सेविलाच्या अनेक पर्यटन-स्थानांमधे प्रमुख दोन आकर्षणे आहेत. त्यातील एक म्हणजे Royal Alcazar Palace.
साधारण बाराव्या शतकात बांधल्या गेलेला हा पॅलेस इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना म्हणून गणल्या जातो. हा राजवाडा युरोप मधील राहत्या राजवाड्यांपैकी सर्वात प्राचीन आहे. स्पॅनिश राजघराण्याचं सेविला मधील हे निवासस्थान...अर्थातच काही भाग. बाकीचा भाग आम जनतेसाठी खुला आहे. ही शाही इमारत आणि बाग म्हणतात की अप्रतिम सुरेख आहे. पण वेळेच्या अभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही.
वेळेच्या अभावी खरंतर म्हणायला नको कारण तसा वेळ होता. पण म्हणतात ना की too much of a good thing is bad! नुकताच अल-हांबरा बघून आलो होतो. त्याच्यामुळे इतकं भारावून गेलो होतो की परत त्याच प्रकारची दुसरी इमारत पाहणे जिवावर आले होते. पण आता मात्र ते न बघितल्याची रुखरुख लागून राहयली आहे.
आकर्षण नं. दोन- Sevilla Cathedral. हे जगातील सर्वात मोठे कॅथेड्रल आहे.
इस्लामी राजवटीच्या काळात अल्काझार च्या अगदी लागून एक शाही मशीद होती. इस्लामी राजांचा पराभव केल्यानंतर तिथे आलेल्या ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या शाही मस्जीदीच्या जागी या कॅथेड्रल ची स्थापना केली. मग पुढचे जवळजवळ शंभर वर्षे याचे बांधकाम चालले. या बांधकामात मूळ मस्जिदीच्या बर्याच गोष्टी-- खांब, मिनार वगैरेंचा फार कलात्मकतेने उपयोग केलेला आहे. त्यापैकीच एक मिनार म्हणजे आताचा Giralda Tower....या कॅथेड्रल चा सर्वात सुप्रसिद्ध भाग.
जालावरून साभार
या कॅथेड्रल चं एक वैशिष्ठ असे की अमेरिका शोधून काढणारा Christopher Columbus- याला मरणानंतर याच जागी मूठमाती देण्यात आली. त्याची इथे एक सुबक समाधी पण आहे.
बाहेरून अतिशय भव्य असलेली ही इमारत आतुनही तेवढीच मोठी आणि सुरेख आहे.
आतला मुख्य गाभारा- altarpiece
बाहेर छान स्वच्छ उन पडले होते. आज इथला आमचा शेवटला दिवस होता त्यामुळे किती फिरू आणि किती नाही अशी अवस्था झालेली...आता आम्ही जवळच असलेल्या Santa Cruz ह्या भागात फेरफटका मारायला निघालो.
Santa Cruz- सेविला चा हा अत्यंत देखणा भाग. या भागात लहान, निमूळत्या वाटा, रस्त्यांच्या कडेने जागोजागी छोटेसे कॅफे, मधेच एखादा चिमुकला चौक, चौकात संत्र्यांनी लगडलेली झाडे, फुलांचे वाफे आणि अतिशय हसतमुख स्पॅनिश लोकं. अगदी पाय दुखेपर्यंत फिरा मग एखाद्या रस्त्यावरील कॅफेत कॉफी चा आस्वाद घ्या. मुलांना समोरच्या चौकात खेळू द्या. जरा ताजेतवाने झालात की मग पुन्हा फिरायला सुरूवात करा...प्रत्येक रस्ता निराळा, एखाद्या वाटेने गेल्यावर वाटावं की अरे, रस्ता संपलाय की काय?...पण जरा डावी-उजवी कडे बघा, एखादी लहानशी वाट दिसलेच....तिथून बाहेर पडा की समोर पुन्हा वेगळाच नजारा..एखादी लहानशी बाग तरी, एखादा चौक आणि चौकात कारंजे तरी नक्कीच.
जालावरून साभार
स्पेन ची अजुन एक खासियत लक्षात आली ती म्हणजे इथे जागोजागी असलेले Tapas Bar. हे Tapas म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे स्नॅक्स- यामधे मुखयत: ऑलिव्स आणि चीज़ चा समावेश असतो. मग त्यात निरनिराळे ब्रेडस, हॅम, चिप्स इत्यादी प्रकार असतातच. संध्याकाळी मित्रांबरोबर, परिवाराबरोबर बाहेर जाऊन निवांत बसून वाइन पीत, tapas खात बसणे म्हणजे स्पॅनिश लोकांची अगदी सुखाची कल्पना.
जालावरून साभार
तसे हे लोक तब्बेतीने आरामशीर...दुपारची आरामाची वेळ..यांच्या भाषेत siesta यांना अगदी प्रिय. अर्थात मोठमोठ्या स्पॅनिश शहरांमधे चित्र वेगळे असेल, हे मी सांगतेय ते लहान शहरांमधे.
दक्षिण स्पेन ची सफर प्लॅन करतांना लक्षात ठेवण्यासारखे .....
१. al hambra ची तिकिटे आधीच ऑनलाइन बुक करणे. वेळेवर काढू असा विचारही करू नये. दिवसाचा ठराविक तिकिटांचा कोटा असतो तो कधीच बुक हूऊन जातो.
२. सेवीला पासून कॉर्डोबा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. एक तासाची थेट ट्रेन आहे. एका दिवसाची छान सहल होऊ शकेल. sevila- cordoba- granada हा भाग andalucia goden triangle म्हणून प्रसिद्ध आहे.
४. सेविला पासून माद्रिद सुद्धा अगदी तीन तासांच्या अंतरावर आहे. थेट ट्रेन आहे.
५. साधारणपणे तुम्ही असा प्रवास करू शकता--मालागा ला फ्लाय करा. मालागा अथवा जवळपासच्या बीच रिज़ॉर्ट मधे एक दोन दिवस..तिथून ग्रॅनडा ( २ दिवस), सेविला- कॉर्डोबा( ३,४ दिवस) आणि माद्रिद( २ दिवस).करा आणि माद्रिद हून परतिचे विमान पकडा. माद्रिद साठी वेळ नसेल तर सेवीला मधूनच परत फिरा. असा छान ८-१० दिवसांचा बेत होऊ शकतो.
आता फक्तं संध्याकाळ हातात होती तेव्हा नदीकिनारी फिरायला गेलो. Guadalquivir ही नदी Cazorla च्या पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पुढे अट्लॅंटिक महासागराला जाउन मिळते. क्रिस्टोफर कोलंबस सारख्या अनेक दर्यावर्दिंनी आपल्या सागर प्रवासाची सुरूवात याच नदीतून केली.
नदीकिनारी फिरता फिरता समोर बोट उभी असलेली दिसली. तिकीट काढून आत गेलो आणि घाईघाईने वरच्या डेक वर मोक्याची जागा पकडायला वरती गेलो तर बघितले की बोटिवर फक्त आम्ही चौघंच! म्हटलं आता टूर कॅन्सल करतात की काय? पण नाही, ठरल्या वेळी बोट निघाली. तोपर्यंत थोडेफार लोकही बोटीत चढले होते. नदीवर एक तास फेरफटका मारुन खाली उतरलो. नदी किनारी एकेकाळचा दिमाख अजूनही मिरवणारा Tower Of Gold. नवीन जगाचा शोध लागल्यावर तिथून लुटलेली धन-दौलत सुरक्षीत ठेवायला या tower चा उपयोग होत असे- म्हणून हे अतिशय समर्पक नाव याला मिळाले.
काही जागा, काही गावं आपल्याला मनापासून आवडतात तसंच आमचं सेविला च्या बाबतीत घडलं. पहिल्या दिवसापासूनच याच्या जणू आम्ही प्रेमातच पडलो होतो. तसं म्हटलं तर ह्या गावाला काही लंडन सारखा दिमाख नाही किंवा पॅरिस सारखी भारून टाकणारी भव्यताही नाही पण काहीतरी आहे इथे...चार्म आहे, सुबक पणा आहे, इतिहास तर आहेच पण इथल्या वातावरणात अजुन काहीतरी....एक शांत, निवांतपणा आहे म्हणूनच कदाचित इथून आमचा पाय काही केल्या निघत नव्हता.....
दुसर्या दिवशीची फ्लाइट होती. Take off करतांना अगदी मनापासून म्हटलं------ पुनरागमनायच:.......!!!
छान! एका जास्तं माहित
छान!
एका जास्तं माहित नसलेल्या जागेची छान ओळख करून दिलीत.
फोटो सुरेख आहेत.
धन्यवाद!
फोटो आवडले. माहितीही खुप
फोटो आवडले. माहितीही खुप छान.
ग्रासियास! सुरेख वर्णन आणि
ग्रासियास! सुरेख वर्णन आणि फोटो! नक्की स्पेनला जाणारे मी on a good 15 day vacation!
खुप सुंदर... मलाही जायचे आहेच
खुप सुंदर... मलाही जायचे आहेच अगदी. आणि आता तर जास्तच प्रबळ झालीय ईच्छा !
सर्व प्रतिसादांचे मनापासून
सर्व प्रतिसादांचे मनापासून आभार.
जिज्ञासा--तुम्ही मागे सुचविल्याप्रमाणे या भागात काही टिप्स टाकल्या आहेत. सॉरी आधी विसरले होते. आता लक्षात आल्यावर अपडेट केले आहे. तुमच्या ट्रिप ला खूप शुभेच्छा. १५ दिवस असतील तर नक्की माद्रिद, टोलेडो त्यात जोडा.
छान माहीती आणि फोटो.
छान माहीती आणि फोटो.
खूप छा माहिती आणि फोटो.
खूप छा माहिती आणि फोटो.
वॉशिन्ग्टन डीसीतही असा एक तपस बार आहे. स्पॅनिश फूड देणारा.
आधी तपस म्हणजे अगदी मराठमोळा शब्द वाटला. पण नंतर कळलं की अगदी स्मॉल पोर्शन्स मधे सर्व केले जाणारे स्नॅक्स म्हणजे तपस. याच्या बरोबर कॉम्प्लिमेन्टरी "शांग्रिया" म्हणून एक ड्रिन्क मिळते. अग्दी कमीप्रमाणात अल्कोहोल आणि क्रॅनबेरी आणि तत्सम फळांचे ज्यूस असं काहीसं मिश्रण.
मात्र हे स्मॉल पोर्शनमधे नव्हतं उलट एक मोठा जार भरून.
मानुशी-ते सॅंग्रिया तर इतकं
मानुशी-ते सॅंग्रिया तर इतकं टेंप्टिंग दिसतं. तो रंगीबेरंगी जार बघुनच मस्तं गारेगार वाटतं. Tapas & Sangria क्लॅसिक कॉंबिनेशन आहे.
मानुशी-ते सॅंग्रिया तर इतकं
मानुशी-ते सॅंग्रिया तर इतकं टेंप्टिंग दिसतं. तो रंगीबेरंगी जार बघुनच मस्तं गारेगार वाटतं. Tapas & Sangria क्लॅसिक कॉंबिनेशन आहे>>>>>>>>.+१००
.
.
छान माहिती आणि फोटो.
छान माहिती आणि फोटो.
छान माहिती आणि फोटो.
छान माहिती आणि फोटो.
पद्मावती, प्रवासाच्या
पद्मावती, प्रवासाच्या टिप्ससाठी धन्यवाद ह्या नक्की उपयोगी पडतील!
खूप छा माहिती आणि फोटो! .सगळे
खूप छा माहिती आणि फोटो!
.सगळे भाग आज एकदम वाचले.