ठाणाळे लेणी
18 डॉल्फिन्स ग्रुपच्या बाईक सफर, ट्रेक म्हणजे आता आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. वर्षाकाठी एक १० दिवसाची हिवाळी बाईक टूर अन एक पावसाळी ३ दिवसाची बाईक सफर हि परंपरा गेले कित्येक वर्षे चालू आहे. गड किल्ल्यांच्या सफरी, डोंगर दऱ्यांमध्ये उनाडकी, बाईकवर गावो पाडी भटकंती हाच आमचा जीवनानंद झाला आहे.(आता तर हे आमच्या बायको-मुलांच्या हि अंगवळणी झाले आहे)
अश्याच एका पावसाळी बाईक टूरची आठवण मनावर अगदी कोरली गेली आहे. मला नेमकी तारीख आठवत नाही पण साधारण दोन एक वर्षा पूर्वी म्हणजे जुलै २०१३ ला आम्ही पावसाळी बाईक टूरला निघालो होतो.
पावसाळी बाईक टूर म्हटली कि इतर बाईक टूर, ट्रेक सारखी नसते. याला काही विशेष तयारी करावी लागते. प्रत्येक वस्तू अन कपडे वेग वेगळ्या प्लास्टिक पिशवीत घ्यावी लागते. पूर्ण दिवस पावसात भिजत प्रवास केल्यावर रात्री झोपण्यासाठी उबदार कपडे, थोडासा सुका खाऊ, मोबाईल साठी विशेष सुरक्षा अश्या एक ना अनेक भानगडी असतात. पण म्हणता ना .... ‘हौसेला मोल नसते’ हेच खरे.
पालघर हून सकाळी लवकर निघून ठाणे-पनवेलचे कॉंक्रीटचे जंगल पार करत आम्ही साधारण ४ वाजता पाली या निसर्ग रम्य गावी पोहोचलो. पावसाळ्यामुळे पालीच्या निसर्गाने हिरवी गार चादर पांघरली होती. हवेत मस्त गारवा पसरला होता. पालीच्या भक्त निवासात ब्यागा टाकल्या.
मंदिराकडे निघालो.
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.
नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन. आम्ही ठाणाळे लेण्यांकडे निघालो. हे जुने लाकडी बांधकामाचे मंदिर खूपच सुंदर आहे. आपण मंदिरात दोन मिनिटे बसलोना तर मनाला नक्की शांतता लाभेल यात शंका नाही.
हे सगळे आटपून आम्ही ठाणाळे गावात पोहोचता पोहोचता साधारण ५.०० वाजले होते. गावात विचारपूस केली तर 'इतक्या उशीरा निघून तुम्ही परत खाली कधी उतरणार' असा सूर निघाला. उतरताना काळोख होईल. त्यात दिवस भर पाऊस सुरूच होता. आज नाही पाहिली तर पुन्हा कधी येऊ याचा काही नेम नाही. तसा डोंगर चढण्यासाठी सूर्य प्रकाश मुबलक होता. उतरण्याचे काय ते नंतर बघू म्हणत आम्ही निर्णय घेतला. आपण ठाणाळे लेणी पहायचीच.....!
ठाणाळे गाव डोंगराच्या पायथ्याशीच वसले होते.छोटेसे गाव त्यात आम्हाला वाट दाखविण्यासाठी एक काका भेटले. गावाच्या मागच्या बाजूने आम्ही चढायला सुरवात केली. घनदाट जंगल, रिम झिम पाऊस सुरु होता. जंगलातली ही पायवाट खूपच निसरडी होती. सुमारे अर्धा तास चालल्यावर आम्हाला वाटेत एक ओहोळ(ओढा) लागला आणि तो ओहोळ पार करून आम्हाला पुढची वाट धरायची होती. पाऊस सुरु असल्या कारणाने ओहोळाच्या पाण्याचा वेग खूपच तीव्र होता. एकमेकला धरून आम्ही साखळी केली आणि तो ओहोळ पार केला. पावसाचा जोर वाढत होताच त्यात सुर्यनारायण हि आपला प्रकाश हळू हळू मंद करत होते. आता दुसरा ओहोळ लागल आम्ही तोही पार केला. काका म्हणत होतेच "बिगीबिगी चला उतरताना कालोख होईल अन पान्याचा जोर बी वाडल" साधारण दीड तासात आम्ही लेण्यांपर्यंत पोहोचलो.(हे फोटो आंतरजालावरील )
पायथ्यापासून १००० फुटांवर असलेली ही लेणी पश्चिमाभिमुख आहेत. तेवीस बौद्ध लेण्यांनी युक्त अश्या या लेणीसमुहात एक चैत्यगृह ,एक स्मारक स्तूप समूह व एकवीस निवासी गुहा आहेत. दक्षिणोत्तर दिशेत एका माळेत कोरलेल्या बहुतांशी लेण्यांमध्ये बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी दगडी ओटे खोदलेले आहेत..ठाणाळे लेणी समूहातील एका विहारात प्राकृत – ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले पाण्याचे टाक आहे. ठाणाळे लेण्यांमधील सर्वात आकर्षक व प्रशस्त असे सात क्रमांकाचे दालन साधारण मध्यावर आहे.
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ठाणाळे लेण्यात इंग्रजांपासून लपण्याकरीता आश्रय घेतला होता. असे माझ्या वाचनात आले होते.
बहुतेक सर्वच लेणी अपूर्ण अवस्थेत आहेत. पण हि जागा खूपच सुंदर आहे. पुढल्या वेळीस लेण्यांमध्ये रहाण्याच्या तयारीनेच येऊ असे म्हणत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.(काका कंदील पेटविताना)
आता आम्हाला घाई करणे क्रमप्राप्त होते. कारण हळू हळू काळोखाचे साम्राज्य पसरायला सुरवात झाली होती. आम्ही लेणी बघत असतानाच काकांनी आपल्या सोबत आणलेला कंदील पेटविला होता. पाऊस पडत असल्याने मोबाईल बाहेर काढणे शक्य नव्हते. आमच्या पैकी एका कडे Headlamp होता. एक Headlamp आणि एक कंदील यांच्या सहारे आम्ही या घनदाट जंगलातून वाट काढत पुढे सरकत होतो. आता जंगलात संपूर्ण काळोख पसरला होता पावसाचा जोर वाढला होता. परतीच्या प्रवासाला लागलो होतो पण पाऊस आणि काळोख या मुळे हा प्रवास आता अवघड झाला होता. आमच्या पुढे काका आणि आम्ही एका रेषेत मागो माग.... मजल दरमजल करत आम्ही पहिल्या ओहोळजवळ पोहचलो. जोरदार पावसामुळे पाण्याचा वेग वाढला होता. मिट्ट काळोखात आता हा ओहोळ आम्हाला पार करावयाचा होता. काका एकाहातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन पुढे निघाले स्वतःला सावरत त्यांनी ओहळ लीलया पार केला. विरुद्ध तीरावर जाऊन काकांनी काठी पुढे सरकवत एकेकाला येण्यास सांगितले. आता हा म्हातारा आम्हा जवानांना लाजवत होता.(हाच तो ओहोळ)
या अश्या पाण्याच्या वेगात ओढा पार करणे म्हणजे एक दिव्य होते. पाय सरकला तर आपण नेमके कुठे जाऊ याचा विचार न केलेलाच बरा. एकमेकाला धीर देत, पाण्यात शेवाळामुळे गुळगुळीत झालेले दगड, त्यात स्वतःचा तोल सावरत एकदांचा कसातरी हा ओहोळ आम्ही पार केला. पण या भानगडीत कंदील मात्र विझला होता. प्रकाश देणारा एकमेव सहारा आता विझला होता. कंदिलाचे फुन्देल फुटले होते. आता पुढे काय ?????
या मिट्ट काळोखात आम्हाला पुढे मार्ग कसा शोधावा हा एकच यक्ष प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. इथे ही काकांच्या पिकल्या केसांचा अनुभव कामाला आला. काकांनी अचानक आपले धोतर सोडले. आम्ही बघतच राहिलो. हे काय चालले आहे. पाठोपाठ साधारण कमी भिजलेला लोंगट हि काढला. धोतर पुन्हा नेसून काकांनी जवळचाच एक काठी काढली . त्याला लंगोटाचे कापड गुंडाळले. त्यावर कंदिलाची एक तार काढून कापड घट्ट बांधून घेतले. कंदिलातील रॉकेल काढून कापडावर टाकले. इथपर्यंत सगळे ठीक होते. पण या पावसात आग कशी लावणार???? त्यात हि मार्ग निघाला. आमच्यातील एकाकडे लायटर होते. आता आमची मशाल पेटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित हास्य पसरले होते. प्रकाशाची किंमत काळोखाशिवाय कळत नाही हेच खरे......
आता पुढील प्रवास सुखरूप होऊदे अशी मनोमन देवाला प्रार्थना करून आम्ही पुढे निघालो. झपाझप पावले पुढे टाकत पुढे सरकत होतो. रातकिड्यांचा आवाज आता अधिकच गडद झाल्याचा भासत होता. थोड्याच वेळात दुसऱ्या ओहोळापाशी येऊन पोहोचलो. हा ओहोळ आधीच्या ओहोळा पेक्षा थोडा लहान होता. विनासायास आम्ही तोही ओढा पार केला. आता वाट सरळच असावी, आता आपण सहज पोहचू असे आम्हाला वाटत होते. मात्र घनदाट जंगलात नेमका गाव कुठे आहे याचा अंदाज येत नव्हता. तरी काकांच्या भरवश्यावर मध्ये मध्ये कंदिलातील रॉकेल मशालीवर टाकत आम्ही पुढे मार्गक्रमण करत होतो. अचानक काका थांबले. रस्ता चुकला........काळजात धस्स झाले. थोडे पुढे मागे झाले खरे मात्र काकांनी या काळोख रात्रीतही नेमका मार्ग शोधलाच आणि पुन्हा एकदा आम्ही योग्य मार्गाला लागलो. जस जसा गाव जवळ येऊ लागला तस तसे गावातील दिवे दिसायला लागले. आणि तस तसे आमच्या पोटातील कावळे जोर धरू लागले. साधारण ९ वाजता आम्ही पायथ्याशी पोहचलो. काकांच्या घरी थंडगार पाणी पिऊन शांत झालो.
काकांच्या मेहनीतीचा योग्य तो मोबदला देऊन आम्ही काकांच्या आठवणी मनात घेऊन निघालो.
आता पाली चे भक्त निवास लवकरात लवकर गाठायचे होते. जेवण जोशी काकुंच्या घरी सागितले होते. जेवण आणि आमच्यात आता फक्त १३ कि. मीटरचे अंतर होते. आमच्या गाड्या जोशी काकुंच्या घरी सुसाट सुटल्या होत्या.
जोशी काकु आमची वाट पाहतच होत्या. जोशी काकुंचे शुद्ध ब्राह्मणी सुग्रास जेवणावर आम्ही यथेच्छ ताव मारला. लसूण चटणी तर अप्रतिमच......! “अन्नदाता सुखी भव” म्हणत आम्ही जोशी काकुंच्या घराचा निरोप घेतला.
रात्री पाली भक्तनिवास मध्ये दंगा मस्ती करत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी कोलाडला जाऊन river rafting चा आनंद घेऊन. ताम्हीणी घाटातील मुसळधार पाऊस अनुभवत लोणावळ्या मार्गे पालघर गाठले. हि पावसाळी बाईक टूर म्हणजे आम्हा बाईक वेड्यांना स्वर्गीय आनंद देणारीच ठरली.
जयदीप पाटील, केळवे पालघर(काकूनकडे सकाळचा नास्ता)
(बल्लाळेश्वर (पाली) मंदिरासमोरील तलावात पोहताना.)
वा मस्तच. मीही दिवसाच रस्ता
वा मस्तच. मीही दिवसाच रस्ता चुकलो होतो.उन्हाळ्यात चुकलो तर तहानेने जीव व्याकुळ होतो ,पावसाळ्यात ओढे ओलांडता येत नाहीत.थंडीत चुकलो आणि चारची ठाणे बस डोळ्यासमोरून निघून गेली होती मग नाडसूरपर्यंतची पायपिट वाढली.
सुंदर वर्णन. अनोखी सफर !
सुंदर वर्णन. अनोखी सफर !
Srd, धन्यवाद....! दिनेश दा
Srd, धन्यवाद....!
दिनेश दा ,जिप्सी , आशुचांप , सुनटून्या अश्या अनेक मा. बो. करांचे लिखाण वाचूनच. आपण हि काही लिहावे अशी इच्छा निर्माण झाली. दिनेश दा तुमचे दोन शब्द माझा सारख्या नवोदिताला प्रोसहनच थाप वाटते.