प्लुटो मोहिमेच्या निमित्ताने...

Submitted by अतुल. on 18 July, 2015 - 16:27

ध्या प्लुटोच्या जवळून नासाचे न्यू होरीझॉन्स हे यान जात आहे. त्याने पाठवलेली काही छायाचित्रे आपण पहिली. या मोहिमेच्या निमित्ताने...

प्लुटो हा लघु ग्रह पृथ्वीपासून कमीत कमी तब्बल ४ बिलियन (४ वर ९ शून्ये) किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी मधल्या अंतराच्या तीस पट अंतर. साठ हजार किमी प्रति तास इतक्या वेगाने जाणाऱ्या न्यू होरीझॉन्सला हे अंतर काटायला जवळ जवळ दहा वर्षे लागली. इतक्या अंतरावरून प्रकाश किरण यायलाच चार तासांचा कालावधी लागतो. म्हणजेच यानाने पाठवलेले संदेश चार तासांनी आपल्याला मिळतात. अशा परिस्थितीत प्लुटो वर यान उतरवणे हे महाकठीण आहे. म्हणूनच न्यू होरीझॉन्स हे प्लुटो वर न उतरता केवळ त्याच्या जवळून जाईल. (जाता जाता: आजवरचे सर्वात लांब पोचलेले मानवनिर्मित यान म्हणजे व्होयोजर-१ आहे. १९७७ साली सोडलेले हे यान आता सूर्यमालिकेच्याही पार गेले असून सध्या तिथून संदेश यायला १७ तास इतका वेळ लागतो. या यानात मानवी इतिहासंबंधी बरीच माहिती व छायाचित्रांच्या बरोबरच अनेक देशांतील गायकांच्या आवाजाचे नमुने असलेली एक डिस्कही ठेवली आहे. यात भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे "जात कहां हो" हे गीत आणि आरती पंडित यांच्या आवाजातील एक मराठी संदेश सुद्धा समाविष्ट आहे).

कल्पना करा पृथ्वी एखाद्या बास्केटबॉलच्या आकाराची केली तर प्लुटोचा आकार एखाद्या गोल्फच्या चेंडू एवढा होईल, त्यांच्यातले अंतर ८० किलोमीटर इतके होईल, आणि यानाचा वेग पाव मिलीमीटर प्रतिसेकंद इतका होईल. त्या तुलनेत माणसाचा आकार ४० नॅनोमीटर म्हणजे एखाद्या व्हायरसच्या आकारा इतका होईल. म्हणजेच एखाद्या बास्केटबॉल वरच्या व्हायरसने तब्बल ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोल्फच्या चेंडूकडे व्हायरसच्याच आकाराची एखादी वस्तू पाठवावी तसा हा प्रकार आहे. तेही तो गोल्फचा चेंडू एका जागी स्थिर नव्हे तर गतिमान असताना ! यावरून मानवी बुद्धी व प्रयत्नांची क्षमता किती अचाट आहे याची कल्पना येते.

या प्लूटोच्या शोधाची गोष्ट सुद्धा अफलातून अशीच आहे. १८४० मध्ये Urbain Le Verrier या फेंच गणित तज्ञाने केवळ न्यूटनचे नियम आणि गणिताचा वापर करून नेपच्यून या ग्रहाचे ठिकाण निश्चीत केले आणि खगोल शास्त्रज्ञांना त्याची खात्री करण्यास सांगितले. बरोब्बर त्याच ठिकाणी खगोल शास्त्रज्ञांना नेपच्यून आढळून आला. एकोणीसाव्या शतकात खगोलशास्त्रातील हि एक अतिशय उल्लेखनीय अशी बाब होती. त्यानंतर खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यून हाच सूर्यमालिकेतील शेवटचा ग्रह आहे असे वाटत होते. त्याचे वस्तुमान व गतीचा अभ्यास करताना असे लक्षात आले कि त्याच्या गतीवर त्याच्या पलीकडील कोणत्यातरी एका अज्ञात ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत आहे. त्यानंतर केवळ दुर्बिणीच्या सहाय्याने घेतलेल्या असंख्य छायाचित्रांचा अभ्यास करून क्लाईड टॉमबॉग या खगोलशास्त्रज्ञाने प्लुटोचा शोध लावला.

Pluto_discovery_plates.jpg

सर्वात शेवटचा ग्रह म्हणून प्लुटो नेहमीच चर्चेत राहिला. पण १९९२ नंतर तंत्रज्ञान प्रगत झाल्यावर प्लूटोच्याही पलीकडे कमीजास्त आकाराचे शेकडो ग्रहगोल आहेत असे लक्षात येऊ लागले. यालाच कुपर बेल्ट असे म्हणतात. अतिथंड गोलांचा प्रचंड विशाल पट्टा. यात नंतर अनेक ग्रहसदृश्य गोल सापडू लागले लागले. यामुळे २००६ साली ग्रहाची व्याख्या नक्की केली गेली. व त्यात हे सर्व नवीन ग्रह (प्लुटो सुद्धा) बसत नसल्याने प्लुटोचे ग्रहपद काढून घेण्यात आले. प्लुटो विषयी माहिती घेणे तसेच कुपर बेल्टमधील गोलांचा अभ्यास करणे ही न्यू होरीझॉन्स मोहिमेची उद्दिष्टे आहेत.

जरी प्लुटोचे ग्रहपद काढून घेतले असले तरी देखील त्याचा शोध लावणाऱ्या क्लाईड टॉमबॉग या खगोलशास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ त्याची काही रक्षा न्यू होरीझॉन्स मधून प्लुटो वर पाठवण्यात आली आहे.

(सर्व माहिती विकिपीडिया तसेच इंटरनेटवरील इतर काही संकेतस्थळांवरुन)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गा.पै. जी लिंक बद्दल धन्यवाद Happy ज्योतिष शास्त्रामध्ये जे "नवग्रह" मानले जातात ते म्हणजे खगोलशास्त्रीय नऊ ग्रहच (प्लुटो धरून) असावेत असा माझा आतापावेतो समज होता. त्यामुळे प्लुटो चे ग्रहपद काढून घेतल्यावर ज्योतिष शास्त्रात पण उलथापालथ झाली असेल काय? असा प्रश्न मध्यंतरी मनात आला होता. पण ज्योतिष शास्त्रात फारसा रस नसल्याने त्यावर पुढे कधी फारसा विचार केला नाही. पण आपण दिलेल्या लिंक मुळे ज्योतिष शास्त्रात मानलेले बरेच ग्रह हे खगोल शास्त्राने शोधलेल्या ग्रहांपेक्षा पेक्षा पूर्ण वेगळेच आहेत या विषयी माहिती मिळाली. तो एकंदर लेखही संवाद स्वरुपात छान लिहिला आहे. शेअर केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

यामुळे २००६ साली ग्रहाची व्याख्या नक्की केली गेली. व त्यात हे सर्व नवीन ग्रह (प्लुटो सुद्धा) बसत नसल्याने प्लुटोचे ग्रहपद काढून घेण्यात आले.

कारण प्लुटो हा इतर ग्रहांच्या मानाने आकाराने बराच लहान आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ नील डे ग्रासेउटायसन याने नुकतेच सांगितले की जर गुरूवर माणसे रहात असतील तर ती आजूबाजूच्या शनि, युरेनस, नेपच्यून या ग्रहांच्या मानाने बुध शुक्र, मंगळ व पृथ्वी हे फार लहान असल्याने ग्रह नाहीत असेच म्हणतील.

नील डे ग्रासेउटायसनचे हे उद्गार कुठे आहेत जरा रेफरन्स द्याल का?

माझ्या माहितीनुसार ग्रहांची व्याख्या केवळ आकारावर नाही. त्याच्या परिभ्रमण कक्षेवर पण अवलंबून आहे. व्याखेत "पृथ्वीसापेक्षता" नाही:

In its 2006 response, the International Astronomical Union (IAU), recognised by astronomers as the world body responsible for resolving issues of nomenclature, released its decision on the matter. This definition, which applies only to the Solar System, states that a planet is a body that orbits the Sun, is massive enough for its own gravity to make it round, and has "cleared its neighbourhood" of smaller objects around its orbit.

त्यानुसार प्लुटो हा ग्रह होऊ शकत नाही कारण तो नेपच्यून ची कक्षा छेदतो. आणि बुध छोटा असूनही ग्रह आहे. माझ्या माहितीनुसार नील डे ग्रासे टायसन यांनी सर्वांना सरसकट ग्रह असे संबोधण्या ऐवजी वर्गीकरण करून नावे देण्यावर भर दिला. जसे कि गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे आकाराने मोठे असले तरी वायूभारित आहेत. शेकडो. हजारो किलोमीटर वायू आणि त्या खाली द्रव्याची आवरणे. त्याखाली कुठेतरी घनरूप असतील. म्हणून त्यांचा प्रत्यक्ष घन आकार हा लहानच आहे. म्हणून यांना वेगळे नाव. आणि प्लुटो व प्लूटोच्या पलीकडे असंख्य थंड गोल आहेत त्यांना वेगळे नाव इत्यादी.

जाऊ द्या. नील डी ग्रासे टायसन हा स्टीव्हन कोल्बे च्या कॉमेडी शो मधे बोलत होता. कोल्बे त्याची खेचायचा प्रयत्न करत होता की तुम्ही उगीचच प्लुटोला ग्रह मानत नाही. तो तिकडे स्पेसमधे आहे, त्याला एक चंद्र आहे मग तो ग्रह का नाही? नीलने सांगितले गुरु पृथ्वीच्या ११ पट मोठा नि पृथ्वी प्लुटोच्या पाचपट मोठी. म्हणजे शेव्हरोले इम्पाला समोर लहान मुलांच्या खेळण्यातली मॅचबॉक्स गाडी. वगैरे वगैरे.

इथे बघा:
http://io9.com/watch-neil-degrasse-tyson-and-stephen-colbert-geek-out-17...