जरा विश्राम घ्यावा

Submitted by निशिकांत on 25 August, 2015 - 02:45

जाहले जगणे जरा विश्राम घ्यावा
पिंजर्‍यातिल प्राणपक्षी भुर्र उडावा

कालचे निर्णय जरा बदलूत आपण
तत्व सोडुन भावनांना भाव द्यावा

तळमळे घायाळ सावज आर्ततेने
पारध्याला पण कसा अंदाज यावा?

एक क्षण आलीस अन् गेलीस का तू?
रेशमी गुंता कसा मी सोडवावा?

हासर्‍या जखमात धुंदी ज्यास मिळते
तोच आनंदी खरा उन्मुक्त रावा

आतली खदखद कधी दिसली न कोणा
चेहर्‍याला, हासरा केला गिलावा

मंदिरेही बांधली अन् मस्जिदीही
देव, अल्ला पण तिथे केंव्हा दिसावा?

कामगारांचे लढेही थंड झाले
चळवळीने वृक्ष मोठा उन्मळावा

कोंडमारा का असा "निशिकांत" होतो?
गारदी अपुल्यामधे का सापडावा?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users