२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
मदतकार्यामधील सहभागाचे मध्यांतर: अनन्तनाग आणि पहलगाम
२०१० मध्ये कुपवाड्यामध्ये फार्सिकल एनकाउंटर प्रकरणामध्ये सेनेतील ५ जणांना जन्मठेप घोषित झाल्याच्या बातमीनंतर अनुभवाचा पुढचा भाग लिहित आहे. . . १२ ऑक्टोबरच्या सकाळी थंडी बरीच वाढलेली आहे. अर्थात् श्रीनगरमध्ये बर्फ पडायला अजून वेळ आहे. काल राजौरीमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे आज प्रपोझल्स बनवायचे आहेत आणि त्याच्यासोबत दादाजींनी सेवा भारतीच्या मदतकार्याच्या एका व्हिडिओसाठी कॉमेंटरीसुद्धा लिहायला सांगितली आहे. आणि फिल्डमध्येसुद्धा जायचं आहे.
सेवा भारतीच्या कार्यालयामध्ये सध्या गिरनार मसाला चहा चालू आहे. ज्यांना स्वयंपाक येतो असे कार्यकर्ते नाश्ता- जेवण बनवतात. त्याशिवाय काही स्थानिक कार्यकर्त्यासुद्धा स्वयंपाकाचं काम करतात. सकाळी दादाजी अनन्तनागला जात आहेत असं समजलं. थोड्याच वेळात दादाजींनी मलासुद्धा तयार राहायला सांगितलं. आज तिथे फूड पॅकेटस, प्राथमिक उपचार, रेशन, औषधे असं सामान न्यायचं असणार.
आश्रमाचे स्वामीजीसुद्धा येत आहेत असं कळालं. श्रीनगरच्या लाल चौकाजवळ रेसिडन्सी रोडवर हा आश्रम आहे- श्री चन्द्र चिनार बड़ा आखाडा उदासीन आश्रम. इथेच श्रीनगर शहरातले आरोग्य शिबिर झाले, कार्यकर्ते मुक्कामाला होते आणि अनेक वेळेस कार्यकर्ते जेवण्यासाठी इथेच येत आहेत. आश्रमात गेलो. स्वामीजी आले आणि काही सामान गाडीत ठेवलं. स्वामीजींशी ओळख झाली होती; कारण ते जेवण्याच्या वेळी सेवा करत असायचे आणि स्पष्ट स्वरामध्ये जेवणाआधी प्रार्थना सांगायचे. त्यांच्यासोबत एक फोटोग्राफरसुद्धा आहे. आज आमचे चालक हिलालभाई आहेत. आजचं काम नक्की कसं आहे ह्याबद्दल दादाजींना विचारलं तर ते इतकंच म्हणाले की, अनन्तनागमध्ये मदत सामान द्यायचं आहे आणि कार्यकर्त्यांना भेटायचं आहे. श्रीनगरवरून पाम्पोर- अवन्तीपुरा रस्त्यावर निघालो तेव्हा रस्त्यावर तुंबलेलं पाणी दिसलं. पुराचं पाणी अजूनही अडकलेलं आहे आणि एक- दोन ठिकाणी ते अजूनही पंप लावूनच काढत आहेत. अनेक दुकान आणि घरांना झालेलं नुकसानसुद्धा दिसत आहे. मिलिटरीच्या कित्येक युनिटसनाही नुकसान झालं असं कळालं. अनेक युनिटसच्या भिंती कोसळल्या आहेत.
सकाळी काही ठिकाणी दाट धुकं आहे. थंडी आहेच. अवन्तीपुरामध्ये मिलिटरीचे अनेक लोक दिसत आहेत. इथे एक प्राचीन सौर मंदीरसुद्धा आहे. संगम ह्या ठिकाणी झेलम व अन्य एक नदीचा संगम आहे. संपूर्ण नदीवर धुक्याने शाल पांघरलेली आहे. नद्या कुठून येतात, किती पाणी आहे अशी चर्चा चालू आहे. संगमजवळच रस्त्यावर क्रिकेट बॅट बनवणारी अनेक दुकानं आहेत. केशर आणि सफरचंदाच्या बागाही आहेत. पहलं ठिकाण अनन्तनाग आहे. इथे एका कार्यकर्त्यांच्या घरी जाणं झालं. तिथली गरज बघून एक पॅकेट दिलं ज्यामध्ये रेशन इत्यादी आहे. ह्या कार्यकर्त्यांच्या घरीच एक मंदीर- मशीद लागून आहेत. अनन्तनागमध्ये त्याच नावाचं प्राचीन मंदीरही बघितलं. तिथेही दादाजींच्या ओळखीचे लोक आहेत. त्यांचीही चौकशी करून थोडं सामान इथे दिलं. मंदीराच्या बाहेर जवान लोक उभे आहेत. अनन्तनाग मोठं गाव आहे; परंतु गल्ल्या खूप अरुंद आहेत. अनेक ठिकाणी गर्दी आहे आणि लोक मोठ्या आवाजात बोलत आहेत.
इथून एक रस्ता किश्तवाड़ला जातो. दूर पीर पंजालच्या शिखरांवर बर्फ दिसतोय. पुढे अचाबलच्या जवळ विवेकानंद केंद्राच्या कश्मीर कार्यालयात जायचं आहे. तिथेही गरज विचारून थोडं सामान दिलं. काही वेळ थांबलो. इथे रामकृष्ण मिशनचा एक आश्रमही आहे. इथले एक मोठे स्वामीजींचं नुकतंच निर्वाण झालं होतं; त्यांना भेटायला फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती असे लोक यायचे असं कळालं.
हे सगळं बघताना मनात प्रश्न येतो आहे की हे सामान वाटणं need based आहे का? कशा प्रकारे ते जाणून तर घेतलेलं दिसत नाहीय. जिथे कुठे आवश्यकता वाटते आहे, तिथे मदत केली जाते आहे. सामाजिक शास्त्राप्रमाणे तर पहले सर्व्हे करावा, लोकांना भेटून गरजांचं मूल्यमापन करावं; त्यांचं म्हणणं ऐकून आणि निरीक्षणाने आवश्यकता ओळखून त्यांच्यासाठी काम करावं. इथे असं होत नाही आहे. आणि ते शक्यही नाही. मदतकार्यासारखं काम करत असताना अनेक गोष्टी एकत्र कराव्या लागतात. सर्व काही पुस्तकी पद्धतीने आणि परिपूर्ण करण्यासाठी वेळ नसतो. म्हणूनcommon sense च्या आधारे मदत दिली गेली. आणि जरी काही सर्व्हे सारख्या साधनाचा वापर केला असता, तरी त्यावरही अवलंबून तर राहावंच लागलं असतं. असं एखादं साधन/ टेकनिक ह्यावर विश्वास ठेवावा लागला असता. कदाचित त्यापेक्षा आपला कॉमन सेन्स आणि आकलन ह्याचाच आधार घेणं योग्य असेल.
अनेक कामं एकत्र होत आहेत; म्हणून दादाजी अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि ओळखीच्या लोकांना भेटत आहेत. पुढे पहलगामला जायचं आहे. रस्त्यातच मट्टन किंवा मार्तंड हे गाव आहे. म्हणून तेही बघितलं. त्याच्या अगोदर ज्याचा कालच विषय निघाला होता ते छत्तीसिंगपूरा गाव लागलं! काल त्यावेळी माहिती नव्हतं की, उद्या थेट त्या गावातच जायचं आहे. दादाजींनी तिथे गेल्यावर विचारलं बघ, किती सरदार आहेत सांग. खरोखर अनेक सरदार दिसत आहेत. नंतर मार्तंडचं प्राचीन मंदीर आणि त्याला लागून असलेला गुरूद्वारा बघितला. पाच मिनिटात बघितला.
लिद्दर नदीच्या बाजूने जाणा-या रस्त्यावरून पहलगामकडे निघालो! जागोजागी बर्फानी बाबा आणि हर हर महादेव लिहिलं आहे. यात्रा सीजन तर सप्टेंबरच्या आधीच संपला होता. एकदा वाटलं की, इथेसुद्धा काही कार्यकर्त्यांकडे जायचं आहे. पण तिथे स्वामीजींच काम आहे आणि आमची गाडी त्यांना तिथे नेते आहे. तिथे एका हॉटेलमध्ये त्यांचे कोणी परिचित आहेत; ज्यांच्याकडे त्यांचं काही काम आहे. आज एका अर्थाने मदतकार्य सोडून हा प्रवास होतो आहे. असं व्हायला नको, असा विचार मनात येऊन गेला. पण मग वाटलं की, चांगलं काम करण्यासाठी एखादा दिवस ब्रेक घेतला तरी हरकत नाही. म्हणून मग त्या पर्यटनाचा आनंद लुटला. कश्मीरला जायला निघालो तेव्हा मित्राने म्हंटलंच होतं की, तू खरोखर मदतकार्यासाठी जातो आहेस का पर्यटनासाठी? आज त्याचं म्हणणं थोडा वेळ खरं होईल! तसे आलेले अनेक कार्यकर्ते शेवटी एक- दोन दिवस फिरायला गेले होते. जेव्हा पहिल्यांदा दादाजींना भेटलो, तेव्हा ते काही कार्यकर्त्यांना लदाख दाखवण्यासाठी लेहमध्ये बोलत होते! त्याच वेळेस एका अर्थाने लदाखचं स्मरण दर्शन झालं (जशी कधी कधी आठवणीने आंघोळ म्हणजे स्मरण स्नान करावं लागतं; तसंच हे स्मरण दर्शन असतं!); आज पहलगामचं सौंदर्य बघण्याची संधी आहे!
पहलगाममध्ये खरोखर अद्भुत नजारा आहे. चारही बाजूंना बर्फाच्छादित शिखर आणि जवळच लिद्दरची गर्जना. ज्या हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबलो ते एक थ्रीस्टार हॉटेल आहे. खूप रमणीय बनवलेलं आहे. खरोखर शांती आहे सगळीकडे. हॉटलच्या रिसेप्शनमध्ये सौम्य स्वरात लावलेलं लाईट इन्स्ट्रुमेंटल म्युझिकसुद्धा ह्या शांतीला अधिक प्रगाढ करत आहे. . . स्वामीजींमुळे ह्या हाय- फाय हॉटेलामध्ये जेवणासाठी थांबलो. दादाजी ह्या महागड्या हॉटेलचा आनंद घेत आहेत आणि वेटर लोकांना सेवा भारतीबद्दल सांगत आहेत.
नंतर हॉटेलच्या मालकांनी सांगितलं की, इथेही आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. पहलगाममध्ये पाण्याने नुकसान नाही झालं; पण इथला पूर्ण बिजनेस ठप्प झाला आहे. हॉटेलमध्ये कित्येक लाखांचं बूकिंग झालं होतं; ते सगळं रद्द झालं. जर ग्राहक आले नाहीत तर हे मोठं हाय- फाय हॉटेल चालवणं भयंकर कठिण काम आहे. दिवाळीच्या नंतर ग्राहक येतील अशी आशा त्यांना वाटते आहे. त्यांचे श्रीनगरमधले हॉटेल्ससुद्धा सुनसान आहेत. आपत्तीने कॉरपोरेट क्षेत्रामध्येही मोठं नुकसान केलं आहे.
परत जाताना लिद्दर पार करून एका दुस-या रस्त्याने बिजबेहेड़ाला गेलो. जाताना कळालं की, ह्या भागात अतिरेकी आणि फुटिरतावाद्यांचा मोठा अड्डा आहे. टुरिस्ट वाहन जेव्हा इथून जातात तेव्हा लोकांना कॅमरे बंद ठेवायला आणि काचा वर करायला सांगतात आणि टुरिस्ट वाहन मध्ये थांबूसुद्धा शकत नाहीत. बिजबेहेड़ाच्या पुढे अवन्तीपुरामार्गे पाम्पोरला पोहचलो. एका ठिकाणी दादाजींच्या परिचित दिदी आहेत; त्यांच्या घरी गेलो. त्यांचे वडील विवेकानंद केंद्रात काम करायचे. त्यांच्या घराचंही मोठं नुकसान झालं आहे. तळमजल्यावरचं सगळं वाहून गेलं आहे. कसेबसे ते इथे राहात आहेत. त्यांचा दादाजींसोबत परिचय व नातं जुनं आहे. खरोखर दादाजी सगळ्यांचे 'दादाजी' आहेत! इथे केसरयुक्त चहा मिळाला. सामुग्रीचं एक पोतं इथेही दिलं.
श्रीनगरमध्ये परतायला संध्याकाळ झाली. आजचा अर्धा दिवस कामात आणि अर्धा फिरण्यात व पर्यटनात गेला. कश्मीरमधले अन्य भाग बघता आले. संध्याकाळी कार्यालयात काही वेळ औषधे लावण्याचं काम झालं. रात्री डॉक्टरसुद्धा आले- डॉ. प्रज्ञा दिदी आणि डॉ. अर्पित. उद्या ते परत जाणार आहेत. आणखी अनेक कार्यकर्ते सोबत आहेत. स्थानिक मुलं- मुली सुद्धा आज इथे थांबतील. रात्री गप्पा झाल्या आणि विविध गुणदर्शनही झालं. अनेक कार्यकर्त्यांनी गायलेली गाणी लक्षात राहिली. कश्मिरी गाणं- 'लब पे आती है बन के दुवाएँ तमन्ना मेरी' मस्त होतं. प्रत्येकाने काही ना काही गायलं. 'बुम्बरो बुम्बरो शाम रंग बुम्बरो शाम रंग बुम्बरो आए हो किस बगिया से ओ ओ तुम' आणि आणखीही कश्मिरी गाणी गायली गेली आणि ती खरोखर गोड होती. दादाजींनी आणि चाचूजींनी जोक्स सांगितले व ह्यात सहभाग घेतला. जेव्हा डॉ. प्रज्ञा दिदींना ह्या अनुभवांबद्दल विचारलं तेव्हा 'खूप शिकायला मिळालं व बघायला मिळालं,' इतकंच त्या म्हणाल्या. कार्यकर्त्यांच्या बोलण्यात आलं की कुपवाडामध्ये अनेक जण फुटिरतावाद्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे तिथे जाऊन शिबिर घेणे ही मोठी गोष्ट होती.
आज प्रोपोझल आणि कमेंटरी लिहिण्याचं काम राहिलं. ते उद्या होईल.
जेलम नदी व पाण्याची पातळी
अनन्तनाग मंदीर
मार्तंडमधील मंदीर आणि गुरुद्वारा
पहलगाममध्ये लिद्दर नदी
पाम्पोरमधलं कोसळलेलं घर
साचलेलं पाणी आणि डोंगरावरील अत्याचार
पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०
मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
हा भाग सुद्धा छान आहे
हा भाग सुद्धा छान आहे
तुम्ही आवर्जून देत असलेल्या
तुम्ही आवर्जून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल व वाचनाबद्दल धन्यवाद मनरंग जी!
हा भाग कसा काय वाचायचा राहिला
हा भाग कसा काय वाचायचा राहिला ??
या भागातूनही वेगवेगळी माहिती मिळाली ...