बायोइंजिनिअरिंग- वाळा- खस गवताची लागवड - Landslideसाठी प्रतिबंध

Submitted by अपराजिता on 20 July, 2015 - 12:56

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला , पूर येऊ लागले की त्याच्या सोबतीने भूस्सखलन होणे, दरडी कोसळणे , भूघसरण होणे म्हणजेच Landslide होणे ह्या प्रकारच्या आपत्तीही तोंड वर काढू लागतात.

नुकतीच रविवारी दिनांक १९जुलै २०१५ ला मुंबई-पुणे एकस्प्रेस हायवेवर दरड कोसळून सुमारे ३ - ४ तास वाहतूक बंद ठेवावी लागली अशी बातमी वाचनात आली.

त्यापूर्वी ७जुलै २०१५ रोजी वर्तमानपत्रात सोमवारपासून उत्तर बंगालमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दार्जिलिंगमधील कलिम्पोंग आणि मिरिक येथे भूस्खलन झाले. दार्जिलिंग - सिक्कीमला देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (एनएच) 55 वर देखील दरड कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली आहे. संततधार पावसामुळे जमिनीची धूप होऊन दार्जिलिंग परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी रात्री १जुलै २०१५ ला सुमारे ३८ जणांचा बळी गेला आहे. दार्जिलिंगमध्ये २५ ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १० व ५५वरील वाहतूक विस्कळ‌ित झाली. ही बातमी वाचली. आणि त्यानंतर NIDM ( National Institue of Disasater Management) मधील Geo Hazards भागाचे मुख्य आणि अध्यापक (Professor) असणार्‍या तञ व्यक्तीचे मत वाचण्यात आले ज्यात त्यांनी Landslide होण्यामागची कारणमिमांसा केली होती आणि Landslide थोपविण्यासाठी जमिनीची मशागत करून Vetiver grass ची लागवड केल्यास प्रतिबंध होऊ शकतो असे मत व्यक्त केले होते ज्यामुळे मनात जिज्ञासा दाटली की निसर्गाच्या प्रकोपाला एक साधेसुधे गवत कसा काय प्रतिकार करून थोपवू शकते.

पण त्याआधी दरड कोसळणे किंवा Landslide होण्यामागची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. साधारणपणे ढोबळमानाने डोंगर किंवा टेकडी ही त्रिकोंणी आकाराची असते. ह्यातील भूमध्य स्थिती नीट असते तोवर घसरण होण्याची शक्यता नसते. पण जेव्हा कोणत्याही बाजूच्या पायाकडची जमीन किंवा माती ही पकड सैल झाल्याने घसरू लागते तसे भूमध्याची जागा बदलते आणि संपूर्ण वरचा भाग खाली कोसळू लागतो.

भूस्सखलन होणे म्हणजेच दरड कोसळणे किंवा भूघसरण होणे . धो धो पडणार्‍या पावसात साचलेले पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहते आणि पाण्याच्या जोराच्या वेगाने तेथील भुसभुशीत झालेली मातीही वाहू लागते. अशा वेळी मातीची पकड कमकुवत वा ढिली पडली की मोठा भूभाग घसरून पडण्याची शक्यता वाढते , ज्यामुळे मातीचे ढिगारे वा दरडी कोसळून पडण्याची भीती वाढते, ज्याच्या प्रचंड द्बावाखाली लोक चेंगरून मरू ही शकतात. त्यामुळे अशा दरडी कोसळण्याच्या संभाव्य शक्यता असलेल्या जागी जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण अत्यंत गरजेचे असते.

आपण सारे जाणतो की आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इत्यादींवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी जमिनीची धूप होण्याबाबत अत्यंत संवेदनानशील आहेत.

मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. अशा परिस्थीतीत Vetiver grass ची लागवड केल्यास landslide म्हणजेच दरडी कोसळणे ह्या नैसर्गिक आपत्तीला आळा घालता येऊ शकतो हे वाचून मोठे कुतुहल दाटले आणि Internet search केले असता चक्क आ वासण्याची परिस्थीती झाली.

Vetiver grass म्हणजे चक्क आपले वाळा किंवा खस म्हणून ओळखले जाणारे गवत बरे का !!!

Vetiver 
Grass_1.jpg

महाराष्ट्रातील नागपूर , विदर्भ भागांमध्ये कडक उन्हाळ्यापासून संरक्षण म्हणून वाळ्याचे पडदे खिडक्या-दारांना लावतात. वाळ्याची जुडी माठातल्या पाण्यात ठेवल्यास थंड , मधुर सुवासाचे पाणी पिण्यास मिळते. उन्हाळ्यात वाळ्याचे सरबत ही मोठ्या प्रमाणात वापरले जाते अशी साधारण माहिती बहुतेकांना असते.

Vetiver Grass.jpg

Chrysopogon zizanioides हे शास्त्रीय नाव असलेले Vetiver grass म्हणजेच वाळा किंवा खस गवत, ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच आहे. Vetiver हा मूळ तमिळ शब्दापासून उत्पन्न झाला. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भारतात "खस गवत" ह्या नावाने परिचीत असलेले हे गवत.
वाळा खस गवत - या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले आहे. लागवड स्लिप्स’पासून केली जाते.
गवती बांध या तंत्रामध्ये समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतीची लागवड केली जाते व त्याचा बांधासारखा उपयोग करता येतो. याकरिता प्रामुख्याने मारवेल-८, मद्रास अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करतात.

Slope 12.jpg

वाळा लागवड :
वाळ्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत, त्याचबरोबरीने या वनस्पतीमध्ये माती धरून ठेवण्याची असलेली क्षमता लक्षात घेता जल आणि मृद संधारणासाठी मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास निश्‍चितच उपयुक्त ठरू शकते. भारतामध्ये उत्तर प्रदेशात जंगलांमधून व तमिळनाडू, केरळ इ. राज्यांत वाळा लागवड करून तेलनिर्मिती केली जाते. वाळा या सुंदर दिसणाऱ्या गवताची मुळे काहीशी कंदवर्गीय असतात, त्यांची वाढ माती, हवामान यांच्या अनुकूलतेप्रमाणे 10-35 सें.मी.पर्यंत होते. हे गवत दीड ते दोन मीटरपर्यंत वाढते. पाने अरुंद, चपटी, चकचकीत, तेलकट असतात. या बहुवर्षायू गवतास वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते व उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 1000 ते 2000 मि.मी. पाऊस आणि 21 ते 43 अंश से. तापमानाच्या ठिकाणी, हलक्‍या ते मध्यम जमिनीत हे गवत चांगले वाढते. त्याचप्रमाणे भारी जमिनीत, मोकळ्या पडलेल्या, खार, चढ - उताराच्या, नदीकाठच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही याची लागवड होऊ शकते.

वाळा - खस गवत हे बहुवर्षायू म्हणजेच चिरस्थायी स्वरूपाचे आहे म्हणजे प्रदीर्घ काळ टिकणारे, अत्यंत टिकाऊ व चिवट गवत आहे. वणवा, थंडी इ.साठी हे गवत कणखर मानले जाते. म्हणूनच या गवताची लागवड मृद, जल संधारणासाठी उत्कृष्ट समजली जाते. पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे.
वास्तविक पहाता बायोइंजिनिअरिंग मध्ये ह्या vetiver grass चा उपयोग फिजी, इटली, हैती, जावा , साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज इत्यादी बरेच देश भू-संधारणासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वात पहिली सुरुवात जागतिक बँकेने आपल्या भारतातच १९८० च्या सुमारास केली आणि त्यानंतर इतर सर्व देशांत त्याचा उपयोग सुरु झाला.

दुर्दैवाने आपल्या भारतात खस गवत किंवा वाळा ह्याच्या बहुविध उपयोगाचे महत्त्व अजूनही जास्त परीचयाचे नाही असे काही संस्थाच्या निष्कर्षातून सामोरे आले आहे.

आपल्या देशात २०१३ मध्ये कोईमतूर नेहरू आर्टस आणि सायन्स सेंटरने निलगिरी पर्वतांच्या भागातील जमीनीची धूप थांबविण्यासाठी ह्याचा वापर केला होता. तसेच ह्याच प्रोजेक्ट्चा भाग म्हणून उटी-कोटगिरी हायवे वरील कोडप्पामुड , उटी- मेट्टुपलायम नॅशनल हायवे येथील मरापालम आणि कलहट्टी येथे खस गवताची लागवड केली होती. *१

तसेच कोकण रेल्वे येथे सुध्दा दरडी कोसळून होणारे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी ह्याच vetiver grass चा उपयोग केला होता.

Dr. Paul Truong, Director, Vetiver Network International, Brisbane, Australia ह्यांनी Samford Valley, Brisbane, Australia येथील Landslide ही Vetiver Grass लावून कशी थांबविता येऊ शकते हे आपल्या Photo essayने सिध्द केले आहे.*२

Slope cultivation.jpg

खरे तर २०१० मध्ये आसाम सरकारने आसाम मधील ब्रम्हपुत्रा नदीचे भूस्सखलन थांबविण्यासाठी जर्मन Expert Team बोलाविली होती. *६
पण शेवटी एका भारतीयानेच ह्याचे उत्तर शोधले आणि तो भारतीय म्हणजे शंतनु भट्टाचार्य, आसाममध्ये PWD मध्ये काम करणारा.

Brahmputra Erosion_bw.jpg

ह्याच Shantanoo Bhattacharyya, Executive Engineer, PWD, Assam & Volunteer in Bioengineering ह्याने आसाम मधील ब्रम्हपुत्रा नदीचे भूस्सखलन कसे अफाट मेहनतीने थांबविले हे त्यांच्या Photo essayने सिध्द केले आहे.*३

खाली दिलेल्या संदर्भातील लिंकवर भेट देऊन जर हे आपण प्रत्यक्ष पाहिले तर साधे दिसणारे गवत काय प्रचंड करामत करू शकते ह्याची जिवंत प्रचिती तुम्हाला नक्कीच येइल.

निसर्गातील ही वनसंपत्तीच निसर्गाच्या प्रकोपापासून माणसाला वाचविण्यास मदतीचा मोठा हात देऊ शकते पण आपण जागृत व्हायला तर हवे नाहीतर आपली अवस्था "तुझे आहे तुजपाशी , परी जागा चुकलासी " अशी बिकट होते, आपल्याच अज्ञानाने...

मागच्याच वर्षी ५ जून २०१४ ला आसाम मधील गुवाहाटी येथे मोठी landslide झाली, त्यानंतर Assam State Disaster Management Authority नी ३६६ landslide-prone sites मध्ये vetiver grass लावण्याचा Project हा शंतनु भट्टाचार्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला आहे.*४

आपली भारतीय संस्कृती ही खूप महान आहे . ह्याच्याही खूप आधीच्या इतिहासात धौम्य ऋषींनी आरूणी नावाच्या त्यांच्या शिष्याला "केदारबंध" नावाची विद्या शिकवून ह्याच शास्त्रात प्रगत केले होते, ज्यात मातीचे बंधारे बांधून जमिनीची मशागत केली जात असे.

vetiver grass ही मुळात आपली भारताचीच जगाला देणगी आहे , चला तर आपण आपल्याच ह्या देण्याचा स्वत:च्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी वापर करायला शिकून landslide रूपी निसर्गाच्या प्रकोपाला यशस्वीपणे सामोरे जाऊ या...अगदी कमी खर्चात,निसर्गाच्याच सहाय्याने...

संदर्भ :
१. http://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/role-of-vetiver-...
२. http://www.vetiver.org/AUS_landslide%20Samford-o.pdf
३. http://www.vetiver.org/IND_riverbank%20erosion%20control%203.pdf
४. http://www.telegraphindia.com/1140606/jsp/northeast/story_18482095.jsp#....
५. http://www.telegraphindia.com/1120626/jsp/northeast/story_15655181.jsp#....
६. http://archive.indianexpress.com/news/assam-ropes-in-german-experts-to-t...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच इंटरेस्टींग माहिती.
धन्यवाद Happy

धौम्य ऋषी व त्यांचा शिष्य आरूणीची नदीला बांध घालण्यासंदर्भात काहितरी कथा आहे असे पुसटसे आठवतेय पण नेमकी कथा आठवत नाहीये.

केदारबंध विद्येबद्दल ऐकलं नव्हतं. मी ऐकलेली आरुणीची कथा आज्ञापालनाबद्दलची होती - पुन्हा पुन्हा बांधलेला बांध पाण्याच्या फोर्समुळे टिकत नसतो तेव्हा शेवटी पाणी अडवण्यासाठी आरुणी स्वतः प्रवाहात आडवा झोपतो - अशी.

संपूर्ण तांत्रिक माहिती संदर्भांसह उत्तम दिली आहे.

भारताबद्दल बोलायचे तर परदेशातून आयात केलेले तंत्रज्ञान ,संशोधन काहीही विचार न करता अमलात ,अर्धवट अंमलात आणण्याचा खटाटोप असतो.कधीकधी अतिरेक असतो.सरकारचीच जमिन आणि त्यांचाच निर्णय आणि त्यांचाच पैसा (फंड ).आपण काय बोलणार ?धरसोड आणि आपल्यालाच सर्व कळते म्हणवणारे वजनदार सरकारी अधिकारी वाट लावतात.हळूहळू भारतीय वनसंपदा नष्ट होऊन तिथे परदेशी वाण लावले जात आहे.

वाळा गवताबद्दल माहित आहे परंतू कोणतीही उपयुक्त वनस्पती सार्वजनिक ठिकाणी लावली की चोरीला जाते.आताच्या सर्व बागा पाहा झटपट वाढणाय्रा दिखाऊ झाडांनी भरल्या आहेत. रस्त्याकडेही हाच प्रकार.

आता जे दरड कोसळण्याचे प्रकार घडताहेत त्याच्या मागे नैसर्गिक कारणे नसून मानवनिर्मित आहेत.रस्ते बांधणारे कंत्राटदार मोठे सुरुंग लावून डोंगरातला खडक भराभर फोडतात.बाजूचे खडक हादरतात. पावसाचे पाणी उघड्यया चिरांतून आत गेलो की ते सुट्या खडकास खाली ढकलते.तो रेटा कित्येक टनांचा मामुली लोखंडी जाळी कशी थोपवणार?खरं म्हणजे खडक कापून काढला पाहिजे.
या खडकावर वाळा कसा लावणार?जिथे शहरांजवळ मातीचे डोंगर आहेत ते कसेबसे तग धरून आहेत.भरावसाठी येथून माती ( अर्थात तळाचीच ) काढतात. गरीब लोक झोपड्या ( अनधिकृत घरे ) बांधतात.खूप पाऊस झाला की वरचा प्रचंड ओला ढिगारा घसरतो.इथे लावलेले तुमचे वाळा गवत चोरीला जाणार.
डोंगर कापू न दिल्यास ९९टक्के घसारे थांबतील.

अपराजिता, खूपच अणि अभ्यासपुर्ण लेख. जियो! >>>+१०००

पण एसआरडी (srd) म्हणतात त्यातही तथ्य आहे - दरड कोसळण्याबाबत ...

>>>> तो रेटा कित्येक टनांचा मामुली लोखंडी जाळी कशी थोपवणार?खरं म्हणजे खडक कापून काढला पाहिजे. <<<<
Srd, तुमचे विवेचन बरोबर आहे. या जाळ्या लहान आकाराचे दगड पडू नयेत म्हणुन आहेत, आख्खी दरड्/डोन्गर कोसळणार असेल तर त्याकरता या उपयोगी नाहीतच. अन अर्थातच, घाट रस्ता बनवितानाच, तुम्ही म्हणता तसे सुरुंग वापरुन्/व्हायब्रेटरने काम केलेले असते जे उरलेल्या खडकांस डोळ्यांना न दिसणार्‍या पद्धतीने ठिसूळ करत असतेच. बाकी तुम्ही म्हणता तसेच होत जाते, व राजकारणी लोक "बळीचा बकरा" किंवा जुने हिशेब चुकते करण्यास मिडियावर येऊन वाट्टेल ते बरळत असतात. असो.

तरीही, गवताचा वरील उपाय बर्‍याच ठिकाणी वापरला जाऊ शकतो, खास करुन धूप रोखण्यासाठी.

Interesting article. Khus is an important grass and should be cultivated. But what srd says is also true. There is no soil left in ghats to grow anything. If layer of soil is put on these rocks, and if the grass is grown on it, it will not help. The Mumbai Pune highway work quality is not up to the mark and it was completed under pressure.

माहिती उत्तम
तरीही मूळ लेखामधील संदर्भ दिलेल्या दरडींच्या ठिकाणी हा प्रयोग तितका यशस्वी होईल असे वाटत नाही. खडकांच्या प्रकारानुसार लँडस्लाईड प्रतिबंधासाठी उपाय वेगवेगळे आहेत. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा ( ड्रेन ) करणे ही सर्वात प्रमूख गोष्ट आहे.

बँगलोरच्या नर्सरीमध्ये गेले कित्येक महीने मी वाळ्याची चौकशी करत होते. मागच्याच महीन्यात शेवटी मला मिळाला. एका छोट्या पिशवीत ल्या झाडाचे/गवताचे १००रु घेतले. नेहमीची शोभेची झाडे ३० ते ५०र्‍ पर्यंत मिळतात.
ह्यात पण २ प्रकार असतात. एक बीया तयार करते ,दुसरे जे व्यापारी तत्वावर विकले जाते ते नाही. बघुया मी आणलेले कसे निघतेय.

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.

Srd आपण मांडलेला खडकांवर वाळा कसा लावणार हा मुद्दा नक्कीच विचारार्ह आणि स्तुत्यच आहे.

मी माझ्या अल्प माहितीच्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. मी लिहीलेल्या लेखात मांडलेली माहिती ही पूर्णतः नेटवरील वाचनाच्या आधारेच मांडली आहे. ह्या मुद्याचे स्पष्टीकरण खालीले लिंकवर मिळू शकते.

http://www.telegraphindia.com/1140606/jsp/northeast/story_18482095.jsp#....

Shantanu Bhattacharyya has stated -
“Vetivers can prevent landslides as the roots of the grass run deep and can check the land mass from crumbling. I have successfully applied the concept in the hilly areas beside National Highway 40 near Jorabat and in the gauge conversion work of NF Railway in Dima Hasao district,” Santanu Bhattacharyya, executive engineer of the state PWD department, said during a workshop on climate change here today.( 5th June 2014)

The site given below also states that Vetiver Grass Technology/ plantation helps amazingly to prevent landslide specially in Hilly areas too.

America, China, Vietnam and many other countries have already applied.
http://www.vetiver.com/TVN_editor.htm

Even I am discussing with Shantanu Bhattacharyya and NIDM Experts so I will inform accordingly as and when their replies are received.

धन्यवाद.

याच विषयावरचा 'वाळा लावून उत्पन्न 'नॅशनल चॅनेलवर शेती कार्यक्रम दोन महिन्यांपुर्वी झाला होता.केरळ -तमिळनाडू कर्नाटक सीमेच्या भागात याची लागवड केलेली दाखवली. वाळ्याच्या मुळांना किंमत आहे आणि ती दीड मिटरस खाली खोल जमिनीत ( इतर सर्व गवता्ंची मुळे आडवी पसरतात ) असतात ती मजूर लावून मातीतून काढणे फार खर्चिक आहे.

आता हा उपाय करण्याचे कंत्राटाचे टेंडर कोणाचातरी ललल्लूपंजूभाचा घेईल तो कोणालातरी सबकॅान्ट्रॅक्ट देईल पुढे हा धागा राजकीय वळण घेईल म्हणून हा मुद्दा लिहिला नव्हता) धाग्यातली वाळ्याची माहिती संपूर्ण आणि उपयुक्त आहे यात वादच नाही.त्याच्या उपायाबद्दल साशंकता व्यक्त केली इतकेच.

मी एका स्ट्क्चरल इंजिनियरला विचारले की दरड का कोसळतात यावर तो म्हणाला की जिथे घाट कापुन रस्ता बनविला जातो तिथे खडक किंवा माती याच्या गुणवत्तेनुसार रस्त्याच्या बाजुला येणार्‍या भागाला स्लोप दिला जातो. उदा, जर खडक ठिसुळ असेल त्यावर मुळातच क्रॅक्स असतील तर स्लोप जास्त ठेवला जातो. ९० डिग्रीमधे कुठेच खडक कापुन त्यावर लोखंडी जाळ्या बसविल्या जात नाहीत.

हे प्रयोग जर एखाद्या परदेशी सल्लागाराच्या सल्याने झाले असतील तर केवळ ह्या देशात अश्या अपघाताला कुणाला जबाबदार ठरवावे याचा नेमका निर्णय होत नाही झालाच तर जुजबी मोबदला द्यावा लागतो म्हणुन असे सल्ले मिळत असतील.