कार ड्रायव्हिंग करीत असतांना संघूने सिद्धांतला स्टेअरिगला लागून मांडीवर बसविले होते. त्याला मधून मधून चूप करण्याचा तो प्रयत्न करीत होता. संघशीलला आम्ही लहानपणापासून ‘संघू’ म्हणत होतो. तो आमचा मधला मुलगा.
सिद्धांतचा ’ऊऽऽ ऊऽ” असा रड अजुनही चालूच होता.
‘सिद, अरे ती बघ अनन्या...’ गाडीला जसं जोरात ब्रेक लावल्यावर गाडी जाग्यावर थांबते; तसा सिद्धांतचा रड एकाएकी थांबला.
अनन्या सिद्धांतच्याच वयाची. ती संघूच्या मित्राची मुलगी. दोघेही आधी त्रिवेंद्रमला एकाच हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजीस्ट होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबाचे एकमेकाच्या घरी जाणेयेणे सुरु होते. संघू दोन महिने झाले, आता तो पुण्याला आला.
अनन्याला बोलता येत होतं. सिद्धांत मात्र अजूनही बोलत नव्हता. मुलांपेक्षा मुली लवकर बोलतात, असे म्हणतात ते खरं आहे.
’अनन्या अन् तिचे पप्पा काल आपल्याकडे आले होते न...! तू तिच्यासोबत खेळला होता. तुने तिला खेळणे दाखविले. बाबाने तुम्हाला गार्डनमध्ये नेले. तुम्ही तेथे बॉल खेळलात. पाळण्यात झुलले. घसरगुंडीवर खेळले. हो ना... सिद...’
सिद्धांत निमुटपणे रड थांबवून भिरभिर पुढे पाहत संघूचे बोलणे ऐकत होता. खरं म्हणजे अनन्या आणि तिचे पप्पा असे कोणीच समोर नव्हते. पण सिद्धांतचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संघूने मुद्दामच त्याला असे सांगितले. पण संघू बोलायला थांबल्याबरोबर परत त्याचा हळू आवाजात रड पुन्हा सुरु झाला. त्याचा क्षणभर का होईना रड थांबला; हे मला मोलाचे वाटत होते.
तेवढ्यात टॅव्हल बस आली.
’सिध्दांत रडू नको. आमची बस आली. आम्ही आता गावला जात आहे.’ मी सिद्धांतकडे पाहत म्हणालो. मी बाजूच्याच सीटवर बसलो होतो. सिद्धांतची काहीच प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही.
बस थांबली. मी कारच्या डिकीतून बॅगा काढून बसच्या डिकीत टाकल्या. तो पर्यंत कुसुम बसमध्ये चढली. मी तिच्या मागोमाग चढलो. संघू सिद्धांतला कडेवर घेऊन आमच्याकडे पाहत खाली उभा होता. तो आता रड थांबवून निमूटपणे आमच्या हालचालीकडे पाहत होता. त्याचा नेहमी टवटवीत, खेळकर, निरागस दिसणारा चेहरा आता मलूल झालेला दिसत होता. डोळ्याच्या खाली गोबर्याग गालावर अश्रूचे ओघळ थबकलेले दिसत होते.
दरवाज्यातून मागे फिरून मी सिद्धांतला पाहिले.
‘सिद्धांत, बायऽऽ...’ असे म्हणत मी हात हलवला. त्यानेही माझ्याकडे पाहून रडक्या चेहर्याूनेच हात हलवून बायऽऽ केला. त्याने माझ्या बायला प्रतिसाद दिल्याने माझी हुरहूर कमी झाली. आम्ही बसमध्ये चढत असल्याचे पाहून त्यालाही आम्ही गावला जात असल्याची चाहूल लागली असावी.
बस सुरु झाली. सिध्दांत व संघू आता दिसेनासे झाले. मी माझ्या सिटवर येऊन बसलो. स्लिपर गाडी होती ती. खिडकीतून बाहेर पाहिले. गाडी पुढे जात होती. अन् रस्ते, इमारती, दुकानाच्या पाट्या, जाहिराती असे सारेच भराभर मागे पडत होते.
गाडीच्या वेगाने माझे विचारचक्र फिरू लागले. मला कमालीचं अस्वस्थ वाटत होतं. अपराधीपणाच्या भावनेने माझे मन गलबलून गेले होते. सिद्धांतचा रडवलेला चेहरा सारखा माझ्या नजरेसमोर येत होता. मीच त्याला कारणीभूत झालो होतो. त्यामूळे मला सारखी चुटपूट लागली होती.
मी खिशातला मोबाईल हातात घेऊन संघूला रिंग केला.
’संघू. पोहचला का रे....?’
’हो... पप्पा. पोहचलो.’
’सिध्दांत कसा आहे रे...? अजूनही रडत आहे का ?’
’नाही... पप्पा. आता शांत झाला. पण बोटाला हात लावू देत नाही. हात लावले की रडतो.’
’बोटाला काही लावले की नाही...?’
’हो... हळद आणि तेल लावले.’
’उद्या वाटल्यास फ़्रॅक्चर आहे का ते तपासून घे.’
’हो... पप्पा. काही काळजी करु नका. तुम्ही जास्त फील करु नका. जे झालं ते झालं... व्यवस्थीत जा. हॅपी जर्नी....’ असे म्हणून त्याने फोन बंद केला.
एक महिन्यापूर्वी आम्ही मुलाकडे आलो होतो.
येण्याच्या आदल्या दिवशी संघूने सकाळी फोन करुन नुतनला बाळंतपणासाठी दवाखान्यात भरती केल्याचे सांगितले. नंतर एखाद्या तासाने बाळ झाल्याचे सांगितले.
रात्रीची टॅव्हल बस होती. मी तिकीट काढून आणली. आम्ही भराभर घ्ररातले सारे कामे आवराआवर करायला लागलो.
घर सोडून बाहेर जायचे म्हणजे घराला कुलूप लावूनच जावे लागत असे. पहिल्यांदा झाडाची व्यवस्था लावावी लागत असे. मग सर्व झाडांच्या कुंड्या एकत्र करणे, त्यांच्या खाली प्लेट ठेवणे, घराच्या बाहेर पडेपर्यंत त्यात पाणी टाकत राहणे इत्यादी सारी कामे करण्यात कुसुम मग्न होवून जात होती. एवढी लगबग पाहून झाडं पण समजून जात असतील की घरवाले आता बाहेर जाणार आहेत म्हणून !
कुसुमचा जीव झाडात फारच गुंतलेला असायचा. झाडांना ती लेकरासारखे जपत होती. झाडांना सोडून जाण्यापूर्वी ती सारखी झाडाच्या आजूबाजूला रेंगाळत राहायची. त्यांना पाणी टाकत राहायची.
त्यामुळे झाडांना सोडून जातांना आम्हाला फारच वाईट वाटत होते. कारण आम्ही कधी परत येऊ त्याचा काही नेम नव्हता. तोपर्यंत यातील किती जगतील आणि किती मरतील याची मनात धाकधूक राहायची. घरी आल्यावर त्यातील जीवट झाडं सोडले तर बाकी मेलेले दिसले की सारखी हळहळ वाटत राहायची. मग कुसुम परत झाडं विकत किवा कुठूनतरी आणायची व रिकाम्या झालेल्या कुंडीत लावून गॅलरीतील परसबाग पुन्हा पुन्हा फुलवीत राहायची.
घरी आम्ही दोघेच राहत होतो. तीघेहे मुले बाहेर राहत होते. हा पुण्याला, प्रज्ञाशील लुधियानाला तर करुणा ठाण्याला.
मुलं मोठे झाले, अर्थाजनाला लागले; अन् पाखरासारखे कधी भूर्रकन उडून गेले ते कळलंच नाही. आम्ही मग मुलांची, नातवंडाची आठवण अनावर झाली किवा मुलांनी आग्रह केला की अधूनमधून त्यांचेकडे महिना-दीड महिना राहून येत होतो.
सुरुवातीचे काही दिवस मुलांकडे असेच भुर्रकन निघून जात. आता नातवंडे झाल्याने त्यांचेशी खेळण्यात थोडेफार दिवसं निघून जात होते, म्हणा ! पण जास्त दिवस झाले की कुसुमची चला ना गावला... अशी भुणभुण सुरु व्हायची. खरं म्हणजे आपलं घर सोडून दुसरीकडे तिला जास्त दिवस करमत नसे. आपल्याच घरी करमते अशी म्हणायची. मग आम्ही मार्केट किवा आणखी कुठेतरी फिरायला जावून मन रिझवत होतो. एखाद्यावेळी मुलं पण वेळ असला की कुठेतरी फिरायला नेत.
मुलांकडे जायचे म्हणजे त्यांच्यासाठी नव्हाळीच्या वस्तू घेऊन जाण्यात मोठी हौस वाटायची. त्यात ज्वारी-बाजरीचे पीठ, बेसन, तिखट, लोणचे, तूप, शेवया, वड्या, झिंगे अशा काहीबाही वस्तू घेऊन जात होतो.
घराला कुलूप लावण्यापूर्वी खिडक्या-दरवाजे लावणे, गॅससिलेंडर, नळाचे कॉक, इलेक्ट्रिक स्विचेस बंद करणे, कॉम्पुटर व टी.व्ही.चे वायरी काढून ठेवणे, मोबाईल, चार्जर, ओषधी, तिकीटा, जेवणाचा डब्बा, पाण्याचे बॉटल्स, किल्ल्या व मुलांना द्यायच्या नव्हाळीच्या वस्तू घेतल्या की नाही, बॅगेत सारे सामान भरले की नाही; म्हणून एकमेकांची विचारपूस करणे, असं घरातून निघेपर्यंत सुरु राहायचे.
मी नेहमीप्रमाणे ऑटो आणला. ऑटोवाल्याला बाहेर बिल्डिंगच्या खाली थांबायला सांगून घरात गेलो. बॅगा बाहेर आणून दरवाज्याला कुलूप लावले. त्याचबरोबर कुसुम पुढे सरसावून कुलूपाला ओढून पाहायला लागली. ती नेहमी मी दरवाज्याला कुलूप लावले की त्याची हमखास तपासणी करीत असते. आताही तिने तसेच केले. मी ऑफीसला असतांना ऑडिटचे कामे करीत होतो. त्यावेळी मी पण असेच तपासणीचे कामे करीत होतो.
सकाळी आम्ही पुण्याला संघूकडे पोहचलो. सिद्धांत घरीच होता. सिद्धांत आता सव्वादोन वर्षाचा झाला. त्याला मी ‘सिद्धांतभाऊ’ म्हणत होतो. मी माझ्या सार्याच नातुंना भाऊच म्हणत असतो.
त्याला म्हटले, ‘सिद्धांतभाऊ, ओळखतो का मला?’ असे म्हटल्यावर तो माझ्या जवळ आला. मी त्याला उचलून कडेवर घेतले. त्याचा पापा घेतला. तसा तो बापाच्या फार अंगावरचा ! कुणाच्या जवळ सहजासहजी जाणार नाही.
आम्ही त्रिवेदमला गेलो होतो. तेव्हा तो सुरुवातीला आमच्या जवळ येतच नव्हता. त्याला आवाज दिला की, तो आमच्याकडे न पाहता गचकन मान दुसरीकडे वळवून फिरवायचा. नंतर तो आमच्यासोबत इतका रुळला की आमच्याशिवाय राहत नव्हता.
त्याला आम्ही अपार्टमेंटमधील खालच्या मोकळ्या ठिकाणी फिरायला नेत होतो. त्याचेसोबत बॉल व इतर खेळणे खेळत होतो. त्यामुळे तो आमच्याही अंगावरचा झाला होता. त्याला इलेक्ट्रिक स्वीचेच बंद-चालू करायला फार मजा वाटत होती. बटन दाबल्यावर लाईट लागला की ‘आईट’ म्हणायचा. त्याला लाईटचा उच्चार येत नव्हता. म्हणून तो आईट म्हणायचा.
एकदा आम्ही गावाला असतांना संघू माझ्यासोबत मोबाईलवर बोलत होता. तेव्हा त्याने मोबाईल सिद्धांतच्या कानाला लावला. मी त्याला आईट कुठे आहे रे... म्हणून विचारले. तेव्हा तो खोलीत जावून बेडवर चढून लाईटचे बटन चालू-बंद करीत ‘आईट, आईट’ असे म्हणत असल्याचे मला संघू सांगत होता; अशी त्याची गंमत ऐकून आम्ही खूप हसत होतो.
दुसरा त्याचा छंद म्हणजे संघू कार चालवितांना थांबला की कारचे स्टेअरिंग फिरविण्यासाठी पटकन संघूजवळ जायचा.
आम्ही त्याला सायकल घेऊन दिली होती. ती व दुसरी एक स्टॉलर यांना उलटी करायला खुणवायचा. तो मग माझ्या मांडीवर बसून चाकं फिरवीत राहायचा. ह्या दोन्हीही गाड्या त्याला सरळ दिसल्या, की आमच्यावर त्याच्या भाषेत रागवायचा.
आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे त्याला जेवण भरवीतांना नूतन त्याचे जवळ टॅबलेट द्यायची. टॅबलेट म्हणजे कॉम्पुटरचा छोटा अविष्कार. तो मग त्याला सुरु करून बोटाच्या स्पर्शाने व्हिडीओ, गेम, गाणे असं काहीतरी लावून पाहत राहायचा. त्याला जे पाहिजे ते बदलवीत राहायचा. जेवण होईपर्यंत त्याचा हा कार्यक्रम सुरु राहायचा. या वयात त्याला टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळता येणे म्हणजे नवलच वाटत होते. विशेष म्हणजे चालू करण्यापासून ते बंद करण्यापर्यंतच्या सार्याा क्रिया त्याला येत होत्या. मग त्याचे कौतुक केल्याशिवाय आम्हाला राहवत नसे. यावरून आजची पिढी फारच पुढे जात असल्याचे चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसत होते.
आम्ही पोहचलो; त्या दिवशी मला अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बगीच्यात सिद्धांत घेऊन गेला. तेथील घसरगुंडीवर मनमुरादपणे खेळला. मग मी रोजच त्याला येथे आणून खेळवत होतो. खूप पळायचा. त्याची पळण्याची स्टाईल पण वेगळीच ! खांदे उडवत पळायचा.
तो मला जीममध्ये घेऊन गेला. तो संघुसोबत जिममध्ये जात असल्याने त्याला माहित होते. त्याला ‘जीम’ असा शब्द उच्चारता येत नव्हते तर त्याऐवजी तो ‘जी’ म्हणायचा.
त्याने मला बॅगमध्ये ठेवलेले, त्याचे खेळणे दाखविले. मग रोजच मला घेऊन बसायचा. त्याचे खेळणे हाताळून झाल्याशिवाय मला तेथून उठू देत नव्हता.
संघूला रोज रात्री एक-दीड वाजेपर्यंत झोपू देत नव्हता. मोठा मस्ती करायचा. जेवण झाल्यांनंतर झोपेपर्यंत दोघेही बाप-लेक खेळत राहायचे.
एखादी घटना घडली की तो खाणाखुणा व हावभाव करून सांगण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आम्हाला त्याची ही अबोल भाषा कळत नव्हती. मम्मा, पप्पा शिवाय त्याला दुसरं काही बोलता येत नव्हतं. संघू व नूतनला तो काय सांगतो ते कळायच.
एकदा त्याचा हात बाळाच्या डोक्याला लागला तेव्हा तो प्रसंग खाणाखुणा व हावभाव करून सांगत होता. अशा त्याच्या गमतीजमतीत आम्हीही समरस होऊन जात होतो.
संघूचा दुसरा छोटा बाळ मस्त गुटगुटीत आणि मोठा शांत. टुकुरटुकुर पाहत राहायचा. त्याला भूक लागली की ‘ऑऽऽ ऑऽऽ‘ करून मधुर आवाजात रडायचा.
आम्हाला एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचे असल्याने आम्ही गावला यायला निघालो.
बॅगा घेऊन लिफ्टने खाली कारजवळ आलो. सोबत सिद्धांत पण होता. येतांना त्याने नूतनला बाय केला. हसत-खेळत, उड्या मारत तो कारजवळ आला.
बॅगा संघूने डिकीत ठेवल्या. कुसुम दरवाजा उघडून मागच्या सीटवर बसली. संघू ड्रायव्हर सीटवर बसला. मी सिद्धांतला घेऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसणार होतो. माझ्याजवळ एक थैली होती. ती पाठीमागच्या सीटवर ठेवण्यासाठी मी दरवाजा उघडला व परत बंद करायला लागलो. तेव्हा सिद्धांत एकदम जोरात किंचाळला. त्याची किंकाळी ऐकून माझ्या मनात चर्र झालं. त्याचे बोट पहिल्या आणि दुसर्या दरवाज्याच्या मध्ये चेंदला असल्याचे माझ्या लक्षात आले.
त्याच्या ओरडण्याने मी घाबरलो. संघू ताबडतोब कारच्या बाहेर पडून सिद्धांतला उचलून घेतले. काय झाले म्हणून मला विचारले. मी त्याचे बोट चेपल्याचे सांगितले.
‘पप्पा, जरा पाहून दरवाजा लावत जा... त्याचे बोट जर फ्रॅक्चर झाले असेल
तर... ?’ संघू काळजीच्या सुरात मला म्हणाला.
त्याचे हे बोलणे ऐकून मी खजील झालो. पोराच्या यातना पाहून बापाची तडफड होणं साहजिकच आहे.
‘हो...रे... संघू... त्याने दरवाज्याच्या फटीत बोट टाकले असेल हे माझ्या लक्षातच आले नाही. तिथे अंधार होता. मला काही दिसलेच नाही. फार मोठी चूक झाली माझ्याकडून... चांगला हसत-खेळत असलेल्या लहानशा जिवाला माझ्यामुळे दुखापत झाली. गावला जाता जाता असे घडले. फारच वाईट वाटते.’
‘कुठे बोट चेपलं. दाखवा बरं.’ संघू म्हणाला.
आम्ही कारच्या दरवाज्याच्या बाजूने आलो. पहिला दरवाजा लाऊनच होता. मागचा दरवाजा उघडा होता. दोन्ही दरवाज्याच्या मध्ये फट निर्माण झालेली होती. नेमके त्याचवेळेस सिद्धांतने त्यात बोट घातले असावे. जेव्हा मी दरवाजा लावायला गेलो; तेव्हा चेपले असावे. मी त्या फटीत बोट टाकून दरवाजा लावून पाहिला; तेव्हा बोटाच्या शेवटच्या टोकावर दाब पडून घसरून बाहेर आला. सिद्धांतच्या कोवळ्या बोटावर असाच दाब पडून चिंबला असावा.
बस येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे आम्हाला लवकर निघणेही गरजेचे होते. इकडे सिद्धांत जीवाच्या आकांताने रडत होता. घळघळा अश्रूचा पूर डोळ्यावाटे बाहेर येऊन त्याच्या कोमल गालावर ओघळत होते.
ऐरवी लहान मुलाचा रड हा धुक्यासारखा अल्पजीवी असतो. असे म्हणतात की मुलं मोठ्या माणसासारखे आपले दु:ख गोंजारत बसत नाहीत. पण सिद्धांत इतका वेळ रडत आहे; म्हणजे नक्कीच त्याला खूप यातना होत असाव्यात !
मी त्याची दयनीय अवस्था पाहून गलबलून गेलो होतो. मला कमालीचे वाईट वाटत होते. जणूकाही माझ्या काळजाचे पाणी होत आहे असे वाटत होते. चांगला हुंदळणारा-हसरा-खेळकर चेहरा एकाएकी रडका झाला...! इतका साजरा गोजिरवाणा दिसणारा चेहरा तेजोहीन झाला...! या अकल्पित प्रसंगाने मला पुरते हलवून सोडले होते.
मी स्वत:वरच खूप संतापलो होतो. चिमुकल्या जीवाला दुखापत करण्याला मीच कारणीभूत आहे असे म्हणून नकळत माझा हात कपाळावर जाऊन स्वतःलाच चापटे मारीत होता. मी अपराधी भावनेने अर्धामेला झालो होतो.
सकाळी घरी पोहोचल्याबरोबर संघूला फोन केला.
‘संघू, आम्ही पोहचलो घरी. सिद्धांत कसा आहे ?’
‘चांगला आहे, पप्पा. बरं झाले. सुखरूप पोहचलात.’
थोडं थांबून आणखी पुढे म्हणाला, ‘सिद्धांतला दुखापत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यांआधीही कधी माझ्यामुळे तर कधी नूतनमुळे अशा घटना घडल्यात. प्रत्येकवेळी मोठठा रडतो...! त्याचे बोट एकदा बाथरूमच्या दरवाज्यात चेपले होते, गरम इस्त्रीने त्याचा हात भाजला होता. टबमध्ये गरम पाण्याने त्याचे दोन्ही पाय पोळले होते. गार्डनमध्ये पळतांना एका मोठ्या छिद्रावर त्याचा पाय पडल्याने मुडपला होता. अशा ज्या काही गोष्टी घडतात ना... त्याला खरं म्हणजे आपण मोठे माणसंच जबाबदार असतो. म्हणून आपण लहान मुलांच्या बाबतीत फार लक्ष द्यायला पाहिजे, असे मला वाटते.’
‘बरोबर आहे. आपल्या निष्काळजीपणामुळेच मुलांना दुखापत होत असते. काळजी घेतली की काळजी करण्याचा प्रसंग येत नाही.’ असं मी म्हणत त्याला दुजोरा दिला.
गोजिरवाणा चेहरा तेजोहीन झाला...!
Submitted by rkjumle on 28 May, 2015 - 10:17
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्यामुळे लेकरांना दुखापत
आपल्यामुळे लेकरांना दुखापत झाली की खरच खुप वाईट अपराधी वाटत राहतं