या बरोबर
आहात याचा मनस्वी आनंद आहे...
स्पर्श पटलाचे (touch screen)आकर्षण, ह्या नैसर्गिक भावनेचा अध्यापनात उपयोग करून त्या आधारे
विविध अध्ययन कौशल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश या डिजिटल क्लासचा आहे.
असेच काही प्रयोग वरील व्हिडीओजमध्ये पहावयास मिळतात. जे अगदी यशस्वी आहेत.
मी ज्या वस्तीत काम करतो तिथे १०० % आदिवासी ठाकर राहतात. ते अगदीच हेमलकसा सारखे नसले.
तरी त्यांची मानसिक जडणघडण, रहाणीमान, बौद्धिक स्तर आदी बाबी चिंताजनक आहेत.
त्यामुळे माझा हेतू फक्त या दोन मुलांपुरता मर्यादित नसून एकूणच शाळेतील सर्वांना नव्या तंत्राच्या आधारे
किमान अध्ययन पातळी पर्यंत नेण्याचा आहे. तुम्ही जो विश्वास दाखवलात त्या बद्दल मी खूप खूप आभारी आहे.
मला अनेकांनी फोन मेसेज करून मदतीचा हात पुढे केलाय ज्याचा आनंद तर होतोय पण प्रचंड दडपण सुद्धा आहे.
असो.
माझा विचार एक असे युनिट तयार करण्याचा आहे ज्या मध्ये विद्यार्थ्यांना एका सुसज्ज शाळेत असल्याचे समाधान मिळेल.
समाजातल्या कोणत्याही मुलांच्या गणवेश ,टाय- बुटाचे , त्यांच्या बोलण्या वागण्याचे दडपण या मुलांवर येऊन त्यांचा आत्मविश्वास डळमळणार नाही.
आणि मुख्य म्हणजे कृतीतून आणि ज्ञानरचनावादाधारे त्यांच्या अध्ययन क्षमता विकसित होतील.
त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा एवढाच प्रामाणिक हेतू आहे.
या साठी २ टप्प्यात काम करावे लागणार आहे.
१. तांत्रिक गरजा -
या प्रकल्पासाठी (प्रोजेक्ट) विद्यार्थी संख्येच्या इतके किंवा अर्धेतरी शैक्षणिक tablets. with HDMI PORT
किमान १ संगणक / laptop संच
इंटरनेट कनेक्टीव्हिटी,
स्पीकर सिस्टीम
INTERACTIVE बोर्ड / LCD प्रोजेक्टर / LCD डिस्प्ले १
डिस्प्ले शेअरिंग डिव्हाईस १
स्क्रीनिंग बोर्ड / पडदा
सोलरयुनीट बॅटरीबॅकप
----------------------
२. भौतिक गरजा -
यात खूप गोष्टी आहेत.
भिंतींची सजावट, १ पंखा , १ LED highmax,प्लास्टिक कार्पेट.
प्लास्टिक रूफिंग , पडदे, लाईट फिटिंग, चप्पल स्टेंड, इत्यादी इत्यादी...
वैयक्तिक बाबी...जसे , गणवेश, लेखन साहित्य, स्कूल bags,
साबण, नेपकिन आदीची व्यवस्था शासकीय तसेच स्थानिक पातळीवरून शक्य होत आहे.
म्हणून त्याची गरज नाही.
मला कोणीही पैसे द्यावेत असे अपेक्षित नसून यातली कुठलीही गोष्ट आपण देऊ शकता. जी नेण्याची व्यवस्था मी स्वतः करेन. अगदीच शक्य नसेल तरच आपण आपणास हवी ती रक्कम मुख्याध्यापक खात्यावर वर्ग करू शकता ज्याचा नंबर मी संपर्कातून देईलच. शिवाय वस्तू खरेदीचा तपशीलही आपणास मिळेल. आपण देऊ केलेल्या वस्तूवर आपले नाव असावे कारण नंतर तो मुद्दा विनाकारण त्रासाचा होतो.
एका सुसज्ज शाळेत वरील बाबी काटेकोरपणे असतात ज्यासाठी एका प्रकारे फी च्या माध्यमातून पालकच पैसे पुरवत असतात.
इथे परिस्थिती वेगळी असल्याने मी हे आवाहन करत आहे
- शाम
मो. ९४२०९५२५७३
शिक्षक दिनाच्या
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
तुम्ही दिलेले व्हिडिओज पाहिले. त्या ४ पैकी पहिल्या दोन लिंक्स उघडत नाहीयेत. चांगला उपक्रम आहे. फक्त सगळे शिक्षण ह्याच माध्यमातून होणे योग्य वाटत नाही. हाताने लिहिण्याची आणि प्रत्यक्ष पुस्तके वाचण्याची देखील कौशल्ये विकसित व्हायला हवीत. विशेषतः पहिली ते चौथी ह्या वयोगटात.
ह्या दृक्श्राव्य माध्यमाचा खूप सुजाणपणे उपयोग केला पाहिजे. म्हणजे जर आता हृदयाचे काम कसे चालते हे जर प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून कळणार असेल तर शिक्षकांनी केवळ हृद्य कसे काम करते एवढ्यावरच न थांबता मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि प्रश्न सोडवण्याच्या कौशल्याला चालना देणारे प्रश्न विचारले पाहिजेत.
उदा. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला म्हणजे नक्की काय झाले असेल? हा झटका कधी येऊ शकतो? जर एखाद्या माणसाला तुमच्या समोर झटका आला तर तुम्ही काय कराल?
माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या हृदयात फरक काय?
कुत्र्याचे हृद्य माणसाला बसवले तर काय होईल? बसवता येईल का?
हृदयाचे ठोके कसे मोजतात? BP चा आणि हृदयाचा काय संबंध असतो?
आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अशा प्रकारचे प्रश्न विचारून (किंवा हे प्रश्न मुलांना कसे पडतील असे पाहून) त्यांना पुस्तकातल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष आयुष्यातील गोष्टीशी कसा संबंध असतो हे शिकवता येईल.
आपल्याकडे शिक्षण म्हणजे नुसतं mugging up असतं कारण खडू फळा पद्धतीत शिक्षकांना इतकं दमायला होतं बोलून लिहून की फक्त माहिती प्रदान करणे ह्या पलीकडे शिक्षक इच्छा असून जाऊ शकत नाहीत. आता ह्या माध्यमाची मदत मिळाल्यामुळे रट्टा मारणे ह्या पासून सुटका होऊन अधिक वेळ हा समजून घेणे आणि त्यापुढे जाऊन प्रश्न विचारणे आणि उत्तरे शोधणे ह्यात घालवता येईल.
@जिज्ञासा >> तुम्हाला
@जिज्ञासा >> तुम्हाला समस्याही माहीत आहे आणि त्यावर उपायही. तुमच्या पोस्टच्या उत्तरार्धात खूप महत्वाच्या
गोष्टी तुम्ही नमूद केल्यात. धन्यवाद!!
सगळे शिक्षण ह्याच माध्यमातून होणे योग्य वाटत नाही.>> नक्कीच.. आणि तसे शक्यही नाही.
तंत्रज्ञानाचा वापर होत नाही असे एकही क्षेत्र आहे काय? आपण रोजच्या व्यवहारात कितीतरी प्रकारे
तंत्रज्ञानाचा वापर करतो. तेच शिक्षाणातही वापरायचे आहे.. बस्स!
आणि संपुर्ण वाचल्यास सगळे उद्देश नजरे समोर येतातच की, फक्त प्रश्न तंत्रज्ञानाचा नसून बदलत्या
सुविधांचाही आहे. तसे तर एक झाड आणि एक फळाही पुरेसा आहे शिक्षणासाठी..
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/education/in-maharashtras-first-digital...
ही बातमी बाचून हा धागा आठवला.
Pages