साल १९९२, स्थान माटुंगा बॉम्बे ग्लासवर्कसमोरची शाळा, महिना बहुधा असाच जुन जुलैचा असेल. योगविद्यानिकेतन संस्थेचा सोळावा टिचर्स ट्रेनिंग कोर्स सुरु झाला होता. आम्ही सारे हॉलमध्ये एकत्र जमलो होतो. निंबाळकर सर अमेरीकेहुन परतले नव्हते. आणखि आठ दिवसांनी येणार होते. पण शिस्तीप्रमाणे कोर्स सुरु व्हायलाच हवा होता. स्टेजवर अष्टेकर सर आले. आणि त्यांनी त्यादिवशीच्या योगवर्गाला सुरुवात केली. निंबाळकरसरांऐवजी अष्टेकर सर हा वर्ग आठवडाभर घेणार होते. नम्रतेची पराकाष्ठा करीत अष्टेकरसरांनी सुरुवात केली "राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?" आणि अतिशय समर्थपणे त्यांनी आठ दिवस आमचे शिक्षण केले. आठ दिवसांनी निंबाळकर सर आल्यावर मात्र अष्टेकरसरांनी त्यांना "राजहंस" का संबोधले असावे याचा अंदाज आला. तेजपुंज चेहरा. भव्य कपाळ, मध्यम उंची, साधा परिवेष, खणखणीत आवाज, मराठी, इंग्रजी आणि हिन्दी या तिन्ही भाषांमध्ये लिलया वावर असलेल्या निंबाळकरसरांनी आमचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. एखाद्या विषयावर "मास्टरी" असणे म्हणजे काय याचे ते प्रात्यक्षिकच होते. काही माणसे आपल्या निव्वाळ अस्तित्वानेच वातावरणावर प्रभाव टाकतात. अशा तर्हेचा सरांचा प्रभाव होता. इतरवेळी सर खांद्याला झोला लावुन अत्यंत साधेपणाने सर्वांमध्ये वावरत असत. मात्र स्टेजवर आले कि त्यांच्या तोंडुन "योग" बोलत असे.
या वर्गात आम्ही आसने शिकलो, प्राणायाम शिकलो, योगातील क्रिया सरांनी आमच्याकडून करुन घेतल्या. येथे आम्हाला पातंजल योगसूत्राची ओळख झाली. अनेक गोष्टी सरांनी भरभरुन दिल्या. त्यांची स्वतःची एक विचारांची बैठक होती. आणि त्यांनी ती अतिशय विचारपूर्वक ठरवली होती हे आज जाणवते. योग विषयात सिद्धी हा एक वादग्रस्त विषय. पातंजल योगसूत्र ही योगाभ्यासकांची भगवदगीताच. त्यात एक संपूर्ण भाग सिद्धीवर्णन आहे. काय केल्याने काय मिळतं याचा उहापोह आहे. सरांनी योग शिकवताना योगसूत्रे जरी वापरली तरी सिद्धी हा भाग पूर्णपणे टाळला. स्टेजवरुन ते त्याचा चर्चा वा साधा उल्लेख देखिल करीत नसत. त्यांनी आपला मार्ग हा वैज्ञानिक ठेवला होता. जे विज्ञानाला मान्य आहे, जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येईल इतकेच सर सांगत असत. चमत्काराला सरांकडे थारा नव्हता. योगाच्या जुन्या पुस्तकांमध्ये आसने प्राणायामाचे अतिमानवी वाटतील असे परीणाम वर्णिलेले असतात. त्याचाही उल्लेख सरांच्या शिकवण्यात नसे. त्यांनी आपल्या योगविद्येची मर्यादा शारिरीक आणि मानसिक उन्नती इतकीच मर्यादीत ठेवली होती. आणि हेच नेमके त्यांच्या शिकवण्याचे बलस्थान होते. पुढील मार्गाबद्दल त्यांना आकस नव्हता कि अनादर नव्हता. पण शिकवताना जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येत नाही ते सांगणे त्यांना मंजुर नव्हते. त्यामुळे निंबाळकरसर हे निंबाळकर"सर" च राहीले. बाबा किंवा महाराज ही पदवी त्यांच्यामागे कधीही लागली नाही.
हाच मार्ग त्यांनी पुस्तके लिहितानादेखिल अवलंबीला. सरांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांना त्यासाठी अनेक पुरस्कार देखिल मिळाले. "आरोग्यासाठी योग" हे पुस्तक तर आजदेखिल प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र त्यातदेखिल अतिमानवी सिद्धींचा उल्लेख त्यांनी टाळला. शरीर आणि मनाचे आरोग्य एवढाच उद्देश त्यांनी लिहिताना बाळगला. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांभोवती चमत्कारांचे, गुढतेचे वलय नव्हते. सर्वसामान्यांना पटेल, महत्त्वाचे म्हणजे त्यांना झेपेल आणि त्यांना योगाची आवड निर्माण होईल अशा तर्हेने अत्यंत प्रासादिक भाषेत त्यांनी पुस्तके लिहिली. योगविद्या निकेतनचा एकुणच दृष्टीकोण हा सर्वसामान्यांसाठी योगप्रसार हा असल्याने त्यांच्या इतर ठिकाणी चालणार्या योगवर्गात देखिल सरांचा हाच विचार योग शिकवताना प्रामुख्याने मांडला जातो. या योगवर्गात शिकवणारे शिक्षक हे योगविद्या निकेतनच्या योगशिक्षक वर्गातुन बाहेर पडलेले असतात आणि अत्यंत निस्वार्थीपणे आपली सेवा देत असतात. त्यांना अतिशय अल्पस्वल्प असे मानधन मिळते. योग्यविद्या निकेतनच्या योगवर्गाचे शूल्क इतर क्लासेसच्या मानाने फारच कमी असते. योगाचे बाजारीकरण झाल्याच्या जमान्यात ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. आणि हे शिक्षकदेखिल शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग शिकवुन, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुन सरांचा वारसा पुढे चालवित असतात.
निंबाळकर सरांनी योगोपचाराचा अतिशय समृद्ध वारसा आपल्या विद्यार्थ्यांना दिला. निरनिराळ्या आजारांसाठी सोप्यात सोपी आसने त्यांनी सांगीतली. योगाभ्यास हा "रेडीमेड" नसुन "टेलरमेड" असावा असे ते नेहेमी म्हणतात. ते त्यांनी याबाबतीत आचरणात आणुन दाखवलं. योगविद्या निकेतनच्या ऑफीसात पुर्वी सर ठराविक दिवशी स्वतः बसत. आता त्यांचे शिष्य बसत असतील. त्या दिवशी डॉक्टरांचे कागदपत्र घेऊन मंडळी त्यांना भेटतात. आजार पाहुन त्यावर निरनिराळी आसने आणि योगजन्य उपाय सुचविले जातात. सरांनी योगवर्गात पूर्वप्राथमिक आसनांपासुन सुरुवात केली. त्यामुळे अक्षरशः वयाने ऐशीच्या वर गेलेली मंडळीसुद्धा सरांनी सांगीतलेला योग सुखानैव करु शकतात. त्यांनी योगवर्गासाठी डिझाईन केलेले कोर्सेस तर चमत्कारच आहेत. शरीराच्या सर्वांगावर परिणाम व्हावा अशातर्हेने तयार केलेल्या आसनांच्या मालिकेत पूरक असनांचा विचार सरांनी केला आहे. त्यामुळे सर्वांगासनानंतर मत्स्यासन येते. पश्चिमताणासनानंतर सुप्तवज्रासन येते. "मॉडरेशन" हे सरांच्या योगाचे महत्त्वाचे लक्षण. त्यामुळे जबरदस्तीने खेचणे, ताणणे येथे नसते. पूर्व प्राथमिक आसनांनी सुरुवात करावी आणि हळुहळु पुढे जावे. स्पर्धात्मकता बाळगु नये. श्वासावर लक्ष ठेवावे. क्षमतेपेक्षा जास्त करु नये. विशिष्ट आजारात काही आसने करु नयेत. अशा सुचना देत सरांचा वर्ग चालतो. शिकवणे सुरु असताना योगाव्यतिरिक्त ते क्वचितच इतर काही बोलत. मात्र एकदा योगाभ्यास शिकवताना कसल्याशा विषयावरुन सर म्हणाले होते "ऐसी बात बोलिये कोई न बोले झुठ और ऐसी जगहा बैठिये कोई न बोले उठ". हा एक त्यांचा उपदेश मी पक्का लक्षात ठेऊन आहे.
सरांनी हातचं काहीही न राखता भरभरुन दिलं असलं तरी मला ते घेता आलं नाही याचं मात्र फार दु:ख आहे. हिरवट वय होते, मत आणि मिशा दोन्ही फुटल्या होत्या त्यामुळे मुर्खपणाला बंडखोरी समजुन वागणे चालले होते. मार्शल आर्टमध्ये दिवस घालवल्याने शरीर बर्यापैकी लवचिक होते. अनेक कठिण आसने करत असल्याने जरा लोकप्रियता मिळाली होती. ती हवा डोक्यात होतीच. या सार्या गोष्टींमुळे सरांच्या फार जवळ जाता आले नाही. पुढे अनेक वर्षे गेल्यावर डोके ताळ्यावर आले आणि आजवर आपण योगाभ्यास हा एखाद्या शारीरीक व्यायामाप्रमाणे करुन वेळ वाया घालवला हा साक्षात्कार झाला. सरांच्या सांगण्याचे महत्त्व तेव्हा पटले. आज सरांनी तयार केलेला मार्ग हाच माझा योगाचा जीवनमार्ग झाला आहे. योगदिनाच्या निमित्ताने निंबाळकरसरांच्या पायावर डोके ठेऊन त्यावेळच्या चुकांची मी क्षमा मागतो आणि यापुढील आयुष्यात माझ्या योगाभ्यासाला त्यांचा आशिर्वाद असावा ही प्रार्थना करुन येथे थांबतो.
अतुल ठाकुर
दिनेशजी तुमचे म्हणणे लक्षात
दिनेशजी तुमचे म्हणणे लक्षात आले. पण निंबाळकरसरांना "निंबाळकरसर" म्हणुनच म्हणण्याची सवय असल्याने तसे लिहिले गेले. प्रतिसादाबद्दल आभार.
सूर्यनमस्कार आसनाबद्दल छान चर्चा सुरु आहे.
शाम भागवतजी आपल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभारी आहे.
लेख छान झालाय. काल वाचला
लेख छान झालाय.
काल वाचला तेंव्हा सूर्यनमस्कार आणि इतर योगासने एकत्र न करण्याबद्दल वाचल्यावर प्रश्न पडला होता. मी ही योगासने शिकताना हे ऐकल्याचे आठवत नाही आणि आताही करताना आधी सूर्यनमस्कार, इतर योगासने आणि शेवटी प्राणायाम हे एकत्र करते. पण भ्रमर आणि शाम भागवत ह्यांनी लिहिल्याप्रमाणे श्वसनावर लक्ष ठेवत, कमी गतीने केलेले सूर्यनमस्कार हे योगासनांबरोबर एका बैठकीत करता येतात हे पटले.
काही कारणास्तव आसने करण्यास
काही कारणास्तव आसने करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही तर श्वसनावर लक्ष केंद्रित केलेले सूर्यनमस्कार घातल्यास आसने आणि प्राणायाम केल्याचा आनंद घेता येतो.
चाळीसएक वर्षांपूर्वी माझ्या
चाळीसएक वर्षांपूर्वी माझ्या आईवडिलांनी निंबाळकरसरांकडूनच टीचर्स ट्रेनिंग घेतलं त्यावेळी त्यांच्याकडून सरांचं वर्णन ऐकायचो त्याची आठवण झाली. ऋषितुल्य व्यक्तिमत्व!
शेवटच्या परिच्छेदानी तुमच्याबद्दल आदर वाटत आहे. आपल्यातली त्रुटी सगळ्यांसमोर मान्य करायला एक खास आत्मविश्वास लागतो तो तुमच्यात आहे.
आताच सकाळमध्ये वाचले की
आताच सकाळमध्ये वाचले की योगगुरू निंबाळकर सरांचे काल निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
गुरुवर्य निंबाळकर गुरुजींना
गुरुवर्य निंबाळकर गुरुजींना भावपुर्ण श्रध्दांजली
हो निंबाळकर सर गेले.
हो निंबाळकर सर गेले.
वाशीला फादर अॅग्नेल जवळ योगविद्या निकेतन आहे. मी शेजारच्याच गल्लीत राहायचो. आमच्या फॅमिलीतले तिथे योग शिकायला आणि नंतर जमू लागल्याने शिबिरात थोडेफार शिकवायला जायचे. मुलीलाही थोडीफार आवड तिथूनच लागलेली. पण ती योगाच्या नाही तर तिथेच चालणार्या मार्शल आर्टच्या क्लासला जायची. ने आण करताना माझेही तिथे जाणे व्हायचे. सर गेले ती पोस्ट फॅमिलीच्या व्हॉटसपग्रूपवर पडली, स्टेट्स ठेवले गेले आणि मी सुद्धा हात जोडले. पण सरांबद्दल फारसे वा काहीच माहीत नव्हते. आज हा लेख वाचला आणि माहिती कळली. ते गेल्यावर ...
छान लेख, धन्यवाद. लेखाचा शेवटचा परीच्छेदही प्रामाणिक .
Pages