"दे की!"
"नाय"
"अगं दे की लवकर "
"तुम्हाला नाय म्हणल्याल कळत नाय का?"
"फक्त आजच्या दिवस"
"नाय म्हंजे नाय"
"जास्त कुठ मागतोय मी फक्त 'धा'च दे" नाम्याने काकुळतीला येऊन म्हटले.
"धा ! नाय नि पाच नाय , एक रूपाया नाय माझ्या जवळ" सरू तोंड फिरवत म्हणाली पण नाम्या मागे हटायला तयार नव्हता. थोडा वेळ त्याने इकडे तिकडे केलं. पुन्हा तो सरूच्या पुढे उभा राहिला .
"आता काय" सरूला माहीती होते की, पैसे दिल्याशिवाय गत्यंतर नाही पण, करता येईल तेवढा प्रतिवाद सरू ने केला. नाम्याने करता येईल तेवढा चेहरा गरीब करून परत आपला तगादा चालू केला, "उद्या पासून माळच घालतो गळ्यात आयशप्पथ! पण आजच्या दिवस घिवू दे! परत काय दारूला हात नाय लावणार "
"आस्स रोजच बोलता तुमी , मग परत हायेच ये रं माझ्या मागल्या " सरू ने बडबड केली. तिलाही माहित होते की, याचा काहीही उपयोग होणार नाही पण ही तिची नेहमीची सवय होती.
"अगं! आस काय करतीया? इस्वास नाय का माझ्याव
र तुझा ?" नाम्यान इकडे तिकडे डोळे फिरवत बोलला. त्याची नजर लपवलेले पैसे शोधत होती. सरूलाही कळून चुकले होते की, आता जास्त ताणण्यात अर्थ नाही. नाम्याच्या हाती जर पैसे लागले तर सर्व जाणार होते. त्या पेक्षा दहा रुपयात बिलामत टळत असेल तर बरं. असा विचार करुन तिने कनवटीचे दहा रुपये काढले व नाम्याच्या हातात ठेवत म्हणाली, "येवढच 'धा' रुपय राहिलं होतं ते बी घ्या"
दहाची नोट पाहून नाम्याचा चेहरा खुलला. त्याने लगबगीने ती दहाची नोट खिशात घातली. सरूनं केलेला चहा कसातरी तोंडात ओतला. गरम चहानं तोंडात चटका बसला पण त्याला काहीच वाटले नाही. आत्ता त्याची तलप चहानं भागणारी नव्हती. चहा घेउन तो बाहेर पडला. डाव्या बाजूला वळून तो झप झप पाऊले उचलून तो चालू लागला. थोड्याच वेळात तो मारूतीच्या देवळापाशी येऊन पोहचला. त्याची नजर आतल्या मारूतीच्या मुर्तीकडे गेली. क्षणभर मारूतीराय आपल्याकडेच पाहत आहेत असा त्याला भास झाला. "जय मारूतीरायाऽऽ" असे म्हणून त्याने रस्त्यावरूनच हात जोडले. व तो पुढे चालू लागला. देवळाच्या ओट्यावर मागच्या बाजूला काही जण पत्ते खेळत होते. त्यात 'तो' पण होताच! नाम्याची नजर त्याच्यावर गेली. त्यानेही नाम्याकडे पाहिले. नाम्याने पाहूनही न पाहिल्यासारखे करत पुढे जायचा प्रयत्न केला पण सावबाने हाक मारलीच , "ये नाम्या हिकडं ये आधी"
नाम्या जवळ आला. गप्प उभा राहिला. "तीर्थप्रसाद घ्यायला चाल्लास वाटतं " सावबाने हसत हसत विचारले तशी इतर मंडळी पण हसायला लागली. नाम्या तोंड कसनुसं करीत खाली बघत रहायला.
"पैसे कधी देणार माझं?" सावबाने मुद्द्याला हात घातला.
"दे तो की" नाम्याने बोलल्यासारखं केल.
"देतो म्हंजे कधी? मेल्यावर मढ्यावर उधाळतोस का?"
मंडळी पुन्हा हसायला लागली. नाम्या गप्प उभा राहिला.
" आरं बोल की कधी देणार" सावबाने आवाज चढवला. तरीही नाम्या गप्पच उभा.
"बघू खिशात किती हायेत?" असे म्हणत सावबा ओटयावरून खाली आला व त्याचे खिशे चाचपू लागला.
"काय नाय खिश्यात" करत नाम्या मागे सरू लागला . खिश्यातली दहाची नोट त्याने हाताने दाबून धरली. त्या दोघांची झोंबाझोंबी बघून बाकीचे खो खो हसू लागले.
"दोन दिसात पैशे नाय दिले तर दांडक्यानच फोकालतो तुला. चल निघ हितंन!" म्हणत सावबाने त्याला ढकलून दिले. कसंबसं
सावरत नाम्या पुढचा रस्ता चालू लागला. नदीवरच्या पुलाच्या मध्यभागी येताच त्याची नजर खाली वाहणार्य़ा पाण्याकडे गेली. पाणी संथ पणे वाहत होते. पुलाच्या पलीकडे जाताच तो बसस्थानकाच्या जवळ पोहचला. तिथून तो डाव्या बाजूच्या एका अंधार् या गल्लीत वळला. अंधार खूप असला तरी त्याची पाऊले अडखळली नाहीत. वाट पायाखालची होती. थोड्याच वेळात तो त्याला पाहिजे होते त्या ठिकाणी येऊन पोहोचला. नेहमीचीच जागा असल्याने वरचा 'सरकारमान्य देशी दारूचे दुकान ' हा बोर्ड वाचण्याची तसदीही त्याने घेतली नाही. आत जाताच एक कुबट दर्प त्याच्या नाकात शिरला पण ओळखीचा असल्याने त्याला काही वाटले नाही. खिश्यातली दहाची नोट काढत तो काऊंटर जवळ गेला.
"काय बाबूराव काय चाल्लयं" नाम्यांन सलगी दाखवली.
"काय नाय! हेच आपलं . . " बाबूराव निरूपायाने बोलल्यासारखे बोलला. नाम्याने दहाची नोट त्याच्या हातात सरकवली, "दे एक बाटली . . बसतो कोपऱ्यात "
"मालकानं उधारी बंद केलीया"
"दे की राव देतो की पैसं"
"नाय जमणार! मालक पगारातून कट करलं ह्या 'धा' चीच पे आता " म्हणून बाबुरावने एका प्लॅस्टिक पिशवीतली दारू एका कळकट ग्लासामध्ये ओतली.
"दे आता तेवढीच " म्हणत नाम्यान ग्लास आणि तिथे ठेवलेल्या ताटातली एक मुठ शेव उचलली व तो कोपऱ्यात जाऊन बसला. सावकाशपणे त्याने ग्लास तोंडाला लावत पहिला घोट घेतला. तोंडात एकदम कडू कडू झाले. जळजळ करत दारू घशाखाली जाऊ लागली. नाम्याने डोळे झाकले , तोंड वेडेवाकडे केले. चव येण्यासाठी त्याने थोडी शेव तोंडात टाकली. मग त्याला हायसे वाटले. थोडं थोडं करत नाम्याने तो ग्लास संपवला शेवेचा शेवटचा बोकाणा तोंडात टाकत नाम्या उठला. तोपर्यंत त्याच्या डोळ्यात लालसर झाक आली होती. तोल ढळू लागला होता. तो पुन्हा काउंटरजवळ आला.
"ये बाब्या बाटली काढं!"
"पण उधार द्यायला नाय सांगितलं"
"ते मालक आन् मी बघून घिवू, तु तुझं काम करं" नाम्या अशा स्वरात गुरकावला की बाबुरावला पुढे बोलताच आलं नाही. त्यासा हात आपोआप खालच्या खोक्यात गेला व एक बाटली काढून नाम्याच्या हातात सोपवता झाला. मुठभर शेव घेऊन नाम्या पुन्हा आपल्या
कोपऱ्यात गेला. आता त्याच्या चालण्यात भलतीच ऐट होती. पुढच्या पंधरा मिनिटांत त्याने ती बाटली संपवली. आता त्याला आपले शरीर हलके झाल्यासारखे वाटू लागले. तो उठला व झोकांड्या देत काउंटरजवळ आला. "ये मांडून ठेव" आवाजात तीच जरब होती. बाबुन नुसती मान हालवली. त्याच्याकडे न बघितल्यासारखे करून नाम्या तिथून निघाला. त्याचे डोळे आपोआप झाकत होते. तोल इकडे तिकडे जात होता. तोंडाने शीळ घालत तर कधी गाणे म्हणत तो चालला होता. पुलाच्या मध्यावर आल्यावर त्याने पुन्हा खाली वाकून पाहिले. पाणी शांत वाहत होते. नाम्याने एक मोठा दगड कसाबसा उचलला व चारदोन शिव्या हासडत पाण्यात फेकला. 'चुब्बुक' असा आवाज आला शांत पाण्यावर तरंग उठले. मग नाम्या डुलत डुलत गावाकडे निघाला. एव्हाना संध्याकाळ झाली होती. नाम्या आता देवळाजवळ येऊन पोहचला. तिथे पत्त्याचा डाव ऐन रंगात आला होता. तेवढ्यात सावबाने नाम्याला पाहिले. त्याची थोडी गमंत करावी म्हणून त्याला हाक मारली, "ये नाम्याऽऽ हिकडं ये"
नाम्या डुलत डुलत तिथे आला.
"आलास का टाकून " सावबांने कुत्सितपणे विचारलं
"ये पैशे दिवून घेतली. काय तुझ्या बापानी नाय पाजली" नाम्या आता जोशात होता.
"भडव्या नीट बोलकी नाम्या" लोक आपल्यालाच हसल्याने सावबा चिडला.
"ये भडवा तुझा बाप! मला नामदेवराव म्हणत्यात" सिनेमातल्या नायकासारखा डॉयलॉग नाम्याने मारला. मंडळी हसायला लागली तर काहींनी शिट्टया मारल्या. कुठे ह्याला हाक मारली असे सावबाला झाले ह्याची फजिती करायला बोलवले आणि आपलीच फजिती होत आहे हे पाहून त्याने शेवटचे अस्त्र बाहेर काढले, "पैसे काढ आगोदर माझे"
"पैसे, पैसे काय करतो तु किती पैशे पायजेत तुला? तु बोल फक्त " जणू पैसे खिशातच आहेत अशा आर्विभावात नाम्या बोलला. "उद्या तुझ्या तोंडावर पैशे फेकतो" नाम्या होलपडत बोलला.
"चल पळ आता हिथंन" सावबा वरमला होता पण उसनं आवसाण आणून बोलला .
"ये मी देवाच्या दारात उभा हाये. कुणाच्या बापाची जागा नाय ही" आता नाम्या पुर्णपणे चंद्रावर पोहचला होता. "हे काय आपलं आयकणार नाय" असं म्हणत सावबाने तिथून काढता पाय घेतला.
मग नाम्याने सावबाला अजून चार शिव्या हासडल्या व तिथून तो निघाला. आता तो घरी येऊन पोहचला तर घराचे दार बंद होते. धाडक् न त्याने दारावर लाथ मारली. दार उघडले गेले. सरू दचकून बसली.
"ये तुझ्या मायला . . . दार लावून बसतीस काय? नवऱ्याला पाहून" धडपडत आत येत नाम्या गुरकला.
"आलात का पिऊन! बसा आत्ता गिळायला" सरू वैतागून म्हणाली. मग तिने ताट वाढले. नाम्या जेवायला बसला.
"काय केलंय हे! काय झोपंत सयपाक केलास काय?" नाम्या घास तोंडात घालत बोलला.
"जे हाये घरात तेच केलंय! रोज कुठुन आणू पंचपकवान तुम्हाला"
"मला उलंट बोलतीस तुझ्या आत्ता " नाम्यान ताट भिरकावून दिलं
"जेवा नायतर राव्हा मोठा आलाय राजाचा लेक" आता सरूही तापली .
"बघतोच तुला " म्हणत नाम्या सरूवर धावून गेला. एक शिवी हासडत त्याने सरूवर हात उचलला तसा सरूने त्याचा हात पकडून त्याला हिसडा दिला. नाम्या भांड्याच्या कपाटावर जाऊन आदळला. कपाटावरची एक दोन भांडी त्याच्या डोक्यात पडली. मग दोघांची चांगलीच जुंपली. शेवटी शेजारच्या म्हातारीने येऊन दोघांना दटावले. नाम्याच्या कपाळावर टेंगुळ आले होते. भांडी इकडे तिकडे विखरली होती. नाम्या तिथेच कलंडला व बडबडत शिव्या देत झोपी गेला.
सकाळी नाम्या उठला. डोके गरगरत होते. मुक्यानेच तो कामे आटपू लागला. सरूकडे पहायचे धाडस त्याला होत नव्हते. दिवसभर काम करून संध्याकाळी तो सरूपुढे उभा राहिला .
"काय" सरूने रागात विचारले.
चेहऱ्यावर गरीब भाव आणून नाम्या उद् गारला, "फक्त 'धा' च रुपये दे! उद्यापासून बंद! आयशप्पथ!"
. . . . . . . धनंजय . . . . .
झक्कास.... आवडली खेडेगावात
झक्कास.... आवडली
खेडेगावात आणि वस्तीत असले नमूने खुप पहायला मिळ्तात
धन्यवाद . . . . .
धन्यवाद . . . . .