साल १९९२, स्थान माटुंगा बॉम्बे ग्लासवर्कसमोरची शाळा, महिना बहुधा असाच जुन जुलैचा असेल. योगविद्यानिकेतन संस्थेचा सोळावा टिचर्स ट्रेनिंग कोर्स सुरु झाला होता. आम्ही सारे हॉलमध्ये एकत्र जमलो होतो. निंबाळकर सर अमेरीकेहुन परतले नव्हते. आणखि आठ दिवसांनी येणार होते. पण शिस्तीप्रमाणे कोर्स सुरु व्हायलाच हवा होता. स्टेजवर अष्टेकर सर आले. आणि त्यांनी त्यादिवशीच्या योगवर्गाला सुरुवात केली. निंबाळकरसरांऐवजी अष्टेकर सर हा वर्ग आठवडाभर घेणार होते. नम्रतेची पराकाष्ठा करीत अष्टेकरसरांनी सुरुवात केली "राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?" आणि अतिशय समर्थपणे त्यांनी आठ दिवस आमचे शिक्षण केले. आठ दिवसांनी निंबाळकर सर आल्यावर मात्र अष्टेकरसरांनी त्यांना "राजहंस" का संबोधले असावे याचा अंदाज आला. तेजपुंज चेहरा. भव्य कपाळ, मध्यम उंची, साधा परिवेष, खणखणीत आवाज, मराठी, इंग्रजी आणि हिन्दी या तिन्ही भाषांमध्ये लिलया वावर असलेल्या निंबाळकरसरांनी आमचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. एखाद्या विषयावर "मास्टरी" असणे म्हणजे काय याचे ते प्रात्यक्षिकच होते. काही माणसे आपल्या निव्वाळ अस्तित्वानेच वातावरणावर प्रभाव टाकतात. अशा तर्हेचा सरांचा प्रभाव होता. इतरवेळी सर खांद्याला झोला लावुन अत्यंत साधेपणाने सर्वांमध्ये वावरत असत. मात्र स्टेजवर आले कि त्यांच्या तोंडुन "योग" बोलत असे.
या वर्गात आम्ही आसने शिकलो, प्राणायाम शिकलो, योगातील क्रिया सरांनी आमच्याकडून करुन घेतल्या. येथे आम्हाला पातंजल योगसूत्राची ओळख झाली. अनेक गोष्टी सरांनी भरभरुन दिल्या. त्यांची स्वतःची एक विचारांची बैठक होती. आणि त्यांनी ती अतिशय विचारपूर्वक ठरवली होती हे आज जाणवते. योग विषयात सिद्धी हा एक वादग्रस्त विषय. पातंजल योगसूत्र ही योगाभ्यासकांची भगवदगीताच. त्यात एक संपूर्ण भाग सिद्धीवर्णन आहे. काय केल्याने काय मिळतं याचा उहापोह आहे. सरांनी योग शिकवताना योगसूत्रे जरी वापरली तरी सिद्धी हा भाग पूर्णपणे टाळला. स्टेजवरुन ते त्याचा चर्चा वा साधा उल्लेख देखिल करीत नसत. त्यांनी आपला मार्ग हा वैज्ञानिक ठेवला होता. जे विज्ञानाला मान्य आहे, जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येईल इतकेच सर सांगत असत. चमत्काराला सरांकडे थारा नव्हता. योगाच्या जुन्या पुस्तकांमध्ये आसने प्राणायामाचे अतिमानवी वाटतील असे परीणाम वर्णिलेले असतात. त्याचाही उल्लेख सरांच्या शिकवण्यात नसे. त्यांनी आपल्या योगविद्येची मर्यादा शारिरीक आणि मानसिक उन्नती इतकीच मर्यादीत ठेवली होती. आणि हेच नेमके त्यांच्या शिकवण्याचे बलस्थान होते. पुढील मार्गाबद्दल त्यांना आकस नव्हता कि अनादर नव्हता. पण शिकवताना जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येत नाही ते सांगणे त्यांना मंजुर नव्हते. त्यामुळे निंबाळकरसर हे निंबाळकर"सर" च राहीले. बाबा किंवा महाराज ही पदवी त्यांच्यामागे कधीही लागली नाही.
हाच मार्ग त्यांनी पुस्तके लिहितानादेखिल अवलंबीला. सरांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांना त्यासाठी अनेक पुरस्कार देखिल मिळाले. "आरोग्यासाठी योग" हे पुस्तक तर आजदेखिल प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र त्यातदेखिल अतिमानवी सिद्धींचा उल्लेख त्यांनी टाळला. शरीर आणि मनाचे आरोग्य एवढाच उद्देश त्यांनी लिहिताना बाळगला. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांभोवती चमत्कारांचे, गुढतेचे वलय नव्हते. सर्वसामान्यांना पटेल, महत्त्वाचे म्हणजे त्यांना झेपेल आणि त्यांना योगाची आवड निर्माण होईल अशा तर्हेने अत्यंत प्रासादिक भाषेत त्यांनी पुस्तके लिहिली. योगविद्या निकेतनचा एकुणच दृष्टीकोण हा सर्वसामान्यांसाठी योगप्रसार हा असल्याने त्यांच्या इतर ठिकाणी चालणार्या योगवर्गात देखिल सरांचा हाच विचार योग शिकवताना प्रामुख्याने मांडला जातो. या योगवर्गात शिकवणारे शिक्षक हे योगविद्या निकेतनच्या योगशिक्षक वर्गातुन बाहेर पडलेले असतात आणि अत्यंत निस्वार्थीपणे आपली सेवा देत असतात. त्यांना अतिशय अल्पस्वल्प असे मानधन मिळते. योग्यविद्या निकेतनच्या योगवर्गाचे शूल्क इतर क्लासेसच्या मानाने फारच कमी असते. योगाचे बाजारीकरण झाल्याच्या जमान्यात ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे. आणि हे शिक्षकदेखिल शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग शिकवुन, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुन सरांचा वारसा पुढे चालवित असतात.
निंबाळकर सरांनी योगोपचाराचा अतिशय समृद्ध वारसा आपल्या विद्यार्थ्यांना दिला. निरनिराळ्या आजारांसाठी सोप्यात सोपी आसने त्यांनी सांगीतली. योगाभ्यास हा "रेडीमेड" नसुन "टेलरमेड" असावा असे ते नेहेमी म्हणतात. ते त्यांनी याबाबतीत आचरणात आणुन दाखवलं. योगविद्या निकेतनच्या ऑफीसात पुर्वी सर ठराविक दिवशी स्वतः बसत. आता त्यांचे शिष्य बसत असतील. त्या दिवशी डॉक्टरांचे कागदपत्र घेऊन मंडळी त्यांना भेटतात. आजार पाहुन त्यावर निरनिराळी आसने आणि योगजन्य उपाय सुचविले जातात. सरांनी योगवर्गात पूर्वप्राथमिक आसनांपासुन सुरुवात केली. त्यामुळे अक्षरशः वयाने ऐशीच्या वर गेलेली मंडळीसुद्धा सरांनी सांगीतलेला योग सुखानैव करु शकतात. त्यांनी योगवर्गासाठी डिझाईन केलेले कोर्सेस तर चमत्कारच आहेत. शरीराच्या सर्वांगावर परिणाम व्हावा अशातर्हेने तयार केलेल्या आसनांच्या मालिकेत पूरक असनांचा विचार सरांनी केला आहे. त्यामुळे सर्वांगासनानंतर मत्स्यासन येते. पश्चिमताणासनानंतर सुप्तवज्रासन येते. "मॉडरेशन" हे सरांच्या योगाचे महत्त्वाचे लक्षण. त्यामुळे जबरदस्तीने खेचणे, ताणणे येथे नसते. पूर्व प्राथमिक आसनांनी सुरुवात करावी आणि हळुहळु पुढे जावे. स्पर्धात्मकता बाळगु नये. श्वासावर लक्ष ठेवावे. क्षमतेपेक्षा जास्त करु नये. विशिष्ट आजारात काही आसने करु नयेत. अशा सुचना देत सरांचा वर्ग चालतो. शिकवणे सुरु असताना योगाव्यतिरिक्त ते क्वचितच इतर काही बोलत. मात्र एकदा योगाभ्यास शिकवताना कसल्याशा विषयावरुन सर म्हणाले होते "ऐसी बात बोलिये कोई न बोले झुठ और ऐसी जगहा बैठिये कोई न बोले उठ". हा एक त्यांचा उपदेश मी पक्का लक्षात ठेऊन आहे.
सरांनी हातचं काहीही न राखता भरभरुन दिलं असलं तरी मला ते घेता आलं नाही याचं मात्र फार दु:ख आहे. हिरवट वय होते, मत आणि मिशा दोन्ही फुटल्या होत्या त्यामुळे मुर्खपणाला बंडखोरी समजुन वागणे चालले होते. मार्शल आर्टमध्ये दिवस घालवल्याने शरीर बर्यापैकी लवचिक होते. अनेक कठिण आसने करत असल्याने जरा लोकप्रियता मिळाली होती. ती हवा डोक्यात होतीच. या सार्या गोष्टींमुळे सरांच्या फार जवळ जाता आले नाही. पुढे अनेक वर्षे गेल्यावर डोके ताळ्यावर आले आणि आजवर आपण योगाभ्यास हा एखाद्या शारीरीक व्यायामाप्रमाणे करुन वेळ वाया घालवला हा साक्षात्कार झाला. सरांच्या सांगण्याचे महत्त्व तेव्हा पटले. आज सरांनी तयार केलेला मार्ग हाच माझा योगाचा जीवनमार्ग झाला आहे. योगदिनाच्या निमित्ताने निंबाळकरसरांच्या पायावर डोके ठेऊन त्यावेळच्या चुकांची मी क्षमा मागतो आणि यापुढील आयुष्यात माझ्या योगाभ्यासाला त्यांचा आशिर्वाद असावा ही प्रार्थना करुन येथे थांबतो.
अतुल ठाकुर
_/\_
_/\_
सुरेख परिचय आणि लिखाण.
सुरेख परिचय आणि लिखाण.
अतुल ठाकूर, व्यक्तीपरिचय
अतुल ठाकूर,
व्यक्तीपरिचय आवडला. निंबाळकर केवळ गुरुजींविषयी ऐकून होतो. आज जणू प्रत्यक्ष भेट घडते आहे असा भास झाला. हे वाक्य फार समर्पक आहे :
>> "ऐसी बात बोलिये कोई न बोले झुठ और ऐसी जगहा बैठिये कोई न बोले उठ"
सदैव सत् मध्ये राहावं इतकंच गुरुजी म्हणतात. उपदेशही साधा सोपा सरळ शब्दांत केलाय. त्यावरून वाटतं की त्यांच्या सहवासात कठीण योगही सोपा होऊन जात असावा.
आ.न.,
-गा.पै.
मंजुताई, देवकीजी आभार
मंजुताई, देवकीजी आभार
गापै.जी अगदी समर्पक शब्दात मांडलेत. खरच त्यांच्या सहवासात योग सोपा होऊन जातो. आभार
__/\__
__/\__
लिखाण व आत्मपरिक्षण दोन्ही
लिखाण व आत्मपरिक्षण दोन्ही आवडले.
सुंदर मांडलंय. प्रावीण्यासोबत
सुंदर मांडलंय.
प्रावीण्यासोबत शिष्याचे चिंतन सुरू करून देणे हे गुरूचे उद्दिष्ट, तुमच्या उदाहरणाने सफल झाले असल्याचे लिखाणातून जाणवत आहे.
मी सरांना आणि मॅडमंना
मी सरांना आणि मॅडमंना गेल्यावर्षी योगशिबीरमध्ये भेटलो होतो. दोघेही अत्यंत प्रसन्नचित्त व्यक्तीमत्त्वे आहेत!
योग विद्या निकेतन! ही संस्था योगशिक्षकांसाठी एक वर्षाचा अभ्यासक्रम घेते आणि, मुंबई, ठाणे आणि नवीन मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सर्वासाठी मे महिन्यात माफक दरात योगशिबिरे घेतात. ही योगशिबिरे अप्रतिम असतात. मी प्रत्येकाला आवर्जून करायला सांगेन. आपला जीवनाचा दृष्टीकोन बदलून जाते.
ही संस्था खरोखर योगविद्या प्रसाराचे काम प्रामाणिकपणे सामान्य लोकांपर्यत करते. Hats off to them!
छान परिचय
छान परिचय
प्रकाशजी, अमेयराव, मैथिली,
प्रकाशजी, अमेयराव, मैथिली, राजु७६ धन्यवाद!
छान परिचय... धन्यवाद. >>>>
छान परिचय... धन्यवाद.
>>>> आणि आजवर आपण योगाभ्यास हा एखाद्या शारीरीक व्यायामाप्रमाणे करुन वेळ वाया घालवला हा साक्षात्कार झाला. <<<<
यावर तुम्ही अजुन लिहीलेत तर उपयोगी होईल. कारण योगाभ्यास म्हणजे निव्वळ शारिरीक क्षमता सुधारणे असेच अजुनही मानले जाते.
>>>> "राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?"<<<<
याचा नेमका अर्थ काय आहे?
अष्टेकरांना वर्ग घ्यावा
अष्टेकरांना वर्ग घ्यावा लागणार होता. निंबाळकर सर उत्कृष्ट वर्ग घेत पण ते नव्हते म्हणुन वर्ग थांबवता येणार नव्हता. अशावेळी त्यांनी स्वतःकडे कमीपणा घेऊन निंबाळकरसरांचा योगवर्ग तर आदर्श आहेच पण इतरांनी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नसावी या अर्थाने ही ओवी वापरली असावी.
limbutimbu, त्या ओळीचा
limbutimbu,
त्या ओळीचा भावार्थ आहे की राजहंसाचे चालणे जसे (डौलदार) असते तसे इतरांचे नसते. म्हणून बाकीच्यांनी चालूच नये काय?
आ.न.,
-गा.पै.
अतुल, गामा, धन्यवाद. अतुल,
अतुल, गामा, धन्यवाद.
अतुल, योगाभ्यासात शारिरिक क्षमता/सुधारणा या व्यतिरिक्त जे फायदे होतात, त्याबद्दल तुम्हीच लिहा ना. ते खुपच उपयोगी होईल.
येथेच या धाग्यात संध्याकाळी
येथेच या धाग्यात संध्याकाळी लिहितो.
योगाचे मानसिक फायदे सर्वश्रुत
योगाचे मानसिक फायदे सर्वश्रुत आहेत, नेटवर देखिल मिळतीलच पण मला येथे एका मुद्द्याचा त्या अनुषंगाने मुद्दाम उल्लेख करायचा आहे.
विचारचक्र सुरु असताना हाती घेतलेल्या कामात माणसाचे लक्ष नसते. तो एकतर भविष्याचा विचार करीत असतो किंवा भूतकाळाचा. पण वर्तमान क्षण त्याच्या ध्यानात नसतो. योगाभ्यास करताना शरीराच्या हालचालीकडे लक्ष देत आसने केल्यास मन वर्तमानात राहते. आसने स्थिर राखत असताना श्वासावर लक्ष ठेवल्यास मन शांत होते.
योगाभ्यास हा हळुवारपणे करायचा असतो. शरीराला एका लयीत ठेवल्याने विचारांची गतीही कमी होते. वेगाने चालणारे विचारचक्र हे संथ शारीरीक क्रियेने ताब्यात आणण्याचा विचार चायनिज "ताई ची" मध्येही केला गेला आहे.
विचारचक्राची गती कमी होणे, त्यामुळे मन शांत होणे आणि वर्तमानात राहण्याची सवय लागणे हे माझ्यामते योगाभ्यासाचे अतिशय महत्वाचे मानसिक फायदे आहेत.
अतुलराव, तुमच्या
अतुलराव, तुमच्या योगशिक्षकांचा परिचय आवडला. सूर्यनमस्कार व काही योगासने रोज करण्या साठी मला स्फूर्ती मिळाली.
पद्मश्री गुरुवर्य श्री.
पद्मश्री गुरुवर्य श्री. निंबाळ्कर याचे चरणी अभिवादन. मी 'योगविद्या निकेतन' संचालित गोरेगाव वर्गाचा साधक. निंबाळकर गुरुजींचे निकटचे शिष्योत्तम श्री अम्रृत पाटील हे माझे गुरु! आमच्या गोरेगाव वर्गाच्या ५० बॅचेस पूर्ण झाल्या (एका वर्षात ४ बॅचेस), तेव्हा झालेल्या समरंभाप्रसंगी निंबाळ्करसर, सौ. शकुताई, श्री अष्टेकर, श्री परब यांच्या समोर काही आसने सादर करण्याची संधी मिळाली. समारंभ संपल्यावर निंबाळकर सरांनी जवळ बोलावुन 'बद्धपद्मासन' आणि 'मयुरासन' या आसनांच्या सहज सादरीकरणाबद्दल कौतुक केले होते. सरांचे मृदु शब्दातले संभाषण अजुनही मनात घर करुन आहे.
यांनी योगवर्गासाठी डिझाईन केलेले कोर्सेस तर चमत्कारच आहेत. शरीराच्या सर्वांगावर परिणाम व्हावा अशातर्हेने तयार केलेल्या आसनांच्या मालिकेत पूरक असनांचा विचार सरांनी केला आहे. >> +१००. आमच्या वर्गात आर्थ्रायटीस ग्रस्त रुग्ण, ८०वर्षाचे तरुण हेदेखिल सहज आसने करु शकत.
अतुल, माहितीबद्दल धन्यवाद.
अतुल, माहितीबद्दल धन्यवाद. हा मूलभूत पायाच आहे असे वाटते. आता यावर थोडे चिंतन/मनन करायला हवे.
.मी 'योगविद्या निकेतन'
.मी 'योगविद्या निकेतन' संचालित२००६-२००७ वर्गाचि साधक. पद्मश्री गुरुवर्य श्री. निंबाळ्कर याचे चरणी अभिवादन.
अतुल, माहितीबद्दल धन्यवाद
श्रीकांतजी, भ्रमर,
श्रीकांतजी, भ्रमर, लिंबुटींबु, मेघ, धन्यवाद
खुप सुंदर परीचय. ज्यांना
खुप सुंदर परीचय. ज्यांना त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले ते खरेच भागय्वान.
माझे एक मत लिहू का ?
गुरुवर्य नंतर " सर " हा शब्द मला खटकतो. मूळात सर आणि मॅडम हे शब्द मराठीत ज्या प्रकारे वापरले जातात, तेच चूक आहे. सर ही एक पदवी होती आणि ती नेहमीच नावाच्या पुर्वी वापरली जात असे ( जसे सर आयझॅक न्यूटन ) मराठीत नावानंतर ती वापरण्याचा अत्यंत चुकीचा प्रघात पडलाय.
सूर्यनमस्कार व काही योगासने
सूर्यनमस्कार व काही योगासने रोज करण्या साठी मला स्फूर्ती मिळाली. >>
श्रीकांतजी, सूर्यनमस्कार हा व्यायाम आहे आणि योगासने ही आसने आहेत. ही एअक्त्र करु नका, एकदिवसाआड करा.
सूर्यनमस्कार हा व्यायाम आहे
सूर्यनमस्कार हा व्यायाम आहे आणि योगासने ही आसने आहेत. >> क्षमा करा राजू७६, पण मी थोडॅ वेहळे मत मांदतो. सूर्यनमस्कारांमधे आसनांचाच समावेश आहे. सूर्यनमस्कार घालताना प्राणायामाचाही अंतर्भाव करता येतो. आधी आसने, मग थोडा वेळ आराम, नंतर नमस्कार किंवा हा क्रम उलटा करुन शेवटास शवासन केले तरी चालु शकेल.
मला वाटते की, श्वास कधी
मला वाटते की, श्वास कधी घ्यायचा व सोडायचा हे लक्षात ठेवले तसेच श्वासाकडे लक्ष ठेवत सूर्यनमस्कार घातले तर
त्यांचा समावेश योगासनात होतो.
पण श्वासाकडे लक्ष न देता सूर्यनमस्कार घातले तर मात्र तो व्यायाम होतो.
शिवाय श्वासाचे नियम पाळत
शिवाय श्वासाचे नियम पाळत जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा जास्त सूर्यनमस्कार घालणे शक्य होत नाही. मात्र श्वासाकडे लक्ष न देता सूर्यनमस्कार घालण्याच्या प्रकारात सूर्यनमस्कारांची संख्या लक्षणीयरित्या वाढवता येते.
पण मी यातला तज्ञ नसल्याने चूभूदेघे.
@अतुल ठाकूर नमस्कार. तुम्हाला
@अतुल ठाकूर
नमस्कार.
तुम्हाला तुमची चूक प्रांजळपणे कबूल करता आली ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ते जमले की सुधारणा नक्कीच होणार. ती सुधारणा तुमच्या भाषेतून व स्वतःकडे मोठेपणा न घेण्याच्या प्रव्रुतीतून जाणवते. त्यामुळे तुमच्या भाषेत नम्रताही आली आहे. तुम्हाला तुमच्या गुरूवर्याचे आशिर्वाद लाभले आहेत याचा हा पुरावाच समजायला हवा.
योगाचे मानसिक फायदे सांगताना तर तुम्ही फाफटपसारा टाळून अगदी मूलभूत गोष्टीलाच हात घातला आहे.
मन वर्तमानकाळात राहणे व भूत व भविष्यात न रमणे हेच तर सगळ्याचे सार आहे.
लेखा बद्दल खूप खूप धन्यवाद व शुभेछा.
छान परीचय. ___/\___
छान परीचय.
___/\___
भ्रमर क्षमा कशाला? मी काही
भ्रमर क्षमा कशाला? मी काही योगविशारद नाही. पण गुरूजी बोलले होते की आसनामध्ये Slowness असतो आणि सूर्यनमस्कार मध्ये Speed असतो.
गुरूजींनी जे सांगितले आहे ते
गुरूजींनी जे सांगितले आहे ते अगदी खरे आहे.
वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास,
श्वासावर लक्ष ठेवून सूर्यनमस्कार घालताना वेगावर आपोआप मर्यादा येते.
मात्र तसे न केल्यास एक प्रकारची लय निर्माण होऊन वेग खूप वाढतो.
Pages