२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू क्षेत्रातील मदतकार्य
. . आज आपत्ती येऊन गेल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हे लिहित असताना कोणाला असा प्रश्न पडेल की, आता हे सर्व लिहिणं खरोखर आवश्यक आहे का? इतकी ह्याची गरज आहे का? ह्याची आवश्यकता आहे. कारण जम्मू- कश्मीर मदतकार्यामध्ये सहभाग घेताना अनेक गोष्टी बघता आल्या. ह्या गोष्टी समजून घेऊन त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.
हे लिहित असताना कश्मीरमध्ये काही ठिकाणी निदर्शनं होत आहेत. सेनेकडून केल्या गेलेल्या फायरिंगमध्ये काही दिवसांपूर्वी दोन तरुण मृत्युमुखी पडल्यानंतर अनेक लोक त्याविरुद्ध समोर आले. सेनेनेसुद्धा चूक मान्य केली आणि त्या सैनिकांवर कायदेशीर कारवाई केली. सीआरपीएफबद्दलही लोक नाराज आहेत. कश्मीरसाठी हे नवीन नाही. तिथे नेहमीच काही ना काही तणाव असतो. तिथल्या कश्मिरींना (जे स्टेट सब्जेक्ट आहेत) त्यांना हे विचारलं तर ते सांगतात की, ही रोजचीच बाब आहे. रोजच काही ना काही चालू असतं. कश्मीरसाठी ही गोष्टbusiness as usual सारखी आहे. पण तरीही अशा गोष्टी अस्वस्थ करून जातात.
८ ऑक्टोबरच्या सकाळी जम्मू अगदी शांत आहे. कालच्या तुफानी पावसाचं आकाशात काहीही चिह्न नाही. पण जमिनीवर अनेक खुणा दिसत आहेत. झाड पडलं आहे; अनेक ठिकाणच्या वस्तु विखुरल्या आहेत; खिडक्यांचे नुकसान झालेले आहे; बाहेरही अनेक वाहनांना नुकसान झालं आहे. पण आता वातावरण एकदम निरभ्र आहे. आज रिपोर्ट आणि पाम्प्लेटचं काम शक्यतो संपवायचं आहे. तसं ते जवळजवळ बनलेलं आहे; थोडे करेक्शन्स चालू आहेत. फोटो टाकायचे आहेत. सकाळच्या वेळेत ह्यावर दादाजींशी चर्चा झाली. जेव्हा अशा प्रकारचं काम होत असतं, तेव्हा काळजी घ्यावी लागते. मदतकार्याचे अनेक पैलू आहेत. जरी चार- पाच पानांचा रिपोर्ट असला, तरीही त्यामध्ये सर्व गोष्टी याव्या लागतात. त्यामुळेच त्यावर अजूनही काम चालू आहे. आणि काही माहिती अशी आहे जी रेडिली उपलब्ध होत नाही. त्यासाठी त्या त्या कार्यकर्त्याशी बोलून ती माहिती घ्यावी लागते. आणि जेव्हा जेव्हा रिपोर्टचा ड्राफ्ट बघितला जातो, तेव्हा तेव्हा नवीन मुद्दे व सूचना समोर येतात. त्यामुळे अनेक वेळेस रिवर्क करावं लागतं. ह्या कामामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत.
काही दिवसांपासून जम्मू क्षेत्रातील सीमेलगत असलेल्या भागांमध्ये फायरिंग चालू आहे. त्यामुळे काही गावांमधील लोकांना शिबिरांमध्ये राहावं लागत आहे. असाच एक भाग अरणिया सेक्टर आहे. आधीच तिथल्या लोकांना पावसाने पुरेसा त्रास दिला होता. आता त्यांच्या घरांजवळ गोळीबार होतो आहे. आज काही डॉक्टर अरणिया सेक्टरमध्ये जातील आणि तिथे आरोग्य शिबिर घेतील. लोकांना भेटतील व त्यांना धीर देतील.
सेवा भारतीच्या कार्यालयामध्ये एक काँप्युटर इन्स्टिट्युटसुद्धा आहे. तिथे अनेक कोर्सेस चालवले जातात. सकाळपासून तिथले विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली. कार्यालयात काम करणा-या कार्यकर्त्यांशीसुद्धा परिचय झाला. संस्थेच्या सचिव अनसूया मॅडम ह्यांच्याशीही बोलणं झालं. कोणाचा कसा परिचय करून द्यायचा हे दादाजींकडून शिकावं! कोणाचा परिचय करून देताना ते म्हणतात की ह्या इथल्या चौकीदार आहेत. कारण काय तर त्या दिदी तिथल्या ऑफिसवर लक्ष देण्याचं काम करतात. ते रविजींना साईकल मास्टर म्हणतात; कारण रविजी खरोखर ऑल राउंडर आहेत. ते सर्व कामे करतात- स्वयंपाक करणे, ऑफिस काम, सामान खरेदी करणे, मदतकार्यामध्ये लोकांना भेटणे, सरकारी अधिका-यांकडे जाणे, मोठी गाडी घेऊन लोकांना मध्यरात्री रिसिव्ह करणे किंवा ड्रॉप करणे इ. इ. सर्व कार्यकर्त्यांसोबत मैत्री होत आहे. रिपोर्टची माहिती गोळा करणं सुरू आहे. दुपार त्यातच गेली.
आता त्याच रिपोर्टवर परत परत काम करताना थोडं जड जात आहे. अनेक वेळेस वाटतं की रिपोर्ट तयार झाला. पण जेव्हा इतर लोक तो रिपोर्ट बघतात, तेव्हा त्यात अनेक बदल करावे लागतात; काही गोष्टी बदलाव्या लागतात. तेव्हा ते अवघड वाटतं. एक काम असतं जे एक घाव दोन तुकडे असं असतं. त्यामध्ये काही अडचण येत नाही. पण असं काम. . . त्यासाठी खूप धैर्य लागतं. त्याला अनेक वेळेस परत परत ठीक करावं लागतं. ही थोडी अडचण असली तरी एक गोष्ट नक्की आहे की, जितकं रिवर्क करावं लागत आहे, तितकेच ह्या कामाचे आणखीही पैलू समजत आहेत.
जम्मू क्षेत्रामध्येही आपत्तीमध्ये बरंच नुकसान झालं. तवी, चिनाब आणि अन्य नद्यांचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलं. उधमपूरमध्ये तर लँड स्लाईडसुद्धा झाला. तसं पाहिलं तर मानवी हानी जम्मू क्षेत्रामध्येच जास्त आहे. जम्मू क्षेत्रातील जम्मू, राजौरी, पूँछ आदि जिल्हेसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. राजौरी जिल्ह्याच्या नोशहरा गावामध्ये लग्नाला जात असलेल्या व-हाडाच्या बसला पुराचा फटका बसून सुमारे ४४ लोक ठार झाले होते. जम्मूमध्ये तवीवर बांधलेला पूल तुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने दिशा बदलली आणि पाणी गावांमध्ये शिरलं. अनेक गावांना मोठं नुकसान झालं. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मोठा फटका बसला. शेतक-यांना मोठं नुकसान झालं. सेवा भारतीने यथा संभव मदत केली. नंतर जम्मू क्षेत्राची अधिक जवाबदारी जम्मू राहत सेवा समितीकडे देण्यात आली आणि सेवा भारतीने कश्मीर क्षेत्राकडे जास्त लक्ष दिलं. जरी जास्त भर आरोग्य शिबिरांवर देण्यात आला असला, तरी कपडे, फूड पॅकेटसारखं सामानही पोहचवण्यात आलं. पूरानंतर येणा-या थंडीचा विचार करता अनेक गावांमध्ये ब्लँकेटससुद्धा वाटले गेले. ह्याबद्दल अद्ययावत माहिती आणि आजवरचे रिपोर्ट सेवा भारतीच्या फेसबूक पेजवर मिळू शकतील.
आज संध्याकाळचं जेवण आम्हांला मिळून बनवायचं आहे. संस्थेमध्ये सर्व काम मिळूनच केलं जातं. आज स्वयंपाकाची जवाबदारी आम्हा तीन- चार जणांवर आहे. प्रत्येकाने त्याला येत असलेल्या गोष्टीप्रमाणे काम वाटून घेतलं. मार्गदर्शन करायला रवी जी आहेतच. एकत्र स्वयंपाक करताना मोठी मजा येते. वेगवेगळ्या शैलींच्या मिश्रणाने स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार होईपर्यंत अरणियाला गेलेले डॉक्टर्स आणि कार्यकर्ते परत आले. त्यांनी सांगितलं की, तिथे शिबिर होत असल्याचं पाहून लोकांना आनंद झाला. आजसुद्धा फायरिंग झाली आणि त्यामुळेच हे शिबिर लवकर बंद करावं लागलं.
रात्री जेवताना अनुभवांची चर्चा रंगात आली. काही तरुण कार्यकर्त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. कश्मीरमध्ये देशाच्या अन्य भागांपेक्षा वेगळी स्थिती का आहे? ताण का होतो? अशा त्यांच्या प्रश्नांचं दादाजींनी समाधान केलं. दादाजींनी त्यांच्या माहितीसाठी संक्षेपात कश्मीरचा इतिहास सांगितला. स्वातंत्र्य- १९४७ आणि त्याच्या आधी असलेल्या स्थितीबद्दल ते बोलले. कश्मीर- मूलत: अध्यात्म साधना भूमी आहे. हे पूर्वी अन्य भागांप्रमाणे मानवी वस्तीचं क्षेत्र नव्हतं. कश्यप ऋषींच्या साधनेमुळे ह्याला कश्मीर नाव मिळालं. मध्ययुगीन कालखंडात इथे अनेक आक्रमण झाले आणि हळु हळू मूळ हिंदु असलेली जनता मुस्लीम बनली. एकोणविसाव्या शतकात महाराजा रणजितसिंहांच्या वेळेस एकदा कश्मीरचे लोक त्यांच्याजवळ पुन: हिंदु होण्याच्या उद्देशाने गेले होते. त्यावेळेस कश्मिरी पंडितांनी त्याला विरोध केला आणि असं केलं तर धर्म बुडेल असं ते म्हणाले. त्यामुळे ते लोक हिंदु होऊ शकले नाहीट आणि मुस्लीम लोकसंख्या वाढत एली आणि स्वातंत्र्याच्या वेळपर्यंत जम्मू- कश्मीरमध्ये मुस्लीम अधिक प्रमाणात होते. नंतर कश्मीरचे देशासोबतचे विलीनीकरण; तत्कालीन भारत सरकारने केलेल्या चुका, कश्मीरच्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आणि त्यांना लाचार करण्याचे केंद्र सरकारचे धोरण ह्यावरही चर्चा झाली.
कश्मीरच्या जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये आजही काही लोक भारताकडे शत्रूप्रमाणे बघतात. सेनेलाही शत्रू मानतात. परंतु हे पूर्ण चित्र नाही आहे. जम्मू कश्मीरमधल्या जम्मू क्षेत्रामध्ये वेगळा दृष्टीकोन आहे. जम्मू भाग भारतासोबत घट्ट जोडलेला आहे. बौद्ध बहुसंख्य असलेला लदाखसुद्धा भारतासोबत जवळून जोडलेला आहे. कश्मीर खो-यामध्येसुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये भारताबद्दल आत्मीयता आहे. आणि एका बाजूने बघितले तर जिथे कुठे कटुता आहे; कडवा भाव आहे तिथे तो फक्त संवादाच्या अभावी आहे. जर लोक एकमेकांना भेटले नाहीत; एकमेकांना जाणून घेतलं नाही, एकमेकांना समजून घेतलं नाही तर हळु हळु अंतर वाढणारच. आणि पूर्वग्रह व मिसकन्सेप्शन्स दोन्ही बाजूंना आहेत. किती तरी भारतीय असे असतील ज्यांच्या मनात कश्मिरींबद्दलही पूर्वग्रह असतील. जसे नाही का आपल्यातले अनेक लोक नॉर्थ ईस्टच्या बंधू- भगिनींना चिनी म्हणून बघतात. त्यामुळे ह्या समस्येचं मूळ कारण संवाद कमी होणे आणि एकमेकांशी कमी मिसळणे हे आहे आणि ह्यावरचं उत्तरही त्याच सूत्रात आहे.
हिंदु- मुस्लीम हा फरक तर फार वरवरचा आहे. कोणाकडेही धर्माच्या चष्म्यातून बघणे ही परिपक्व विचारधारा नाही आहे. खरं तर धर्म हा त्या अर्थाने फक्त लेबलसारखा आहे. जशी कोणाकडे एखादी डिग्री असते. कोणी बीए असतो तर कोणी दहावी पास असतो. पण जीवन तिथे थांबत नाही. प्रवास पुढेही जातो. आता एखाद्या व्यक्तीजवळ डिग्री असेल, त्याच डिग्रीने त्या व्यक्तीकडे बघता येत नाही. त्यामुळे हिंदु घरात जन्म झाला असेल किंवा कोणी मुस्लीम वातावरणामध्ये वाढला असेल हा फरक वरवरचा आहे. सत्य त्याहून गहन आहे. माणूस असणं हेच मोठं सत्य आहे. जसं आपण एखाद्या दरीमध्ये असलो तर आपल्याला उंचीवरचे शिखर दिसू शकणार नाही. जसं जसं आपण उंचावर चढू, तसं दूरवरचं शिखर हळु हळु दृगोच्चर होतं. त्यामुळे खरा मुद्दा लेबलचा नसून दृष्टीचा आहे. आणि ह्या मार्गावर एक एक पाऊल पुढे जाण्याचा आहे. कितीही तणाव जरी असला आणि कितीही मतभेद; कटुता असली; तरी युवा पिढीमध्ये हा डोळसपणा निश्चितच दिसतो. . .
. . . विस्ताराने चर्चा झाल्यानंतर सर्वांच्या मनातल्या अशा प्रश्नांना चांगलं उत्तर मिळालं. जेवणानंतर गुजरातच्या डॉ. प्रज्ञा दिदींनी आणलेल्या ताकाचा सर्वांनी आस्वाद घेतला. रिलिफ कार्य गंभीर नक्की आहे; पण ते करताना प्रत्येक वेळी गंभीर चेहरा ठेवण्याची गरज नाही. हसत खेळतही ते करता येऊ शकतं आणि असंच इथे चालू आहे. दादाजींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते वातावरण खूप रिलॅक्स ठेवतात. मध्ये मध्ये हास्य विनोद चालू असतात; मस्करीत चिमटेसुद्धा काढले जातात. त्यामुळे थकलेल्या जीवांना ऊर्जा मिळते. आज रात्रीचं आकाश एकदम निरभ्र आहे. पण कालही दहा वाजेपर्यंत ते असंच तर होतं आणि मग अचानक तुफानी पाऊस आला. पण आज रात्री उशीरापर्यंत वातावरण शांत आहे. . .
सेवा भारतीच्या प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने लिहिलेले वाक्य
पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
वा खुप छान आहे हा भाग
वा खुप छान आहे हा भाग .............
सत्य त्याहून गहन आहे. माणूस
सत्य त्याहून गहन आहे. माणूस असणं हेच मोठं सत्य आहे. जसं आपण एखाद्या दरीमध्ये असलो तर आपल्याला उंचीवरचे शिखर दिसू शकणार नाही. जसं जसं आपण उंचावर चढू, तसं दूरवरचं शिखर हळु हळु दृगोच्चर होतं. त्यामुळे खरा मुद्दा लेबलचा नसून दृष्टीचा आहे. आणि ह्या मार्गावर एक एक पाऊल पुढे जाण्याचा आहे. कितीही तणाव जरी असला आणि कितीही मतभेद; कटुता असली; तरी युवा पिढीमध्ये हा डोळसपणा निश्चितच दिसतो. . . >>>>> फारच सुरेख लिहिता तुम्ही.....
हे सर्व भाग वाचताना आम्हालाही नवनवीन दृष्टी मिळत आहे .... मस्त ....
मार्गी, >> खरं तर धर्म हा
मार्गी,
>> खरं तर धर्म हा त्या अर्थाने फक्त लेबलसारखा आहे. जशी कोणाकडे एखादी डिग्री असते. कोणी बीए असतो तर
>> कोणी दहावी पास असतो. पण जीवन तिथे थांबत नाही. प्रवास पुढेही जातो.
सहमत आहे. म्हणूनच पाकिस्तान हा वेगळा देश काढणे ही ऐतिहासिक घोडचूक आहे. तिचे परिणाम काश्मिरी हिंदूंसकट आपण सारे अजूनपर्यंत भोगतो आहोत.
आ.न.,
-गा.पै.