स्टेम सेल थेरपी - बायोटेक्नॉलॉजी - तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार !!!

Submitted by अपराजिता on 6 August, 2015 - 14:49

दिनांक १९ जुलै २०१५ च्या " टाईम्स ऑफ इंडिया" ह्या दैनिक वृत्तपत्रातील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले -
स्टेम सेल डोनेशन विषयी जनजागृती करण्यासाठी सायकल स्वारांची आधुनिक रॅली :
चेन्नई येथे शनिवार दिनांक १८ जुलै २०१५ रोजी दात्री फाऊंडेशन आणि कॉगनिझंट (Cognizant) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २०० तरूण व वयस्क सायकल स्वारांची रॅली आयोजित करण्यात आली होती. दात्री ही स्टेम सेल रक्त दाता नोंदणी संस्था आहे, ज्यांना रक्तातील विकृतींचे आजार दूर करण्यासाठी बर्‍याचे मोठ्या संख्येने आजारग्रस्त रूग्णांना ह्या स्टेम सेलच्या दात्यांची अत्यंत मोठी गरज भासत असल्याचे निदर्शनाला आले. आपल्या भारताची लोकसंख्या १ अब्जावर आहे, तरी देखिल एवढी अवाढव्य लोकसंख्या असूनही स्टेम सेल डोनेशनच्या विषयीच्या जनजागृतीच्या अभावापाय़ी स्टेम सेलची रक्तातील विकृतींचे आजार दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असूनही खूपच उणीव भासत आहे. त्यामुळे ह्या रॅलीच्या माध्यमातून स्टेम सेलचे दान किती गरजेचे आहे ह्या बद्दल जनजागृती करण्यात आली.

मनात अपार जिज्ञासा दाटली की काय असते ही स्टेम सेल टेकनॉलोजी ?

त्यातूनच शोध घेताना अजूनही काही अशीच कुतूहल चाळवणारी माहिती वाचनात आली ती टाईम्स ऑफ इंडियाच्या ४ मे २००२ च्या बातमीने !
त्यात असे सांगितले होते की बी. जी मातापूरकर हे नवी दिल्ली येथे मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालय येथे सर्जन आहे. "ऑल इंडिया असोसिएशन ऑफ बायोटेक"च्या दक्षिणेकडील शाखेने स्टेम सेल संशोधनाशी निगडीत एक परिषद ( Conference) हैदराबाद येथे आयोजित केली होती. बीजी मातापूरकर हे यूएसए मध्ये एक पेटंट धारक आहेत ज्या पेटंट द्वारे त्यांनी १० वर्षांपूर्वी असे तंत्र विकसित केले होते की जे एका अवयवापासून नवीन अवयव उत्पादन करू शकत होते.

ह्या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की महाभारताच्या आदिपर्वाच्या एका ओवीने ते दिङ्मूढ झाले होते ज्यात गांधारी (महाराज धृतराष्ट्र पत्नी ) हिने एका गर्भापासून प्रत्यक्षात १०० मुलांना (कौरव ) आणि १ मुलीला जन्म कसा दिला ह्याचा उलगडा केला होता. त्यावर आपले मत मांडताना त्यांनी असे प्रतिपादन केले होते की एकच मानवी स्त्री एकाच वयाच्या १०० पुत्रांना आणि १ कन्येला कसा काय जन्म देऊ शकते?

पुढे आणखी माहिती शोधताना असे आढळले की गांधारीने प्रसूतीनंतर पाहिले की तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला आहे , तेव्हा ती भयंकर चिडली. त्या आधीच्या काळात तिने व्यास मुनींची सेवा करून १०० मुले होण्याचा वर मिळवला होता. जेव्हा गांधारी दु:खाने आणि क्रोधाने तो गर्भाचा मांसल गोळा फेकून देणार होती तेव्हा व्यास मुनी तेथे प्रकटले आणि त्यांनी दिलेला वर वृथा जाणार नाही असे समजावले. त्यानंतर त्यांनी त्या एका गर्भाचे १०१ भाग करून तेल/तूपाने भरलेल्या विशीष्ट प्रकारच्या कुंडामध्ये ( सध्याच्या Test-tube ) ठेवले आणि तब्बल २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ते कुंड उघडले असता १०० मुले आणि १ मुलगी जन्माला आली. ती १०० मुले म्हणजेच १०० कौरव (सर्वात ज्येष्ठ पुत्र दुर्योधन , दु:शासन इत्यादी कौरव ) आणि त्यांची १ बहीण दु:शाला असे वर्णन वाचनात आले.

ह्या कथेच्या आधारे मातापूरकरांनी असे मत व्यक्त केले होते की प्राचीन भारतवर्षात महाभारत (3000 इ.स.पू.) ह्या काळातही भारतीय ऋषी-मुनींना अत्यंत प्रगत विज्ञान अवगत होते ज्या द्वारे गर्भ विभागणी आणि चाचणी-नळीद्वारे मानवी स्त्रीच्या गर्भाशायाच्या बाहेर जाऊनही ते गर्भाला जन्म देऊ शकत होते. शास्त्रज्ञांच्या मते हे त्यांनी स्टेम सेल विज्ञान वापरूनच केले होते, ज्या मुळे मानवी स्त्रीच्या शरीरा बाहेरही ते गर्भ धारणा करवून घेऊ शकत होते.

आता ह्या कथेवर अधिक कसे , काय , खरेच का खोटे असा अधिक उहापोह करण्यापेक्षा कमीत कमी सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या स्टेम सेल टेक्नॉलोजी बाबत माहिती करून घ्यावी असे ठरवले. " तुटे वाद तो संवाद हितकारी " अशी आपल्याला संत समर्थ रामदास स्वामी ह्यांची शिकवण आहे ना? म्हटले तीच आचरणात आणावी.

मग विचार केला की आणि चंगच बांधला की संगणकावर आंतर महाजाल एवढे अफाट माहिती पुरविणारे स्त्रोत असताना आपण का कचरा ? ठरवलेच की काही झाले तरी माहिती तर वाचून काढू या काय असते ही स्टेम सेल टेक्नॉलोजी ?

चला तर जाणून घेऊ या स्टेम सेल थेरपी वा टेक्नॉलोजी - बायोटेक्नॉलॉजी - तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार !!!

स्टेम सेल ह्या मराठीत मूळ पेशी किंवा स्कंधकोशिका म्हणून ओळखल्या जातात.आता स्कंध कोशिका हा शब्द
उच्चारायला मला तरी कठीण वाटतो म्हणून आपण सोयीने मूळ पेशी किंवा स्टेम सेल असाच उल्लेख ह्या पुढील लेखात करू या.

मूळ पेशी (स्टेम सेल्स) हे नाव अलीकडे अनेक वेळा वाचनात येते. त्याबद्दल ही थोडीशी ढोबळ माहिती वाचनात आली ती अशी -

Stem Cell.jpg

मूळ पेशी या अशा पेशी असतात, की ज्यांच्यामध्ये विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशी आणि ऊतींची निर्मिती करता येऊ शकते. बहुपेशीय सजीवांमध्ये या पेशी आढळतात. थोडक्यात सांगायचे, तर मूळ पेशी या शरीराच्या ‘मास्टर’ पेशी असतात आणि त्यापासून सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये मूळ पेशींचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार भ्रूण मूळ पेशी (एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स). या पेशी भ्रूणापासून (एम्ब्रियो) मिळवलेल्या असतात. दुसरा प्रकार असतो पूर्ण वाढ झालेल्या पेशी (अॅडल्ट किंवा आयपीएस सेल्स). या पेशी त्वचा, हाडाचा गाभा ( bone marrow ) किंवा रक्तापासून मिळवून त्यांचे मूळ पेशींत रूपांतर करण्यात येते.

मूळ पेशींच्या स्वत:च्या नवनिर्मितीच्या विशेष क्षमतेमुळे त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर उपचारांसाठी किंवा नवे अवयव, स्नायू किंवा शरीरातील काही भागांच्या निर्मितीसाठी करता येतो. त्यामुळे स्वतःच्याच शरीरातील काही पेशींपासून पेशंटच्या शरीरावर उपचार करता येऊ शकतात.

मग ह्या मूळ पेशी किंवा स्टेम सेल मिळतात तरी कोठे असा साहजिकच प्रश्न मनात उद्भवला असेल, नाही का बरे?

Umbilical Cord blood _ Stem cell.jpg

मूळ पेशींचा महत्त्वाचा स्रोत किंवा पुरवठा करणारे साधन म्हणजे नाळ म्हणजे नुकत्या जन्मलेल्या - नवजात बाळाची नाळ आणि रक्त ! दचकले असाल ना? काय क्रूर पध्दत आहे म्हणून ! येथे बाळाच्या जीवाला बिलकुल धोका नसतो असे डॉक्टर आवर्जून सांगतात.

नीट विचार केल्यास लक्षात येते की बाळ आणि त्याची आई ह्यांना जोडणारी नाळ ही बाळाच्या जन्मानंतर कापूनच टाकली जाते. त्याच नाळेची आणि रक्ताची नीट जपणूक केली तर कितीतरी दुर्धर आजारांवर माणूस उपचार करून जीवनदान मिळवू शकतो. तर मग अशा प्रकारे बाळ जन्मल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नाळेचे विशेष पद्धतीने जतन करून ठेवले, तर भविष्यात मुलाला दुर्दैवाने काही गंभीर आजार झाल्यास नाळेतील मूळ पेशींचा उपयोग उपचारांसाठी करता येऊ शकतो. याला ‘स्टेम सेल बँकिंग’ असे म्हणतात. ही पद्धत सध्या तरी आपल्या भारतात सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही असे चित्र आढळते ; पण येणाऱ्या काळात त्यात अधिक संशोधन होऊन ती सहज वापरता येऊ शकेल.

स्टेम सेल अर्थात मूळ पेशी अनेक रोगांवर उपयुक्त ठरताहेत.याबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढत असून दिवसेंदिवस स्टेम सेल्स जतन करण्याकडे कल वाढत आहे.

रक्ताचा कर्करोग, बीटा थॅलेसेमिया (thalassemia) , लिव्हर सोरॅसिस, पॅरॅलिसिस यासह विविध आजारांमध्ये स्टेम सेल्स उपयुक्त ठरल्या आहेत. त्याशिवाय अनेक आजारांमध्ये स्टेम सेल्सच्या उपयोगितेविषयी जगभर संशोधनही सुरू आहे. त्यामुळेच स्टेम सेल्स जतन करण्याचे प्रमाण सर्वत्र वाढते आहे. दिल्ली, चेन्नई, बंगलोर,
पुणे, मुंबई अशा काही शहरांत स्टेम सेल्सचे जतन करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत आहेत.

हृदयाचे काही आजार, पार्किन्सन्स यांसारख्या काही गंभीर आजारांवर सध्या मर्यादित उपचारपद्धती उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नव्या पद्धतीमुळे त्या आजारांवर उपचाराच्या काही नव्या पद्धती विकसित करता येणे शक्य आहे असे तंज्ञाचे मत आहे.

एक डॉक्टर ब्रेन अॅण्ड स्पाइन तज्ञ म्हणतात की जगात असे काही विकार आहेत, ज्यात आधुनिक औषधे आणि उपचार उपलब्ध असूनही पेशंटला समाधानकारक दिलासा मिळू शकत नाही. ऑटिझम हा त्यापैकीच एक. ऑटिझमवर इतर उपचार करताना स्टेम सेल उपचारांचा एक नवीन पर्याय निर्माण झाला आहे.

या शिवाय स्टेम सेल टेक्नॉलोजीचे तंत्र वापरून रक्ताच्या विकृतीचे काही आजार, सर्व प्रकारचे रक्ताचे कॅन्सर, रक्ताचे काही आनुवंशिक आजार ह्या सारख्या बर्‍याच आजारांवर उपचार करता येऊ शकतो तर कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवरील उपचारांचा खर्च कमी करता येऊ शकतो असा काही तंज्ञाचा दावा आहे. स्टेम सेल थेरपीचा वापर करून विकृतींमुळे किंवा अपघातांमुळे सदोष (बिघाड ) झालेल्या सेलची पुन:स्थापना करता येऊ शकेल अशी वाच्यता आहे.

स्टेम सेल आणि स्टेम सेल बँकिंग विषयी अधिक जाणून घेऊ या पुढील भागात ....

संदर्भ:
http://timesofindia.indiatimes.com/city/chennai/Cycle-rally-pedals-aware...

http://timesofindia.indiatimes.com/india/Kauravas-were-cloned-says-scien...

http://www.biotecharticles.com/Applications-Article/Biotechnology-Foot-P...

मराठी विश्वकोश

www.medindia.net

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टेम सेल मध्ये पैसे घालण्याआधी सर्च मारा, याने आजवर किती रोगांवर रामबाण इलाज शोधलेत. बाकी प्रत्येकाचे पैसे, कुठे दवडायचे ज्याचे त्याने ठरवायचे. गांधारी गोष्ट भारी आवडली.
Happy
हल्लीच लोकसत्ताला पण एक आर्टिकल होतं.
http://www.loksatta.com/chaturang-news/cord-blood-stem-cells-storage-111...

अमितव वरचा लोकसत्ता लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद,
कोणालातरी पाठवता येईल हा Happy

यात लिहिलेय तेच खरे आहे, म्हणजे याचा फायदा नगण्य आणि मार्केटींग / फसवणूकच जास्त आहे हे सध्या गृहीत पकडतो, कोणाचे काही वेगळे मत असेल तर प्लीज ..

He cells street chya rutustravatahi aasatat. Balachya dudhachya datat sapadtat. Ase sangtat.

Eka apatyache dusaryala chaltatch ase nahi.

Iti majhi mahiti. ..

Bhayan typing sathi kshamasva! Sad

The technology is still under research but marketing companies have already started selling it. Aishwarya Rai is also promoting it.

About hundred Kaurav, another theory is that they were born to Dasis. Many girls were born too ( obviously as the make female ratio would be maintained in any situation) but the girls would not have found suitable match if they were to call themselves as princesses and none of the kaurav would take them as mistresses as they would have been considered as their sisters. Hence they hid their identify. ( ref, Parva )

अमितव, +१ लोकसत्तामधला लेख हा सद्यस्थितीचे उत्तम भान देणारा आहे. स्टेम सेल थेरपी ही अजून सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात येण्यासाठी बराच काळ लागू शकतो. अजून बरीच प्रगती करणे बाकी आहे ह्या क्षेत्रात.

>>>>हृदयाचे काही आजार, पार्किन्सन्स यांसारख्या काही गंभीर आजारांवर सध्या मर्यादित उपचारपद्धती उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नव्या पद्धतीमुळे त्या आजारांवर उपचाराच्या काही नव्या पद्धती विकसित करता येणे शक्य आहे असे तंज्ञाचे मत आहे. >>>>
इतर आजाराबाबत माहित नाही पण पर्किन्सन्सबाबत न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांचे आमच्या स्वमदत गटात व्याख्यान झाले. प्रश्नोत्तरे झाली त्यात त्यांनी दिलेली माहिती देत आहे.
प्रश्न
- स्टेमसेलबद्दल काही माहिती द्या.

उत्तर - " स्टेमसेल थेरपीचा फायदा होईल असे १९९० मध्ये सांगितले गेले.त्याला आता जवळजवळ २० ते २५ वर्षे झाली.तेंव्हा मी विद्यार्थी होतो.आणि परीक्षेत लिहायचो स्टेमसेल नावाची थेरपी आहे त्याचा पीडीला फायदा होईल.पण गेल्या २५ वर्षात ती थेरपी पुस्तकातच राहिली.त्याचा पेशंटना काही फायदा झाला नाही.काही वेळा असे सांगितले गेले की स्टेमसेल थेरपीने सगळे आजार बरे होऊ शकतात.असे औषध म्हणजे अमृतच म्हणावे लागेल.अजून तरी असे औषध जगात कुठेही आलेले नाही.एकाच औषधाने मुलाचा मतीमंदपणा पण बरा होईल,डायबेटीस बरा होईल आणि पार्किन्सन्सही बरा होईल.पण असे होणे नाही.मग आम्हा डॉक्टरांची गरजच नाही.जाऊन फक्त ते औषध घ्यायचे.स्टेमसेलमध्ये क्षमता आहे पण अजून ते संशोधनाच्या पातळीवरच आहे.दुर्दैवाने संशोधनाच्या पलीकडे गेलेले नाही."

नेहमीप्रमाणेचमाहितीपुर्ण लेख.

स्टेम सेल्सची इतकी क्षमता असल्याचे सिद्ध झाल्यावरही पुरेसे संशोधन का झाले नाही? कुठे घोडं अडलंय?

लोकसत्ता मधील लेख छानच..
यादृष्टीने काही नविन संशोधन झाल्यास छान होणार..
रच्याकने, डॉक कुठ गेले आजकाल लेख नाही येत त्यांचे..
डॉक म्हणजे डॉ. सुरेश शिंदे ..

आम्ही केलेय.
हे करताना वास्तव वादी माहिती दिली गेली आणि आम्हीही विचारुन घेतली.
त्याव्रुन हे पॅकेज घेतानाच "अगदी मोजक्या आजारांवार तोडगा आहे आणि त्या तोडग्याला वास्तवात आणण्याचा भारतातला खर्च १०-१५ लाख आहे" याची कल्पना एकंदर डॉक्टरने दिलेल्या माहितीतून आणि आम्ही विचारलेल्या वाढीव प्रश्नांवरुन होती.

स्टेमसेल हा प्रकार गेली अनेक वर्ष (आणी कदाचित पुढची अनेक वर्ष) रिसर्च टॉपिक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट व्हायला मदत करतोय. गेली काही वर्ष, तो जाहिरातीचं साधन देखील बनला आहे.

आत्ता स्टेमसेल साठवून ठेवण्यासाठी बराच खर्च केला, तर २०-२५ वर्षांनी कदाचित, सगळ्या असाध्य आजारावर ते रामबाण औषध ठरेल हा आशावाद मला तरी भाबडा वाटतो. २०-२५ वर्षांत शास्त्र आणी तंत्र-विज्ञान (science & technology) हे पण प्रगत होईलच की. कदाचित तेव्हा त्या आजारांवर बाकीच्या उपाययोजना पण निघाल्या असतील

त्यावर समजा आणि ५ वर्षांनी संशोधन झालं, तर या ५/१०/१५/२० वर्षांपूर्वी टिकवलेल्या पेशी पुरेशा प्रमाणात (संख्या) आणि पुरेशा कार्यरत असतील का? उत्तर माहीत नाही. नसण्याची शक्यता जास्त.
चिक्कार संशोधन चालू आहेच... काही चांगलं झालं तर उत्तमच. सरकारी काही योजना असेल तर तिकडे अवश्य द्याव्या, पदरचे पैसे भरून देण्यापूर्वी सर्व बाजूनी विचार करावा इतकंच.

पुढे आणखी माहिती शोधताना असे आढळले की गांधारीने प्रसूतीनंतर पाहिले की तिने एका मांसाच्या गोळ्याला जन्म दिला आहे , तेव्हा ती भयंकर चिडली. त्या आधीच्या काळात तिने व्यास मुनींची सेवा करून १०० मुले होण्याचा वर मिळवला होता. जेव्हा गांधारी दु:खाने आणि क्रोधाने तो गर्भाचा मांसल गोळा फेकून देणार होती तेव्हा व्यास मुनी तेथे प्रकटले आणि त्यांनी दिलेला वर वृथा जाणार नाही असे समजावले. त्यानंतर त्यांनी त्या एका गर्भाचे १०१ भाग करून तेल/तूपाने भरलेल्या विशीष्ट प्रकारच्या कुंडामध्ये ( सध्याच्या Test-tube ) ठेवले आणि तब्बल २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ते कुंड उघडले असता १०० मुले आणि १ मुलगी जन्माला आली. ती १०० मुले म्हणजेच १०० कौरव (सर्वात ज्येष्ठ पुत्र दुर्योधन , दु:शासन इत्यादी कौरव ) आणि त्यांची १ बहीण दु:शाला असे वर्णन वाचनात आले. >>>>>

माझं कन्फ्युजन झालं. आयव्हीएफ तंत्रज्ञान नवं होतं तेव्हां गांधारी हीच आयव्हीएफ तंत्रज्ञानाची पहिली युझर ठरली होती. पुढे इक्सी तंत्रज्ञान आले तेव्हांही इक्सी तंत्रज्ञानाने मुलं झाल्याचं सांगितलं गेलं होतं. आता स्टेम सेल थेरपी पण. शंभर मुलांचं ठीक आहे हो, एकाच वेळी तीन तंत्रज्ञानांना जन्म कसा काय दिला असेल ? बरं वर १०० चाच होता मग १०१ कसे झाले ? प्रोग्राम मे व्हायरस ???

असो. पुण्यात यासबंधीचं संशोधन होतं. कधी जमलं तर भेट देऊन माहीती घ्या. आपल्या सल्लुला केस उगवून जमाना झाला.

खडी साखर, जगात नवीन विकसीत झालेलं तंत्रज्ञान, हे पूर्वी आमच्या पुर्वजांनी शोधून, हाताखालच्या फडक्यासारखं वापरून टाकलेलच असतं. नवीन शास्त्रज्ञ पोरा-टोरांनी शोध लावला, की आम्हाला फक्त ते पुराणकथांमधून शोधून त्या शोधासमोर चिकटवायचं बाकी असतं.

मला हे कळलय, की आपले सगळे पूर्वज अत्यंत बुद्धीमान वगैरे होते आणी मधल्या सगळ्या पिढ्या नालायक निपजल्यामुळे ते सगळं प्रगत ज्ञान लोप पावलय.

स्टेम सेल्सची इतकी क्षमता असल्याचे सिद्ध झाल्यावरही पुरेसे संशोधन का झाले नाही? कुठे घोडं अडलंय? >>संशोधन भरपूर झालंय, होतंय पण जी गोष्ट आपण साध्य करू इच्छितो ती घडवून आणणं तितकं सोपं नाही. एका fertilized egg cell पासून एक अख्खा जीव तयार होणे ह्यात हजारो प्रकारच्या signaling networks, molecular processes योग्य वेळी, योग्य ठिकाणी घडणं अपेक्षित आहे. We know a lot about these signaling pathways and molecular networks but not enough to successfully replicate the entire process in vitro.

मला हे कळलय, की आपले सगळे पूर्वज अत्यंत बुद्धीमान वगैरे होते आणी मधल्या सगळ्या पिढ्या नालायक निपजल्यामुळे ते सगळं प्रगत ज्ञान लोप पावलय.
<<

व्हॉट???

अहो, तुमच्या बोटाला काही हाड? (जिभेला हाड वगैरे स्टाईल वाचावे)

जें झालें, तें म्लेंछ आक्रमकांमुळे. समजलें?

आमच्या पिढ्या नालायक निपजूच कशा शकतील????

त्याव्रुन हे पॅकेज घेतानाच "अगदी मोजक्या आजारांवार तोडगा आहे आणि त्या तोडग्याला वास्तवात आणण्याचा भारतातला खर्च १०-१५ लाख आहे" याची कल्पना एकंदर डॉक्टरने दिलेल्या माहितीतून आणि आम्ही विचारलेल्या वाढीव प्रश्नांवरुन होती.
<<

Angry अशाने मार खावा लागतो मग Sad

याच हिशोबाने मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनवरही खर्च करूनच टाका.

घरोघरी ज्ञानेश्वरच जन्माला घालायचे आहेत आपल्याला.