जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७

Submitted by मार्गी on 5 August, 2015 - 04:19

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६

मदतकार्यातील दिग्गज कार्यकर्ते

१० ऑक्टोबरची सकाळ. आज पाम्पलेट आणि रिपोर्टचे काम पूर्ण होईल. आता पेज डिझाईन करणा-या व्यक्तीला हे काम सोपवलं जाईल. इच्छा होते आहे की, आता फिल्डवर जाऊन काही काम करावं. बस फक्त आजचा दिवस. उद्या श्रीनगरला जायचं आहे. सकाळी विदुषी दिदींना सोडण्यासाठी दादाजी आणि अन्य एका दिदीसोबत स्टेशनवर जाणं झालं. दादाजी सगळ्यांच्या मित्रासारखे आहेत. मित्रत्वाच्या नात्याने प्रेम करतात आणि ओरडतातसुद्धा. ह्याच वेळी कळालं की, काल दुपारी जम्मूवरून निघालेल्या डॉ. प्रज्ञा दिदी आणि डॉ. अर्पितजी रात्री ब-याच उशीरा कुपवाडाला पोहचले. पुलवामा (जे श्रीनगरच्या पहिले वीस किलोमीटर आहे) पोहचतानाच मध्यरात्र उलाटली होती आणि हिलाल भाई त्यांची तिथे वाट बघत होते. त्यानंतर ते पुढे गेले. चालवणारे वर्माजी जम्मूचे आहेत त्यामुळे त्यांना कश्मीरचे रस्ते नीट माहिती नाहीत. तरीही ते व्यवस्थित पोहचले. मुघल रोडवरून जम्मू- श्रीनगर प्रवास प्रचंड थकवणारा आहे. आणि त्यांना तो जीपच्या ऐवजी एम्ब्युलन्समधून करावा लागला. निश्चितच ते जाम थकले असणार. आणि सकाळी थोडा आराम करून ते शिबिर घेतील. इतकंच नाही तर हे दोन्ही डॉक्टर दोन- तीन दिवसांपूर्वीच परत जाणार होते; परंतु त्यांनी आपला प्रवास पाच दिवस पुढे ढकलला. कदाचित आता सर्व डॉक्टर परतले आहेत आणि शिबिर चालू ठेवण्यासाठी डॉक्टर लागतील, हेच त्यामागचं कारण आहे. म्हणून ते आणखी काही दिवस राहतील.

सेवा भारती ऑफिसात काम करणा-या एका दिदींना डिझाईन आणि प्रिंटिंग करणा-या माणसाबद्दल विचारलं. काही गैरसमज होऊन त्यांना वाटलं की मला पेंटिंगचा माणूस हवाय. त्यांचा असा समज झालाय हे मला कळालं नाही; पण दादाजींचं बारीक लक्ष होतं. त्यांनी त्या दिदींना विचारलं आणि उलगडा झाला. पेंटिंगच्या ऐवजी प्रिंटिंग आणि डिझाईनच्या माणसासोबत मग बोलणं झालं. दादाजींचं लक्ष किती खोलवर आहे, ह्याचं हे आणखी एक उदाहरण. त्यानंतर दुस-या प्रिंटिंगच्या माणसासोबतही बोलणं झालं आणि मग रेट ठरवून त्याला फाईल दाखवली. त्या वेळीसुद्धा कॉम्प्युटरमधून प्रिंट काढताना तिथे काम करणा-या दिदींनीसुद्धा करेक्शन सांगितले. एका अर्थाने चांगलं वाटलं की काम आणखी निर्दोष होत आहे; पण दुस-या बाजूने असंही वाटलं की, इतके लोक इतक्या वेळेस बघत असूनही अशा गोष्टी कशा सुटतात. असो.

दुपारी एका प्रेस रिलीजवरही थोडं काम केलं. आत्तापर्यंतच्या मदतकार्याबद्दल प्रेसमध्ये माहिती द्यायची आहे. आत्तापर्यंत सेवा भारतीने मुख्य लक्ष आरोग्य शिबिरांवरच केंद्रित केलेलं आहे. येणा-या दिवसांमध्ये एम्ब्युलन्सेससुद्धा सुरू करायच्या आहेत. मदतकार्यासाठी सेवा भारतीला तीन एम्ब्युलन्सेस मिळाल्या आहेत. आता त्या चालू ठेवण्याची व्यवस्था करायची आहे. त्यामध्ये अनेक अनपेक्षित अडचणी येतात आणि त्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. एम्ब्युलन्सची नोंदणी आणि पासिंग करून घेणे आहे. त्यामध्ये अडचणी‌ आल्या. सरकारी लोक अडवणूक करतात. त्यातून मार्ग काढावा लागतो. कधी गोड बोलून; कधी कठोर होऊन तर कधी भांडून पुढे जावं लागतं. इथले कार्यकर्ते त्यात तत्पर आहेत. पासिंग करून घेतल्यानंतर एम्ब्युलन्सवर लगोलग संस्था, एम्ब्युलन्स देणारी संस्था ह्यांचे बॅनर आणि एम्ब्युलन्सचं‌ सर्पिल चिह्न आदिसुद्धा लावण्यात आले.

मदतकार्यात सेवा भारती शक्यतो सामग्रीच्या वाटपापासून लांबच राहिली. एक तर देण्यामुळे नाही म्हंटलं‌ तरी थोडा परावलंबीपणा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे गरजा फार मोठ्या असतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कशाचं वाटप करणं शक्य नसतं. तरीही काही विचार विनिमय केल्यानंतर सेवा भारतीने सोलार लाईटसच्या एका कंपनीला लाईटस वाटप करण्यासाठी अनुमती दिली. पहिले नको म्हणाले होते, परंतु नंतर लक्षात आलं की, लाईटसचा गावांना उपयोगच होईल. म्हणून ते लाईटस वितरणासाठी सेवा भारतीकडे पाठवण्यात आलेले आहेत. ते जम्मू एअरपोर्टवर आलेले आहेत; उद्या आमच्या एम्ब्युलन्ससोबत ते श्रीनगरला जातील. जम्मू एअरपोर्ट शहरापासून बाहेर पण लांब नाही आहे. ट्रॅफिकमुळेच थोडा वेळ लागला. निश्चितच जम्मू संपूर्ण जम्मू- कश्मीर राज्यातलं सर्वांत मोठं‌ आणि आधुनिक शहर असावं. जाताना रोडवर आर एस पुरा दिशा दाखवणारा एक बोर्ड दिसला. साईकल मास्टर अर्थात् रविजींचं कौशल्य इथेसुद्धा बघायला मिळालं. कार्गोवाले लोक त्यांचे मित्रच आहेत, असं वाटत होतं. जेव्हा माणूस वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, तेव्हा तशा प्रत्येक परिस्थितीत कसं वागावं हे कौशल्य त्याला मिळत जातं.

तिथून आल्यावर लगेचच परत निघावं लागलं. रियासी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये काही लोकांना राशन आणि फूड पॅकेटस अशी सामुग्री पोहचवायची आहे. हे गाव वैष्णोदेवीच्या थोडं पुढे आहे. दुपारी ऑफिसातून निघताना थोडा उशीर झाला आहे. उधमपूर रस्त्याला आल्या आल्या तवी नदीचा शांत प्रवाह दिसला. केवळ काही दिवसांपूर्वीच तवी रौद्र होती. आणि आपत्तीच्या खाणाखुणा पुढे रस्त्यावरही दिसत आहेत. जम्मूच्या थोडं पुढे गेल्यावर रस्ता रुंद आणि टू बाय टू झाला. पण हे काय? ह्या रस्त्यावर ट्रकांची प्रचंड मोठी‌ रांग लागलेली दिसते आहे. जवळजवळ दोन- तीन किलोमीटर लांब रांग आहे! जम्मू श्रीनगर व्हाया बनिहाल रस्ता काही ठिकाणी बंद आहे आणि जाम लागला असल्यामुळे हे नक्कीच अनेक दिवसांपासून इथे अडकलेले आहेत. ह्या ट्रकवाल्यांची स्थिती वाईट आहे. ह्यांच्यासाठी रस्ता कधी सुरू होईल काहीच सांगता येत नाही. रामसू आणि रामबनजवळ अजूनही‌ रस्ता थोडा तुटलेला आहे. तोपर्यंत ह्यांच्या अडचणी संपणार नाहीत. ट्रकवाल्यांसोबतच मोठं सामान पाठवणारे दुकानदार आणि व्यापा-यांच्याही समस्यांना अंत नाही. ज्या लोकांनी टॅक्स आणि विमा वाचवण्यासाठी कमी लोड दाखवला होता, त्यांची आता स्थिती वाईट आहे. कारण त्यांना लिहिलेल्या लोडच्या प्रमाणातच भरपाई मिळणार. ती बचत करण्याच्या नादात त्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागलं. असो.

त्रिकुटा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं कटरा जम्मूपासून सुमारे ४२ किलोमीटर दूर आहे. दूरवरूनच त्रिकुटा पर्वत दिसू लागतात. कटराच्या काही अंतर आधीपर्यंत रस्ता चांगला आहे; पण कटराजवळ खराब आहे. कटरा जम्मूच्या तसं जवळ असूनही रियासी जिल्ह्यात येतं. जम्मू- कश्मीरमध्ये जिल्हे फक्त वीस- पंचवीस किलोमीटर अंतरात बदलतात. उदा., श्रीनगरचं बडगाम एअरपोर्ट. तो वेगळा जिल्हा आहे. कटरामध्ये सेवा भारतीचं एक हॉस्टेलसुद्धा आहे- दिशा छात्रावास. तिथे जवळजवळ पस्तीस विद्यार्थी आहेत. त्यांची शाळा कटरामध्ये आहे. हॉस्टेलमध्ये सुद्धा काही स्कूल बॅग्ज द्यायच्या आहेत. हे हॉस्टेल सेवा भारतीने देणग्यांच्या मदतीने सुरू केलं आणि चालवलं आहे. सेवा इंटरनॅशनल आणि अन्य संस्थांनी ह्यासाठी डोनेशन दिलं होतं. ह्या स्कूल बॅग्जसुद्धा यूथ फॉर सेवाकडून आलेल्या आहेत. सुमारे पाच वर्षांपासून हे वस्तीगृह चालतं.

ह्या वस्तीगृहामध्ये कश्मीरच्या वेगवेगळ्या भागांमधले विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी दहशतवादाने पीडित झालेल्या कुटुंबांमधले आहेत; काही अनाथ आहेत; काही दुर्गम आणि सुविधांपासून वंचित भागांमधले आहेत. जम्मू कश्मीरच्या सर्व मुख्य प्रदेशांमधून आलेले विद्यार्थी आहेत- जम्मू क्षेत्रातील डोडा, किश्तवाड़, पूँछ, कश्मीरचे गांदरबल, अनंतनाग सारखे भाग आणि लदाखहूनसुद्धा आहेत. दहावीपर्यंतचे विद्यार्थी‌ आहेत. विद्यार्थिनींचं वस्तीगृह वेगळं जम्मू शहरात आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही कर्मचारीसुद्धा इथे राहतात.

जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा जणू त्रिकुटा पर्वताच्या पायथ्याशीच मुलं मौजेने खेळत होती. वस्तीगृह अगदी बघण्यासारखं होतं. अत्यंत आधुनिक आणि विचारपूर्वक बनवलेलं आणि अगदी सुसज्ज आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक पद्धतीच्या डॉर्मिटरीज, स्वच्छ खोल्या, हॉल, कॉम्प्युटर रूम, किचन, भेटायला येणा-या लोकांसाठी वेगळ्या गेस्ट रूम्स हे तर आहेच; पण प्रत्येक ठिकाणी सुविचार आणि अर्थपूर्ण चित्रंही लावलेली आहेत. मुख्य द्वारावर विवेकानंदांचा फोटो आणि संदेश लावलेला आहे. इतकंच नाही तर मुलांना खेळायला हिरवंगार ग्राउंड आणि वाचनालयसुद्धा आहे. ड्रेनेजचं पाणी रिसायकल करण्याची व्यवस्थासुद्धा आहे. मुलांचे अगदी निरागस आणि आनंदाने ओतप्रोत भरलेले चेहरे कश्मीरची समृद्ध संस्कृती दर्शवत होते. हिमाचलचे राजकुमारजी कुटुंबासोबत इथे राहतात. पण प्रत्येक कामामध्ये मुलांचा सहभागसुद्धा असतो. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या समित्या असतात ज्या स्वच्छता, स्वयंपाक, कंप्युटर उपकरण, अभ्यास अशा जवाबदा-या घेतात.

हे सर्व बघून नकळत म्हणालो की, वैष्णोदेवीच्या ऐवजी खरं तीर्थस्थान तर हे आहे! पण दादाजींना this against that च्या ऐवजी this and that हे चांगलं वाटतं. प्रत्येकाची आपली आस्था असते, असं त्यांनी सांगितलं. हे वस्तीगृह बघताना आणि मुलांसोबत मैत्री करताना अंधार पडला. त्यामुळे आता पुढे गावात नेऊन द्यायची सामग्री इथेच ठेवावी लागेल. गावातले कार्यकर्ते येऊन ती नेतील. तोपर्यंत आणखी एक गोष्ट कळली की, श्रीनगरमध्ये एकल विद्यालय टिचर असलेले इरफान भाईसुद्धा ह्याच वस्तीगॄहाचे प्रॉडक्ट आहेत. आणि साईकल मास्टर रवीजीसुद्धा इथेच राहिलेले आहेत! दादाजींनी सांगितलं की रविजींच्या कुटुंबालाही दहशदवादाचा फटका बसलेला होता. रवीजी इथे आठवीपर्यंत शिकले. पण तोपर्यंत प्रत्यक्ष अभ्यासापेक्षा त्यांना खरं काम करून बघण्यात रस निर्माण झाला होता. जेव्हा त्यांचं अभ्यासात लक्षच लागू शकत नाही हे दिसलं तेव्हा कठिण निर्णय घ्यावा लागला. पण आता काही वर्षांनंतर हा निर्णय योग्य ठरला असं दिसत आहे. अभ्यासात अडकून पडण्याऐवजी आता ते कित्येक प्रकारची कामं करतात. आणि डिस्टन्स कोर्सने पदवीसुद्धा घेऊ शकतात. मनात विचार आला की, की कौशल्याला जास्त महत्त्व देणारी आमीर खानची लेहची शाळा अशीच तर नसेल!
रात्र पडली तसा त्रिकुटा पर्वत उजळून निघाला. कटरापासूनच चौदा किलोमीटरचा रस्ता मंदीरापर्यंत वर जातो. अंधारात तो प्रकाशमान आहे. हे वस्तीगृह कटरा गावापासून सुमारे दिड किलोमीटर दूर जवळजवळ जंगलात आहे. इथून जाताना मोठं समाधान वाटत आहे.

वाटेत दादाजींसोबत परत गप्पा रंगल्या. जेव्हा ऑगस्ट २०१० च्या पहिल्या आठवड्यात लेहमध्ये क्लाउडबर्स्ट झाला होता, तेव्हासुद्धा सेवा भारतीने मदतकार्य केलं होतं. त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. अनेक शाळांमध्ये सेवा भारतीने मदत केली. त्या वेळी तिथे कार्यकर्त्यांचं‌ प्रशिक्षण चालू होतं; ते सगळे जण तत्काळ आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी आले. अचानक पाणी आल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं. कार्यकर्त्यांनी मदत पोहचवली. हे कार्यकर्ते जिथून आले आहेत त्या एकल विद्यालय योजनेचं काम लोकांना खूप पटलं आहे. कश्मीरच्या आपत्तीत अनेक शिक्षकांनी जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवले; मोठी मदत केली. ह्यानंतर अनेक गावांमध्ये लोक अशी विद्यालये- अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग सुरू करावेत अशी मागणी करत आहेत आणि अनेक कार्यकर्तासुद्धा स्वत:हून असे शिक्षक बनण्यासाठी पुढे येत आहेत. म्हणून काही दिवसांपूर्वी सेवा भारतीने नवीन एकल विद्यालये सुरू करण्यासाठी एकल विद्यालय फाउंडेशनला प्रस्तावसुद्धा पाठवला आहे. एकल विद्यालयामागे सेवा भारतीचा उद्देश मुलांना सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण उपलब्ध करून देणे, हा आहे.

वाटेत एक डोमेल स्थान लागलं. इथे कटराहून येणारा रस्ता उधमपूर जम्मू हायवेला मिळतो. दादाजींना विचारलं की, हे डोमेल तेच आहे का जिथे १९४७ मध्ये पाकिस्तानी फौजेने हल्ला केला होता? दादाजी म्हणाले की, इथे डोमेल अनेक आहेत. जिथे दोन रस्ते मिळतात, ते डोमेल! पुढे दादाजींच्या बोलण्यात आलं की, आज संपूर्ण देशभरात सरदारजींवर जोक्स करण्याची जी पद्धत आलेली आहे तिचं मूळ इंग्रजांच्या कुटिल डावपेचामध्ये आहे. सरदारजी अत्यंत शक्तीशाली आणि शूर असतात. जर ते आणखी प्रबळ राहिले असते, तर इंग्रजांची अडचण झाली असती. म्हणून त्यांचा अपमान होण्यासाठी आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने ते स्वत:ची क्षमता विसरावेत म्हणून इंग्रजांनी अशा अपमानजनक गोष्टी‌ पसरवल्या. खरोखर गोष्टी किती खोलवर गेलेल्या असतात!

परत पोहचायला रात्रीचे साडेनऊ वाजले. रवीजींनी मस्त जेवण बनवलं होतं आणि ते सोबतच जेवले. जम्मू कश्मीर स्टडी सेंटरचे रंजनजींशी परिचय झाला. ह्याच स्टडी सेंटरचे संचालक श्री. अरुणकुमारजी ह्यांच्याकडून सेवा भारतीच्या कामाची माहिती मिळाली होती‌ आणि इथे कामासाठी येण्याची संधी मिळाली होती. सकाळी लवकर उठून श्रीनगरला जायचं आहे.


अत्याधुनिक वस्तीगृह!

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मार्गी,

>> आज संपूर्ण देशभरात सरदारजींवर जोक्स करण्याची जी पद्धत आलेली आहे तिचं मूळ इंग्रजांच्या कुटिल
>> डावपेचामध्ये आहे. सरदारजी अत्यंत शक्तीशाली आणि शूर असतात. जर ते आणखी प्रबळ राहिले असते,
>> तर इंग्रजांची अडचण झाली असती. म्हणून त्यांचा अपमान होण्यासाठी आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने ते स्वत:ची
>> क्षमता विसरावेत म्हणून इंग्रजांनी अशा अपमानजनक गोष्टी‌ पसरवल्या.

मला सरदारजींवर केलेले विनोद खटकायचे. आज त्यामागचा स्रोत समजला. त्याबद्दल आपले आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

हे सर्व बघून नकळत म्हणालो की, वैष्णोदेवीच्या ऐवजी खरं तीर्थस्थान तर हे आहे! >>>> अग्दी अग्दी ...

अतिशय उत्तम लेखमाला ....