जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०

Submitted by मार्गी on 8 August, 2015 - 05:52

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९

श्रीनगर आणि गंगीपोरामध्ये आरोग्य शिबिर

१३ ऑक्टोबरची सकाळ. आज डॉ. प्रज्ञा दिदी आणि डॉ. अर्पितजी परत जातील. त्यांच्या जागी काल गोव्यावरून डॉ. देसाईजी आलेले आहेत. काल डॉ. प्रज्ञा दिदी आणि अर्पितजींनी औषधांचे अनेक सेट बनवले आहेत. काल संध्याकाळी त्यांनी तेच काम केलं. आज सकाळी ते शंकराचार्य मंदीर बघायला गेले; पण गाडीमध्ये स्पार्क झाल्यामुळे त्यांना परत यावं लागलं. आता ते एअरपोर्टला जायला निघतील. त्यामुळे आता एकच डॉक्टर असतील आणि त्यांच्यासोबत फार्मसिस्टसुद्धा नसतील. फार्मसिस्ट चेतनजीसुद्धा आजच निघत आहेत. त्यामुळे आता मलाही आरोग्य शिबिरांवर जावं लागेल. आत्तापर्यंत काही औषधांचे बॉक्स लावण्याव्यतिरिक्त आणि त्यांना एम्ब्युलन्समध्ये नेऊन ठेवण्याव्यतिरिक्त माझा त्यात काहीच सहभाग नाही. आता उरलेल्या दिवसांमध्ये हेच काम मुख्य असेल.

सकाळी सुरेंद्रजींसोबत बसून फोटोजना कॅप्शन देण्याविषयी चर्चा झाली. व्हिडिओचा ड्राफ्ट त्यांनी बनवलेला आहे; त्याला अजून चांगलं करायचं आहे. फोटोचे कॅप्शन्स दादाजी आणि सुरेंद्रजी ठरवत आहेत. आजच्या शिबिरांसाठी औषधांचे सेट तयार आहेत; तरीही अजून सेट बनवावे लागतील. काल गोव्यावरून जसे डॉ. देसाई जी आले; तसेच जयपूरवरून युवा इंजिनिअर पवनजीसुद्धा आले आहेत. ते सोलार लाईटस वितरणाचं काम करतील. त्यासाठी ते कंपनीकडून आले आहेत. श्रीनगरच्या शिबिरातही होते बहुतेक. काल डॉ. प्रज्ञा दिदींनी शिबिराचं काम डॉ. देसाईंकडे हँड ओव्हर केलं. आणखी डॉक्टर यावेत, म्हणून सगळे जण आपापल्या ठिकाणी संपर्क करत आहेत.

काल रात्रीच कार्यालयात आलेले दोन कार्यकर्ते- जावेदजी आणि सादिया दिदी आजच्या पहिल्या कँपला येतील. आश्रमात शिबिर आता रुटिन बनलेलं आहे. आश्रमात काही औषधेही ठेवलेली आहेत; संस्थेचं बॅनरही तिथे आहे. आश्रमाच्या परिसरातले काही कर्मचारीसुद्धा शिबिरात येतात. पण माझं पहिलंच शिबिर असल्यामुळे थोडी अस्वस्थता आहे. आणि फार्मसिस्टही नाही‌ आहे. साडेदहा वाजेपर्यंत शिबिराची तयारी झाली. औषधं लावली; बॅनर लावलं. टेबल तर तिथले चाचाजी स्वत:च लावून देतात. शिबिर सुरू झालं. आज त्या अर्थाने सगळं नवीन आहे. डॉक्टरही कालच आले आहेत; त्यांना शिबिराची कार्यपद्धती समजून घ्यायला थोडा वेळ लागू शकेल. सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या. सेवा भारतीच्या कार्यालयातून औषधे घेताना कात्री घ्यायची राहिली होती; आणि ती आश्रमातही मिळाली नाही; म्हणून ती बाहेरून विकत आणावी लागली. रस्त्यावरची दुकानं आता सुरू झालेली आहेत. अर्थात त्यांच्या सामानाचं मोठं नुकसान झालेलं आहे. एक- दोन आवश्यक औषधं मिळत नाहीत. पण डॉ. सरांनी दुसरी औषधं दिली.

श्री चन्द्र चिनार आश्रमामध्ये एका विशाल चिनार वृक्षाखालीच टेबल लावलं गेलं आहे. हळु हळु रुग्ण येऊ लागले. सगळ्यात पहिले तर आश्रम परिसरातले कर्मचारीच आले. नंतर लोकांची गर्दी सुरू झाली. शादिया दिदी नाव नोंदणी करत आहेत; मी आणि जावेदजी औषधं काढून देतो आहोत. अनेकदा औषध सापडत नाही. तेव्हा डॉ. सरांनाही शोधावं लागतं. इथे अनेक दिवसांपासून शिबिर सुरू असल्यामुळे लोकांना माहिती झालेली आहे. हळु हळु संख्या वाढतच गेली आणि रांग तयार झाली. सर्व काही शांततेत सुरू आहे. ह्या स्थानाची एक गंमत अशी होती की माझ्या मोबाईलला इंटरनेट मिळतंय; जे कार्यालयात मिळत नाही. एक गोष्ट जाणवली की, येणा-या रुग्णांमध्ये बहुतांश सामान्य रुग्ण आहेत. अनेक रुग्णांना त्वचेचे त्रास आणि शरीरात वेदना होत आहेत. इथे सरकारी हॉस्पिटल अजूनही पूर्ण सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शिबिर आवश्यक आहे.

जवळजवळ दोन तास शिबिर चाललं. एक वाजल्यानंतर हळु हळु बंद करावं लागलं. साठ रुग्ण आले होते. शिबिर बंद करणं खूपच कठिण आहे; कारण लोक थांबतच नाहीत. त्यांची रांग सुरूच राहते. हळु हळु समजावून नोंदणी बंद केली. औषधं आश्रमात ठेवली. तेव्हा कुठे लोक थांबले. आश्रमातच जेवण केलं. जेवणानंतरही काही रुग्ण आले आणि त्यांनाही औषधं द्यावी लागली.

तोपर्यंत फयाज़ भाई आणि हिलाल भाई नेण्यासाठी आले. त्यांच्यासोबत पवनजीसुद्धा आहेत. त्यांना गावामध्ये सोलार लाईटसचं वितरण करायचं आहे. जावेदजी आणि शादिया दिदी गावातच उतरले. एक- दोन दिवसांमध्येच जावेदजींशी चांगली मैत्री झाली. दोन्ही कार्यकर्ते गांदरबल जिल्ह्यातले आहेत आणि सेवा भारतीसोबत नुकतेच जोडले गेले आहेत. गमतीची गोष्ट अशी होती की शादिया दिदींच्या बोलण्यात काही इंग्रजी शब्द आले होते जे विदेशी एक्सेंटसारखे वाटले. गावातल्या शिबिरासाठी हिलाल भाई, फयाज़ भाई आणि नज़ीर भाई सोबत असतील. हे शिबिर गंगीपोरा गावात आहे जे श्रीनगरपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे.

गांव छोटसंच आहे. इथे एक गोष्ट दिसली की कश्मीरची गावं केरळसारखी आहेत. वस्ती सतत सुरूच राहते. दोन गावांच्या मध्ये अंतर वाटतच नाही. गावामध्ये पोहचल्यावर अनेक प्रश्नार्थक चेह-यांनी स्वागत केलं. लोकांशी काही बोलणं झाल्यावर शिबिर एका मस्जीदच्या प्रांगणात घ्यायचं ठरलं. बॅनर लागले व एक खुर्ची आणली गेली. लोक एकत्र झाले होतेच. एम्ब्युलन्समधून औषधांचे बॉक्सेस काढेपर्यंत गर्दी झाली. फयाज़ भाईंनी म्हंटलं की, लाईटस आतल्या बाजूने ठेवा; ते ह्या गावात द्यायचे नाही आहेत. काही ब्लँकेटससुद्धा होती व तीपण लाईटससोबत दुस-या गावात द्यायची आहेत. त्यांना जवळजवळ लपवत औषधं काढली आणि शिबिर सुरू झालं. परंतु शहरातल्या शिबिरात आणि गावातल्या शिबिरामध्ये मोठाच फरक आहे. इथे लोकांची खूपच गर्दी झाली. सगळ्या वयातले लोक आहेत- तरुण, मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलासुद्धा. नोंदणी करून व चिठ्ठ्या देऊनही लोक गर्दी करत आहेत. औषध काढून द्यायलाही अडचण होते आहे. पण मग डॉक्टर सरांनी काम सुरू केलं आणि एकेक रुग्णाला तपासायला सुरुवात केली. सोबत हिलाल भाई आणि फयाज़ भाई आहेत. शिबिर चालू राहिलं.

जेव्हा कोणी एखादी व्यक्ती‌ जवळ येईल, तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी 'सलाम वालेकुम' म्हणतो. पण 'सलाम वालेकुम' किंवा त्याच्या उत्तरामध्ये 'वालेकुम अस्सलाम' म्हणण्याची सवय नसल्याने चांगली अडचण झाली. एका प्रकारे अनकॉन्शस मन मध्ये आलं. पण हळु हळु जमलं. इथे नमस्तेची भाषा चालत नाही; इथे अभिवादनासाठी 'सलाम वालेकुम'च म्हणावं लागतं. आणि ह्यामध्ये धर्म किंवा स्वाभिमानाचा कोणताही मुद्दा नाहीय. जर आपण तमिळनाडूमध्ये असू तर 'नमस्ते'च्या ऐवजी 'वणक्कम' म्हणावंच लागणार ना. त्याचा स्वाभिमानाशी काहीच संबंध नाही आणि नसला पाहिजे. पण एक कार्यकर्ते असेही आहेत जे 'सलाम वालेकुम' म्हणू इच्छित नव्हते. प्रत्येकाचे विचार असतात म्हणा. पण समोरच्यासोबत काम करताना त्याच्या भाषेतच बोलणं स्वाभाविक आहे. असो.

हे शिबिर खूप वेळ चालतच गेलं. मध्ये मध्ये मस्जीदमधून नमाजसुद्धा अदा केली जात आहे. स्थानिक लोकांमध्ये बहुतांश लोक बोलण्यात रस घेत नाहीत. काही युवक आहेत जे हसून बोलत आहेत. पण जवळजवळ अडीच- तीन तास शिबिर चालू होतं; पण कोणी पाणीसुद्धा दिलं नाही. एका प्रकारचा दुरावा स्पष्ट जाणवत होता. पण रुग्ण चालूच होते. महिलासुद्धा मोठ्या संख्येने येत होत्या. आणि त्या सहजपणे डॉक्टर सरांशी बोलत आहेत. भाषेची अडचण कुठे कुठे येते; पण कार्यकर्ते आहेतच. इथेही एक दोन औषधे ऐन वेळी न मिळाल्यामुळे पर्यायी औषधं द्यावी लागली. पवनजींनी नोंदणीचं काम केलं आणि नंतर ते लोकांशी बोलत होते. ते अगदीच नवखे आहेत आणि त्यांना पहिल्या जॉबमध्ये फक्त तीन महिने झाले आहेत.

शिबिर बंद करताना फार कष्ट पडले. तोपर्यंत काही जणांनी आतमध्ये ठेवलेली ब्लँकेटस बघितली आहेत आणि ते त्याची मागणीही करत आहेत. रुग्णही थांबायचं नाव घेत नाहीत. हळु हळु सर्व औषधं एम्ब्युलन्समध्ये ठेवावी लागली आणि तरीही लोक ऐकत नव्हते. दोन रुग्ण तर एम्ब्युलन्समध्ये औषधं न्यायला आले. अर्थात् हे अपेक्षितच होतं.

आता दुस-या गावामध्ये जाऊन लाईटस वितरण करायचं आहे. गावाचं नाव बहुतेक शेखपोरा असावं. तिथे सरपंचांच्या घरी थोडा वेळ थांबलो. इथेही लाईटस आणि ब्लँकेटस एक प्रकारे लपवूनच ठेवले होते. घरामध्ये एक मीटिंग सुरू झाली. त्यावेळी आणलेला चहा मात्र स्वादिष्ट होता. नंतर आणखी लोक आले आणि मग बंद दरवाजामध्ये मीटिंग झाली. आणखी लोक आल्यावर लाईटस वितरण झालं. त्यानंतर आणखी एक मीटिंग सुरू झाली. त्यावेळी सरपंचांच्या घराच्या बाहेर काही लोक आले आणि 'तुम्ही लाईटस तर फक्त सरपंचांच्या नातेवाईकांनाच दिले,' असं म्हणायला लागले. मग फयाज़ भाई आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना कसंबसं समजावून परत पाठवलं. ही मीटिंग खूप वेळ सुरू राहिली. खरं तर त्यामध्ये आमची काही भूमिका नव्हती. लाईटस देणा-या कंपनीचं हे काम आहे. पण थांबावं लागलं. नंतर हळु हळु एकेक गोष्ट स्पष्ट झाली. हे गांव मोठं होतं आणि फक्त तीस लाईटस द्यायचे होते; त्यामुळे सरपंचांनी ते आपल्या जवळच्यांमध्येच वाटले. नंतर निघताना ब्लँकेटसही दिले गेले. आणखी काही स्थानिक लोकांनी लाईटस मागितले आणि द्यावे लागले.

ह्यामुळे मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. काल वितरण करतानाही थोडा वेळ जसं वाटलं होतं‌ तसंच इथेही वाटलं. आवश्यकतांचं आकलन कसं केलं गेलं आहे आणि कोणाला लाईटस द्यायचे आहेत, हे ठरवलं तरी कसं? हेच प्रश्न लाईटसच्या कंपनीच्या पवनजींना विचारले. पण त्यांच्याजवळ उत्तर नाही. आणि ते तर नवखे आहेत; नुकतेच कॉलेजच्या बाहेर जॉबमध्ये आले आहेत. कंपनीने सांगितलं तसं ते करत आहेत. कंपनीला फक्त लोकांना लाईटस वाटण्यात इंटरेस्ट आहे आणि त्यांच्या फोटोजमध्ये इंटरेस्ट आहे (ज्याद्वारे ते सीएसआरमध्ये हे काम दाखवतील). पण उघड गोष्ट आहे की आवश्यकता समजूनच घेतल्या गेलेल्या नाहीत. आणि सरपंच आणि प्रभावशाली कार्यकर्त्यांनी लाईटस घेतले. नंतर त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या व त्यामुळेच निघायला उशीर झाला. त्यावेळेस फार अस्वस्थ वाटलं. एक तर स्थानिक लोक फार काहीच बोलत नाहीत. त्यामुळे काही वेळ काय चालू होतं, हेच समजत नव्हतं. जेव्हा हे कळालं की, आवश्यकता न बघताच लाईटस दिले जात आहेत; तेव्हा रागच आला. पण कोणी कार्यकर्ते त्यावर काहीच बोलले नाहीत. पवनजीसुद्धा काळजीत होते; कारण त्यांना काही लाईटस अतिरिक्त द्यावे लागले. आणि डॉक्टर सरांनाही लोक वारंवार औषध मागत आहेत. थोडं फार उपयोगी असलेलं औषध त्यांच्या हातावर ठेवावं लागलं.

गावातून निघताना रात्रीचे नऊ वाजले आहेत. मन अगदी अस्वस्थ आहे. ह्या पूर्ण विषयाबद्दल दादाजींसोबत बोलावं लागेल. आणि ते ह्याचं स्पष्टीकरण नक्की करतील आणि त्यांनी नंतर केलंसुद्धा. पण तोपर्यंत मन अशांत राहिलं. खरं तर अशी परिस्थिती आपदाग्रस्त क्षेत्रामध्ये अनपेक्षित म्हणता येत नाही. काही मिळत आहे हे बघितल्यावर लोकांच्या मागण्या थांबतच नाहीत. हा मानवी स्वभावच आहे. कदाचित ह्यामुळेच सेवा भारतीने वितरणामध्ये जास्त रस घेतलेला नाही. पण ह्या सर्व विषयाने अस्वस्थ केलं. परतताना श्रीनगरमधले रस्ते सुनसान होत आहेत. रात्री सगळे लोक सोबत असल्यामुळे दादाजींशी ह्या विषयावर बोलता आलं नाही. पण मी अस्वस्थ आहे, हे त्यांनी तत्काळ ओळखलं. उद्या ते ह्याचं उत्तर देतील. तोपर्यंत मन अस्वस्थच राहील. बघूया.


चिनार वृक्षाजवळ शिबिर. डॉक्टर, कार्यकर्ते आणि रुग्ण


औषधांचे बॉक्स


मस्जीदच्या समोरचं शिबिर. बॅनरजवळ फयाजभाई

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ११

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हा भाग
प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा उत्तम प्रकार मदत कार्य करणाऱ्या डॉक्टर्स ,कार्यकर्ते आणि या सर्वांना सलाम _/\_

कदाचित ह्यामुळेच सेवा भारतीने वितरणामध्ये जास्त रस घेतलेला नाही. >>> खूप विचारपूर्वक काम करते आहे सेवा भारती ....

ही सर्व लेखमाला उत्तम सुरु आहे ...