२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०
आरोग्य शिबिरामध्ये सहभाग आणि अन्य कार्य
१४ ऑक्टोबरच्या सकाळी दादाजींसोबत बरीच चर्चा झाली. कालच्या अनुभवानंतर अनेक प्रश्न मनात आहेत ज्यांच्यावर आता बोलायचं आहे. पहिले दादाजींना गावात आलेला अनुभव सविस्तर सांगितला. दादाजींनी काळजीपूर्वक ऐकलं आणि मग उत्तर दिलं. ते म्हणाले की, सेवा भारतीचे कार्यकर्ते खूप टेस्टेड आहेत; परिपक्व आहेत. मदतकार्याच्या सुरुवातीलाच त्यांना मोठ्या संस्थांकडून ऑफर देऊनही ते सेवा भारतीसोबतच थांबले. म्हणून त्यांनी ज्या लोकांना लाईटस आणि ब्लँकेटस दिले; त्यांना विचार करूनच दिले असणार. त्यांनी पुढे सांगितलं की, नुकसान झालेल्या गावांमधल्या कुटुंबांना लाईटस आणि ब्लँकेटस मिळाले, ही गोष्ट आपण बघावी. ह्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तसंच त्यांनी असंही म्हंटलं की, ९०% कामाची खात्री देता येते; पण थोडं १०% काम इकडचं तिकडे होणार आणि ते स्वाभाविक आहे. जर ९९ लोकांना मदत मिळाली आणि एखाद्या व्यक्तीला नाही मिळाली, तर ती एकटी व्यक्तीच जास्त आवाज करते. म्हणून ह्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. कश्मीरमध्ये पुरानंतरच्या परिस्थितीत लोकांपर्यंत मदत पोहचवणं इतकं सोपंसुद्धा नाही. मग त्यांना कंपनीच्या भुमिकेबद्दल विचारलं. ते म्हणाले की, हे पाहा, माझ्यामते त्या कंपनीचा हा युवा कार्यकर्ता आपल्या सोबत आला आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. इथे फॉगिंग करणारं कोणी नव्हतं; तो इंजिनिअर आहे आणि फॉगिंग करू शकतो; आता कंपनी काही मार्केटिंग करणार असेल तर करू द्या. शेवटी इथे सगळे लोक आपापलं मार्केटिंगच करत नाही आहेत का. त्यांचं सांगणं पटलं.
नंतर पवनजींनी फॉगिंग करून दाखवलं. स्प्रेइंगसारखंच पणा एका वेगळ्या यंत्राद्वारे त्यांनी केलं. त्याचा डेमोसुद्धा दाखवला. कंपनीच्या ड्युटीवर असूनही ते सेवा भारतीच्या कामात सहभागी आहेत. सकाळी सुरेंद्रजींसोबत बसून व्हिडिओ मिक्सिंगचंही काम चालू होतं. त्यांनी व्हिडिओ चांगला बनवला आहे. फोटोजचे कॅप्शन्सही झाले आहेत. लवकरच ते पूर्ण होईल. माझं प्रपोझल्सचं काम अजून बाकी आहे; काल रात्री उशीर झाल्यामुळे ते राहून गेलं. आज वेळ मिळेल तेव्हा ते करेन. डॉ. देसाई सरांसोबत सकाळच्या शिबिरासाठी औषधांचे काही सेट बनवले. दुपारच्या गावातल्या शिबिराबद्दल अजून काही ठरलेलं नाही. फयाज़ भाई सांगतीलच.
आश्रमातलं शिबिर चांगलं झालं. आज कोणी कार्यकर्ता नसूनही डॉक्टर सर आणि तिथल्या लोकांच्या मदतीने सुरळीत झालं. आज सुमारे ७७ रुग्ण आले. अनेक गोष्टी बघता आल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्या आश्रमाच्या परिसरात काम करणारे लोकच पहिले आले. ते रोजच चेक अप करून घेतात. त्यांचा हा बालिशपणा बघून हसूच आलं. ते रुग्ण नाहीत; पण आरोग्य तपासणी सुरू होताना बरोबर त्यांना वेदना सुरू होतात! ते रुग्ण नाहीत; पण ही मानसिकता नक्कीच थोडी रुग्ण आहे. गावामध्येसुद्धा हेच व्हायचं. लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी फार उतावीळ व्हायचे. ही पावडर द्या, ओआरएस द्या किंवा बँडेड द्या किंवा मग ते लाईटससुद्धा. लाईटसची किंमत दोन हजार रूपये होती. आणि लोकांच्या घरांना घराऐवजी बंगले म्हणणं जास्त बरोबर होतं. इतके संपन्न असूनही ते मुलांसारखे उतावीळ होत होते. हे एक घेण्याच्या मानसिकतेतून तयार झालेल्या खूप जुन्या रोगाचं लक्षण आहे. त्याची अनेक कारणंही असावीत.
शिबिरामध्ये बँडेड, मास्क, मलम, टॉनिक इत्यादी वस्तुही थोड्या ठेवल्या आहेत. लोकांना त्याही हव्यात. एकाच वेळी अनेक मास्कस हवेत. काही गरज असेलच; पण आवश्यकतापेक्षा जास्तच मागत आहेत. आणि त्यांना नाही म्हंटलं तर नाराज होतात. मग त्यांना सांगावं लागतं की, अन्य ठिकाणांसाठीच्या शिबिरांमध्येपण हे लागणार आहे. तरीही ते असं बघतात की ह्या गोष्टी घेण्याचा त्यांचा अधिकारच आहे. मग डॉ. सर आदी शांत सुरात त्यांना समजवतात की, ही औषधं लोकांच्या डोनेशन्समधून आली आहेत; त्यामुळे जे आहे त्यातच भागवावं लागणार आहे.
दुपारपर्यंत गावाच्या शिबिराबद्दल फयाज़ भाई व अन्य कोणी काही कळवलं नाही, म्हणून परत कार्यालयात आलो. दुपारी औषधांचे सेटस बनवण्याचं काम डॉ. सरांसोबत केलं. प्रथमोपचाराचे बॉक्स बनवले ज्यामध्ये ओआरएस, कात्री, ऑइंटमेंट, क्लोरिन टॅबलेटस, बँडेड, कॉटन, बीपी एपरॅटस, वेदनेच मलम इत्यादी वस्तु आहेत. डॉ. सरांनी सांगितलं की, अनेक महाग इंजेक्शन्ससुद्धा इथे आहेत ज्यांचा शिबिरामध्ये उपयोग नाही. ती मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये द्यावी लागतील. काही औषधांच्या एक्स्पायरी डेटससुद्धा लवकर येत आहेत. डॉक्टर सर गूँज संस्थेच्या एका केंद्रात जाऊनही काही औषधं घेऊन आले. दुपारी औषधांना ऑर्गनाईझ करत गेलो. आता संध्याकाळचं शिबिर होणार नाही. काही अडचण आहे, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. एक अडचण हीसुद्धा आहे की, एम्ब्युलन्स चालवणं जरी अनेक कार्यकर्त्यांना येत असलं तरी लायसन्स फक्त हिलालभाईंकडेच आहे. आणि त्यांचे वडील काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत.
दुपारी दादाजी, फयाज़ भाई आणि जावेदजींसोबत चर्चा झाली. हे जावेदजी सेवा भारतीचे जुने कार्यकर्ते आहेत आणि टंगमर्गचे आहेत. त्यांची एक एनजीओसुद्धा आहे- नई किरन. ते एमएसडब्ल्यू करत आहेत आणि सेवा भारतीचे जुने कार्यकर्ते आहेत. गाणंही मस्त गातात. त्यांच्या एनजीओला वूलर लेक स्वच्छ करायचं आहे. हा दल लेकप्रमाणेच एक मोठा तलाव आहे व गेल्या काही वर्षांमध्ये वस्ती आणि बांधकामामुळे त्यावर अतिक्रमण झालं आहे. पूर येण्याच्या काही कारणांपैकी अनेक कारण पाण्याच्या जागेवर केलेल्या बांधकामाशीसुद्धा संबंधित आहेत.
चर्चेत अनेक गोष्टी ठरल्या. उद्या दादाजी बहुतेक जम्मूला जातील. आता रिलिफ कामाचा मुख्य टप्पा संपला आहे. हळु हळु कार्यकर्तेही परत जात आहेत. म्हणून त्यांनी काही गोष्टी फयाज़भाई आणि जावेदभाईंना सांगितल्या. श्रीनगरच्या आरोग्य विभागाला मदतकार्याचा रिपोर्ट द्यायचा आहे. इन्जेक्शन्स एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला द्यायचे आहेत. पुढच्या सहा महिन्यांसाठी एम्ब्युलन्ससोबत काम करणारे कोणी डॉक्टर यावेत, असा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी राहण्याच्या व्यवस्थेसाठी एक अर्ज प्रशासनाकडे द्यायचा आहे. कारण जास्त वेळ राहणार असतील तर डॉक्टरांना चांगली सुविधा लागेल. लाल चौकात एक यात्री निवास आहे; तिथेसुद्धा मदत सामग्रीचा एक सेट द्यायचा आहे. ही कामं येणा-या काही दिवसांमध्ये करायची आहेत.
संध्याकाळचा वेळ हा अर्ज लिहिण्यात आणि प्रपोझल्सवर काम करण्यात गेला. आज दुपारी पवनजींनी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये फॉगिंग केलं. तिथेसुद्धा अधिका-यांनी त्यांना खूप कामाला लावलं आणि अनेक जागी फॉगिंगला पाठवलं. संध्याकाळी एक डिएसपी सेवा भारती कार्यालयात आले. दादाजींचे ते मित्रच आहेत. त्यांनी औषधांचे सेटससुद्धा बघितले. सेवा भारतीच्या कार्यालयाचे घर मालक निवृत्त पोलिस अधिकारी मिर्जाजीसुद्धा थोड्या वेळ येऊन भेटले. कार्यालयाला लागून असलेल्या रूम्समध्ये राहणारे अंकलही आज भेटले. त्यांच्याच खालच्या खोल्यांमध्ये औषधं ठेवली आहेत.
आता हळु हळू मदतकार्याचा मुख्य भाग संपत आहे. उद्या दादाजी, वर्माजी, चाचूजी आणि सुरेंद्रजी परत जातील. आजचं रात्रीचं जेवण पवनजींनी बनवलं आहे. एकदम चविष्ट बनवलं आहे! त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे; पण कौशल्यांची कमतरता अजिबात नाही. डॉ. सरांसोबतही बोलणं होत आहे. ते गोव्याचे आहेत. आधी डॉ. प्रथमेश कर्पे गोव्याहून आले होते. देसाई सर गोव्याच्या एका भागामध्ये रोटरी क्लबचे प्रमुख आहेत आणि येण्याआधी त्यांनी ह्या कामासाठी बरेच पैसेही उभे केले होते. आता ते इथे दहा दिवस काम करणार आहेत.
श्रीनगरमध्ये एफएम रेडिओ छान चालतो. आकाशवाणीच्या बातम्याही चांगल्या ऐकू येतात. रात्री सुफी संगीतही वाजतं. मोबाईल नेटवर्क ठीक आहे. डेटा नेटवर्क मात्र श्रीनगरच्या काहीच ठिकाणी मिळतं. बाकी बघितलं तर रिलिफ कामाचं ठिकाण म्हणून राहण्याच्या व खाण्याच्या सोयी फारच चांगल्या आहेत. आता रिलिफ कामामधल्या सहभागाचे आणखी चार दिवस शिल्लक आहेत.
रुग्ण सेवा करताना डॉ. देसाई सर
तिथून जवळच असलेला श्रीनगरमधला प्रसिद्ध लाल चौक
पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १२
मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १०
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ११
चांगला आहे हा भाग सुद्धा
चांगला आहे हा भाग सुद्धा
तसंच त्यांनी असंही म्हंटलं
तसंच त्यांनी असंही म्हंटलं की, ९०% कामाची खात्री देता येते; पण थोडं १०% काम इकडचं तिकडे होणार आणि ते स्वाभाविक आहे. जर ९९ लोकांना मदत मिळाली आणि एखाद्या व्यक्तीला नाही मिळाली, तर ती एकटी व्यक्तीच जास्त आवाज करते. म्हणून ह्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. >>>>> दादाजी चांगलेच अनुभवसमृद्ध आहेत हां ....
अप्रतिम लेखमाला ...