' सांजवेळ '
संध्याकाळचे सहा, मोबाईल वर वेळ पाहिली. नुकतीच पडून गेलेली पावसाची एक सर, समोर दिसणारा एकाकी ओला रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हलणारी हिरवीगार झाड, हवेतील बोचरा गारवा .. एकूणच काय एकदम रोमॅंटिक वातावरण आणि कानावर पड़णाऱ्यागाण्याच्या ओळी, 'इशारो इशारो में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा कहा से '..
आणि अशा या मस्त माहोल मधे मी मात्र गाडीत बसून वाट पहात होते त्याची. खिड़कीची काच खाली करुन त्यावर रेलून ठेवलेला हात आणि त्यावर विसावलेली माझी मान ..बहुदा थोड्या मोठ्या आवाजातच चालू होत ते गाण आणि समोर दिसत होता मला 'कश्मीर की कली' चा गाण्यातला तो सीन..
इतक्यात बाजूने एक आजी आजोबा थोड़े सावकाश चालत गेले. थोड़ पुढे गेल्यावर जरा थांबले व परत मागे जावून जरासे घुटमळले. मी साइड मिरर मधे पाहिलं तर एकमेकांशी काही बोलत होते. काही अंदाज आला नाही व राहवल पण नाही, म्हणून मी विचारल, 'आजोबा काय झालं'?आजोबांना बहुदा माझा प्रश्न थोडा अनपेक्षित होता. ते म्हणाले 'काही नाही,काही नाही '.त्या दोघांची उडालेली ती गड़बड़ आणि तो संकोच मला खूप काहीतरी सांगत होता पण नक्की काय ते समजत नव्हतं. मी परत विचारल, 'काही हरवलय का ?' माझ्या या प्रश्नाने ते दोघं जरा अजूनच गड़बडले.
मग माझा प्रश्नाचा मोर्चा मी आजींकड़े वळवला. काठापदराची नीटनेटकी साडी, गळ्यांत मंगळसुत्राबरोबर घातलेली मोत्यांची माळ, कानातील मोत्यांच्या कुड्या आणि डोक्यात माळलेला जुईचा गजरा, हे सर्व क्षणार्धात टीपून मी विचारल ' काय झाल आजी ?' आता मात्र आजी एकदम हसल्या आणि मी मात्र गड़बडले..
तेवढ्यात आजी म्हणाल्या 'अग दिसायला माझ्या नाती एवढी नाहीस, थोड़ी मोठी आहेस पण नातीसारखीच आहेस, सांगते.’ त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता जणू त्याला वाहण्याकरतां एक रस्ता हवा होता...
आजोबा म्हणाले 'काही नाही, काही नाही, वेळ जात नाही हिचा बाकी काय ', त्यांच वाक्य तोडत आजी म्हणाल्या 'तुम्ही थांबा हो, मला बोलू दे. सांगू दे ना , काय हरकत आहे.' त्यांचा हा गोड संवाद ऐकून माझी उत्सुकता अजुनच वाढली.
'अग तू जे गाण ऐकत आहेस ना, ते आम्ही कॉलेज मधे असतांना एकत्र म्हटल होत ट्रिपला गेलो होतो ना तेव्हा ' आजींनी असं म्हणताच त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरही मला लाजून चढलेला गुलाबी रंग स्पष्ट दिसू लागला आणि आजोबांचा चेहरा जरा अजूनच गोंधळला.
सहज चौकशी करता करता आजीं आजोबांच्या अचानक समोर आलेल्या त्या रोमॅंटिक आठवणीने मला एक सुखद धक्काच मिळाला.
आजी एकदमच आठवणीत रमल्या,'अग तेव्हा आजच्यासारख नव्हतं, त्यामुळे अशाच आठवणी असतं ग मनाजवळच्या .. काय म्हणतात ना अगदी SPECIAL तशा.
मी एकदम बोलूंन गेले 'HOW SWEET' मग मात्र आजोबा एकदम सहजपणे बोलून गेले 'तुझ्या या गाण्याने क्षणांत मागे जाऊन पोचलो आम्ही.अग काय हरवलंय विचारत होतीस ना, बहुतेक या आठवणीच हरवल्या होत्या’ मी म्हणाले 'आजोबा आता या आठवणीत तुमची संध्याकाळ छान जाईल'.
आजोबा एकदम हळवे झाले, 'हो ग, खरं आहे. चल आता येतो आम्ही, उशीर झालाय, अंधार पड़ायच्या आधी घरी जायला हव.' आणि माझा निरोप घेऊन ते दोघे जाऊ लागले.
गाडीतील ते गाण केव्हाच् संपल होत आणि त्या गाण्यातील शम्मीकपूर आणि शर्मीला समोर जात होते ....
कविताजी, एकाच लेखाचे दोन धागे
कविताजी,
एकाच लेखाचे दोन धागे तयार झालेत!