जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६

Submitted by मार्गी on 4 August, 2015 - 05:24

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५

आपत्तीचे वेगवेगळे पैलू

९ ऑक्टोबरची सकाळ. काल रात्री झालेली चर्चा अजूनही ताजी आहे. दादाजींनी कालच्या मीटिंगमध्ये हेसुद्धा सांगितलं होतं की आज सकाळी एका ठिकाणी जायचं आहे. जम्मूपासून दहा किलोमीटर दूर एक कॉलनी आहे. तिथे संस्थेचे वीस बचत गट सक्रिय आहेत. सकाळचं पहिलं काम त्यांना भेट देणं आहे. खरं पाहिलं तर हे काम मदतकार्याचा भाग मानता येणार नाही. ही गोष्ट मनात नक्की येऊन गेली. पण सगळे लोक जात आहेत म्हंटल्यावर तिकडे जाणं झालं. जाण्याआधी डॉ. प्रज्ञा दिदींनी सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी परोठे केले आणि ब्रेड जॅमसुद्धा आणलं होतं. त्यांनी उत्तराखंडमधल्या पूराच्या वेळेसही काही महिने काम केलं होतं.

आम्ही जात आहोत ती कॉलनी उधमपूर हायवेच्या जवळ जागती गावामध्ये आहे. ही वास्तविक कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची एक मिनी टाउनशिप आहे. जेव्हा १९८९ मध्ये परिस्थिती बिघडली आणि कश्मिरी पंडितांना खो-यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडावं लागलं तेव्हा ते नाइलाजाने जम्मू, दिल्ली आणि अन्य ठिकाणी गेले. त्यांच्या पुनर्वसनासाठी काही काळापूर्वी ही कॉलनी वसवली गेली. आज इथे कश्मिरी पंडितांची हजार एक घरं असतील. रस्त्यामध्ये काल झालेली चर्चा पुढे सुरू आहे.

दादाजींनी सांगितलं की, १९८९ वर्षापासून खो-यामध्ये आतंकाचे काळे ढग आले. तोपर्यंत शांत आणि निवांत असलेल्या खो-यामध्ये अस्थिरता आली. कश्मिरी पंडितांना तिथून बाहेर काढण्यात आलं. शतकांपासून सोबतीने राहात असलेले लोक नाइलाजाने एकमेकांना दुरावले. त्यांनी इथे हेसुद्धा स्पष्ट केलं की, कश्मिरी पंडित आणि कश्मिरी हिंदु हे समानार्थी शब्द आहेत. कारणा कश्मीरमध्ये अधिकतर पंडितच राहायचे. आणि समाजातील अन्य वर्ग- जसे श्रमिक, मेंढपाळ किंवा भटके समुदाय- त्यांना पंडितांनी कधी आपल्यामध्ये मानलं नाही. जातीयवादी बुरसटलेल्या कालबाह्य विचारसरणीचंच हेही एक उदाहरण. कश्मिरी पंडित कश्मीरमध्ये एलिट क्लास बनत गेले आणि हळु हळु कश्मीरमध्ये मुस्लीमांची संख्या वाढत गेली.

१९८९ वर्षापर्यंत ह्या मुस्लीमांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्याची कारणं अनेक आहेत. पाकिस्तानने दिलेली फूस, कश्मीरच्या राजकीय पक्षांचे कट, केंद्र सरकारची परावलंबी आणि लाचार बनवणारी धोरणं अशी कारणं तर होतीच. त्याशिवाय स्थिती अशी होती की, कश्मिरी पंडित एका अर्थाने मुख्य कश्मिरी समाजापासून (जो ब-याच प्रमाणात मुस्लीम झाला होता) वेगळे पडलेले होते. ते एलिट असल्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये होते; आणि अन्य घटकांच्या शोषणाचेही कारण बनले होते. शिक्षण, आधुनिक विचार, संसाधनांवरील नियंत्रण अशा अनुकूलतांमुळे ते अधिक समृद्ध होत होते आणि अन्य समाज त्यांच्या तुलनेत विकासाच्या मार्गावर मागासलेला होता. ह्या मागासलेपणाला सकारात्मक म्हणजे रचनात्मक प्रकारे दूर करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे असंतोष वाढत गेला. आपण प्रत्येक समाजाच्या इतिहासात बघतो की एलिट वर्ग अनेक प्रकारे शोषणकर्ता बनतो. इथेही तीच स्थिती होती. कश्मिरी पंडित साक्षर असल्यामुळे ते गावातल्या मुस्लीमांना पत्र वाचून दाखवायचे; परंतु त्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबाकडून काम करून घ्यायचे. एका प्रकारे विकासाच्या बेटासारखी स्थिती बनली आणि रचनात्मक आंदोलनाच्या अभावी असंतोषाचं वादळ उभं राहिलं. प्रदीर्घ काळ शोषण अनुभवलेल्या समाजाने तेच शस्त्र ह्या पंडितांविरुद्धसुद्धा उगारलं. ते एलिट असले तरी संख्येने कमी होते. त्यामुळे हळु हळु त्यांच्यासाठी संकटं निर्माण झाली आणि त्यांना मग तिथून बाहेर पडावं लागलं.

ही चर्चा चालू असताना संस्थेच्या एका वरिष्ठ दिदींनी सांगितलेली आठवण आठवली. त्या कश्मिरी पंडित आहेत आणि त्यांच्या कुटुंबालासुद्धा एके काळी सक्तीने असहाय स्थितीत कश्मीरच्या गावांमधून परांगदा व्हावं लागलं. त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तेव्हा सर्वत्र शांती आणि सुख होतं. लोक सामान्य जीवन जगायचे. पण १९८९ नंतर त्यांना मायग्रेट व्हावं लागलं. नंतर एकदा १९९४ च्या आसपास त्या खो-यात गेल्या होत्या. लहानपणी ज्या गावांमध्ये त्यांचे प्रिय जन होते; ते आता नव्हते. त्यांची घरे उदास पडली होती. गांदरबल जिल्ह्यातल्या खीर भवानी मंदीरात त्यांचं जाणं झालं. त्यांच्या लहानपणी त्या मंदीरात पुजारी राहायचे आणि मुसलमान दुकानदार प्रसाद आणि दुध विकायचे. परंतु ह्या वेळी जेव्हा त्या तिथे गेल्या, तेव्हा मंदीर एकदम सुनं सुनं होतं. केवळ काही जवान मंदीराच्या रक्षणासाठी तिथे होते. खीर भवानी मंदीरात दुध अर्पण करण्याची प्रथा आहे; परंतु त्यांना दुधसुद्धा तिथे नेता आलं नव्हतं. न राहवून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांना मोठ्याने रडताना बघून एका जवानाने त्याच्या कँटिनमधून दुध आणून दिलं.

त्या दिदी सांगतात की, १९८९ नंतर जे झालं ते भयानक आपत्तीसारखं होतं. सर्व काही नष्ट झालं. परंतु त्यांना त्यामध्ये काही सकारात्मक गोष्टीसुद्धा दिसतात. त्या म्हणतात की, ह्याच दुर्घटनेमुळे आम्ही लोक बाहेरच्या जगामध्ये आलो; गावाच्या चाकोरीबद्ध विचारसरणीतून बाहेर पडलो. जम्मू, दिल्ली आणि अन्य ठिकाणी आम्ही हळु हळु प्रगती केली. नव्या काळाचे विचार आम्हांला मिळाले. चांगलं शिक्षण मिळालं आणि चांगल्या नोक-या मिळाल्या. अनेक लोक विदेशातही गेले. हे सगळं त्या मर्यादित विश्वामध्ये शक्यच नव्हतं. आज आमच्या लोकांजवळ मोठ्या प्रॉपर्टीज आहेत. इतकं कदाचित तिथे राहून शक्य होण्यासारखं नव्हतं. असो.

कॉलनीमध्ये बचतगटाचं एक कार्यालय आणि विक्री केंद्र आहे. नवीनच उभं राहिलं आहे. हे अथरूट वूमन एम्पॉवरमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत चालवलं‌ जातं. इथल्या महिला संस्थेच्या मदतीने हँडीक्राफ्ट, शिवणकाम, ब्युटी‌ पार्लर अशा विषयांमध्ये सक्रिय आहेत. सुविधांसाठी अजून सरकारकडे थोडं झगडावं लागतं. परंतु तरीही ह्या महिला जुन्या जखमा विसरून नवीन घर उभं करण्याच्या मार्गावर खूप पुढे निघाल्या आहेत. घरी परतणा-या काही कार्यकर्त्यांनी इथे थोडी शॉपिंगसुद्धा केली.

काही वेळ तिथे थांबून सगळे जण परत निघालो. परत येतानासुद्धा चांगल्या गप्पा झाल्या. दादाजी मुसलमान मित्रांबद्दल बोलले. ते म्हणाले, मुसलमान समाजामध्ये एक समाज म्हणून कित्येक गुण आहेत. समाज म्हणून ते नेहमी एकत्र असतात. आपल्या धर्माप्रती त्यांची श्रद्धा आणि दृढ विश्वास असतो. ते नेहमी कलेक्टिव्ह असतात. त्यांच्यात अंतर्गत संघर्ष जवळजवळ नसतो. समाजासाठी काम करणा-यांसोबत कोणी वैचारिक वाद घालत बसत नाहीत. एकतेची शक्ती त्या समाजाचा पाया आहे. दादाजींच्या बोलण्यातून एका गोष्टीकडे बघण्याचे किती सकारात्मक पैलू असतात हे दिसलं. हे शिकण्यासारखं आहे.

दुपारी औषधं एम्ब्युलन्समध्ये ठेवण्याचं काम झालं. आता डॉ. प्रज्ञा दिदी आणि डॉ. अर्पित कश्मीरला जात आहेत. त्यांना निघेपर्यंत दुपारचे दोन वाजले आहेत आणि आज रात्री त्यांना कुपवाडाला जायचं आहे. कुपवाडा जिल्हा श्रीनगरच्याही उत्तरेला १०० किलोमीटर आहे. पुलवामामधून बहुतेक हिलाल भाई त्यांना जॉईन होतील आणि रस्ता दाखवतील. . . आता रिपोर्ट आणि पाम्पलेट जवळजवळ तयार आहेत. आज प्रिंटर आणि पेज डिझायनरसोबत बसायचं आहे. लवकरच ते बनेल. परंतु हा 'जवळजवळ' शब्द अगदी अवघड आहे. आपण एखादी फाईल कॉम्प्युटरवर कॉपी करतो, तेव्हा ९९% कॉपी होऊनही वास्तवात ती कॉपी झालेली नसते! किंवा एखादा खेळाडू शतकाच्या अगदी जवळ पोहचतो; परंतु तरीही तो शतकापासून दूर राहतो. तशीच स्थिती आजही आहे. टेक्स्ट तयार आहे; परंतु फोटोज अजूनही टाकायचे आहेत. आता अडचण ही आहे की, फोटोज एकत्र उपलब्ध नाही आहेत. आणि असूसुद्धा शकत नाहीत. जम्मू आणि कश्मीर विभागाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बरंच काम झालेलं आहे. त्याची माहिती योग्य प्रकारे ठेवलेलीसुद्धा आहे; पण ती एका जागी उपलब्ध नाही. त्यामुळे ती एकत्र करण्यात अजून वेळ लागतोय.

आणि मला इथे येऊन अजून चार दिवसही झालेले नाहीत! खरं वाटत नाहीय, पण अजून चार दिवस व्हायचे आहेत. साहजिकच मला अनेकांकडून माहिती घ्यावी लागेल. ज्यांनी पहिल्यापासून सगळं काम बघितलं आहे; त्यांच्या सूचना घेऊन रिपोर्ट आणि पाम्पलेट बनवावं लागेल. त्यातच आजचाही दिवस जाईल. अर्थात् आता दोन्ही 'जवळजवळ' फायनल आहेत आणि आता प्रिंटर व डिजायनरसोबत बोलणं होईल. संस्थेद्वारे आजवर केलेलं मदतकार्य संस्थेशी संबंधित लोकांपर्यंत पोहचवायचं आहे.

दुपारी विदुषी दिदींसोबत खूप गप्पा झाल्या. अर्थात् त्याच जास्त वेळ बोलत होत्या. इंदौरहून येताना त्यांनी‌ तिथल्या कमिशनरला एक पत्र देऊन कळवलं की मी स्वत:च्या जवाबदारीने कश्मीर मदतकार्यासाठी जात आहे. त्या एकट्याच आल्या आहेत. सेवा भारतीसोबत संपर्क फक्त मिळाला होता. आल्यावर दादाजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अकाउंटसचं काम बघितलं. त्या वकील आहेत. त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांना आयुष्यामध्ये सर्वाधिक बोलणी दादाजींकडूनच खावी लागली. अर्थात् त्यांनी ते खूप एंजॉय केलं. त्यातून खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला. त्या इंदौरमध्ये नातेवाईकांसोबत राहतात. गेल्यावर परत येणार असं त्या म्हणत आहेत. आणि ताजी बातमी ही आहे की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्या परत सेवा भारतीमध्ये आल्या आहेत- ह्या वेळेस जास्त काळ थांबण्यासाठी. असे विशेष लोक ह्या प्रवासात सतत भेटत आहेत.

. . परत परत त्याच ड्राफ्टवर काम करणं कठिण वाटत आहे. अनेक वेळेस दादाजी लिहिलेलं काढायला लावतात, तेव्हा काही वेळेस रागसुद्धा येतो; पण थोड्याच वेळात त्यांचं म्हणणं समजतं. रिपोर्ट अगदी छोटा असला तरी त्यामध्ये सर्व गोष्टी आल्या पाहिजेत, हा त्यांचा विचार आहे. छोट्या गोष्टीसुद्धा अनेक वेळेस तावून सुलाखून काढाव्या लागतात. जसं जपानी लोक दोन पानांच्या करारासाठीसुद्धा अनेक दिवस काम करतात किंवा मानसशास्त्रज्ञ छोट्याशा घटनेचं प्रदीर्घ विश्लेषण करून त्यातलं सार मांडतात. . .

संध्याकाळी रोहितजींशी भेट झाली. रोहितजी कश्मीरचे आहेत आणि आता जम्मूला जॉब करतात. तेसुद्धा कश्मिरी पंडित आहेत. श्रीनगरमध्ये चालू असलेल्या कामापासून त्यांच्याशी ओळख झाली आणि आता तर चांगली मैत्री झाली आहे. ते सांगत आहेत की आता खो-यामधलं वातावरण बदलत आहे; श्रीनगरमध्ये सगळ्यांनी सहजपणे काम करणं शक्य झालं ही गोष्टसुद्धा सूचक आहे. कश्मीरच्या गावांमध्ये त्यांना लोकांनी स्वीकारल्याचा अनुभव आला. तिथे त्यांनी आरोग्य शिबिरामध्ये भाषांतराचं कामसुद्धा केलं होतं.

त्यांच्यासोबत जम्मूच्या रस्त्यांवर चालताना अनेक ठिकाणी आर्मीचे जवान दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मूलगत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर फायरिंग सुरू आहे. एका रस्त्यावर आर्मीच्या ट्रक्सचा मोठा काफिला जातो आहे. त्यांना विचारलं‌ तर त्यांच्यासाठीसुद्धा हे नवीन दृश्य आहे म्हणाले. हा काफिला जम्मूहून पश्चिमेच्या दिशेने जात आहे. . . सेनेबद्दल अभिमान वाटण्याचा हा क्षण आहे.

रोहितजी रिपोर्ट आणि पाम्पलेटसाठीही मदत करत आहेत. त्यांचा काँप्युटरसंबंधित जॉब करत करत ते काही वेळ ह्या कामासाठी‌ देत आहेत. आता प्रिंटर आणि डिजाईनिंगसाठीसुद्धा ते मदत करतील. त्यांच्या बोलण्यात आलं की, जर एका पूराच्या विपत्तीमध्ये मदतीचे इतके हात समोर येत असतील; तर कश्मीरमधलं वातावरण ठीक होणं ही मग अशी कुठली मोठी समस्या आहे! त्यांच्यामते हे अतिरेकी किंवा फुटिरतावादी लोक अगदी भित्रे अहेत; थोडे जरी लोक एकत्र उभे राहिले; तरी ते गार पडतील. खरोखर हिंसा किंवा बाह्य आवेश हा मनात असलेली भितीच दर्शवतो. जो आतमधून असुरक्षित असतो; त्यालाच बाह्य आक्रमणात जास्त रस असतो. असो.

म्हणतात ना की कधी कधी जे होतं‌ ते चांगल्यासाठीच होतं. कदाचित ह्या आपत्तीत देशातल्या लोकांनी आणि मिलिटरीने जी मदत केली; त्यामुळे तिथल्या लोकांचं थोडं मत परिवर्तन होऊ शकेल. . . असंच काहीसं एका कार्यकर्त्यांनीही म्हंटलं. त्यांनी म्हंटलं की, जेलम नदीमध्ये जितकी अवैध बांधकामं केली होती आणि नदीला दाबून जिथे अतिक्रमण केलं होतं; अगदी त्याच जागा नदीने साफ केल्या! कधी कधी वाईटातून चांगलं होतं ते असं.


बचतगटाचं केंद्र


सीमा सडक संगठन- मदतकार्याचे जीवनदूत!!

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर एका पूराच्या विपत्तीमध्ये मदतीचे इतके हात समोर येत असतील; तर कश्मीरमधलं वातावरण ठीक होणं ही मग अशी कुठली मोठी समस्या आहे! त्यांच्यामते हे अतिरेकी किंवा फुटिरतावादी लोक अगदी भित्रे अहेत; थोडे जरी लोक एकत्र उभे राहिले; तरी ते गार पडतील. खरोखर हिंसा किंवा बाह्य आवेश हा मनात असलेली भितीच दर्शवतो. जो आतमधून असुरक्षित असतो; त्यालाच बाह्य आक्रमणात जास्त रस असतो. >>>>>>
फार अंतर्मुख करायला लावणारे लिहिता आहात तुम्ही....

हे सारे लिखाण अनेकांसमोर येणे फार गरजेचे आहे .......

मार्गी,

>> थोडे जरी लोक एकत्र उभे राहिले; तरी ते गार पडतील. खरोखर हिंसा किंवा बाह्य आवेश हा मनात असलेली
>> भितीच दर्शवतो.

एकदा का घटनेतलं ३७० वं कलम रद्द झालं की उर्वरित भारतातून लोकं तिथे जाऊन अतिरेक्यांचे मनसुबे हाणून पाडू लागतील. नेमकं हेच भारतद्रोही लोकांना नकोय.

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद गामा पैलवान जी!! Happy

कलम ३७० एक मुद्दा आहे; पण ते फार महत्त्वाचं नाहीय. एक औपचारिकता आहे. त्यापेक्षा जास्त व्यापक बाब म्हणजे जनतेमध्ये परस्पर- संपर्क; अभिसरण; कम्युनिकेशन गॅप दूर होणे ही आहे. शेवटच्या भागांमध्येसुद्धा ह्या मुद्द्याला स्पर्श केला आहे. सर्व प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

खुलाशाबद्दल धन्यवाद, मार्गी! तुम्ही म्हणता तसा परस्परविश्वास निर्माण व्हायलाच हवा. ३७० हटवल्याने ही प्रक्रिया अधिक जोमाने होईल असा माझा अंदाज आहे. अर्थात, या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक जाणकार लोकं आहेत याची मला कल्पना आहे. Happy
आ.न.,
-गा.पै.