कॅलिफोर्निया २०१५ : (३) लॉस एंजेलिस

Submitted by मामी on 31 July, 2015 - 02:04

आधीचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे
कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील

३ जून. लॉस एंजेलिसच्या LAX एअरपोर्टवर सामानसुमानासकट बाहेर आलो. टर्मिनलच्या बाहेरच फ्लाय-अवे बस मिळते असं गृहपाठात कळलंच होतं. सगळ्या शटल बसेस (म्हणजे कार रेंट केली असेल तर त्या त्या रेंटल कंपनीच्या कारतळावर घेऊन जाणार्‍या, वेगवेगळ्या हॉटेलच्या, विमानतळाहूनच डिस्नीला जाणार्‍या लोकांसाठी डिस्नीलँड रिझॉर्टसच्या वगैरे वगैरे) थांबण्यासाठी प्रत्येक टर्मिनलबाहेर एक जागा ठरवून दिलेली. तिथं थांबायचं, आपली शटल आली की त्यात बसायचं. आम्ही फ्लाय-अवेची वाट बघत थांबलो. त्यावेळी लक्षात आलं की सगळ्यात जास्त बसेस आहेत त्या - सेपुलवेडा नावाच्या ठिकाणी जाणार्‍या! त्यात बसणार्‍या मंडळींकडे उगाचच जरा संशयानी बघितलं. Wink Proud

आमची फ्लाय-अवेही लगेच आलीच. आमच्या नशिबानं ती आमच्या बिल्डिंगसमोरच उभी राहणार होती. संध्याकाळच्या एलेच्या ट्राफिकमध्येही तिनं आम्हाला पाऊणतासात हॉलिवुड बुलेवार्डच्या आमच्या नव्या घरी आणून सोडलं. घरमालकाच्या वतीनं एक स्त्री हजर होतीच आमची वाट पहात. घराची ओळख, अपार्टमेंटमधल्या सोई, कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची वहिवाट, अपार्टमेंट कॉम्लेक्स मधल्या सोई आणि बाहेर पडायचे रस्ते वगैरे तिनं दाखवले आणि ती गेली.

हे बाहेर पडायचे रस्ते लवकरच उपयोगी पडले. आल्याच्या साधारण तिसर्‍या दिवशीची गोष्ट. जेट लॅग पूर्ण उतरला नव्हता त्यामुळे दुपारी सगळेजण अंथरुणात लोळत, पेंगत होतो. आणि अचानक बिल्डिंगचा फायर अलार्म वाजायला लागला. घोषणा ऐकू यायला लागली की "बिल्डिंगमध्ये कुठेतरी आग लागली आहे. बाहेर पडा आणि लिफ्ट न घेता जिन्यानं खाली उतरून जा." झोपाळलेल्या डोक्यात ही सुचना जाईपर्यंत आणि त्यानंतर जरा बरे कपडे पटापट चढवून, पासपोर्टस, पर्सेस, मोबाईल्स, लॅपटॉप वगैरे गोळा करून घराबाहेर पडायला फारतर दीड मिनिट लागलं असेल पण मनावर प्रचंड दडपण यायला लागलेलं. बाहेर पडलो तर कुठे काही धूर दिसत नव्हता किंवा वासही येत नव्हता. बहुधा चुकून झालेला अलार्म असणार असा संशय आलाच. पण तरीही टेन्शन होतं. लांबलचक कॉरीडॉरच्या एका टोकाला गेलो तर ते दार उघडेना. धावत पुन्हा दुसर्‍या टोकाला गेलो, तिथेही दार उघडेना. मग रितसर भिती वाटली. पुन्हा एकदा ट्राय केला अन उघडलं एकदाचं दार. खाली आलो आणि बिल्डिंगमधल्या इतर मंडळींबरोबर बसलो. फायरब्रिगेडच्या गाड्या आल्या, सेक्युरिटीबरोबर काहीतरी गुफ्तगु केलं आणि फॉल्स अलार्म आहे हे डिक्लेअर झाल्यानं आम्ही सगळे पुन्हा आपापल्या घरी गेलो. अवघं १५-२० मिनिटांचं नाट्य! पण त्यानंतर फायरब्रिगेडचा सायरन वाजला की जीव धसकायचा!

घर हॉलिवुड बुलेवार्डवरच असल्याने घरातून बाहेर पडून उजवीकडे सरळ चालायला लागलं की पायाखाली दिसायचा सुप्रसिद्ध Walk of Fame. याच रस्त्यावर अनेक फेमस थिएटर्स, ऑस्कर सोहळा जिथे भरवला जातो ते कोडॅक (आताचं डॉल्बी) थिएटर, त्याबाहेर हॉलिवुडी सिनेमातील कॅरॅक्टर्सचे पोशाख करून उभे राहिलेले लोकं, मधल्या बिल्डिंगच्या मागे दिसणारं Hollywood Sign असं सगळं सामावलेलं. सर्व प्रकारची रेस्टॉरंट्सही चिक्कार होती. एक ट्रेडर जोजही अगदी जवळ होतं. घरा समोरच सबवेचं स्टेशन होतं. मोक्याची जागा होती खरी.

गृहपाठात घोकल्याप्रमाणे, नेटवर व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे स्टेशनवर जाऊन माणशी एक अशी ३ TAP cards काढली आणि त्यांत ७ दिवसांचा मेट्रो पास भरून टाकला. आता आम्ही सगळ्या मेट्रो ट्रेन्स आणि बसनं ७ दिवस अमर्याद फिरायला मोकळे होतो. शिवाय ११ नंबरची बस तर होतीच बरोबर! मात्र, एले जर केवळ ३-४ दिवसांत बघायचं असेल तर सरळ हॉपऑन हॉपऑफ बस करणं योग्य.

३ जून ते १० जून आम्ही या पहिल्या अपार्टमेंटमध्ये होतो. या मुक्कामात युनिव्हर्सल स्टुडिओ, सांता मोनिका बीच, डाऊनटाऊनचा फॅशन डिस्ट्रिक्ट, द ग्रोव आणि इतर काही मॉल्स, मायकेल्सच्या दुकानात घालवलेले ३ तास आणि त्यातील वस्तूंना दिलेला उदार आश्रय, दिसामाजी एकदा तरी ट्रेडर जोजला भेट देणे आणि हॉलिवूड बुलेवार्डवर फिरायला जाणे अशा टवाळक्या केल्या. ११ जूनला या घराला टाटा करून डिस्नी रिझॉर्ट मध्ये मुक्काम हलवायचा. मग तसंच पुढे लास वेगास, ग्रँड कॅनियन करून १० दिवसांनी पुन्हा एलेला यायचं होतं. बरोबर एक मोठ्ठी सूटकेस, दोन कॅबिन बॅग्ज आणि दोन बॅकपॅक्स होत्या. मध्येच आणखी एक छोटी स्ट्रोलर बॅग या ताफ्यात सामिल झाली. हे इतकं सामान सगळीकडे नाचवण्यापेक्षा बस्केकडे ठेवण्याचं ठरवलं. आधी एक मोठी बॅगच फक्त ठेवणार होतो. पण बस्केनं एक बोट पुढे केलंय असं बघून आख्खा हात खेचला आणि तिन्ही मोठ्या बॅगा तिच्या सुपुर्द केल्या. त्यानिमित्तानं तिच्या घरी जाऊन साचीखि, दीपचे सामोसे, लाडू आणि कॉफीही रिचवून आलो. बस्के आणि तिच्या आईबाबांशी मस्त गप्पा झाल्या. आता केवळ बॅकपॅकिंग!!!

एलेमध्ये अवतीर्ण झाल्यावर काही दिवस जाऊ दिले आणि मग जेटलॅगबिग गेल्याची खात्री पटल्यावर युनिव्हर्सल स्टुडियोचा घाट घातला. नेटवर वाचल्यावर इथे सोमवारी किंवा मंगळवारी जाणं उत्तम असं कळलं. मग सोमवारी संध्याकाळी दुसर्‍या दिवशीची तिकिटं बुक केली. नेटवरच वाचल्याप्रमाणे सक्काळी गेट्स उघडण्याआधी जाऊन उभे होतो. त्यामुळे निदान सकाळच्या अर्धा दिवसांत तरी गर्दी बर्‍यापैकी कमी होती. सगळ्या राईडस करता आल्या. काही काही तर दोनदाही केल्या. धम्माल आली.

या मुक्कामात पुढची काही बुकिंग्ज केली. सगळ्यात पहिले डिस्नीलँड! खरंतर डिस्नीला जायचं तर शनिवार-रविवार टाळून जायला हवं. पण आमचा पुढचा प्रोग्रॅम '१८ तारखेला यावापाई लॉज' या क्लॉजमुळे मर्यादित होता. त्यामुळे शेवटी ११ ते १४ जून ( गुरुवार ते रविवार) असा नेमका डिस्नीचा प्रोग्रॅम ठेवावा लागला. एलेच्या डिस्नीलँडमध्ये असलेल्या तीन हॉटेल्सपैकी जे मोक्याचं आणि सुंदर हॉटेल आहे त्यात खोल्या रिकाम्या नव्हत्या. पण पॅराडाईज पिअर हॉटेलात मिळाली एक रूम. रुममधल्या खिडकीतून कॅलिफोर्निया अ‍ॅडव्हेंचर पार्कचा मस्त देखावा! हॉटेलपासून चालत ७व्या मिनिटाला डिस्नीलँड अथवा कॅलिफोर्निया अ‍ॅडव्हेंचर पार्कला जाता येत होतं. आम्ही दोन्हीही पार्कची तिकिटंही ऑनलाईन काढून टाकली.

अन एका शुभसकाळी 'अहो आश्चर्यम' घडलं. ग्रँड कॅनियनमधल्या अजून एका लिंबूटिंबू लॉजचं (Maswik Lodge) १९ तारखेचं बुकिंग मिळालं. अहाहा!!!!! मग डिस्नीलँड असलेलं अनाहिम गाव ते लास वेगास अशी जाणारी बस शोधली आणि Lux Bus America चं जाण्यायेण्याचं बुकिंग केलं. ही बस लास वेगास मध्ये Harrah's नावाच्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये आपल्याला घेऊन जाते आणि परत येतानाही तिथूनच उचलते. हे बुकिंग झाल्यानंतर मग हातासरशी लास वेगासच्या हॉटेलचंही बुकिंग करून टाकलं. लास वेगासला बक्कळं होटेलं त्यामुळे तिथल्या बुकिंगची काळजी नव्हती. Harrah's हॉटेलपासून जवळच असलेलं, स्ट्रीपच्या मध्यवर्ती विसावलेलं, माझ्या आवडत्या Ocean's Eleven सिनेमाच्या कथेत आलेल्या आणि नाचत्या कारंज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेलाजिओमधे एक रूम ३ रात्रींकरता बुक केली. ग्रँड कॅनियनमधून परत आल्यावर एक रात्र पुन्हा लास वेगासला मुक्काम करणार होतो. त्याकरता मग सोईचं पडावं म्हणून Harrah's मध्येच रूम बुक केली.

शिवाय, दुसर्‍या टप्प्याकरता एलेची काही मोठी घरं हेरून फेवरीट लिस्टमध्ये टाकून ठेवली होती. आधीच्याच एरियातली घरं होती ती. पहिल्या मुक्कामाच्या शेवटी शेवटी जेव्हा बहिण २९ जूनला एलेत येऊन आम्हाला जॉईन होणार हे ठरलं तेव्हा घर बुक करायला घेतलं. एव्हाना, काही घरं ऑलरेडी बुक झाली होती म्हणून आमच्याकरता उपलब्ध नव्हती. एका घरमालकिणीनं तिच्या ३ मांजरांची काळजी घेण्याचं आवाहन केलं म्हणून आम्ही ते गाळलं. एक खूपच महाग वाटलं त्यावर काट मारली. करता करता एक सुरेख, ४ बेडरूमचं घर आमच्याकरता उरलं. ते बुक केलं. आता घोळ असा होता की मधल्या काळात हे घर आम्हाला हवं त्या सर्व तारखांसाठी उपलब्ध नव्हतं. आम्ही २१ जूनला एलेला परत येणार होतो आणि हे घर आम्हाला २५ तारखेपासून मिळणार होतं. मग २१ ते २४ डाऊनटाऊनमधिल कोणत्यातरी हॉटेलात राहून तिथला भाग बघून टाकायचा असं ठरवलं. लक्सबस अमेरिका थोडे जास्त पैसे भरल्यास डाऊनटाऊनपर्यंत सोडणार होती. डाऊनटाऊनच्या हॉटेलातलं बुकिंग अजून केलं नव्हतं.

एलेमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टनं बरंच फिरलो. हाताशी सतत फोनवरचा नकाशा, जीपीएस गरजेचा. एक अ‍ॅपही आहे तिथल्या पब्लिक ट्रान्स्पोर्टचं. ते ही डाऊनलोड करून घेतलं होतं. थोडं फार चुकत माकत का होईना, हिंडलो. कुठेही गेलं तरी भारतीय पब्लिक दिसलं की मराठी ऐकू यायचंच. आपण मराठी लोकं भारीच भटके!

एले खादाडी : ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, प्लम्स, अ‍ॅप्रिकॉट्स, ब्लॅकबेरीज ढीगानं खाल्ली. एकदम फ्रेश आणि चविष्ट. केळ्यांना मात्र काही चव नाही हां. चविष्ट केळी लास वेगासला मिळाली. आमच्या घराच्या आजूबाजूला सर्व प्रकारची चिक्कार रेस्टॉरंटस होती. लेकीनं फक्त सुशी खाण्याचं व्रत घेतलं होतं. मी फक्त सीफूड, चिकन खात होते. नवरा जितकं शक्य होईल तितकं इंडियन खात होता. तिघांच्या तीन तर्‍हा! पण जमवलं कसंतरी. Happy हॉलिवुड बुलेवार्डवरच एक वेगास सीफूड बफे नावाचं रेस्टॉरंट आहे. हाSSSSS भला मोठ्ठा स्प्रेड. तिथे दोनदा जेवलो.

डिन्सीलँडकरता एले सोडलं तेव्हा लास वेगास, ग्रँड कॅनियन आणि पुन्हा लास वेगासची बुकिंग्ज झाली होती. एलेमध्ये परत आल्यावर मधले ४ दिवस सोडले तर एलेच्या पुढच्या टप्प्यातलं घर बुक झालं होतं.

बाकी राहिलेलं ठळक बुकिंग : एलेच्या डाऊनटाऊनमधलं हॉटेल, पीसीएच वरच्या दोन ठिकाणची हॉटेल्स, पालो आल्टो जवळपास घर, योसेमिटी नॅशनल पार्कातलं बुकिंग, सॅन फ्रान्सिस्कोचं बुकिंग. कार रेंटिंगही बाकी होतं. ते बहिणीच्या गळ्यात मारलं. हो, जी गाडी चालवणार तिनंच वाहन निवडावं नाही का?
(क्रमशः)

पुढचे भाग -
कॅलिफोर्निया २०१५ : (४) डिस्नीलँड, लास वेगास, ग्रँड कॅनियन
कॅलिफोर्निया २०१५ : (५) पुन्हा एकवार एले
कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे
कॅलिफोर्निया २०१५ : (७) लॉस आल्टोसचा मुक्काम
कॅलिफोर्निया २०१५ : (८) सॅन फ्रान्सिस्को

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं. आधीचे दोन भाग सुद्धा वाचले आत्ताच. तुमच्या नियोजनाचं, प्लॅनिंग खरंच कौतुक वाटलं. खूप छान लिहिताय. पुढच्या भागाची वाट बघतेय.

अत्यंत उपयुक्त माहीती!
बस्केकड़े baga ठेवण्याची टीप भारी...;)

काय मस्तं डिटेल्स लिहितेयस.
एकदम उपयुक्त!
माझी मात्रं 'किती खर्च होईल' असा विचार करण्यापर्यंतच मजल जाईल.
Happy

Lol वत्सला अवश्य ठेव गं बॅगा.. फक्त भरपूर वेळ काढून गप्पा मारायला यायला पाहीजे. Happy

मस्त लिहित आहेस गं मामी! तुमच्यासारखे एकदा फिरून पाहिले पाहिजे. Happy

असंच अनियोजित, पण भरपूर डेटा रिसर्च करून पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरायला आवडतं. हाताशी वेळ असेल तर १-२ दिवस फक्त निरुद्देश बस/ ट्रेन/ स्ट्रीट कार (ट्राम) यातून नकाशा हाताशी ठेवून भटकायला प्रचंड आवडतं. वीक डे मध्ये लोंढे/ गर्दी/ ट्राफिक हे तर कायम नॉसट्याल्जिक करतात. गुड गोइंग वाचतोय Happy

बाप रे! इतकं सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट ने फिरता येते असे मला अमेरिकेत राहून पण माहित नव्हतं / वाटलं नव्हतं Happy
गाडी हातात नसेल तर अगदी हॅन्डॅकॅप्ड वाटून घ्यायची सवय आहे !! Happy

एल ए ला मेट्रो आणि बस दोन्ही नी फिरलो आहे. ठीक ठाक आहे तसं. दूर दूर जायचं असेल तर गाडी पेक्षा तेच प्रिफर करेल मी पण Lol

हो. एलेचं पब्लिक ट्रान्स्पोर्ट नक्कीच चांगलं आहे. पण ग्रीन लाईन, ऑरेंज लाईन, रेड लाईन अशा अनेक बसेस. कोणत्या डायरेक्शनला जाणार त्यानुसार त्यांचे नंबर, आठवड्याच्या कोणत्या दिवशी किती वेळ सुरू राहणार वगैरे वगैरे असे अनेक इश्शूज आहेत. सगळ्या गोष्टींचा सराव होईपर्यंत बरंच होमवर्क करावं लागतं. पण तक्रार नाही. Happy

आताच तिन्ही भाग वाचून काढले . टिपिकल प्रवास वर्णनापेक्षा वेगळ आहे हे लिखाण
तुझ्या रोचक आणि खुसखुशीत शैलीतल लिखाणवाचायला मजा येतेय
वर अमित म्हणतोय तस अनियोजित भटकायला आवडत
येऊ दे पुढचे भाग

नियोजन नाही नाही म्हणताही तू भरपूर अभ्यास केलेला दिस्तोय.. पी एच डी ची डिग्री तुला मिळेल बाई, या संशोधनावर Happy
मस्त मज्जा येतीये वाचायला.. बाकी एल ए ला पब्लिक ट्रांसपोर्ट ने फिरणं .. वॉव, ग्रेट डिसकवरीये ही..

सेपुलवेडा....... तुझी कमेट.. Rofl