कधी तरी टीव्हीवर जागतिक अॅथलॅटिक्स बघत होते. आणि वाटलं लिहावंच काहीतरी. विशेषत: उंच उडीबद्दल. माझा इव्हेन्ट!
आता वयाच्या या टप्प्यावर येऊन पोचल्यावर बर्याच गोष्टींसाठी सिंहावलोकन केलं जातं. किंबहुना गत काळाच्या खूप आठवणी कधीही कश्याही मनात उचंबळून गर्दी करतात. आणि कधी कधी गत काळातल्या काही काही आठवणांचं काही तरी वेगळंच इन्टरप्रिटेशन मनात होतं. तर असंच हे टीव्हीवर जागतिक अॅथलॅटिक्स बघताना वाटलं की आता या आपल्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर काही तरी लिहावंच!
....................................१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा मी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी सराव करायला सुरवात केली तेव्हा मी माझ्या जुन्याच साध्याश्या "सीझर किक" या पद्धतीने उंच उडीचा सराव करत असे.
शाळेत असल्यापासून मी याच पद्धतीने उंच उडी मारत असे. मग कधी तरी याचं नावही समजलं...."सीझर किक".
सर्वसाधारणपणे मनुष्यप्राणी उडी कशी मारेल, तशीच अगदी साधीशी अशी ही सीझर किक पद्धत होती.
काहीशी अशी:
उंच उडी साठीच्या आडव्या बारपासून काही अंतरावर अगदी समोर उभे रहा. पळत या. बार जवळ आला की शरीर उचला. बारवरून उडी मारा.
या पद्धतीत तुम्ही बारवर हवेत असता तेव्हा स्टॅन्डिन्ग पोझिशनमधे असता. यालाच खेळाच्या शास्त्रीय भाषेत "फ़ीट फ़र्स्ट" पोझिशन म्हणतात.
म्हणजेच या पद्धतीत तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या अगदीच विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करता. तुमच्या हवेत उंच जाण्याच्या क्रियेला गुरुत्वाकर्षण विरोध करते.
त्यामुळे या स्टाइलने उडी मारणाऱ्याला काही लिमिटेशन्स रहातात.
आणि प्रगती अगदी धीम्या गतीने होते.
तसंही ठराविक उंची गाठल्यावर आपली उडी अगदी अर्ध्या सेंटीमीटरनेही वाढवण्यासाठी खूपच मेहेनत घ्यावी लागते.
तर मी जेव्हा इन्टरकॉलेजिएट्साठी प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा याच सीझर किक स्टाइलने उड्या मारत राहिले. आणि इतरही सर्व प्रकारचे कॉम्प्लिमेन्टरी व्यायाम करत राहिले.
मग कॉलेजातल्या देसाई सरांशी गाठ पडली. यांनी एशियाड स्पर्धांमधे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता मला जसं आठवतंय तसं त्यांचा मुख्य इव्हेन्ट थाळीफ़ेक(डिस्कस थ्रो) असावा. पण ओव्हरऑल ते ऑलराउन्डर अॅथलीट होते. मग उंच उडीसाठी तेच माझे कोच बनले.
त्यांनी माझी उंच उडीची पद्धत पाहिली. आणि उंच उडीविषयीची वर उल्लेखलेली शास्त्रीय माहिती मला समजावून सांगितली. जी तेव्हा माझ्या जरा डोक्यावरूनच गेली. (आर्ट्सची विद्यार्थिनी असल्याने की काय?) आणि याच गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाणारी सीझर किक ही पद्धत सोडून देऊन मी "वेस्टर्न रोल किंवा स्ट्रॅडल रोल" ही पद्धत शिकून घ्यावी असं सुचवलं.
मी ही नवी पद्धत अॅडॉप्ट करण्याचा प्रयत्न करू लागले. पण अंगात, पायात, मनात भिनलेली, वर्षानुवर्षे अंगिकारलेली सीझर किक झटकायला/काढून टाकायला फ़ार मेहनत घ्यावी लागली. शाळेत असल्यापासून हीच तर माझी उंच उडीची पद्धत होती! एक वेळ अशी आली की वाटलं सरांना सांगावं, "सर...मला नाही जमणार ही स्ट्रॅडल रोलची नवी पद्धत. जाऊ दे. मी माझ्या जुन्याच सीझर स्टाईलनेच प्रॆक्टिस करीन. जितकी वाढायची असेल तितकी वाढेल माझी उडी.....जाऊ दे!" कारण जुनी स्टाइल सोडायला माझे पाय आणि मन आजिबातच तयार नव्हते. अगदी कंटाळून गेले होते. धीर सुटला होता.
पण वन फ़ाइन मॉर्निन्ग माझ्या पायांनी आणि मनानेही स्वीकारली एकदाची ही वेस्टर्न/ स्ट्रॅडल रोल स्टाइल. आणि केवळ चमत्कार! माझं मलाच कळलं नाही, की कशी ती पहिली वज्रलेप पद्धत माझ्या मनाने पुसली आणि कशी ती नवी पद्धत माझ्या पायांनी अॅडॉप्ट केली!
मग मात्र डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आणि वाटलं ....खरंच काय सायन्स आहे या मागचं! कोणतीही गोष्ट अगदी मुळापासून शिकायची तर त्यामागे काही तरी विज्ञान असणारच. हे अगदी पटलं.
मग आधी जे "मिलिमीटर मिलीलीटर लढवू"(इंच इंच लढवू च्या चालीवर!) असं चालू होतं ते "सेन्टीमीटर लढवू" वर आलं आणि then I never looked back!
आणि कळून चुकला सायन्समधला एक नियम. पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाचा. कधीपासून शिकत होतेच की हे शाळेत. पण आत्ता हे गुरुत्वाकर्षण प्रकर्षाने जाणवत राहिलं. माझ्यासारख्या सायन्स गणिताची नावड जोपासणारीला त्या न्यूटनचं झाडावरून पडणारं सफ़रचंद सतत दिसत राहिलं!
थोडक्यात स्ट्रॅडल /वेस्टर्न रोल स्टाइलमधे आपण गुरुत्वाकर्षणाच्या फ़ोर्सला संपूर्णपणे विरोध करत नाही.....जो आपण सीझर पद्धतीत करतो!थोडक्यात.... In this style, you defy the gravitational force!
कारण या पद्धतीत तुम्ही आधीच्या पद्धतीनुसार "फ़ीट फ़र्स्ट" अश्या पोझीशनमधे उडी न मारता "हेड फ़र्स्ट" या पोझिशनमधे उडी मारता.
आधीच्या सीझर पद्धतीत तुम्ही आडव्या बारच्या अगदी समोरूनच पळत येऊन स्टार्ट घेता. पण या स्ट्रॅडल/वेस्टर्न् रोल पद्धतीत तुम्ही आडव्या बारच्या ३०/४० अंश कोनातून तिरके पळत येऊन स्टार्ट घेता मग टेक ऑफ़्! बहुतेक वेळा हा स्टार्ट तसा अगदी जवळूनच असतो. ज्याला जितक्या स्टेप्स जमतील तितक्या. साधारणपणे या ३ किंवा ५ स्टेप्स असतात. आणि तुम्ही जेव्हा बारवर हवेत असता तेव्हा तुम्ही शक्यतो बारला पॅरलल असता. आलं का लक्षात....कसा गुरुत्वाकर्षणाला आपण कमी विरोध करतो ते!
आपण जेव्हा सीझर पद्धतीत स्ट्रेट हवेत पाय उचलून उडी मारतो तेव्हा आपण थेट गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि या स्ट्रॅडल रोल पद्धतीत आपण हेड फ़र्स्ट पोझिशनमधे हवेत जाऊन तिथेही आडव्या पोझिशनमधे असल्याने इथे आपण गुरुत्वाकर्षणाच्या तितकेसे विरुद्ध जात नाही, किंवा हा ग्रॅव्हिटेशनल फ़ोर्स् आपल्याला तितकासा विरोध करत नाही. आपल्या हेड फर्स्ट पोझिशनमुळे हा गुरुत्वाकर्षणाचा विरोध आपल्याला खूपच कमी विरोध करतो.
असो........
प्रत्येक गोष्टीत कालांतराने काही नवीन शोध लागून काही सोयीस्कर पद्धतींचा शोध लागत असतो. कधी बऱ्याच वेळा ट्रायल, एरर चालते.
तसंच उंच उडीच्या टेक्नीक्समधे काही काही बदल होत गेले.
अगदी सुरवातीच्या काळात एक चौकोनी खड्डा मऊ माती, बारीक वाळू यांनी भरलेला असायचा. व खेळाडू उडी मारून आडव्या बारवरून खाली थेट या वाळूत पडायचा.
(वरच्या फोटोत इथे उल्लेखलेला वाळू मातीचा ढिगारा दिसतोय.)
मीही सुरवातीला अश्याच प्रकारच्या पिटमधे उंच उडी मारत असे. पण स्वता:ला इजा न होऊ देता शरीर व्यवस्थित रोल करून इतक्या उंचीवरून कसं खाली पडायचं याचं एक टेक्निक उंच उडी मारणारा खेळाडू आपोआपच आत्मसात करून घेतो. मांजर जसं कितीही उंचीवरून पडलं तरी चारी पायांवरच व्यवस्थितच उभं रहातं तसंच काहीसं.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे .... मार्शल आर्ट्स खेळाडू. हे खेळाडू वीट फ़ोडणे किंवा तत्सम क्रीया शरीलाला इजा न होऊ देता जसे करतात तसंच या उंच उडीचं आहे.
वर उल्लेखल्याप्रमाणे उंच उडीच्या तंत्रातही काही नवीन बदल आले. त्यातला एक बदल पिटसंबंधात. बारवरून खेळाडू खाली पडताना डायरेक्ट पिटमधे पडायचा त्याचा विचार करून खेळाडू कमी उंचीवर पडला तर जरा जास्त सोयिस्कर होईल का, या विचाराने पिटमधे पुढील बदल करण्यात आला.
पिटमधे एक उंच असा वाळू मातीचा ढीग बनवण्यात आला. म्हणजे बारवरून उडी मारल्यावर खेळाडू खूप खोलीवर न पडता या वाळूच्या ढिगाऱ्यावर पडेल आणि शरिराला इजा होण्याचे चान्सेस आणखीनच कमी होतील असा त्यामागचा विचार.
हा विचार चांगलाच होता. पण नवीन कल्पना जेव्हा वापरात येतात तेव्हा त्यातले फ़ायदे तोटे नीट समजतात.
उंच उडी हा एक असा प्रकार आहे की ज्यात खेळाडूला खूपच कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. एका स्पर्धेत मला स्वता:ला जेव्हा अश्या उंचावलेल्या पिटवर उडी मारण्याची पहिल्यांदाच वेळ आली तेव्हा असं जाणवलं की वरून खाली पडण्याचं अंतर जरी कमी झालेलं असलं तरी सुरवातीला आडव्या बारवर लक्ष केंद्रित करताना खूपच त्रास होतो. आपण बारवर लक्ष केंद्रित करत असतो आणि नजरेत उंचावलेला पिट आडवा येत असतो. तरीही त्या स्पर्धा झाल्या तश्याच.
नंतर मात्र अगदी लेटेस्ट टेक्निक म्हणजे सॉफ़्टफ़ोम मॅट्रेसेस! लॅन्डिन्ग पिटमधे या मऊमऊ गाद्या आल्या. अर्थातच आमच्या कॉलेजात या अव्हेलेबल नव्हत्यात. डायरक्ट स्पर्धेच्या वेळीच या गाद्यांचं दर्शन झालं. आणि वॉव!
पडण्याची आणि स्वता:ला इजा होण्याची भीती शून्य टक्क्यांवर आली म्हणजेच स्वता:च्या परफॉर्मन्समध्येही नक्कीच सुधारणा!
अश्या मऊ मॅट्रेसेसवर जेव्हा पहिली उडी मारली....अहाहा काय वर्णावं ते सुख! आणि यात सेफ़ लॅन्डिन्गची १००% गॅरन्टी! त्यामुळे खेळाडू बिनधास्तपणे स्वता:ला झोकून लागला! परफॉर्मन्स स्पीडीली सुधारू लागला. आपण सध्या ज्या मॅट्रेसेस् स्पर्धांमधे बघतो, त्याच या गाद्या! पहा कुठून कुठे आला प्रवास!
आधी वाळू मातीने भरलेला साधा खड्डा, नंतर त्यातच उंचावलेला मातीवाळूचा ढिगारा आणि नंतर मऊमऊ गाद्या!
आता उड्यांच्या स्टाइल्सबद्दल...........
मी वर उल्लेखलेल्या कोणत्याच स्टाइल्स आता उपयोगात नाहीत. यातही इतके बदल होत गेले! सध्या आंतरराष्ट्रीय आणि लोकल लेव्हलवरही हा खेळ खेळणारे बहुसंख्य खेळाडू एका नव्याच टेक्नीकचा वापर करतात. "फॉसबरी फ्लॉप्"
फॉसबरी फ्लॉपचा हा फोटो नेटवरून साभार.
मी जेव्हा खेळत होते तेव्हा फ़ॊसबरी फ़्लॊप या पद्धतीची उडी मारणारा जिथे असेल तिथे गर्दीच जमायची.
कारण to watch this style, was certainly a treat to eyes! तेव्हा फ़क्त एखादा मुलगाच मारायचा अशी उडी...तेही व्हर्सिटी लेव्हलला किंवा नॅशनल्सला! मुली आधी खेळातच कमी असायच्या, त्यात उंच उडीत आणखी कमी. आणि वेस्टर्न रोल या स्टाइलने उडी मारणाऱ्या मुली खूपच कमी. त्यामुळे "फॉसबरी फ्लॉप" ही फ़क्त पुरुषांचीच मक्तेदारी होती.
या प्रकारात खेळाडू ४/५ पावलांचा(स्ट्राइडस) तिरका स्टार्ट घेऊन घता बघता एकदम बारवर उलटा दिसू लागतो. म्हणजे इथेही हेड फ़र्स्ट पोझिशनच. आणि लॅन्ड होताना शरीराची इंग्रजी C ची आकृती झालेली दिसते.
खरंच ही उडी बघताना बघणारा अचंबितच होतो!
१९६८ साली डिक फॉसबरी या अमेरिकन खेळाडूने ही नवी पद्धत पहिल्यांदा ऑलिंपिकमधे अवलंबली. आणि वर उल्लेलेल्या सर्व पद्धतीपेक्षा या पद्धतीत खेळाडूला गुरुत्वाकर्षणाचा कमीत कमी विरोध होतो.
आणि आता सर्वत्र वापरात असलेल्या फ़ोम मॅट्समुळे खेळाडू या फॉसबरी फ़ॊस पद्धतीचा भरपूर फ़ायदा घेत अधिक धाडसीपणाने आणि बिन्धास्तपणे भरपूर उंच उडी मारून सेफ़ लॅन्डिन्ग करू शकतो. आता तर मुली सुद्धा उंच उडीसाठी फॉसबरी फ्लॉप हीच पद्धत वापरतात.
त्यामुळे ही पद्धत जगभर लोकप्रिय झाली.
पण मला मात्र ही पद्धत शिकता आली नाही याची जराशी खंत आहेच मनात.
मानुषी ताई ,मस्त लिहिल
मानुषी ताई ,मस्त लिहिल आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तेव्हाच काय अजूनही खेळ त्यातल्या तांत्रीक बाबींसकट शिकवला जात नाही ( बहुतांश शालांमधे) . क्रिकेट फूटबॉल , टेनिस , बॅडमिंटन ह्यासारखे खेळ शाळेबाहेर, अॅकॅडमीज मधे जाउन शिकावे लागतात.
नादिया चा पर्फेक्ट १० पाहून जिम्नॅस्टीक्स करायचे मी. सिंगल बीम वर कार्ट्व्हिल म्हणजे कौशल्याची परमावधी !! त्यापेक्षा जास्त कळणारे शिकवणारे आजूबाजूला नव्हते , आणि शोधलेही नाहीत.
तुम्ही ह्यावर अजून नक्की लिहा.
मानुषी ताई, सुंदर लिहीले आहे
मानुषी ताई,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर लिहीले आहे तुम्ही. मला खेळात फारशी रुची नसून सुद्धा लेख फार आवडला याचे श्रेय तुमच्या लेखनाला.
माझ्यासारख्या सायन्स गणिताची नावड जोपासणारीला त्या न्यूटनचं झाडावरून पडणारं सफ़रचंद सतत दिसत राहिलं!>>> क्या बात है.
ममो, अश्विनीके, इन्ना,
ममो, अश्विनीके, इन्ना, रैना
सर्वांना धन्यवाद.
इन्ना....>>>तेव्हाच काय अजूनही खेळ त्यातल्या तांत्रीक बाबींसकट शिकवला जात नाही > हं...अजूनही.
आणि हो...नादिया खूप जणींसाठी इस्पिरेशन होती.
रैना......इथेच (मायबोलीवर) आल्यापासून व्यक्त व्हायला हळूहळू शिकले.
ममो.........इथली(माबो) मुलं मुली .इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताहेत, रेग्युलर नोकरी धंदा करून आपापल्या छंदांमधे प्राविण्य मिळवताहेत. अगदी रथी महारथीच.
त्यामुळेच मला हे इतकं जुनं असूनही यावर इथे लिहावंसं वाटलं. पुढच्या पिढीबरोबर शअर करावंसं वाटलं.
मानुषीबाय धन्य आहेस तू.. अगं
मानुषीबाय धन्य आहेस तू.. अगं किती गुण आहेत तुझ्यात भरलेले.. फील सो प्राऊड ऑफ यू.. मस्त फोटो आणी
माहिती, भारी वाटलं वाचून..
आता आय डी बदलून ,'विदुषी' घे ___/\___
मेरी दौड केवल इंटर कॉलेज चँपियनशिप बॅडमिंटन , टेटे गेम तक.. उडीबिडी मारना मेरे बस मे नई.. !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव इन्ना, ग्रेट गा!!
वॉव इन्ना, ग्रेट गा!!
आता आय डी बदलून ,'विदुषी' घे
आता आय डी बदलून ,'विदुषी' घे ___/\___>>>>>>>> काय राव वर्षू........आता बास्स का?
अगं तुम्हा सर्वांत राहूनच काहीबाही खरडायला शिकले.
बाकी आपलं हे सगळं जुनंच.
किती छान लिहिलेय्स. तु हे
किती छान लिहिलेय्स. तु हे सगळे करत होतीस हे वाचुन आश्चर्य वाटले.
जरी शाळेच्या खेळाच्या सिलॅबसमध्ये भरपुर खेळ असले तरी आपल्या इथे खरेच खेळाला अजिबात महत्व नाहीय, .
आमच्या इथे वार्षिक परिक्षेला गोळाफेक, उंच उडी, थाळीफेक, १०० मिटर रेस असले काय काय प्रकार असायचे. पण त्यांच्याकडे कोणी कधी गांभिर्याने पाहिले नाही, त्यांचे टेक्निक असते हे कधी कळले नाही. वर्षाच्या शेवटी परिक्षेला हातात पहिल्यांदा लोखंडी गोळा मिळायचा. हातात उचलुन तो खांद्यावर घेतला की मागच्या मागेच पडायचा. एखादीच अशी निघायची जी गोळा नीट मानेवर घेऊन गोल गिरक्या मारत तो फेकायची. आणि आम्ही बाकिच्या नवल पाहतोय अशा डोळ्यांनी तिच्या त्या गिरक्या पाहायचो.
आता हे सगळे आठवुन रडू येतंय की काय काय शिकता आले असते जर कोणी शिकवले असते तर.
शीर्षक खूप कॉम्प्लिकेटेड
शीर्षक खूप कॉम्प्लिकेटेड वाटले, डोक्यावरून गेल्यासारखेच काय आहे हे बघायला आत शिरलो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि आत खूपच ईंटरेस्टींग लेख आणि माझ्यासाठी नवीनच माहिती मिळाली.. मस्त
आपल्याकडे शाळेत किती कमी महत्व देतात पीटी किंवा अॅथलेटिक्सला याची परत जाणीव झाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
हा हा, यावरून मला शाळा आठवली, उंच उडीची स्पर्धा नाही पण परीक्षा व्हायची ती कंपलसरी असल्याने ऊडी मारावीच लागली होती.
किती उंच उडी मारलीय हे स्वतःच मार्क करायला हातात खडू घेत भिंतीसमोर उभे राहत ऊडी मारणे.. गुरुत्वकर्षणाच्या अगदी विरुद्ध दिशेने
वर साधना यांच्या पोस्टवरून
वर साधना यांच्या पोस्टवरून सहज आठवले,
माझी तब्येत तशी साधारणच पण मी शाळेत भल्याभल्यांपेक्षा लांबवर लोखंडी गोळा फेकल्याचे आठवतेय कारण मी त्याची टेकनिक काय असते हे पुस्तकी का होईना परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासून गेलो होतो.
तर या क्रिडा प्रकारातील टेकनिकचे महत्व स्वानुभवाने नक्कीच समजू शकतो.
साधना......तू म्हणतेस तशी
साधना......तू म्हणतेस तशी गोळाफेक मीही करत असे. पण सगळं झोनल आणि जिल्हा पातळीवर. पुढे मात्र हाय जंप आणि दोन नं.वर लॉन्ग जम्प.
ऋन्मेष......किती उंच उडी मारलीय हे स्वतःच मार्क करायला हातात खडू घेत भिंतीसमोर उभे राहत ऊडी मारणे.
हो ही अशी उडी अगदी ७वी पर्यन्त तेही फक्त पीटी परीक्षेसाठी.
कॉम्पिटेटिव्ह लेवलला वेस्टर्न रोल.
अगं तुम्हा सर्वांत राहूनच
अगं तुम्हा सर्वांत राहूनच काहीबाही खरडायला शिकले. >>>> खरडणे वेगळे आणि अशा खरोखरीच्या "उंचच उंच" उड्या मारणे वेगळे .....
एक वेगळा धागाच काढ की या तुझ्या वेगवेगळ्या क्रीडाप्रकारासाठी - जास्त करुन अनुभव लिहिणे ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो शशांक .......पुरातन
हो शशांक .......पुरातन काळातले अनुभव म्हणून खरंच लिहायचंय! कारण एकूणच टेक्नॉलॉजी मुळे सगळंच इतकं बदलंय............
एक साधी गोष्ट बघ.......मी चक्क अनवाणी पायांनी उड्या मारतीये. नॅशनलसाठी सिलेक्शन झाल्यावर आधी माझ्या पायाचे स्पाइक्स ( बुटाच्या अगदी पुढच्या भागाला तळाला चांगले इंच इंच लांबीचे ५/६ अणकुचीदार खिळे) बनवून घेतले. जे मी पुढे नॅशनलला वापरावेत. प्रॅक्टिस सुरू झाली. (आणि लगेच लग्न ठरलं आणि झालं तो भाग वेगळा!
मग खेळ बंद झाला.)
पुरातन काळातले अनुभव म्हणून
पुरातन काळातले अनुभव म्हणून खरंच लिहायचंय! >>> प्लीज प्लीज लवकर लिहिणे- फार विचार करु नकोस (नाहीतर विचार बदलेल - टेक्नॉलॉजीमुळे सगळे बदललंय असे म्हणत म्हणत ....
)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथल्या सगळ्यांना खूप उत्सुकता आहे आणि तुझी लेखनशैली तर कमालीची प्रभावी आहे .... चिअर्स ...
लय भारी मानुषी. मला पण शालेय
लय भारी मानुषी.
मला पण शालेय खेळांची आठवण झाली. मी उंच उडी किंवा लांब उडी मारायचे पण नंबर पटकावण्याइतपत कधी ती उंच नसायची.
पण खोखो आणि कबड्डी ह्यात प्राविण्य असायच.
मी कस काय हे मिसल माझी लेक
मी कस काय हे मिसल![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझी लेक Long Jump & High Jump करते. त्यामुळे हे सगळे खूपच जवळचे अगदी आपले वाटणारे आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता तर मुली सुद्धा उंच उडीसाठी फॉसबरी फ्लॉप हीच पद्धत वापरतात.>>> हो पण पुण्या मुंबईच्याच मुली ज्या ह्याचे प्रॉपर ट्रेनिंग घेतात बाकी बर्याच सीझरही मारतात.
बाकी तुमचे फोटो मस्त आहेत.
जागु आणि मी नताशा
जागु आणि मी नताशा धन्यवाद.
नताशा तुझी लेक " फॉसबरी" च मारते का? ती काय शिकते?
हो मानुषी ती " फॉसबरी" च
हो मानुषी ती " फॉसबरी" च मारते. ती डेक्कन जिमखानाला प्रॅक्टीस करते.
ती काय शिकते - ९ वीमधे आहे.
फॉसबरीच?? वॉव ग्रेट! नताशा
फॉसबरीच?? वॉव ग्रेट! नताशा ...खूप छान वाटलं ऐकून!
मस्त लिहिलं आहेत मानुषी.
मस्त लिहिलं आहेत मानुषी.
मानुषीताई, फार अप्रतिम लेख.
मानुषीताई, फार अप्रतिम लेख. मला हे काहीही माहिती नव्हतं, आज ह्या लेखामुळे समजलं.
यु आर ग्रेट म्हणजे ग्रेटच. Allrounder आहात तुम्ही. मस्तच. ___/\___.
अजून वाचायला आवडेल.
सायो धन्यवाद
सायो धन्यवाद गं!
अन्जू![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
"नेटनाटकां"मधूनही तू नेटाने माझा लेख वाचून जे नेटका/नेमका प्रतिसाद दिलास त्याबद्दल धन्यवाद! :स्मितः
तरीही अंन्जू ग्रेट वगैरे काही नाही गं....वर लिहिल्याप्रमाणे इथे इतके रथी महारथी काय काय करताहेत त्यापुढे काहीच नाही.
मानुषी, तुम्ही अशी उडी
मानुषी, तुम्ही अशी उडी मारायचात हे बघून फारच भारी वाटतंय मला तुमच्याबद्दल. ह्या अश्या उड्या जेव्हा बघते तेव्हा इतकी फ्लाईट कशी घेता येते इथेच माझे विचार अडकतात.
मानुषी ताई, हा लेख म्हणजे
मानुषी ताई, हा लेख म्हणजे जोर का झटका धीरे से लगे........
एकी कडे सुरकं, झबलं सुबक पणे शिवणारी आजी आणि एक दम अॅथलॅटिक्स........
__________ /\___________
कल्पनाच करवत नाही..
खुप सुरेख लेखन शैली, माहिती, प्र.ची. सगळच.....
आणि तुझा जुना फोटो मस्तच हा...
सगळ्यांचे प्रतिसाद खुप छान.....
मानुषीताई धन्यवाद तुमचेच.
मानुषीताई धन्यवाद तुमचेच.
तरीही अंन्जू ग्रेट वगैरे काही नाही गं....वर लिहिल्याप्रमाणे इथे इतके रथी महारथी काय काय करताहेत त्यापुढे काहीच नाही.
किती तो विनय आणि नम्रता. मोठी माणसं अशीच असतात.
मानुषी ताई - किती मस्त
मानुषी ताई - किती मस्त लिहिलंयस
अजून भरपूर लिही त्या वेळच्या अनुभवांवर....
मथळ्यामधे उंच उडी असेही लिहायचेस ना..... कात्रजचा घाट केलास अगदी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आडो सायले अन्जू आणि
आडो सायले अन्जू आणि हर्पेन
सर्वांना धन्यवाद.
मथळ्यात बदल करतेय रे हर्पेन!
मानुषी मस्त लिहिलंय आणि
मानुषी मस्त लिहिलंय आणि फोटोही छान. माहिती आवडली. ऑलराउंडर आहात खरोखर.
मस्त लेख. मी काल परवाच यावर
मस्त लेख. मी काल परवाच यावर युट्य्ब वर बरेच विडिओ बघितले.
उंच उडीतली अजून एक खासियत म्हणजे पुरुषांमध्ये ८ फुटापेक्षा उंच उडी फक्त क्युबाच्या हाविएर सोटोमायोर ने मारलेली आहे ती सुद्धा २७जुलै १९९३ला. म्हणजे आता २२ वर्षे झाली तरी हा विक्रम अबाधित आहे. अॅथलेटिक्स मध्ये खचितच इतकी वर्षे एखादा विश्वविक्रम अबाधित राहिला आहे.
गौरी धन्यवाद. टण्या
गौरी धन्यवाद.
टण्या धन्यवाद............... क्युबाच्या हाविएर सोटोमायोरचा रेकॉर्ड ब्रेकिन्ग उडीचा व्हिडीओ असंख्य वेळा पाहिलाय! जबरदस्तच! २.४५ मी.
जबरदस्त मस्त लेख.
जबरदस्त
मस्त लेख.
Pages