आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील
कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
आता डाऊनटाऊनमध्ये राहतोय म्हटल्यावर जवळपासची जी ठिकाणं राहिली होती ती चार दिवसांत उरकली. जरा इकडे तिकडे जवळपास शॉपिंग, लाराकरता म्हणून हॉबीलॉबी शोधून तिथे खरेदी, जवळच असलेली पब्लिक लायब्ररी,नॅचरल हिस्टरी म्युझियम, सायन्स सेंटर, चायनाटाऊन, पर्शिंग स्क्वेअर, ग्रँड पार्क वगैरे बघून टाकलं.
मग २५ तारखेला सामान आणि आम्ही एका टॅक्सीत बसलो आणि एलेतल्या दुसर्या घरात रहायला आलो. हे खरंखुरं घर होतं. मुंबईत राहून कधी बंगल्याचं सुख अनुभवायला मिळणं अशक्य! त्यामुळे हे तात्पुरतं का होईना आपलं घर आहे या कल्पनेनं हरखूनच गेलो. बहिण २९ तारखेला येणार होती. आता हे चार दिवस फक्त घर एंजॉय करायचं ठरवलं. बहिण, तिची मुलं आणि तिच्याबरोबर कार आली की पुन्हा भटकंती सुरू होणारच होती. मग ही मधली सुट्टी आरामात घालवूयात असं ठरवून टाकलं.
घराचा मालक एक गुजराती निघाला. एक ७५ वयाचा गोड म्हातारा. त्यालाही भारतीय मंडळी बघून आनंद झाला. त्याचंही घर आमच्या घराच्या मागेच होतं. एकटाच रहात होता तो. आम्ही घर ताब्यात घेतल्यावर जवळपास कोणकोणती दुकानं आहेत वगैरे त्याला विचारत होतो. तर त्यानं सरळ स्वतःची कार काढली आणि आग्रह करकरून नवर्याला कारमध्ये बसवून आधी इंडियन ग्रोसरी आणि मग आमच्या (त्याच त्या) सुप्रसिद्ध ट्रेडर जोजमध्ये घेऊन गेला. नवर्यानंही दांडगी खरेदी केली. पाणी, लाटलेल्या चपात्या, तयार भाज्या, डाळ-तांदूळ, कांदे बटाटे, दीपचे सामोसे हे न ते ..... फ्रीज भरून गेला. हिंग, हळद विसरलो ते घरमालकानं दिलं. मग पुढचे दोन दिवस मी ही घरीच जेवले. लारानं सुशीच्या ऐवजी सामोसे खाल्ले. घराजवळच एक थाई रेस्टॉरंट होतं त्यालाही उदार आश्रय दिला. रविवारी जवळच्या फार्मर्स मार्केटमध्येही चक्कर मारली. बाकी घरी टिव्ही, लाराचं क्राफ्ट, पुस्तकं आणि आमचं बुकिंग यात मस्त वेळ घालवला. आरामच आराम.
२६ तारखेला बस्केच्या नवर्यानं आमचं सामान आम्हाला घरपोच आणून दिलं. (बस्के त्यावेळी बेएरीयात गेली होती.) त्याबद्दल निनादला एक मोठ्ठा थँक्यू! तीन जड बॅगा बिचार्यानं त्याच्या घरातून आणून , गाडीत घालून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याला तातडीनं कुठेतरी जायचं होतं त्यामुळे तो घाईत होता. आम्ही त्याच्याशी घराबाहेरच दोन मिनिटं बोलत उभे होतो तर त्याचवेळी एका बाईला त्याच ठिकाणी तिची गाडी पार्क करायची होती. त्यामुळे आम्हाला बोलणंही आटोपतं घ्यावं लागलं. तिला घाई होती कारण तिची आमच्या शेजारच्या घरात कोणाकडे तरी डेट होती आणि त्या डेटकरता ती अगदी आतूर झाली होती. शुक्रवारी डेटला गेलेली ती रविवारपर्यंत तिथेच राहिली बहुतेक. दोघं हातात हात घालून फिरायला जाताना दिसले त्या एक दोन दिवसांत. नवर्याला म्हटलंही की " लगता है, इनकी तो चल पडी!"
बुकिंगचं म्हणाल तर आता पुढच्या टप्प्यांची बुकिंग्ज करणं गरजेचं होतं. ४ जुलैला पॅसिफिक कोस्टल हायवेवर कूच करणार होतो. पीसीएच वर काय काय करता येईल याची एक आयटिनरी बहिणीनं बनवली होती. त्यानुसार दोन रात्री मुक्काम होता. सॅन सेमियन नावाच्या गावाजवळ एक हर्स्ट कॅसल नावाचा अतिशय सुंदर कॅसल आहे. पहिल्या दिवशी एलेहून निघून मधली सांता बार्बरा, सॉल्वँग ही सुंदर शहरं बघून संध्याकाळपर्यंत सॅन सेमियन गाठायचं. तिथला कॅसल बघून तिथं रात्रीचा मुक्काम करायचा. ५ जुलैला सकाळी निघून बिग सर वगैरे करत मॉनरे ला मुक्काम करायचा. मॉनरेचा अॅक्वेरियम बघायचा. ६ तारखेला संध्याकाळ पर्यंत पालो आल्टोला पोहोचायचं असा बेत.
सगळ्यात जास्त बदल या बेतात होत गेले. एक छान बदल झाला म्हणजे आयत्यावेळी बहिणीचा नवराही पीसीएच करता आम्हाला जॉईन होणार असं ठरलं. तो ३ तारखेला सकाळी एलेत येणार होता आणि ६ तारखेला संध्याकाळी परत जाणार होता. भले शाब्बास! एक अॅडिशनल कुशल ड्रायव्हर मिळणार होता.
मग लक्षात आलं की हर्स्ट कॅसल बघण्यासाठी किमान २ तास लागतील. त्यांची अगदी लहानशी टूरच ४५ मिनिटांची असते. शिवाय त्या डोंगरावर जाण्यायेण्याचा वेळ वगैरे धरून २ तास होतीलच. पहिल्या दिवसाच्या शेवटी २ तास मिळणं कठिणच होतं. त्यातून बरोबर ३ लहान मुलं आणि १ माझा नवरा अशी अरसिक मंडळी. त्यांना असलं काही बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मग शांतपणे हर्स्ट कॅसल गळून टाकला. त्यामुळे दिवसभर जी इतर ठिकाणं बघणार त्यांच्याकरताही जास्तीचा वेळ मि़ळणार होता. मुक्काम मात्र सॅन सॅमियन मध्येच करायचा ठरला. एका मोटेलमध्ये २ खोल्या बुक केल्या. पण ते मोटेलचे रेट कसले मेले. एखाद्या चांगल्या हॉटेलाच्या तोंडात मारतील असे. समर व्हेकेशन, ४ जुलै आणि त्या भागात असलेली कमी मोटेलं असं सगळं मिळून त्यांनी रेट वाढवले होते बहुतेक.
मॉनरे मध्ये अॅक्वेरियम शेजारच्याच एका हॉटेलात दोन रुम्स बुक केल्या. या इथल्या रुम्स राजकन्येच्या महालासारख्या सजवलेल्या. सगळं गुलाबी गुलाबी! लारादेवी या हॉटेलवर बेहद्द खुश झाल्या. 'हे मी पाहिलेलं बेस्ट हॉटेल' असंही डिक्लेअर करून झालं. अर्थात असं 'बेस्ट हॉटेल' त्यांना प्रत्येक प्रवासात किमान एक या रेटनं सापडतं हे सांगायला नकोच.
तेवढ्यात बातमी आली की बहिणीचा नवरा ६ तारखेच्या संध्याकाळ ऐवजी सातला पहाटे परत जाणार. त्यामुळे आता आमच्या हातात ६ जुलैची संध्याकाळही आली. मग साराटोगाला आतेबहिण राहते तिच्याकडे डिनरला जाऊन मग पुढे मुक्कामाला जायचं असं ठरवून टाकलं.
आता एव्हाना हे मुक्कामाचं ठिकाण बदललं होतं. पालो आल्टो करता आम्ही एक छानसं स्विमिंग पूल वगैरे असलेलं घर बघून ठेवलं होतं. पण आम्ही बुकिंगला जरा उशीर केला तर ते गेलं. फार वाईट वाटलं. मग आमच्या क्रायटेरियात बसणारी घरं अचानकच मॅपवरून नाहिशी झाली. मी जाम वैतागले आणि मग आमच्यात तेवढ्यात एक संयमित चर्चाही घडली. अजून एक चर्चा घडण्याच्या भितीनं नवर्यानं चपळाई करून एक घर पटकावलं. ते पालो आल्टोच्या थोडसं खालीच होतं - लॉस आल्टोस नावाच्या गावात. पण चला, तुका म्हणे त्यातल्या त्यात!
आणि मग आणखी उशीर न करता सॅन फ्रान्सिस्कोचंही बुकिंग केलं. खरंतर सॅन फ्रान्सिस्कोला आम्हाला फिशरमन्स वार्फच्या जवळ घर हवं होतं. पण मनासारखं मिळेचना. मग शेवटी एका वेगळ्याच भागातलं पण चांगली कनेक्टिव्हिटी असलेलं घर घेतलं. हे शेवटचं बुकिंग होतं. हुश्श्य्!
परत जाताना बहिण सॅन फ्रान्सिस्कोहून सिएटलला जाणार होती आणि त्याचवेळी आम्ही एलेला एका रात्रासाठी परत येणार होतो. ही विमानाची बुकिंग्ज बहिणीन केली होती. एलेच्या एअरपोर्टजवळच्या होटेलाचं बुकिंगही झालं होतं.
लॉस आल्टोस नंतर योसेमिटी नॅशनल पार्काचाही विचार होता. पण पुन्हा खूप धावपळ झाली असती आणि कुठलंच ठिकाण नीट बघता आलं नसतं. असा विचार करून योसेमिटीही चक्क गाळून टाकलं. पुन्हा कधीतरी योसेमिटीचा योग येईलही. कुणी सांगावं!
२९ तारखेला सजून धजून मंड्ळी बसनी एअरपोर्टवर पाहुण्यांना रिसिव्ह करायला गेली. ही एलेतली पब्लिक ट्रान्स्पोर्टनं फिरायची शेवटची खेप होती - निदान या ट्रिपपुरती तरी. त्या आनंदात ट्रेन पकडून, बस पकडून वगैरे एअरपोर्ट वर पोहोचलो. बसमधून उतरल्या उतरल्या "कसे बाई लोकं पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरतात. ठेपी कार असली की कसं बरं वाटतं नै!" वगैरे उच्च विनोद करून वर त्यांवर ख्याँ ख्याँ हसूनही झालं.
यथावकाश श्रींचं आगमन झालं आणि पुन्हा सामानसुमानासकट आम्ही कार रेंटच्या बसमध्ये जाण्यासाठी टर्मिनलच्या बाहेर येऊन उभे राहिलो. आम्ही उभे राहतोय नाही तर एक फॉक्सरेंटची शटल दिसली. त्याला हात केला तर त्यानं मागून दुसरी शटल येतच आहे असं काहीतरी हातवारे करून सांगितलं असं वाटलं. आणि मग आम्ही एक दीर्घ वाट बघत उभे राहिलो. अर्धा तास झाला तरी पुढची शटल येईना. बाकी दुनियाभरातल्या सगळ्या शटला आम्हाला वाकुल्या दाखवून जात होत्या. फॉक्सवाल्यांना फोन केला तर "दर १० मिनिटाला शटल आहे" असा बाणेदार पण रेकॉर्डेड मेसेज ऐकू येत होता. त्यात काही दम नाही हे तर दिसतच होतं. शेजारीच तीन मुली फॉक्स करता थांबलेल्य दिसत होत्या. त्यांना विचारलं तर म्हणे त्या गेले २ तास थांबल्यात. अरे देवा! म्हणजे ही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती आणि आता पुढचा मार्ग काढण्यासाठी सुप्रसिद्ध भारतीय जुगाड करण्याची गरज होती तर! मग आम्ही सरळ पुढची जी कोणती कार रेंटलची शटल आली त्यात घुसलो. फॉक्समध्ये कार फक्त रिझर्व्ह करून ठेवली होती. पैसे काही भरले नव्हते. ते एक उत्तम झालं होतं.
मग या दुसर्या रेंटल कंपनीच्या ऑफिसात पोहोचलो. तिथे ही भली मोठ्ठी लाईन. मग पुन्हा जुगाड! मी आणि तीनही मुलं त्याच ऑफिसच्या लाउंजमध्ये सामानसकट बसलो आणि बहिण आणि नवरा टॅक्सी करून फॉक्सच्या ऑफिसात गेले. तिथे त्यांनी शटलबद्दल तक्रार केली आणि टॅक्सी करावी लागली सांगितल्यावर त्यांनी गपचूप टॅक्सीचे पैसे दिले. फॉक्समधे कार (७ सिटर व्हॅन) तयार होतीच. मग काही फॉर्मॅलिटीज पार पडल्यावर एकदाची मंडळी कारमध्ये बसून आम्हाला घ्यायला आली. एव्हाना मुलांचे भूकबळी पडायची वेळ आली होती. त्यामुळे कारमध्ये बसल्यावर सगळ्यात पहिले एक रेस्टॉरंट शोधून पोरांना खायला घातलं. ( कोणत्याही ट्रीपमध्ये मुलांना खायला घालणे ही एक मेजर अॅक्टिव्हिटी होऊन बसतेच.) समोरच फॉक्सचं ऑफिस होतं. तिथे मी अन बहिण पुन्हा गेलो आणि कागदपत्रांवर माझंही नाव ड्रायव्हर म्हणून लावण्यात आलं. माझ्याकरता अॅडिशनल इन्श्युरन्सही भरला होता. तर अशा तर्हेने आमच्या दिमतीला कार आणि ड्रायव्हर हजर झाले.
मग काय! आमचा पुन्हा धडाकेबाज प्रोग्रॅम सुरू झाला. आता एकदम विळ्याभोपळ्याची मोट बांधायची होती. तीनही मुलांना जास्त इंटरेस्ट घरी बसून सुट्टी एंजॉय करण्यात होता. त्यांची एंजॉयमेंटची व्याख्या आम्हाला झेपत नव्हती. तीघही जणं तीन स्क्रीन बघत बसणार. लारा युट्युबवर पॉलिमर क्लेचे व्हिडियोज, अरिन आणि रोहन माईनक्राफ्टचे व्हिडियोज बघणार आणि त्याबद्दलच बोलणार. शिवाय, सुट्टी आहे म्हणून मंडळी लवकर झोपायला अजिबातच तयार नाहीत. "इट इज आवर व्हेकेशन आणि वी विल नॉट स्लीप सो अर्ली." असा ठाम पवित्रा घेऊन आयांना झोपवूनच ही मंडळी कधीतरी उशीरा झोपायची. मग सकाळी कसली लवकर उठताहेत! व्हेकेशन असल्याच्या मुद्द्यावरून लवकर उठवायलाही मनाई होती. त्यातून उठून साईटसिईंग सारखं बोअर काम करायचं होतं ना! काय ती झाडं आणि घरं बघता! वेस्ट ऑफ टाईम नुसता ही मनोधारणा असली तर किती डोकं फोडणार अशा मंडळींसमोर?
बरं हे राजपुत्रं आणि राजकन्यका उठले की पुन्हा स्क्रीनसमोर ठिय्या देऊन बसणार. मग चढत्या भाजणीत आवाज चढवून, त्यांना स्क्रीनसमोरून हलवून, खंगाळून, खायला घालून मग बाहेर पडायला भल्या दुपारचे निदान बारा वाजायचेच. आम्हीही खमक्या! आज जरा अंमळ उशीर झाला नै. उद्या जरा लवकरच निघू म्हणजे बरंच बघून होईल, आज रात्रीच पोरांना आंघोळी घालून टाकू असे इमले रोज हवेत बांधायचो आणि ते तेवढ्याच तत्परतेनं ढासळायचे. रात्री आंघोळी घाला नाहीतर आंघोळीची गोळी घ्या, निघायला बाराच वाजायचे.
एलेमध्ये बहिणीकडे ३० जून ते २ जुलै इतकेच म्हणजे ३ दिवस होते. ३ जुलैला बीएमेममध्ये तिचं नाटक होतं. आता या ३ दिवसांत आम्हाला अनेक गोष्टी बसवायच्या होत्या. आम्हाला एक ऑपरा बघायचा होता. फँटम ऑफ द ऑपरा आम्ही एका संध्याकाळी पँटाजेज थिएटरमध्ये बघितला. बिव्हर्ली हिल्स, रोडिओ ड्राईव्ह बघितले. त्यावरची सुंदर, सुंदर घरं पाहिली. पहिल्यांदा तिथं गेलो तर कोणतं घर कोणाचं ते कळेचना. मग परत येताना एका स्त्रीकडून १५ डॉलर्स देऊन स्टारमॅप विकत घेतला. आता उद्या या मॅपनुसार घरं बघू असा विचार. दुसर्या दिवशी गेलो तर मॅप असला तरी ती घरं काही आपल्याला दिसत नाहीयेत. ती आत कुठेतरी आहेत आणि आपण नुसतं रस्त्यावरून हे इथे याचं घर आणि हे तिथे तिचं घर इतपतच करू शकतो म्हटल्यावर आमचा उत्साह आटला. कारमधल्या चिल्ल्यापिल्यांनीही असल्या फालतू प्लॅनबद्दल निषेध व्यक्त करायला सुरूवात केली होतीच. त्यामुळे ते तिथेच राहिलं.
एका संध्याकाळी सांता मोनिका बीचवर गेलो. मुलांनी तिथे पाण्यात सॉल्लिड मजा केली. सर्फबोर्डवगैरे वरून चिक्कार सर्फिंगही केलं. मग तिथल्या पीअरवरच्या राईडस केल्या. त्या दिवशी आम्हाला हवाही छान मिळाली होती. आम्ही घरून मस्त बीच टॉवेल्स वगैरे घेऊन गेलो होतो. लारा आणि अरिन समुद्रात पोहत असताना, आम्ही जवळच उभे राहून गप्पा मारत होतो. रोहनला पाण्यापेक्षा सीगल पकडण्यात जास्त इंटरेस्ट लागला. तो आमच्या अवतीभवतीच सीगल पकडत धावत होता. मध्येच बहिणीच्या लक्षात आलं की रोहन कुठे दिसत नाहीये. अरे बापरे! ती धावत सुटली. आम्हीही शोधायला सुरूवात केली. कुठे दिसेना. तेवढ्यात बहिण बर्याच दूरवरून आम्हाला खुणा करताना दिसली. हां, म्हणजे रोहन मिळाला म्हणायचा. त्याला घेऊन ती आली आणि विचारायला लागली की अरे काय हे, तू हरवला होतास माहित आहे?
रोहन - चेहरा मख्खं आणि मॅटर ऑफ फॅक्टली म्हणे "ओ! आय कुडन्ट सी यु एनिव्हेअर."
" अरे मग लक्षात आल्या आल्या शोधायचं नाही का आम्हाला? सीगलच्या मागेच कसा धावत बसलास?"
"आय वॉज लुकिंग फॉर द व्हाईट थिंगी!"
"कसली व्हाईट थिंगी?"
" दोज व्हाईट थिंग्ज यू हॅव स्प्रेड ऑन द सँड."
म्हणजे हा पठ्ठ्या पांढरे टॉवेल शोधत होता. तीन साडेपाच फुटांची, जमिनीवर काटकोनात उभी असलेली मंडळी शोधण्यापेक्षा वाळूवर पसरलेले टॉवेल शोधणं त्याच्या लॉजिकमध्ये बसत होतं. कर्मं!!!
एलेमधली गेटी सेंटर आणि ग्रिफिथ ऑबसर्व्हेटरी पाहिली. फार मस्त आहेत दोन्ही ठिकाणं. दोन्ही उंचावर असल्यानं व्हूदेखिल सुरेख आहे. ग्रिफिथला गेलो तर त्या दिवशी खूप गर्दी होती. वरपर्यंत जाऊन परत आलो, पार्किंगच मिळेना. आता खाली कुठेतरी पार्क करून मग टेकडी चढत चढत वर जावं लागणार असं दिसत होतं. जाण्यायेण्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना गाड्या पार्क केलेल्या. कुठेही मध्ये जागा सापडेना. आता इतक्या खाली गाडी पार्क करून मुलांना घेऊन इतकी चढण चढून जाण्याचं जीवावर आलं होतं. शेवटी पुन्हा एकदा ट्राय करून तर बघू, असा विचार करून कारनं पुन्हा एकदा वर जायला लागलो, रस्त्यात कुठेही पार्किंग न मिळाल्यानं थेट वर गेलो तर काय! अगदी ऑब्झर्व्हेटरीच्या दारात पार्किंग मिळालं. कोण आनंद झालाय!
एलेबद्दल माहिती शोधताना Tripadvisor.com वर मला एक गंमतीशीर गोष्ट मिळाली होती - Maze rooms! वाचूनच आम्ही हे करायचं ठरवलं. मुलांनाही खूप आवडेल असं वाटत होतं. या रुम्स बुक कराव्या लागतात म्हणून एका सकाळचा कॅसलरुमचा पहिला स्लॉट बुक केला. सकाळी मोठ्या उत्सुकतेनं आम्ही तो पत्ता शोधत पोहोचलो. बापरे, आधी त्या रुम्स शोधायलाच वेळ लागला. मग त्यांच्या बाहेर जाऊन उभे राहिलो तरी आत असा काही गेम आहे यावर विश्वास बसेना. एका लाकडी पार्टिशन मागे आहेत या रुम्स. पण आम्ही उत्साहानं फुरफुरत होतो. आता आत जायचं आणि रिअल लाईफ रुम एस्केप गेम खेळायचा. बेल वाजवल्यावर काही वेळानं झोपेतून उठून आल्यासारखा एक माणूस आला. "जर्रा मेल्या मेझ रूम्स सुरू केल्या तर आले लग्गेच खेळायला!" असा थेट पुणेरी भाव चेहर्यावर. कोण तुम्ही? का आलायत? गेम खेळायला? असे बेसिक प्रश्न त्यानं विचारायला सुरूवात केली. अरे भल्या गृहस्था, कालच आम्ही तुमचा खेळ ऑनलाईन बुक केलाय. जरा चेक करायला काय घेशील? आमचा धीर सुटत चालला. ओके बघतो म्हणत तो दरवाजा आमच्या तोंडावर बंद करून आत गेला. आणि पुन्हा दोन मिनिटांनी येऊन आम्हाला आत या म्हणाला. तेवढ्यात त्याच्या नजरेला बच्चे कंपनी पडली. मग म्हणे १३ वर्षांखालील मुलांना अलाउड नाही. म्हटलं असं काही तुमच्या वेबसाईटवर नाहीये. पण तो ठामच राहिला. गेम थोडा डेंजरस असू शकतो म्हणाला. मुलांना सगळ्यात जास्त रस होता या अॅक्टिव्हिटीत. तेच खेळू शकणार नाही म्हटल्यावर आम्हाला खेळायचं नव्हतं. हिरमुसले होऊन आम्ही परत फिरलो. एक वेगळा अनुभव हुकला. तुम्हा कोणाला इंटरेस्ट असेल तर जरूर जा इथे. अशा मेझ रुम्स ठिकठिकाणी आहेत. आम्हालाही हा साक्षात्कार नंतर झाला. काही सिअॅट्लला आहेतच पण नेटवर बघितलं तर चक्क लोअर परेलमध्येही अशा रुम्स आहेत असं दिसतंय. आता तिथे जाऊन बघते.
एलेत मुलांना नुकताच रिलिज झालेला ज्युरासिक वर्ल्ड सिनेमा बघायचा होता. मग नवर्याला त्या तिघांबरोबर सिनेमाला पाठवलं आणि मी आणि बहिण जवळच राहणार्या बस्केकडे त्या दोन तासांत गप्पा आणि पोहे हाणून आलो. गटग हो!
३ तारखेला सकाळीच बहिणीचा नवरा एलेत येणार होता. त्याला पिक-अप करायला बहिण आणि माझा नवरा गेले. तिथूनच बहिण एक शटल घेऊन अनाहिमला बीएमेमला गेली. त्या आधी पिकअप झाल्यावर पुन्हा एकदा तिच्या नवर्याला घेऊन फॉक्सच्या ऑफिसात जावं लागलं. त्याच्या नावाचा आणि सहीचाही फॉर्म भरायचा होता. आणि शिवाय आमची व्हॅनही बदलायची होती. आधीच्या व्हॅनच्या मधल्या रांगेच्या खिडक्यांच्या काचाच खाली होत नव्हत्या. ते सगळं आटोपून, बहिणीला शटलमध्ये बसवून मग दुपारी मंडळी घरी आली.
आधी खरंतर बहिणीबरोबर सगळेच अनाहिमला जाणार होतो. बहिणीच्या नवर्याला पिक-अप करून तिथूनच डायरेक्ट तिला अनाहिमला सोडायचं आणि मग आम्ही मुलांना घेऊन Knott's Berry Farm ला दिवसभराकरता जायचं असं ठरत होतं. पण ४ जुलैच्या मुळे तिथे अभूतपूर्व गर्दी असण्याचा संभव होता. त्या दिवशी हवामानही गरम होतं. शिवाय दुसर्या दिवशी सकाळी पीसीएच करता प्रयाण करायचं होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करता शेवटी बहिणीनं शटलनं जायचं आणि यायचं आणि आम्ही मुलांना व्हेनिस बीचवर घेऊन जायचं असं ठरलं. संध्याकाळी बीचवरूनच एअरपोर्टवर जाऊन तिला पिकअप करायचं ठरलं. हा प्रोग्रॅम मग मस्त पार पडला. तिचं नाटक आणि आमचा बीच! मग चीजकेक फॅक्टरीत जेवण! एलेचा द्सर्या टप्प्यातला मुक्काम असा भरगच्च आणि आनंददायी झाला.
(क्रमशः)
पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को
झकास. सगळे माईनक्राफ्टचे वेडे
झकास. सगळे माईनक्राफ्टचे वेडे अमेरिकेतच आहेत वाट्टं.
सही वृत्तांत!! ग्रिफिथची तीच
सही वृत्तांत!!
ग्रिफिथची तीच मजा आहे! आम्ही नेहेमी तिथे वर जाऊन घिरट्या घालतो, ५ मिनिटात मिळतेच जागा!! माझी सगळ्यात आवडती जागा आहे ती.
शेवटी सान्ता बार्बरा अन सोल्वँग झाले की नाही मग?
अन, पालो अल्टोच्या तिथले गाव म्हणजे Los Altos का? माझ्या कझीनचे घर आहे तिथे. अगदी हिलस्टेशनसारखे गाव आहे!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकंदरीत बरीच ठिकाणं कव्हर केलीत तुम्ही!! सही !
धन्यवाद. पालो अल्टोच्या तिथले
धन्यवाद.
पालो अल्टोच्या तिथले गाव म्हणजे Los Altos का? माझ्या कझीनचे घर आहे तिथे. अगदी हिलस्टेशनसारखे गाव आहे!! >> हो लॉस आल्टोस. लिहिलंय ना गं मी वरती ते नाव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचुनच दम लागला. लिखाण शैली
वाचुनच दम लागला.
लिखाण शैली खुशखुशीतच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चर्चा, आंघोळीची गोळी, पोरांचे भुकबळी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त. खुप ठिकाणे कव्हर
मस्त. खुप ठिकाणे कव्हर केलीत की.
चिल्लीपिल्ली घेऊन ट्रिप करायची म्हणजे एक डोकेदुखीच असते.
मामि मस्त
मामि मस्त
मामि मस्त
मामि मस्त
सुंदर. डिटेलिंग मस्त सर्वच
सुंदर. डिटेलिंग मस्त सर्वच लेखात.
मस्तं, मस्तं चाललीय सफर तुमची
मस्तं, मस्तं चाललीय सफर तुमची आणि तुमच्याबरोबर आमचीही.