ये रे ये रे पावसा,...

Submitted by vishal maske on 1 July, 2015 - 09:14

ये रे ये रे पावसा,...

केली होती पेरणी,ठेऊन तुझ्यावर भरवसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||धृ||
उन्हामधी राबुन राबुन
पै-पै जमा केली होती
जमीन भेगाळलेलीच होती
पण आशा मात्र ओली होती
वाटलं होतं मनामधी,मीळल तुझा वसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||१||
पहिल्या पावसाचं स्वागत कराया
मानवजात आनंदी झाली होती
तुझे पेपराला फोटो अन्
टि.व्ही.ला बातमी दिली होती
सांग आता तु,का रागवलास असा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||२||
पहिलं कर्ज फिटलं नव्हतं
पण दुसरं कर्ज काढलं होतं
अन् कमी पडलेल्या पैश्यांसाठी
बायकोचं दागिणं मोडलं होतं
उगावणार्‍या सुखालाही,नको टाकु फासा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||३||
आता शेताकडं पाहतानाही
मन उदास-उदास होतंय
अन् करपणारं अंकुर सुध्दा
माझ्याकडं केविलवाणं पाहतंय
कसं सांगु त्याला की,माझा मोकळा झालाय खिसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||४||
वयानं मोठा असलो तरी
मनानं आज छोटा झालोय
अन् मनाच्याही मनामध्ये
आज तुझाच रे भाटा झालोय
तुझं बालगीतही,मी गाऊ लागलो भरदिवसा
ये रे ये रे पावसा,ये रे ये रे पावसा,...||५||

विशाल मस्के,
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात ऐंकण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783

कविता आवडल्यास जरूर पुढे पाठवा,परंतु कविते खालुन नाव काढू नये,...

Group content visibility: 
Public - accessible to all site users