नमस्कारम, मागच्या आठवड्यात दरवर्षीप्रमाणे कोकण दौरा झाला, यावर्षी उकाडा प्रचंड असल्याने ठरलेल्या प्लान मध्ये बरेच बदल झाले.मालवण /तारकर्ली करणार होतो, पण आयत्यावेळी ते रद्द केले. पर्यायी मार्ग मुंबई-पनवेल-टोळफाटा-मंडणगड-दापोली-दाभोळ बंदर –धोपावे(जेट्टी )- गुहागर(मुक्काम)- हेदवी-तवसाळ(जेट्टी)-जयगड-रीळ-मालगुंड-गणपतीपुळे- आरेवारे- रत्नागिरी- पावस –आडिवरे असा ठरला.
सकाळी नेहमीप्रमाणे ५ लाच सगळी तयारी करून बाहेर पडलो. वातावरणात अजिबात गारवा नव्हता. पनवेल सोडून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो, रस्त्याची इतकी वाईट अवस्था कधीही पाहिलेली नव्हती, जी परिस्थिती २ वर्षांपूर्वी होती, तीच आजही होती. पनवेल –महाड पट्टा अतिशय भयाण अवस्थेत होता, सिंगल लेन सुरु होती, तीही खड्ड्यांनी भरलेली
सूर्योदय
माझी ब्याग मध्येच निघाली ती बांधताना सौरभ
नागोठण्याला नाश्त्याला थांबलो, अतिशय जळजळीत वडा उसळ कशीबशी पोटात ढकलली आणि सटकलो. टोळ फाट्याला, गोवा हायवेला बाय बाय करून आत वळलो, तिथेही तीच परिस्थिती. मंडणगड मार्गे दापोली गाठायला अडीज तास लागले. (६५ किमी) वाटेत हे फणस लगडलेले झाड दिसले
दापोलीतून दाभोळ कडे निघालो. इथे रस्ता जरा तरी बरा होता. दाभोळ ला एक चंडिका देवीचे देऊळ पहिले. भुयारात आत जायचे होते, वाटेत मस्त समया ठेवलेल्या होत्या, त्यांच्या मंद प्रकाशात चंडिकेची उग्र मूर्ती सुरेखच उजळून निघालेली होती. तिथून निघालो सुदैवाने दाभोळ बंदरात लगेचच जेट्टी मिळाली.
सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनी हि जेट्टी सेवा पुरवते, हि त्यांची साईट
http://carferry.in/
धोपावे ला उतरलो आणि निघालो. सारखे घाट, उतार चढण, अचानक तीव्र वळण याने खूपच वेळ जात होता.रस्ते असून नसल्यासारखे होते.त्याशिवाय वाटेत काही अप्रतिम नजारे दिसत होते, मग सारखे थांबा , क्यामेरा बाहेर काढा यातही वेळ जायचा.
सेल्फी
गुहागरला पोचेस्तोवर दुपारचा १ वाजलेला होता. (२७० किमी) किसन ने “परमेश्वरी देवी” भक्त निवासाचा नंबर दिलेला होता त्यांना सांगून एक रूम बुक केलेली होती.
सामान टाकून जेवायला बाहेर पडलो. अन्नपूर्णा नावाचे अतिशय उत्तम हॉटेल म्हणून बर्याच जणांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात अतिशय टुकार निघाले.कसेबसे जेऊन परतलो. संध्याकाळी गुहागर बीचवर गेलो. रात्रीचे जेवण जेवण भक्त निवासातच झाले.
सकाळी व्याडेश्वरचे दर्शन घेतले गुहागरात बघण्यासारखे अजून भरपूर होते, पण रूम आज सोडायची असल्याने जाता जाता फक्त हेदवी, बामनघळ करू असे ठरले. नाश्ता आटपून परत सगळे समान बाईक वर बांधले आणि निघालो. उन्ह सॉलिडच होते. हेद्विला बामन घळ पाहिली, सुंदर जागा आहे, समुद्राचे पाणी पण एकदम निळेशार!
रस्त्यातले बरेच लोकं “MH०५” आणि आमचा अवतार बघून काय पोर उन्हात उद्योग करतायेत असले लुक देत होते, काही आपुलकीने चौकशी करत होते. , रोलर कोस्टर सारख्या रस्त्यांवरून कसे बसे तवसाळ बंदरावर पोहोचलो. परत १५ मिनिटे जेट्टी प्रवास करून जयगड ला उतरलो.आता कधी एकदा आडीवर्याला पोचतो असे झालेले.गणपतीपुळ्यात घुसलो आणि एकदम मुंबईत असल्याचा फील आला, हे भयंकर ट्रॅफिकज्याम झालेले , सगळ्या मुंबई, पुण्याच्या गाड्या , देवळाकडे जाणारे रस्ते बंद केलेले, एकूण भर उन्हात भयंकर गोंधळ, या परिस्थितीत देवळात जाणे अशक्य होते. इथून पुढे दोन फाटे फुटतात एक निवळी मार्गे (५२ किमी) रत्नागिरी आणि एक आरे वारे मार्गे (२८ किमी). अर्थात आरे वारे चा रस्ता प्रेक्षणीय होता, कारण अथांग पसरलेला समुद्र सतत साथ देत होता.
(- श्रेय-सौरभ उप्स )
(- श्रेय-सौरभ उप्स )
घाटांचे भयंकर उतार असलेले रस्ते उतरून एकदाचे रत्नागिरीत पोहोचलो. एवढे ७७ किमी पार करायला आम्हाला चक्क ४ तास लागलेले होते, अर्थात हेदवी ला एक तास गेलेला होता. भिडे उपहार गृहात तडस लागेपर्यंत जेवलो, वर प्रत्येकी ३ ग्लास ताक ढोस्ल्यावर जीवात जीव आला. तरी अजूनही ३५ किमी चा प्रवास बाकी होता. चांदण्यातून तो कसा बसा पार पडला . आणि एकदाचे घरी पोहोचलो. महाकालीचे दर्शन घेतले
गेल्या गेल्या काकाने चहा दिला आणि तो पिऊन आंबे काढायला चला असा आदेशही सोडला. झक मारत कोकणी गड्याच्या वेशात बाहेर पडलो.
सहा च्या सुमारास साधारण तीनेकशे आंबे काढले,आणि परतलो.आता काहीही करायची इच्छा नव्हती मस्त अंघोळ केली, आणि बाहेर खुर्च्या टाकून रातकिड्यांचा आवाज ऐकत निवांत बसलो.
आमचे घर
नंतरचा दोन दिवसांचा कार्येक्रम साधारण असा असायचा सकाळी ७ वाजता उठायचे , चा पिऊन काकुस सोबत जांभीत काजूच्या बिया गोळा करायला जायचे, किंवा इतर छोटी मोठी कामे करावीत. दुपारी जेऊन वर सड्यावर जायचे, करवंदानी लगडलेल्या जाळ्या हेर्याव्या आणि मुकाट पुढील एक दोन तास पोटाला तडस लागेपर्यंत करवंद खावीत.
-श्रेय सौरभ उप्स
खाली एक रायवळ आंब्यांनी लगडलेले झाड होते. त्याच्या आंब्यांचा खाली खच पडलेला असायचा, छोट्याश्या चेंडू सारखे दिसणारे ते आंबे, पण चव मात्र कहर, तेही चरायचे. संध्याकाळी वेत्त्ये किंवा गावखडी च्या समुद्रावर जायचे.येताना पेठेतल्या एकुलत्या एक कळकट हाटेलात निवांतपणे चहा घ्यावा आणि डुलत डुलत घरी यावे.रात्री काका तबला काढायचा मग मस्त गाण्यांची मैफिल जमवायची .
वेत्त्याचा समुद्र
निघायचा दिवस आला तसा अचानक एकदम कंटाळाच आला, परत मुंबईत परतायचे,रोजचे लोकलचे धक्के, तीच टुकार नोकरी , आता जायचे तेही आता मुंबई गोवा हायवे ने. काका म्हणाला तुम्ही होतात ते ४ दिवस मजेत गेले, आता परत मी एकटाच...
गड्याने रात्री आमच्या गाड्यांवर सर्व समान कचकून बांधून दिले. त्यावर आम्ही सोबत आणलेल्या बंजी रोप लावल्या. भल्या पहाटे बरोब्बर ५ ला परतीच्या प्रवासाला निघालो, साधारण ६:३० रत्नागिरी सोडून हायवेला लागलो, महाड येईपर्यंत आता काळजी नव्हती, रस्ता एकदम मक्खन होता. आणि चक्क पूर्ण रस्ता रिकामा होता, मधलाच दिवस असल्याने कदाचित वाहतूक नव्हती.पहिल्यांदाच मनासारखी बाईक पळवायला मिळाली. ९ वाजता खेड ला पोचलो पण, कशेडी पण त्याच वेगात ओलांडून खाली आलो. पोलादपूर महाड ओलांडले आणि परत तो घाणेरडा रस्ता सुरु झाला. अपोआप वेग कमी झाला आणि साधारण २ च्या सुमारास रडत रडत घरी पोचलो.
टिपा : इतके भयंकर घाट रस्ते असूनही १५० सीसी च्या बाईक ने ५० चे माईलेज दिले, (२ वर्षांपूर्वी जेमतेम ४० दिलेला होता )
ज्यांना लेह लदाख ला जायचा सराव करायचा आहे त्यांनी पनवेल-महाड-मंडणगड-दापोली असा रूट करावा
कार साठी जेट्टी प्रकार जाम डेंजर वाटला, जे कार चालवण्यात प्रो आहेत त्यांनीचे तो प्रकार करावा, जेट्टीत कार चढवणे आणि उतरवणे महाभयंकर काम आहे.
आमची मालगाडी
अतिशय सुंदर फोटो. तुमच्या
अतिशय सुंदर फोटो. तुमच्या कोकणात एकदा यायचे आहे.
मस्त प्रवास, प्र ची छान आलेत
मस्त प्रवास, प्र ची छान आलेत
नशीबवान आहात, को़कणामधे घर
नशीबवान आहात, को़कणामधे घर आणि आमराई आहे
मस्त प्रवास.. पाण्याचे सर्वच
मस्त प्रवास.. पाण्याचे सर्वच फोटो सुंदर आलेत.
माझे नाव जिने ठेवले ती आत्या गुहागरलाच असते... पण इतक्या वर्षात कधी जाणेच झाले नाही तिच्याकडे.
त्या गावाचे उल्लेख आले कि तिच आठवते.
मस्त!
मस्त!
एक्दा सिन्धुदुर्गाचा अनुभव पन
एक्दा सिन्धुदुर्गाचा अनुभव पन कळवा
मस्त!
मस्त!
सुंदर फ़ोटो. वेगवेगळ्या रंगाचे
सुंदर फ़ोटो. वेगवेगळ्या रंगाचे पाणी, कौलारू घर, आणि निसर्ग, सगळच सुंदर! आणि वर्णन वाचून तर, मीच सगळ अनुभवतेय असं वाटलं. धन्यवाद!
"कोकण" हे नाव पाहिलं की मी तो धागा पाहिल्याशिवाय राहूच शकत नाही. करवंदे, आंबे, फ़णस, काजू, पाहून जीव तळमळला. लहानपणी अशाच करंवंदांच्या जाळ्यात तास न तास घालवलेत. आंबे, फ़णस, काजू पण मुबलक होते.
अप्रतीम घर आहे काकाचं खुप
अप्रतीम घर आहे काकाचं खुप आवडलं
पोलादपूर महाड ओलांडले आणि परत तो घाणेरडा रस्ता सुरु झाला. >>>>आम्ही तिथेच राहतो
मस्त!
मस्त!
सुंदर.
सुंदर.
मस्तच! तुमचा प्रवास, त्याचे
मस्तच! तुमचा प्रवास, त्याचे वर्णन आणि फोटो, आणि तुमचे घर सगळेच छान!
वा वा, लेखन आणि फोटो दोन्ही
वा वा, लेखन आणि फोटो दोन्ही सुरेख. कोकणात फेरफटका झाला आमचापण .
हेदवीचा समुद्र सॉलिड आहे. कित्ती कलरफुल पाणी. मस्तच.
लक्की आहात तुम्ही .. प्रचि
लक्की आहात तुम्ही ..
प्रचि सुरेख ..
मस्तं फोटो. आडिवर्याचे का
मस्तं फोटो.
आडिवर्याचे का तुम्ही?
आडिवरे म्हटलं की मला लालसाळीचा भातच आठवतो.
तितका लाल गुलाबी आणि टेस्टी भात दुसरीकडे कुठे खायला मिळाला नाही.
गावखडीला माझी आई नोकरी करत असे.
गावखडीला अतिशय उत्तम चवीचे हापूस मिळतात.
तिथून आंबे घेऊन पुण्यात विकायचा एक पार्ट टाईम बिझनेस सध्या माझा भाऊ करतो.
त्याच्या हापिसातच कित्येक पेट्या संपतात.
पूर्वी गावखडीला तरीतून जावे लागायचे.
मजा यायची.
तरीतून उतरताच एका छोट्याश्या हॉटेलात खाजा(मालवणी नव्हे, रत्नागिरी स्टाईल घड्याघड्यांचा) आणि भजी मिळत.
बाकी पोलादपूर पनवेल हायवे केवळ लेह लडाखच्या सफरीचा सराव म्हणूनच नव्हे तर 'सर्कशीतल्या मौत का कुआ' मध्ये बाईक चालवायचा सराव म्हणून केला तरी चालेल.
मस्त फोटो ! शेवटच्या फोटोतली
मस्त फोटो ! शेवटच्या फोटोतली हापूस ची पेटी पळवून न्यावीशी वाटतेय !
मन प्रसन्न झाले. आडिवर्याला
मन प्रसन्न झाले.
आडिवर्याला लहानपणी गेलो होतो एक-दोनदा. माझ्या आईचा मावसभाऊ तिथे राहतो. काय सुंदर गाव. गणपतिपुळ्याचा मात्र बाजार होवून गेलाय.
मस्त. आता ह्या सगळ्या
मस्त.
आता ह्या सगळ्या फोटोंमधून एक खास 'प्रसन्न-मेड' कलाकृती होऊ दे.
"कोकण" हे नाव पाहिलं की मी तो
"कोकण" हे नाव पाहिलं की मी तो धागा पाहिल्याशिवाय राहूच शकत नाही.>>> मी पण
फोटो आणि वर्णन मस्तच. तो सेल्फी नंतर एक सोडून पुढचा फोटो फारच आवडला. पाणी, ढग सगळे एकदम मस्त दिसते. एकदम गूढ वाटते.
सुंदर फोटो!!!!!!!!!!! कोकणात
सुंदर फोटो!!!!!!!!!!!
कोकणात वर्षातून तीन-चार वेळा जाणे होतेच. आता आम्ही दरवेळी पनवेल ते खोपोली मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे जाऊन नंतर खोपोलीपासून खोपोली-पाली रस्त्याने वाकण फाट्याला नागोठण्याच्या पुढे मुंबई-गोवा हायवे मार्गे प्रवास करतो. एकतर प्रवासाच्या वेळेची बचत होते आणि पनवेलपासून नागोठण्यापर्यंत त्या खराब रस्त्याचा आणि ट्रॅफिकचा अश्या दुहेरी त्रासातून सुटका होते.
आत्ताच्या कोकण दौर्यावेळी गुहागरला जाऊन आलो आणि आम्हाला सुध्दा अन्नपुर्णा मध्येच जेवण चांगले मिळेल असे बहुतेकांनी सांगितले. पण जाऊन बघतो तर ही गर्दी पुढे जाऊन जेवण करू हा बेत केला आणि शृंगारतळी जवळ झायका नावाचे एक हॉटेल लागले तिथे जाऊन जेवलो. त्यांचे जेवण चांगले होते. अन्नपुर्णाबद्दल तुमचा अनुभव वाचून आम्ही तिथे थांबलो नाही हे चांगलेच झाले असे आता वाटत आहे.
हेदवीच्या समुद्रकिनार्याचे फोटो पाहून आम्ही एवढी चांगल्या जागी गेलो नाही याची मात्र आता हळहळ वाटत आहे. आता पुढीलवेळी हेदवीला नक्की जाणार.