निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

Submitted by मार्गी on 17 August, 2015 - 00:49

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

१. ढगफुटी तर केदारनाथला झाली, मग पिथौरागढला जाऊन काय करशील?
२. आता तर सर्व लोकांना वाचवलं‌ गेलं आहे, रिलिफ काम संपलं आहे, आता तिथे जाऊन काय करशील?
३. महापूर तर उत्तरांचलमध्ये आला होता, मग उत्तराखंडला का जातो आहेस?

हे प्रश्न देशाबद्दल व देशातील परिस्थितीबद्दल आपल्या मनामध्ये असलेलं‌ घोर अज्ञान दर्शवतात. आपण किती उथळ विचार करतो हे दर्शवतात. निघताना हे प्रश्न विचारले गेल्यावर जितक्या अज्ञानाची जाणीव झाली; तितकंच अज्ञान मलासुद्धा आहे, ही जाणीव प्रत्यक्ष परिस्थिती बघताना झाली... इतकी परिस्थिती वेगळी होती!

... अनेक संस्था आणि माध्यमांमधून चौकशी केल्यानंतर पुण्यातल्या मैत्री संस्थेकडून उत्तराखंड मदत कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सर्वप्रथम मैत्री संस्था व सर्व सदस्यांना मन:पूर्वक नमन करतो. मैत्री असं माध्यम बनली ज्याद्वारे आपदाग्रस्त लोकांपर्यंत पोहचता आलं आणि थोडी सोबत देता आली. मैत्री संस्था उत्तराखंडच्या महापूरामध्ये लगेचच सक्रिय झाली आणि आजपर्यंत ती तिथे कार्यरत आहे. भुज भूकंप २००१, त्सुनामी २००४, लेह फ्लॅश फ्लड २००९ आणि नंतर नेपाळमधील भूकंप अशा प्रत्येक वेळेस मैत्री संस्थेने मदत आणि पुनर्निर्मिती कामामध्ये सहभाग घेतला आहे.

.... २६ जुलै २०१३ ला पुण्यातून पाच सदस्यांची टीम निघाली. आणखी एक सदस्य व टीम लीडर दिल्लीमध्ये जॉईन होणार आहेत. अशा प्रसंगी जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा अनोळखी असूनही "मैत्री" होऊन जाते! वेगवेगळे व्यवसाय आणि सामाजिक बॅकग्राउंडमधून एकत्र आलेले ते पाच जण- ज्यांमध्ये दोन डॉक्टरही आहेत- दुस-या दिवशी दिल्लीला पोहचेपर्यंत चांगले मित्र बनले. एकमेकांना अनुभव शेअर केले. सगळं सामान मिळून नेलं. दिल्लीमध्ये अजून दोन जण जॉईन झाले आणि पुढचा प्रवास सुरू झाला काठगोदामच्या दिशेने.

दिल्ली ते काठगोदाम रेल्वे प्रवासातले एक सोबती हल्द्वानीचे होते. ते मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि चार महिन्यानंतर स्वदेशी आले होते व घरी जात होते. त्यांना आपत्तीबद्दल विशेष माहिती नव्हती, पण तरी ते काळजीत होते. महाराष्ट्रातून मदतीसाठी आलेल्या गटाला बघून त्यांना आश्चर्य वाटलं. मीसुद्धा मदत करतो, असं ते म्हणाले. पुढेही हाच अनुभव वारंवार येणार होता. जेव्हा प्रवासाच्या आधी तयारीसाठी काही सामान विकत घेतलं जात होतं, तेव्हा अनेक वेळेस ते नि:शुल्क मिळालं. जसं दुकानदाराला कळायचं हे सामान उत्तराखंड मदत सामान म्हणून जाणार आहे, तेव्हा ते त्याचे पैसे घ्यायचे नाहीत... प्रवासामध्येच कळालं की, पिथौरागढ़ जिल्ह्यातल्या अस्कोट व धारचुला गावांच्या परिसरात काम करायचं आहे. २७ जुलैला रात्री उशीरा काठगोदामला पोहचलो. तिथून लगेचच पुढे जायचं असं ठरलं. काठगोदाममध्ये आकाश बिलकुल निरभ्र आहे. ढग नसलेलं आकाश ता-यांनी उजळून निघालं‌ आहे.

काठगोदाम रेल्वेचं‌ शेवटचं स्टेशन आहे. इथून पुढे पहाड सुरू होतो. झुलाघाटचे राहणारे ड्रायव्हर आले. जीप तयार आहे. सर्व हॉटेल्स बंद असल्याने जेवणासाठी हल्द्वानीला जावं लागलं. जे मिळेल ते खाऊन घेतलं. निघायला रात्रीचे बारा वाजून गेले आहेत. लगेचच पुढे जायला निघालो. पिथौरागढ़ लवकर पोहचावं व काम लगेच सुरू करावं हा प्रयत्न होता. रात्री पहाडातल्या रस्त्यांवर सामान्यत: फार वाहतुक नसते. पण काही लोक गाड्या चालवतात. सात जण आणि भरपूर सामान आहे. डॉक्टरांच्या शिबिरांसाठी बरेच औषधांचे बॉक्स आहेत. आमचे चालक साहसी व सराईत आहेत. त्यांनी जोराने जीप पळवायला सुरुवात केली. काठगोदामनंतर लगेचच पर्वत सुरू आणि मग सतत वळणा- वळणाचा रस्ता व घाट! दोन पावलं म्हणजे दोन चाकं सुद्धा गाडी सरळ जात नाही. हे महाशय वेगामध्ये पळवत आहेत. अंधार आणि थकवा असूनही जीप किती वेगाने जात आहे, हे जाणवत आहे. रस्त्याने दुसरं वाहन खूप वेळाने दिसत आहेत. एक तासानंतर काही ट्रक थांबलेले दिसले. एक गृहस्थ ट्रक रस्त्यामध्ये लावूनच आराम करत आहेत. त्यांना थोडं समजावून बाजूला केलं.

जीप निघाल्यापासूनच पोटामध्ये उलथापालथ सुरू आहे. जर हा प्रवास कमी गतीने असता, तर शरीराला जुळवून घ्यायला वेळ मिळाला असता. पण वळणा वळणांचा रस्ता व वेगाने प्रवास. हळु हळु शरीरात प्रतिक्रिया आली. उलटी येण्याची सुरुवात! थोड वेळ नियंत्रण केलं; पण मग शरीरानेच निर्णय घेतला. एकामागोमाग एक लोकांच्या उलट्या सुरू झाल्या. उलटी अशी गोष्ट आहे; जी दाबून टाकायला नको. कारण ती समस्या नसून समाधान आहे. शरीर त्या स्थितीमध्ये संतुलन करत आहे. त्यामुळे जर शरीराचा इशारा असेल, तर तो टाळायला नको. अनुकूलन होण्याचा हासुद्धा एक टप्पा आहे. शरीर अशा रस्त्यांशी व अशा प्रवासासाठी स्वत:ला जुळवून घेत आहे. असो; सर्व जेवण उलटीमध्ये वाहून गेलं! सातपैकी केवळ तीन जण त्यातून वाचले! शरीरासमोर खडतर परिस्थिती सुरू झाली! आता प्रत्येकाच्या फिटनेस लेव्हलची चाचणी होण्यास सुरुवात झाली. टीम लीडर सरांनी सांगितलंच आहे की, हा जीप प्रवाससुद्धा एक ट्रेकच आहे.

रात्री जीपचा मार्ग- काठगोदाम- भीमताल- शहर फाटक- दन्या- घाट- गुरना- पिथौरागढ़- त्या रस्त्यावर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दिवसा हिमालयातील अनेक बर्फाच्छादित शिखर स्पष्ट दिसतात. रात्रीसुद्धा अशा जागा ओळखू आल्या जिथून दिवसा बर्फाच्छादित शिखर दिसतात..

प्रवास अधिकाधिक कष्टप्रद होत जातोय. झोप लागण्याची शक्यताही नाही. अजिबात स्थिरताच नाहीय. खूप उशीरा शरीराने थोडं जुळवून घेतलं आणि झोप नाही; पण डुलकी आली. पण जसे ब्रेक्स दाबले जात आहेत, शरीर एका झटक्यात जागं होतं आहे. समोर रस्त्यावर ढग आलेले दिसत आहेत आणि चालक महाशय रेसमध्ये भाग घेतल्यासारखे जात आहेत. वाटेत रस्ता मध्ये मध्ये कच्चा आहे आणि त्याची थोडी मोडतोडसुद्धा झालेली आहे. पावसाळ्यानंतरही ह्या रस्त्यावर वाहतुक फार थोडी असते. कारण ह्या मार्गावर कोणतंही मोठं शहर लागत नाही. अल्मोडा शहरापासून थोड्या अंतरावरून जाणारा हा रस्ता सुनसानच असतो. मग पुढे जाऊन तो घाटमध्ये टनकपूर- पिथौरागढ़ मार्गाला मिळतो.

पहाटे चार वाजता दन्या आलं. इथे काही हॉटेल्स सुरू आहेत आणि चहासुद्धा मिळेल. वाटलं की, आता काही उलटी होणार नाही. तेव्हा चहा पिण्याचं साहस केलं. पण जसं पुढे निघालो; चहानेसुद्धा उडी मारली! थोडाही चहा लाभला नाही! आत्तापर्यंत उलट्यांच्या पिचका-यांनी जीपच्या दारांना रंगीबेरंगी केलं आहे! पण चालक अजिबात नाराज नाही झाले. सहजपणे ते म्हणाले काही हरकत नाही, मला गाडी धुवायचीच आहे. पहाडी मनुष्याच्या सरलतेचा हा आलेला फक्त पहिला अनुभव! जशी पूर्व दिशा उजळू लागली, तसा नजारा दिसू लागला... चारही बाजूंना उंचच उंच पहाड आणि तळातून वाहणारी रामगंगा! इथे आधीसुद्धा आलेलो असल्यामुळे परिसर ओळखीचा आहे. घाट, गूरना आणि मग पिथौरागढ़. इथे थोडा वेळ थांबलो. जीप इथपर्यंतच होती. दुसरी जीप आल्यानंतर अस्कोटसाठी निघालो. इथून हिवाळ्यामध्ये बर्फाच्छादित पर्वत खूप छान दिसतात. पण आत्ता दाट ढगांनी निराश केलं. पिथौरागढ़मध्ये काही खायची तर नाहीच; पण चहा पिण्याचीही इच्छा झाली नाही.

पण पुढे टीम लीडर सरांनी सांगितलं की, उलटी आली तरी चालेल, पण खाऊन घ्या. पुढे अस्कोटच्या बेस कँपमध्ये काही खायला मिळेल किंवा नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे वाटेत एका ठिकाणी पराठे खाल्ले. अस्कोट पिथौरागढ़पासून सुमारे पन्नास किलोमीटर दूर आहे. पण पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था खराब असते, त्यामुळे पोहचायला दोन तास लागले. रस्त्यामध्ये आयटीबीपी अर्थात्‌ इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसचे अनेक केंद्र लागतात. रस्त्याची स्थिती दारुण आहे. पिथौरागढ़पासून बीआरओ अर्थात्‌ बॉर्डर रोडस ऑर्गनायजेशनची हिरक परियोजना सुरू होते! इथून पुढचा प्रवास बीआरओ व सेनेच्या अन्य विभागांसोबतच होतो...


प्रकृतीच्या कुशीत...

अस्कोटच्या सुमारे पाच किलोमीटर आधी उजवीकडे एक बोर्ड दिसला- अर्पण संस्था (Association for Rural Planning and Action). ही हेल्पिया गिरीग्रामात असलेली एक ग्रास रूटवर काम करणारी संस्था आहे. इथेच बेस कँप असणार आहे. हेच मुख्य केंद्र असेल. इथूनच पुढचं काम सुरू करायचं आहे. अत्यंत रमणीय अशा परिसरात गेल्या गेल्या थकवा कमी होत गेला. पर्वतांमधली शांती आणि आनंद! इथे काही मित्रांच्या मोबाईल नेटवर्कमध्ये नेपाळ आलं! हो, येणारच कारण, हा भाग नेपाळला लागूनच तर आहे!


हेल्पियाच्या अर्पण संस्थेच्या परिसरातून दिसणारा नजारा

बेस कँपमध्ये थोडा वेळ आराम करून संध्याकाळी वॉर्म अप ट्रेकसाठी एका मंदीरापर्यंत गेलो. पायवाट अगदी सामान्य होती. इथे सरांनी खूप माहिती दिली. पुढची योजना सांगितली. येताना पाऊस सुरू झाला. एका गटात असल्याचा फायदा झाला. छत्री नसलेल्यांना छत्री मिळाली. अंधारात बॅटरी मिळाली. पोंचूमुळे सरांची बॅग भिजण्यापासून वाचली. गटामध्ये काम करताना शक्ती कशी वाढते, ह्याचा अनुभव इथून पुढे सतत येणार आहे. दुस-या दिवशी म्हणजे २९ जुलैला काम सुरू होणार ह्या विचारांमध्ये आणि अर्पणच्या दिदींसोबत ओळख करून घेण्यामध्ये संध्याकाळ गेली.

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net; maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन वाचले नाही. वाचतेय.

तुम्ही तुमची ओळख करुन दिलीत तर बरे होईल :). अर्थात व्यक्तिगत माहिती न देता जितकी जमेल तितकी.

तुमचे लिखाण वाचताना तुम्हाला असे वारंवार मदतकार्याला जाणे कसे जमते हा प्रश्न मनात येत राहतो.

इथे आम्ही मदतकार्य करायचे ठरवले तर ऑफिसमध्ये सुट्टी मिळणार का हा प्रश्न आधी येतो. सुट्टी मिळणार नसते कारण मिळणारी सुट्टी आम्हाला आमच्या हॉलिडे स्पेशल सुट्टीसाठी राखुन ठेवायची असते. त्यानंतर घरचे आमच्या अनुपस्थितीत काय करतील हा दुसरा प्रश्न. ऑफिसने कामानिमित्त बाहेर पाठवले तर घरचे बरोबर अ‍ॅडजस्ट करतात पण असल्या मदतकार्याला बाहेर पडायचे म्हटले की आधी घरच्या भाक-या, मग लष्कराच्या भाक-या भाजायच्या :).. आपला वेळ देऊन समाजकार्य करायचे म्हटले की असे बरेच प्रश्न उपस्थित होतात जे केवळ आपल्याला ते काम करायची मनापासुन तळमळ नसते म्हणुन उपस्थित होतात.

तुम्ही या प्रश्नांची कशी तड लावता हे वाचायला आवडेल. यावर याआधी लिहिले असेल तर मात्र माफ करा, मी शोधुन वाचेन.

प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

@ साधना जी, मी स्वतंत्र कन्सल्टंट- ट्रान्सलेटर म्हणून काम करतो. त्यामुळे वेळ काढू शकतो. वर्षातून पंधरा दिवस किंवा एक महिना काढणे नगण्य आहे. आणि आपल्याकडे जर दहा गोष्टी करायची इच्छा असेल तर आपोआप नव्वद गोष्टी दूर राहतात. आपण सर्वच जण जे मनापासून करायला आवडतं ते करतच असतो ना. तेव्हा सहज शक्य आहे. लोक तर अजून किती जास्त गोष्टी करतात!

फार छान लिहिता तुम्ही.
दरवेळी प्रतिसाद दिला नाही तरी वाचत असतो.
तुमचे लदाख सायकल स्वारी आणि काश्मिर कार्यावरचे लेखही खुप आवडले आहेत.

तुमच्या लेखाची वाटतच पाहत असतो...

प्रत्येक लिखाण वाचताना अचंबित व्हायला होतं.. सो युनिक !!!>>>>+१००

अतिशय मनापासून, तळमळीने केलेले हे समाजकार्य खूपच भावते आहे - ग्रेट....