आपण

Submitted by भुईकमळ on 3 June, 2015 - 02:45

आपण भर दुपारच्या तल्खलीत
आर्ट गँलरीच्या एकांडया गच्चीवर
नजर बुडवून जरा लालस होऊ लागलेल्या
झाडांच्या शेंडयावर
पोचत नाही आपल्या कानापर्यन्त
समोरल्या रहदारीच्या संमिश्र आवाजान्चे फ्युजन
आपण चघळ्त राहतो , शोषत राहतो हपापश्रुतींनी
पर्णदाटीत लपलेल्या सावळ्या पाखराची
बर्फगोळ्यासारखी गोडमिट्ट गारेगार तान .....

आपण तरळत राहतो
लायब्ररीच्या पायरयांवर
किंवा म्यूझियमपुढे झेपावल्या फांदीखाली
पिवळीधम्म फुले कवितेच्या वहीत झेलत
पाकळयांचा रंग कागदावर चुरडवत
किशोरवयीन बोटांनी .
का़ळाची नजर चुकवून वर्गाबाहेर रेंगाळत
वर्गातली सगळी मुलं वृध्द झाली तरीही ...

आपण कधी बदामाखालचा
तांबूस पिवळा पर्णिल कोलाज
पावलांनी डहुळत
धगधगू पाहतो अंतर्यामी
नाना रंगविभोर कल्लोळांनी
मेंदूतल्या खिडकीतली शेवटची मेणबत्ती विझेपर्यंत ..

आपण घामटल्या गर्दीच्या तालात
रहदारीच्या रटरटल्या लाटांत
गाभुळ्लेले शब्द गिळून मौनमग्न वहात
बदललेली ऋतुचर्या न्याहाळत
एकत्र बोटांच्या गुंफणलिपीत कविताबध्द
अगदीच विसंगतसे
या शहरी मौसमात ...…
..........................माणिक वांगडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार प्रभावी शब्दांत व्यक्त झाल्या आहेत भावना.
हपापश्रुती (अनुमानाने अर्थ लावला), गुंफणलिपी हे शब्दही छान मिसळून येतात आशयासोबत. प्रतिमा सर्वच सुरेख. रुदन आणि आकांत यामधले हे स्मरणगुंजन म्हणूनच अधिक थेट पोचते, अखेरच्या (अपरिहार्य?) विरोधाभासासहित.

अमेय ,किती नेमक्या मार्मिक शब्दात अभिप्राय दिलात.माझी गद्यावर तुम्हा सर्वांसारखी हुकुमत नसल्याने सुयोग्य शब्दात आभार मानता येत नाहियेत . 'स्मरणगुंजन' किती समर्पक शब्द वापरलात …खुप खूप धन्स!!!
अविनाशजी , rmd , बी ,भारती तुम्हा सर्वच कवितेतील दर्दी रसिकांचे मनापासून आभार
आणि भारती तुमचा तर्क बरोबर आहे ह्या सगळ्या ओळींना वास्तवाची झालर आहे …. की होती ,काय म्हणु बरं ?
पुनश्च आभार !