नेहमीप्रमाणे सकाळी आईला फोन केला तेव्हा तिने आज घर पूर्णपणे पाडून झाल्याचं सांगितलं. छोट्या भाचीने किती मोठी जागा वाटते आहे म्हणून लगेचच रिकाम्या जागेचा फोटोही पाठवला. मला मात्र ती पडलेली वास्तु पाहून रडूच फुटलं. खरं तर काय कारण होतं रडायचं? नव्या पद्धतीचे, सगळ्या सुखसोयींनी परिपूर्ण, जास्तीत जास्त जागेचा वापर करून एक नवीन घर जन्माला येणार होतं..पण माझ्या मनात मात्र तेच कित्येक वर्षापूर्वीचे आमचे जुने घरच घर करून बसले आहे. १९८९ ते २००४ असा १५ वर्षांचा काळ आम्ही तिथे राहिलो. मी केवळ २ वर्षाची असतांना भाड्याच्या घरातून आम्ही तिथे स्वत:च्या घरी राहायला आलो. खूप पैसे साठवून, कर्ज घेऊन, काही दागिने विकून घेतलेले आई वडिलांचे पहिले घर..
माझी पहिली ह्या घराची अंधुक आठवण म्हणजे मला आणि मोठ्या बहिणीला शिफ्ट व्हायच्या आधी घर दाखवायला आणले होते. पहिल्या मजल्यावर असलेल्या गच्चीतून मी अंगणात खाली बघते आहे आणि बहिणीने मला पडू नये म्हणून दोन्ही हाताने गच्च धरून ठेवले आहे असं काहीसं आठवतं. आम्ही राहायला आलो तेव्हा त्या भागात वीजच नव्हती आणि बिल्डर परागंदा..मोजकीच काही कुटुंब तिथे राहायला आलेली. बहुदा दीड वर्षं आम्ही वीजेशिवाय काढले असावे. आज वीजेशिवाय आयुष्याची कल्पना ही करवत नाही पण वाटतं की तेव्हा काय अडलं वीजेशिवाय? खूप छान आयुष्य होतं ते. सकाळी जाग यायची तीच मुळी सेल वर चालणार्यात रेडियो वरच्या अभंगवाणीने. मग आई अंगणात सडा घालायची. छोटीशी लक्ष्मीची पाऊलं आणि आणि आईच्या ठरलेल्या २-३ डिजाइन पैकी एक रांगोळी घालून मोकळी व्हायची. दिवाळीच्या दिवसात खास मोठी रांगोळी काढायचं काम बहीणीकडे असायचं. दारापुढे आणि फाटकाजवळ रांगोळी काढायचं काम तिच्याकडे. त्यासाठी लागणारे रंग तयार करणे, ठिपक्यांची रांगोळी काढायची असली की बहीण खाकी कागद घेऊन त्यावर छिद्र पाडायची. तर “तू छान रांगोळी काढतेस ना म्हणून तू मोठ्या अंगणात रांगोळी काढ. ताईला काढू दे फाटकाजवळ” अशी माझी समजूत घालून माझा जो काही रंग आणि रांगोळी जमिनीवर पसरून होणारा प्रयोग होत असे त्यासाठी अंगणाची जागा निश्चित केली होती आईने. झाडांमुळे अंगण दिसायचे नाही आणि येणार्याा जाणार्याशला माझी ती सो कॉल्ड रांगोळी पटकन दिसायची नाही.
रविवारी सकाळी रामायण का महाभारत लागायचे टीव्हीवर. ते बघण्यासाठी आमच्याकडे शेजारीपाजारी येऊन बसायचे. वडिलांनी कार बॅटरीज वापरुन टीव्ही चालू केला होता. फार ठराविक वेळी चालायचा तो पण टीव्ही चालू आणि आम्ही कंदिलाच्या प्रकाशात जेवण करतोय असे काहीसे मजेशीर चित्र अजूनही डोळ्यापुढे उभे राहाते. मग मधेच त्यावर मुंग्या यायच्या आणि एंटीना सेट करण्यासाठी दोन व्यक्तींची जुगलबंदी सुरू व्ह्यायची. “झालं, झालं !! गेलं चित्र परत गेलं पप्पा ! क्लियर नाही आहे चित्र !” तर पप्पा वरच्या मजल्यावरून “आता बघ ! दिसतय का ? “...एव्हडा उद्योग करून चित्र क्लियर झालं की नेमकं टीव्हीवर यायचं “रुकावटके लिये खेद है!” आणि कू.... असा आवाज.
काचेचे कंदील त्यात भरलेले निळे निळे रॉकेल. रोज संध्याकाळी काजळी धरलेल्या काचा रांगोळीने साफ करण्याचे काम. रात्रीच्या वेळी बाहेर जायचे तर तेही टॉर्च घेऊन. वृक्षवल्लींचे सोयरे साप, सरडे सुद्धा आसपास भटकू लागले होते. त्यात प्यायचे पाणी येण्याची वेळ फारच खास होती - रात्री २:३० वाजेची. आमच्या घराच्या समोरच नळ होता तिथे जागे झालेली सगळी कॉलनी लाइन लावायची.
उन्हाळा माझा खास आवडीचा. एकतर मिळणारी मोठीच्या मोठी दोन अडीच महिन्याची सुट्टी. त्यात केलेले असंख्य रिकामे उद्योग. पापड, कुर्डई, वेफेर्स, वडे(सांडगे) करण्याचा आईला भयंकर उत्साह. ज्या दिवशी पापडाचा घाट घालणार तो दिवस पप्पांच्या ऑफिसचा असणे गरजेचे असे. ते घरी नसणे ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात घेतली जाई. सकाळी सकाळी दिवसभराचा स्वयंपाक आटपून माता गॅसवर ते भले मोठे पातेले चढवत असे. पीठ तयार होत आले की शेजारच्या २-३ काकू मावश्या पापड लाटायला यायच्या. येतांना आपले पोळपाट आणि लाटणे घेऊन यायच्या. मग चहा नाश्ता आटपला की कामाला सुरवात व्हायची. लाटलेले पापड सुपावर घालून गच्चीवर नेण्याचे काम आमच्यासारख्या कच्च्या लिंबूकडे असे. गच्चीत थोडासाच पिकलेला असा आणखी एक लिंबू बसलेला असायचा. ज्याचे काम सुपावरचे पापड प्लॅस्टिकच्या कागदावर टाकण्याचे असायचे. दोन अडीच महिन्यांची सुट्टी कशी संपायची कळायचे नाही. पाहुण्यांचा राबता आमच्याकडे कायमचाच. पाहुणे आले की ठरणार्याच सहली, जेवणावळी.. कसलाच ताण असा वाटायचा नाही. रात्री गच्चीत सगळ्या लहान मुलांचे बिछाने टाकले जायचे. गप्पा खेळ खाऊ वाहणारे थंडगार वारे यात बाकी कशाची गरज कधी वाटलीच नाही. (मला वाटतं डास तेव्हाही चावत असावेत पण त्यामुळे कधी कोणाला मलेरिया, डेंगी असा काही झालं नाही.)
कितीतरी गोष्टी दिवसभर करत होतो, सगळं काही घरी बनवत होतो, घरकामाला मदत कधी असायची कधी नसायची, पुस्तकं वाचून संपून जायची, शेजार्यांशी/ मित्रमैत्रिणींशी गप्पा पूर्ण व्हायच्या, मनसोक्त खेळून व्हायचे, अभ्यासही करून व्हायचा, छंदही जोपासले जायचे पण तरीही वेळ शिल्लक राहायचा...सकाळ झालेली समजायची, रात्री वेळीच झोप लागायची.. आज मागे वळून पाहतांना वाटते की आई वडिलांनी किती समृद्ध, निरोगी बालपण दिले. तंत्रज्ञानाने गुलाम ना बनवलेली बहुदा आमची पिढी शेवटची.
अर्थात दीड वर्षात वीज आली, पाण्याची मेनलाइन आली आणि आम्ही खर्याे अर्थाने बंगल्यात राहाण्याचे सुख उपभोगू लागलो. हळूहळू एकाकी वाटणार्याल घराला झाडांची सोबत मिळाली. घराच्या एका पिलरच्या सहाय्याने जाईचा वेल पहिल्या मजल्याच्या गच्चीपर्यन्त गेला. संध्याकाळी अर्धवट उमललेल्या पांढर्याय कळ्या जणू काळ्या रात्रीच्या आकाशातल्या तारकाच. पुढच्या अंगणात जाईचा थाट तर मागच्या अंगणात अबोलीचा ताटवा.
वाळलेल्या बियांवर पाणी पडलं की तडतड आवाज यायचा. मला फार गम्मत वाटायची त्याची. शेजारी लावलेला कुंद मात्र पसरत चाललेला. कुंदाचा वास मला जाईपेक्षा जास्त आवडायचा. गुलाब, मोगरा, कर्दळी, ऑफिस टाइम, चीनी गुलाब, सदाफुली, जास्वंदी, शेवंती, सायली, जुई अशी सगळीच मंडळी आमच्याकडे रहिवासाला होती. त्यामुळे आमचे देवघरातले देव कधी लाल, पिवळे, पांढरेशुभ्र, कधी अबोली तर कधी गुलाबी सुद्धा दिसायचे.
मागच्या अंगणात फळझाडांची मक्तेदारी होती. आंबा, सीताफळ, पेरु, डाळींब, जांभूळ, चिकू, केळी अशी सगळी झाडं आईने लावली होती. त्यापैकी सीताफळ, पेरू आणि आंबा तर खासच. सीताफळाला ‘डोळे’ आले की त्याची रवानगी गव्हाच्या नाहीतर तांदळाच्या डब्यात व्हायची. मग रोज हळूच कुठून तरी काढून आई एक सीताफळ पुढे ठेवायची. जास्त खाऊन सर्दी होऊ नये म्हणून बाकीचे परत लपवून ठेवायची. कैरी, सीताफळ हा वानवळा आईच्या मैत्रिणींकडे द्यायची ड्यूटी माझी होती. त्या बदल्यात त्यांच्याकडच्या भाज्या/ फळे परत आईला आणून देणे हे दुसरे काम. आजीने एकदा एक नारळाचे छोटेसे झाड आणून दिले. हळूहळू ते झाड वाढत गेले आणि आमच्या घराची शोभा झाले. आसपास दुसरे नारळाचे झाड नव्हते त्यामुळे पत्ता सांगतांना एक जणू landmark झालं होतं ते झाड.. ह्या झाडाने फार फळे दिली. ते झाड म्हणजे घरदारासाठी एक भूषण होते.. कौतुक होते...
हळूहळू घर, बाग, अंगण जुने होत गेले. त्यात शिक्षणामुळे/ नोकरीमुळे आम्हाला हे घर आठ-दहा सोडून जावे लागले. अनेक उत्तमोत्तम घरात राहिलो पण तरीही आपले घर कुठले हा प्रश्नाचे एकच उत्तर होते. वडील नोकरीतून निवृत्त झाले आणि परत जुन्या घरी आले. घर आता राहण्यायोग्य राहिले नव्हते. बरीच वर्षं बंद राहिल्यामुळे हवी तशी निगा राखली गेली नव्हती. भिंती खचल्या होत्या. छताने ओल धरली होती. आधी ऐसपैस वाटणारे घर अचानक वाढलेल्या सामानामुळे छोटे वाटू लागले होते. नारळ सोडता कुठलेही झाड शिल्लक नव्हते. नारळाच्या झाडानेच काय ती निष्ठा दाखवत तग धरला होता.
मग घर पाडायचे ठरले. नवीन प्लान आला, नवीन बांधकाम सुरु झाले.
...आणि काल आलेला आईचा तो फोन.. “आपलं नारळाचं झाड पडलं ग !” “अगं, काय सांगतेस? कसं काय? कॉंट्रॅक्टरला खास सूचना दिली होती आपण की झाडाला हात लावू नकोस.” “ तो म्हणतो जेसीबीचा धक्का लागला”.
...आणि आमच्या जुन्या घराची शेवटची आठवणही मातीत मिसळली....
स्नू खूप ओघवतं लिहिलय.. घर
स्नू खूप ओघवतं लिहिलय.. घर भिंतींपेक्षा आठवणींनी बनतं त्यामुळे जुनं घर तुमच्या बरोबर नेहमी राहील..
खुपच छान लिहिलय स्नु.. मला
खुपच छान लिहिलय स्नु..
मला माझ्या बाई आप्पांच घर आठवल..कुणास ठाऊक पण वाचताना माझ्या डोक्यात मात्र तेच घर नाचत होत..तेवढ नारळांच झाड जर नसत वाचल तर जाणवलही नसत कि मी मात्र मनात माझ्याच एका आवडीच्या घराचा विचार करतेय..छान वाटल वाचुन.
आईग्गं! किती हृदयस्पर्शी
आईग्गं! किती हृदयस्पर्शी आहे हे.
ह्म्म.. खुप सुंदर.
ह्म्म.. खुप सुंदर.
धन्यवाद आत्मधून, टीना, मामी,
धन्यवाद आत्मधून, टीना, मामी, साधना..
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
छान लिहिलयं .
छान लिहिलयं .
छान लिहिलंय. अगदी मनापासून
छान लिहिलंय. अगदी मनापासून लिहिलं आहेस हे शब्दाशब्दांमधून जाणवतंय.
किती गोड लिहिलंयस स्नू..
किती गोड लिहिलंयस स्नू.. टच्ड माय हार्ट!!!
फार छान लिहिलंय! आठवणींमधून
फार छान लिहिलंय! आठवणींमधून कधी पुसलं जाणार नाहीच हे घर पण तरी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करून ठेवलं असेल ना? म्हणजे घर न पाहिलेल्या पुढच्या पिढ्यांना देखील दाखवता येईल!
खूप छान, मनापासून लिहिले आहेस
खूप छान, मनापासून लिहिले आहेस अगदी.
छान लिहिलयं, टचिंग.
छान लिहिलयं, टचिंग.
स्नु खूप छान लिहिलस - अगदि
स्नु खूप छान लिहिलस - अगदि मनातून!!!!
मस्त लिहीलय...आवडलंच!
मस्त लिहीलय...आवडलंच!
सध्या ह्याच अनुभवातून जात
सध्या ह्याच अनुभवातून जात आहे! मी जिथे जन्मले, वाढले, अगदी लग्न करून सासरी जाईपर्यंत राहीले ती पूर्ण बिल्डींग जमिनदोस्त करून रिडेव्हलपमेंट चालले आहे! तो प्लॉटचा रिकामा फोटो पाहून मलाही कसंतरीच झाले होते.. पुढच्या वेळेस भारतात जाईन तेव्हा आयदर घर तयार नसेल किंवा असले तरीही अगदी अनोळखीच असेल! विअर्ड फिलिंग..
आता लेख परत वाचते. मला सुरवातीच्या ओळी वाचूनच प्रतिसाद द्यावासा वाटला!
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
सगळ्यांना
सगळ्यांना थॅंक्स....
जिज्ञासा, व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही अगदीच पण काही फोटो आहेत. नव्या पिढीचा कलच वेगळा आहे. त्यांना अश्या घरांचे किती अप्रूप असेल माहीत नाही. अर्थात याला करणीभूत आपणच आहोत.आपण आपल्या नव्या पीढीला केवळ निसर्ग केवळ सुट्टीच्या दिवशीच दाखवू शकतो इतर दिवस बिचारे केवळ गाड्यांचा धूर आणि कौंक्रीटचे जंगलच पाहतात. हेवा वाटतो मला त्या गतकाळाचा, बालपणाचा... आणि वाईट वाटते की आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना नाही देऊ शकणार हा साधा आणि निखळ आनंदाचा ठेवा...
स्नू , अतिशय सुरेख लिहिलंय.
स्नू , अतिशय सुरेख लिहिलंय.
छान लिहिलंय... ! घर, जिथे आपण
छान लिहिलंय... ! घर, जिथे आपण वाढलो ते एकदम खासच असतं, आणि तेथील आठवणीही खूप जवळच्या, हळव्या असतात.
घराच्या एका पिलरच्या सहाय्याने जाईचा वेल पहिल्या मजल्याच्या गच्चीपर्यन्त गेला.>> अगदी आई-बाबांचे घर आठवले, आमच्या पुढच्या अंगणात पारिजातकाच्या नाजुक फुलांचा सडा असायचा. आता भारतवारीची वाट पहाणे आले.
ऋणानुबंध फक्त माणसांशीच नाही
ऋणानुबंध फक्त माणसांशीच नाही तर अनेक निर्जीव गोष्टीशीही जडतात. मग त्या आठवणी जन्मभर सोबत असतात. पण त्या अशा शब्दात पकडणे तुमच्यासारख्या फार कमी जणांना जमते.
खूप सुंदर झालाय लेख.
सुंदर लिहिलं आहे.
सुंदर लिहिलं आहे.
छान लिहीलय.अगदी
छान लिहीलय.अगदी मनापासून...छान वाटलं वाचून.
सुंदर लेख, अगदी आमच्याच घराचे
सुंदर लेख, अगदी आमच्याच घराचे वर्णन वाटले (लाईट सोडून) आम्हीही त्याच दरम्यान ८७ - ८८ मध्ये आमच्या घरी रहायला गेलो. तसाच शेजार, झाडी, जनावरे , अँटेना, पापड सगळं काही अनुभवलेलं आहे
छान लिहिलं आहेस. तुझं मन
छान लिहिलं आहेस. तुझं मन मोकळं केल्यासारखं वाटतंय.
मस्त लिहिलेय ..
मस्त लिहिलेय ..
खूप छान लेख. अगदी माझ्या
खूप छान लेख.
अगदी माझ्या घराची आठवण आली.
८३-८४ पर्यंत भाड्याच्या घरात राहत होतो. मग गावापासून दूर घर बांधले. साधारणपणे ८८ मध्ये तिथे राहायला गेले . झाडे लावणे, पाणी भरणें, वाळवणे करणे, जाई चा वेल.आंबा, पेरू , नारळ, सर्व काही आठवले. अरे हो आमच्याकडे घोसावळयाचा वेल होता. किती घोसावळी यावीत याची काही गणतीच नसे,
सर्व आठवले.
आता खूप जुने झाले आहे घर. कोणी राहत पण नाही . पण पडायचा विचार जरी कोणी बोलून दाखवला तरी डोळ्यात पाणी येते.