स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल

Submitted by kulu on 2 July, 2015 - 11:18

आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359

अजुन एक सुंदर वीकंत मिळणार असं मंगळवारीच कळलं. एकतर मागच्या वर्षी स्वित्झर्लंडला उन्हाळा असा नव्ह्ताच. तापमान जास्त होता पण ऊन नाहीच. नुसता पाऊस. त्यामुळ भास्करराव या वीकांताला असणार म्हटल्यावर मी मैत्रीण, स्विस आई, गाईड,फिलॉसॉफर मार्थाबाई यांनी लग्गेच मी कुठेतरी प्रस्थान करावे असे फर्मान काढले. पण सनी वीकेंड म्हटल्यावर सगळीकडे गर्दी असणार , म्हणुन मार्थाला म्हटला की एखाद रीमोट ठिकाण सांग बयो! तसं ठिकाण निवडुन तिने प्लॅन केलाच.
तर जायचं होतं इन्नरथाल या गावी. पण मार्थाने मला कधीही एकाच ठिकाणी जायचा प्लॅन दिलाच नाही. जाता जाता तिथलं आजुबाजुचं पण बघता येईल असं पहायचीच ती. त्यामुळे जाता जाता आईनसिडऽन इथली बेनेडिक्टाईन आईनसिडऽन अ‍ॅबी (याचा उच्चार बे आणि बी च्या मधला काहीसा आहे, लिहिताच येत नाही) बघायचं ठरलं.
आईनसिडऽन ला जायला एक छोटीशी परीकथेत शोभावी अशी रेल्वे होती. गर्दी नव्हतीच. ऊन तर असं पडलेलं की,
भीमसेनजींची "सुंदर कांचन बरसे" ही शुद्ध सारंगातली चीज आठवावी!
अ‍ॅबी बांधायची सुरुवात इस ८६१ जानेवारीत झाली.स्वित्झर्लंड १६०० नंतर बर्‍यापैकी प्रोटेस्टंट झाल्यामुळे या कॅथॉलिक वास्तुला बर्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर आग, मारामार्‍या यातुन पडत उभारत राहीलेली ही वास्तु १९९७ साली शेवटची रिनोव्हेट करण्यात आली. पोप ने भेट दिलेली ही वास्तु भाविकांसाठी अतिपावन आहे. इथे मॉनेस्ट्री आहे, ज्यात अनेक विद्वान शिकले, आणि विशेष म्हणजे ते कार्य अजुनही सुरु आहे. आपल्या पंढरीच्या वारीप्रमाणे, कॅथोलिक ख्रिश्चन लोकांच्यात "वे ओफ सेंट जेम्स" अशी एक तीर्थयात्रा पायी केली जाते. त्या यात्रेतलं ही मॉनेस्ट्री एक प्रमुख क्षेत्र आहे. कथिड्रल च्या आतच लेडी चॅपेल ओफ ब्लॅक मॅडोना आहे. आपल्या इथे जसं मेन मंदीरात कडेला गणपती, दत्ताची वगैरे छोटी छोटी देवळे असतात त्याप्रमाणे.
मी गेलो त्यावेळी तिथे आवारात काम चालु असल्याने फार फोटो काढता आले नाहीत. आणि आत फोटो घ्यायला परमिशनच नाही.

त्याच्या आवारातुन दिसणारं हे छोटंसं आईन्सेडऽन गाव. टिपिकल धर्मक्षेत्र............पण सुंदर, स्वच्छ आणि अंगावर न येणारं!

समोर दिसतेय ती मॉनेस्ट्री. तिथल्या एका भल्या माणसाच्या कृपेमुळे मला आत जाऊन त्यांचं शिक्षण वगैरे बघता आलं. मधात घोळलेले गरम शेंगदाणे खाता खाता काढलेला हा फोटो.

मला माझा सतार टीचर थॉमस ने देखिल सांगितलं होतं हे कथीड्रल बघायला..............त्यातल्या प्रचंड ऑर्गन साठी. खरच प्रचंड प्रकार होता तो. दोन माणसे मावतील एवढ्या प्रचंड नळ्या त्या ऑर्गनच्या.. आणि आवाज तर असा पॉवरफुल की बोलायलाच नको. खरं हा ऑर्गन वाजवण महा किचकट काम. एकतर आवाज घुमल्यामुळे आपण वाजवतोय हे बरोबर की नाही हे ऐकुन थरवता येत नाहे. समोरच्या पुस्तकात जी मेलडी लिहिलेय ती जशीच्या तशी न चुकता वाजवणे आणि घुमणार्‍या आवाजकडे लक्ष्य न देणे ही तारेवरची कसरत!

आता पुढचा टप्पा इन्नरथाल. खरं तर इन्नरथाल हे छोटंस म्हणजे अगदी २०० लोकवस्तीचं गाव. पण ह्या एवढ्याशा गावाला सुंदर तळं, पाठीला खडा दोंगर मिळालाय.

तिथे जाताना ही तळ्याच्या कडेने जाणारी नागमोडी वाट

आणि एक छोटासा पुल

हे इन्नरथाल गाव

समोर दिसणारा तळ्याचा व्ह्यु बघुन मी थक्क झालो.

डोळ्यानी तळे अक्षरशः पित होतो मी!

तळ्याच्या स्तब्ध पाण्यात पडणारं प्रतिबिंब पाहुन तृप्त वाटत होतं!

त्या तेव्हढ्याशा गावला स्वतःच एक टुमदार चर्च पण होतं.

आणि एक छोटेखानी हॉटेल सुद्धा.

तिथे एका बाकावर बराच वेळ नुसता बसुन राहिलो. बघत. थक्क होऊन थकलो होतो!

अनंतहस्ते कमलावराने । देता किती घेशील दो कराने ॥

सुखी माणसाचा सदरा या घरात नक्कीच सापडेल

जायची वेळ झाली. जाता जाता वाईत तर वाटतच होतं. एव्हढं सगळं पाहिलेलं, ही पुरचुंडी आयुष्यभर पुरवायची.
काहीतरी अगदी खुप सुंदर आणि एकाकी पाहिलं की नकळत मनात काहीतरी तत्वज्ञान सुरु होतंच. एवढ्या मोठ्या निसर्गापुढे स्वतःच आयुष्य अगदी गौण वाटायला लागतं.
मागे वळुन वळुन तळ्याकडे बघत होतोच!

आपल्याकडे घाटात वगैरे जसे देवीची छोटी मंदीरे असतात तसं हे छोटं मंदीर.
देवाला म्हटलं, परत येईन रे बाबा. हे तळं मात्र जप!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती देखणं, किती देखणं अरे!! ते गाव अगदी चित्रातल्यासारखंच आहे. मी आजपर्यंत नॉडीचंच गावच इतकं टुमदार आणि देखणं बघितलंय.. एकसे एक सुंदर फोटो आहेत आणि त्यावर तुझ्या त्या फेमस कॉमेंट्स Happy

थक्क होऊन थकणं वगैरे अगदी समजूच शकतंय.. आम्हाला थक्क करण्यासाठी मात्र फारच मोठ्या गॅप्स घेतोयस तू. जरा लवकर लवकर टाकत जा पुढचे भाग...

कुलदीप....

~ काय केले आहेस तू हे ?

"अत्यंत देखणे" या व्याख्येत कदापिही बसू न शकणारे रस्ते.....तलाव....चर्चेस... बागा .... चर्चेस...नदी काठ...काठाशेजारील ती टुमदार घरे, नागमोडी वळणे....कमालीची स्वच्छता....आणि या सर्वांवर कडी म्हणजे सर्वकाही जवळपास निर्मन्युष....औषधासाठी हवे असेल तर मदतीला एक माणूस नाही...साधे रस्त्यावरून भुंकायलासुद्धा कुत्रे नाही....पार्किंगसाठी भरपूर जागा आहेत, पण एखाददुसरी कार पार्क ! असे वाटू लागले मला की तू ज्यावेळी फोटो काढण्याचा दिवस निवडला त्यावेळी गावात कर्फ्यू पुकारला होता की काय !!

तुझ्या मजकुरापेक्षा माझी नजर ह्या चित्रानीच खिळवून ठेवली....अशी की जणू काही स्वीस शासकांनी आमच्या डोळ्यांवर काहीतरी जादूच केली आहे....नशीबवान आहेस तू...तिथे शिक्षणासाठी गेलास आणि ज्ञानासोबत निसर्गाची आणि व्यवस्थेच्या चांगलेपणाची करामत तुला पाह्यला मिळाली.

अप्रतिम..इतकं शांत पाणी पहिल्यांदा पाहतेय.. आपल्याइकडं इतक शांत तळं दिसल्यावर त्यात दगड मारणारेच जास्त दिसतात .. सुखी माणसाचा सदरा तुझ्याच बॅगमधे मिळेल कुलु Happy

vaah!

अहाहा, क्युट लेखन. लवली फोटो.

स्वप्नाच्या गावात फिरवल्याबद्दल धन्यवाद, कुलू.

दृष्टी आणि मन दोन्हीही प्रसन्न. खुप आशीर्वाद कुलु तुला.

आहाहा ........ ग्रेट ....... केवळ अनुभवण्यासारखेच सारे ....

सुखी माणसाचा सदरा तुझ्याच बॅगमधे मिळेल कुलु <<<+१००

होती. गर्दी नव्हतीच. ऊन तर असं पडलेलं की,
भीमसेनजींची "सुंदर कांचन बरसे" ही शुद्ध सारंगातली चीज आठवावी!>>>>>>
कुलु ...याबद्दल तुला १०० पैकी २००. अगदी डोळे मिटून चीज आठ्वली तरी आइनसिड्नचं सांडलेलं ऊन अनुभवलं.

अरे काय अप्रतीम फोटो टाकतोयस! अहाहा!

आहा.. किती सुंदर गाव आहे हे. स्वच्छ मोकळे रस्ते, कचरा असलाच तर तो नुकत्याच गळालेल्या पानांचा, स्तब्ध नितळ निळाईने भरलेले तळे, एखादीच चुकार बोट..... आणि ह्या सगळ्यात कडी करणारी स्वच्छ सुंदर हवा. हे खेडे खरे नसणार, कोणीतरी चित्रे काढुन ठेवलीय बहुतेक Happy

"...हे खेडे खरे नसणार, कोणीतरी चित्रे काढुन ठेवलीय बहुतेक...."

~ साधना यानी अगदी अचूक ओळखले आहे...मी समजत होतो फ़ोटो काढलेले आहेत. सबब आता त्यामुळे माझा गाववाला पोरगा कुलदीप याचा निषेध करावा असे वाटत आहे.... Lol

भारतीताई, मित, जयु, साधना धन्यवाद Happy

हे फोटो खरे असुनही मामांनी माझा निषेध व्यक्त केला म्हणुन मी निषेध व्यक्त करतो........ !!!