एक अशीच सायंकाळ....

Submitted by संतोष वाटपाडे on 20 May, 2015 - 07:45

सायंकाळी लोळ धुळीचे क्षितिजावर तांबडे उसळले,
कैक खुरांनी रान डोंगरामधले अगदी पुर्ण ढवळले,
बघता बघता दिसू लागली गुरे वासरे पळताना अन,
गळ्यातली घुंगरे घोगरी हंबरण्याने भान हरपले...

टपटप टापा टाकत खडकावरुनी सारी धावत होती,
खुळी वासरे लाडाने आईला त्यांच्या खेटत होती,
कधी एकदा घरी जावुनी पान्हा सुटेल अलगद ओठी,
यासाठीच बिचारी माता गाव दूरचा पाहत होती...

धुंद पाखरे थव्याथव्यांनी झाडांवर बसताना दिसली,
सुर्याची पाण्यात पसरली नक्षी थरथणारी पुसली,
गजबजली पाने गवताची वार्‍याने बेभान जाहली,
चंद्रकोर प्रकटली तिलाही घाई झाली होती कसली..

थांबला कळप माथ्यावर दिसता धुरकटसा गाव चिमुकला,
दिवा घरातिल काळासा मिणमिणता एक लबाड चमकला,
वेल्हाळ धावली गुरे कापुनी वाट वाकडी थकलेली,
थेंब कुणाच्यातरी सडातून मातीवर अल्हाद निखळला..

घमघमला परिमळ वार्‍यावर गावाचे वैभव अवतरले,
दूर दूर पसरली घरे गोठ्यात तेज काही खळखळले,
निथळत होते क्षीर जिभेवर काही मातीवरही जेव्हा,
दिव्य केशरी रंगामध्ये गाव शेत परिसर लखलखले ...

- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users