निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561
निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन- http://www.maayboli.com/node/54583
निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग चार - http://www.maayboli.com/node/54599
आता दिंडीने स्वतः ची सुंदर लय पकडत मार्गक्रमण सुरु केले आहे . संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी यांची पुण्यनगरीत भेट झाली . दोन्ही पालख्यांच्या एकत्रित दर्शनाने पुण्यनगरीतील भाविकांचे डोळे निवले . आता वेध लागलेत पंढरी गाठण्याचे.
प्रत्यक्ष आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून , तसेच शेजारील राज्यातून भाविकांचा लोंढा पंढरीस येईल . उद्दिष्ट एकच विठुरायाचे दर्शन .
छत्तीस ते चोवीस तास रांगेत तहान ,भूक विसरून थांबून जेंव्हा विठ्ठल दर्शन होते तेंव्हा भक्तास स्वर्गीय आनंद मिळतो . पण प्रत्येक भाविक ते करू शकत नाही .लक्षावधी भाविक जरी आषाढी एकादशीचा मुहूर्त गाठून पंढरीस पोहचले तरी प्रत्यक्ष विठूरायास ते त्याच दिवशी डोळ्यात साठवू शकत नाहीत पण मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले तरी त्यानां वारी पूर्तीचा आनंद मिळतो .
अर्थात वारी आणि एकादशी यात पांडुरंग दर्शन यास अनन्य साधारण महत्व असले तरी, या पांडुरंगाचे यथार्थ दर्शन आपल्याला अनेक संतांनी त्याच्या सुमधुर रचनांमधून कायम स्वरूपी घडवले आहे .
संत ज्ञानेश्वर यांच्या विठ्ठल रूप आणि त्याच्या दर्शनाने मिळणारे असीम समाधान याचे वर्णन करणाऱ्या रचना अनेक आहेत ,पण त्या सर्वात विठ्ठल दर्शन आणि त्यामुळे होणारी भक्ताची ' झपूर्झा ' अवस्था त्यांनी अचूक टिपली आहे त्यांच्या या रचनेत . या रचनेच्या सुरवातीस ते म्हणतात ,मला विठ्ठल दिसतोय पण कसा तर -
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
यामध्ये विठ्ठलाच्या ' पांडुरंग ' या उपाधीचा दुहेरी वापर त्यांनी किती सहजतेने केला आहे . कारण पांडुरंग हे सर्वपरिचित विशेष नाम तर आहेच पण या शब्दास 'शुभ्र /धवल रंग असलेला' हा देखील एक अर्थ आहे . म्हणजे त्यांना दिसणारा विठूराया रत्नांच्या कांती मधून ज्या प्रमाणे झगमगाट प्रसरण पावतो त्याप्रमाणे तेजःपुंज दिसत आहे . आणि या सौंदर्याचे वर्णन करण्यास शब्द कमी पडतात .असे ते नम्रतेने नमूद करतात .
त्यापुढील कडव्यात -
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
हा कानडा विठूराया मला असे तल्लीन करून टाकत आहे कि त्याने मला पुरता ध्यास लावला आहे पण तो असा काही गुरफटून बसला आहे कि माझ्या आर्त सादाला अद्याप प्रतिसाद देत नाही आहे पण हि अवस्था असली तरी, जो शब्दाशिवाय इतरांशी बोलतो,त्याला मी का समजावून घेवू शकत नाही . भाषेशिवायच बोलणे होत आहे ,पण ती भाषा मला का उमजत नाही असा स्वतः ला प्रश्न विचरून भक्ताची स्थिती ते या कडव्यात मांडतात -
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
हि संभ्रम अवस्था ,त्या सगुण साकार तेजः पुंज विठुरायाचे दर्शन म्हणजे नतमस्तक व्हावे तर पाऊल सापडत नाही . साक्षात परमेश्वर समोर आहे पण कसा सरळ कि पाठमोरा हे उलगडत नाही . धावत जावून त्यास कडकडून आलिंगन द्यावे असे आतून वाटतेय पण त्यासाठी धावावे तर आपलेच एकटे पण जाणवते . आणि दर्शनातील आतुरता मात्र तशीच राहते . या परिपूर्ण रचनेची सांगता करताना हीच भक्ताची सैरभैर अवस्था किती अचूक टिपलीय ते पहा -
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
जेंव्हा संत ज्ञानेश्वर इतक्या अर्थगर्भ पूर्ण रचनेतून, विठ्ठल दर्शन घडवतात तेंव्हा ,आपल्या दुसऱ्या एका सहज सुंदर रचनेतून विठूरायास पाहताना म्हणतात,डोळे भरून या विठ्ठलास पाहणे म्हणजे स्वर्गसुख आहे ,आणि या विठ्ठल दर्शनाची जी आवड मनात निर्माण झाली आहे ते घडण्या मागे केवळ पूर्वपुण्य आहे . इतक्या नम्रतेने केलेली त्यांची हि रचना -
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥
जसे सोप्या शब्दात अचूक वर्णन हि संत ज्ञानेश्वर यांची ख्याती होती तशीच काही देणगी संत तुकाराम महाराज यांना लाभली होती. त्यामुळे त्यांच्या नजरेतील विठोबा म्हणजे -
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥
तुळसी हार गळां कांसे पीतांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
इतक्या यथार्थ वर्णना नंतर सांगता करताना ,ते या नितांत सुंदर मुखकमला कडे पाहत सांगतात ,कि याचे दर्शन हेच माझे सर्वसुख आहे आणि त्याच्या दर्शनात मी रममाण होण्यात मला आनंद आहे .त्यासाठी ते लिहतात -
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥
अर्थात इतके वर्णन करून देखील त्यांचे समाधान होत नाही . त्यामुळे पुन्हा एकदा भरभरून लिहताना,माझा पांडुरंग म्हणजे सौंदर्याचे प्रतिक आहे आणि या सौंदर्याचे तेज कसे आहे कि त्यापुढे सूर्य चंद्राचे तेज लोप पावते . हे सांगून पुढे ते या मूर्तीचे नखशिखांत वर्णन करून त्याच्या दर्शनचा विलंब अधीर करून सोडत आहे ,इतकी कळकळ त्यांच्या या रचनेत उतरली आहे -
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥
कांसे सोनसळा पांघरे पांटोळा ।
घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥५॥
तर विठ्ठल दर्शनाने कृथार्थ वारकर्यांच्या सह पालखीस पंढरीकडे नेवू आणि त्याच्या दर्शनाने आपणही तृप्त होवु.
गेले काही दिवस रोमातून ही
गेले काही दिवस रोमातून ही लेखमाला वाचते आहे. फार म्हणजे फार सुरेख लिहित आहात तुम्ही! प्रत्येक लेख वाचताना डोळे कधी पाणावतात ते कळत नाही! तुमचे मनापासून आभार __/\__
सगुण-निर्गुण -सगुण-निर्गुण
सगुण-निर्गुण -सगुण-निर्गुण अशा विलक्षण वर्तुळातील परमात्म्याचे दर्शन सर्व संत (तुकोबा-ज्ञानोबादी) आधी स्वतः अनुभवतात आणि मग अतिशय रसाळ, प्रासादिक वाणीत ते प्रगट करतात - अशा शब्दांची भुरळ आपल्याला न पडली तरच नवल .....
रविन्द्रजी - तुम्ही या सार्याचे इतके सुरेख संकलन करीत आहात याकरता मनापासून ____/\_____
जिज्ञासा, पुरंदरे शशांक -
जिज्ञासा, पुरंदरे शशांक - आभार !
जिज्ञासा -धन्यवाद !
जिज्ञासा -धन्यवाद !