पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53815
शोधतोय शोधतोय, युरुगु शोधतोय
त्याचे या जगी नवीन घर तो बांधतोय
पूर्वी अम्माने केले ते पुन्हा तो बघतोय
आणि आता स्वतःला देह तो शोधतोय
मी तर नाही पटलो त्याला
पुढचा कोण आहे?
~*~*~*~*~*~
"ओम जय जय गुरुवे नमामि अहं
बाबा सखा तुमि बाबा तुमि तुमि बाबा नमोस्तुते"
या आणि अशाच स्वरुपाच्या गाण्यांची, सॉरी भजनांची व कवनांची आवर्तने होत होती. त्या संपूर्ण जागेला एका भव्य सत्संगाचे स्वरुप आले होते. विविध चॅनेल्सचे रिपोर्टर ही न्यूज कव्हर करायला आले होते.
कारण एक भव्य यज्ञ सुरु होता, श्रुगाल विनाशक यज्ञ!!
त्या यज्ञात विविध द्रव्यांच्या आहुति दिल्या जात होत्या. कसले कसले मंत्र म्हटले जात होते. त्या यज्ञाच्या पुरोहिताच्या जागी एक स्वर्ण सिंहासन होते. त्यावर विराजमान होते बाबा निश्चितानंद स्वामी!
स्वामीजींनी धवल वस्त्रे परिधान केली होती. खांद्यावर रुळणारे केस व संपूर्ण वाढलेली दाढी त्यांच्या धीरगंभीर रुपात भरच घालत होती. पण एकही पांढरा केस नसल्याने त्यांच्या वयाचा अंदाज येत नसे. बाकी कुठलाही दागिना त्यांच्या अंगावर नव्हता. अगदी लक्ष देऊन पाहिले तर सुबक लाकडी खडावा मात्र पायात होत्या. किंचित लांबुळक्या चेहर्यावर शांत भाव, खोल गेलेले डोळे व गरुड नाक अशा स्वरुपात बाबांचे दर्शन होत होते.
बाबांनी हलकेच हात उंचावला. आजच्या आहुत्या संपल्या असल्याचा तो इशारा होता. सर्व भक्त उठून उभे राहिले.
बाबांनी उंचावलेला हात तसाच ठेवला व त्यांनी त्यांचे ठराविक वाक्य उच्चारले
"सब निश्चित है!"
~*~*~*~*~*~
प्रज्ञा त्या ठरलेल्या ठिकाणी वाट पाहत होती. इन्स्पेक्टर जाधवांचा इंफॉर्मर तिला त्याने काढलेली माहिती देणार होता. दिसताना असे दिसत होते कि एका बसस्टॉपवर एखादी कॉलेजवयीन तरुणी बसची वाट बघत उभी आहे. अचानक तिला एक शीळ ऐकू आली. च्युईंग गम चघळत एक युवक चालत येत होता. तिला माहित नव्हते पण तो संपूर्ण मुंबईतला सर्वोत्कृष्ट जुगारी किलर होता.
हे, किलरने उगाचच मैत्रीपूर्ण हास्य टाकले. प्रज्ञा अर्थातच त्याला काही प्रतिसाद देणार नव्हती. पण हा रिपोर्टर असला तर? म्हणून ती आपले जेवढ्यास तेवढे हसली.
"एक पत्ता निवड!" किलरने एक कॅट तिच्या समोर धरला.
"एक्सक्यूज मी?"
"अगं पत्ता निवड तर."
हा नक्कीच रिपोर्टर नाही आहे. याला कटवायला पाहिजे.
"ओके." तिने एक पत्ता हातात घेतला. त्याने कॅट एकत्र करीत पुढे धरला व ते पान तिने सर्वात वरती ठेवले. मग त्याने तो कॅट मनाला येईल तसा पिसला. मग तो तिच्या हातात देत तो म्हणाला
"इस्पिक दुर्री"
से व्हॉट? किलरच्या चेहर्यावर अजूनही तेच मंद हसू खेळत होते. प्रज्ञाला काही कळेच ना हे काय होतं ते.
"हे तू कसं केलं? आय मीन तू कॅट लावला ते कोणीही सांगू शकतं. पण तू पत्ता उलटला पण नाही? लाईक हाऊ?"
किलर मनसोक्त हसला. त्या हास्यात दटावणी, धाक, विकृती इत्यादीचा लवलेशही नव्हता. कोणाला सांगूनही पटले नसते कि हा रसूल भाईचा खास आहे. जणू दोन कॉलेजचे मित्र-मैत्रिण टाईमपास करत आहेत असेच कोणालाही वाटले असते. पत्ता कसा ओळखला तर ती त्याची पिसण्याची खास पद्धत होती ज्याने तो कॅट जसा सुरुवातीला होता तसा आणत असे. पण जर त्यातला एखाद्या आणि एखाद्याच पत्त्याची जागा बदलली तर फक्त तो आणि तोच पत्ता वेगळ्या जागी येणार. थोडक्यात मिसमॅच! जेव्हा तो प्रज्ञाच्या हातात कॅट देत होता तेव्हा त्याने प्रत्येक पत्ताचा फील घेतला होता. तो केवळ फीलने कुठला पत्ता चुकला आहे हे सांगू शकत होता. वापरलेल्या कॅटचा किलर बादशाह होता.
"अगं मला शंकराच्या देवळापाशी बोलावून इकडे कुठे थांबलीस?"
समोर दुसरा एक तरुण निळ्या पल्सारवर बसून बोलत होता. खुणेचे वाक्य! हा रिपोर्टर आहे तर.
"हा कोण?" त्याने हेल्मेट काढत विचारले. किलर रिपोर्टरचे निरीक्षण करत होता. ३० च्या आसपासचा वाटतोय. किलर किंवा प्रज्ञा काही बोलणार एवढ्यात रिपोर्टरच म्हणाला
"ओह पत्त्यांची जादू. मला पण येतात पत्ते लावता. म्हणजे जर असा पत्ता काढला आणि मग मध्ये कुठेही ठेव म्हणायचं. पण प्रत्यक्षात ती जागा लक्षात ठेवायची. मग असा पिसला कि हे बघ तोच पत्ता वर आला." सुहास्य मुद्रेने रिपोर्टर पत्ते पिसत उद्गारला.
यावर किलरही हसला. त्याने खिशातून एक फासा काढला व तो म्हणाला
"मस्त! तुलाही गेम ऑफ चान्स आवडतात वाटतं. मग पत्ता काढ एखादा."
यावेळी आली होती चौकटची राणी.
"ओके आता तू कसाही पिस. पिस रे."
रिपोर्टरला हे लवकर संपवायचं होतं. आजूबाजूची लोकांचे लक्ष आता वेधले जाऊ लागले होते.
"भारी. आता मी हा फासा फेकणार. फाश्यावर जो काही अंक येईल, वरून त्या क्रमांकाचा पत्ता काढ. जर तो तुझा पत्ता आला तर मी जिंकलो. नाहीतर तू. जो जिंकेल तो या मुलीला डेट वर नेईल."
"ओय, काय संबंध! काहीही!"
किलरने प्रज्ञाला हाताना बाजूला सारले व तो रिपोर्टरच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला बोल लावतो बेट!"
रिपोर्टरने प्रज्ञाला आपल्या बाजूला घेतले व कॅट एकदा मिसळून किलरच्या हातात दिला.
"टाक फासा."
किलरने फासा टाकला. ३! त्याने फासा उचलत वर बघितले, रिपोर्टरने प्रज्ञाला मागे बसवून गाडी गिअरमध्ये टाकली पण होती.
"सॉरी दोस्त. पण आज नाही." असे म्हणत ते दोघे तिथून सटकले.
किलरही वाढती गर्दी पाहून तिथून सटकला.
*****
किलर डोक्यात प्रॉबॅबलिटी काढत होता. प्रत्येक पत्ता हवा तो पत्ता असण्याची शक्यता १/५२. पहिल्या सहातले पान ओढणार पण कोणते ओढणार त्याची शक्यता १/६. इंडिपेंडंट इव्हेंट्स त्यामुळे गुणाकर. सो इझी. अर्थातच. जो मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी ड्रॉपआऊट होता त्याला एवढे जमलेच पाहिजे. त्यामुळे शक्यता १/३१२ ~ ०.३२% फार बेटर चान्सेस दॅन मोस्ट सिचुएशन्स. त्याने आता सहाही पत्ते उलटले. तिसरा पत्ता होता चौकट राणी!!
त्या पत्त्याकडे पाहत तो म्हणाला
"हेहे. दोस्त निदान कुठला पत्ता होता ते तरी सांगून जायचं. यात ट्रीक तर मी वापरली नव्हतीच. पण जवळ जवळ १००० वेळा प्रयत्न केल्यावर स्टॅस्टिकली एकदा तरी जमायला पाहिजे. ते जमलं का ते तरी कळलंच असतं."
आणि तो वर बघत मनात म्हणाला.........
पण तो असता आणि जर तो त्या दिवशी प्रमाणेच सीरियस असता तर त्याला १००% पत्ता बरोबर मिळाला असता.
******
प्रज्ञा गाडीला मागे घट्ट धरून बसली होती. तिला शरीरातून रक्त वाहत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. हू द हेल वॉज ही?
"त्याचे नाव किलर आहे."
रिपोर्टर गाडी प्रज्ञाच्या घराच्या रस्त्याला घेत म्हणाला. त्याने गाडीचा वेग घर जवळ आल्यावरच कमी केला होता. तोवर त्याने ट्रॅफिक मध्ये गाडी ज्या पद्धतीने दामटली होती त्याला डेंजर हा एकच शब्द योग्य होता. गाडी थांबवून त्याने प्रज्ञाला उतरवले.
"किलर मला कसा माहिती वगैरे नंतर सांगेन. पहिल्यांदा इंट्रो - रिपोर्टर नाईस टू मीट यू."
प्रज्ञाने हस्तांदोलन करून कसनुसं उसनं हसू आणलं.
"हॉनेस्टली तुझी केस तशी साधी आहे. डोंट मिसअंडरस्टँड, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग पण माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने महेशची दुसरी केस जास्ती थ्रिलिंग आहे. वेल, काम काम आहे. सो हिअर इज ऑल यू नीड!. अनिरुद्धची गाडी धारावीच्या झोपडपट्टीमध्ये राहणार्या एकाने विकली. तो रसूल गँगसाठी काम करतो, अं मध्ये बोलू नको, हा तर त्याला गँगमध्ये काही मानाचे स्थान वगैरे नाही. गल्लीतले गुंड एखाद्या मोठ्या दादाच्या आसर्याला असतात तसलाच हा. त्यामुळे शिंद्यांचा तर्क काही लगेच खरा ठरत नाही पण इव्हेंचुअली तो देखील इथेच येऊन पोचेल. असो; त्याने ती गाडी मग चोरबाजारात विकली. ती काही आता तुला परत मिळू शकत नाही ना त्यातलं सटरफटर सामान. नक्की काय होतं त्याच्यात ते आता चोरालाही आठवत नाही त्यामुळे तो डेड एंड आहे."
"सामान आणि अॅक्टिवा जाऊ दे. ती त्याला कुठे सापडली जे जास्ती महत्त्वाचे आहे."
"नाऊ हिअर थिंग्ज गेट इंटरेस्टिंग! त्याला ती माहिमच्या किल्ल्याच्या बाहेर सापडली. गाडीला किल्ली तशीच होती."
"इंपॉसिबल! असे असेल तर खून किल्ल्यातच झाला असण्याची शक्यता खूपच वाढते. त्याने माझ्या थिअरीला सपोर्ट सुद्धा मिळतो कि किल्ल्यावरच एका कुत्र्याने त्याला मारले. पण तो इतक्या रात्री गाडी स्टँडवर लावून, किल्ली तशीच ठेवून कधीच जाणार नाही. कशाला जाईल ना तो?"
"ते शोधणे तुझे काम आहे. बाकी दुसरं म्हणजे रसूल गँगमध्ये कोणीही अशी विचित्र हत्यारे नाही वापरत जसे इथे वापरलंय. त्यामुळे तुझ्या थिअरीला अजून पुष्टी मिळतीये. त्यामुळे आता शोधून काढ कि तो तिकडे का गेला. हे माझ्यापेक्षा तू जास्त लवकर आणि चांगल्या पद्धतीने शोधू शकशील."
प्रज्ञाने मान हलवून रुकार दिला. परत गरज लागली तर जाधवां थ्रू कॉन्टॅक्ट करेन असं म्हणून ती निघाली.
"एक मिनिट" रिपोर्टरने तिला थांबवले.
" एक सांगायचंच राहिले. किलर! तुला छेडणारा मुलगा कोणी सडकछाप मजनू नव्हता. त्यामुळेच तो इतक्या सहज पत्त्यांशी खेळत होता. किलर मुंबईतला सर्वोत्कृष्ट गॅम्बलर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तो रसूलचा अगदी खास माणूस आहे, जणू उजवा हातच!"
हे ऐकून प्रज्ञा नखशिखान्त हादरली. तिला पटकन काहीच न सुचल्याने ती गोंधळलेल्या चेहर्याने रिपोर्टरकडे बघू लागली.
"माझ्यामते केवळ योगायोगानेच त्याच्याशी भेट झाली. किलरला मुलींची अशी छेड काढायची मधूनच हुक्की येते. बट स्टिल टेक केअर. बी व्हेरी व्हेरी केअरफुल व्हाईल यू गो पोकिंग यूवर नोज हिअर अॅन्ड देअर!"
~*~*~*~*~*~
हाय, मी काय खातोय? पाया सूप. खूप चांगले असतं तब्येतीला सांगितलं तर होतं मागे तुम्हाला. तर मीच तो ज्याच्यामुळे आज मुंबईत गुंड, भिकारी, रस्त्यावरचे बेवारस लोक मरत आहेत. माझ्या बळींचा, खरेतर माझ्या खाद्यपदार्थांचा नक्की आकडा मी सोडून कोणालाच माहित नाही. असो. तर मी आज तुमच्याशी का बोलतोय? का व्हिलनने आपले मनोगत मांडू नये का? तसं पण व्हिलन व्हिलन म्हणजे नक्की काय असतं हो? खूप क्रूड व्याख्या म्हणजे पिटातल्या पब्लिकला न आवडणारे कॅरेक्टर म्हणजे व्हिलन! मग जनरली न आवडण्याची कारणे अगदी सोप्पी, सहज असतात. हिरोच्या घरच्यांना पूर्वी त्रास दिलेला असणे, हिरोईनवर अत्याचार करणे इ. आता मी यातलं काहीतरी करतो का?
खूनी? म्हणजे समजा मी काही माणसं मारली तर लगेच मी खूनी? आता साऊथच्या पिक्चर मध्ये हिरो, पुन्हा हिरो म्हणजे काय ते पण तुमच्यावर आहे, सहज ५०-६० तरी माणसे मारतो. त्याला कोणी खूनी म्हणत नाही. मग मी मूठभर माणसे मारली तर लगेच मी खूनी का, हे बरंय राव! असो, शेवटी तुमची मूल्ये तुमचे आजूबाजूचे वातावरणच ठरवतं. तुम्ही काय वातावरणात वाढता यावर बरेच काही ठरते. सध्याचे उदाहरण द्यायचे तर अमेरिकन मुलाचे चांगल्या वाईटाचे निकष आणि अफगाणी मुलाच्या निकषांमध्ये जमीन आसमानाचा फरक असणार.
मी कुठे जन्मलो नक्की हे मलाच ठाऊक नाही. मला फक्त अंधुकसे आठवते कि मी जमिनीवर बसलो आहे आणि एका बाईचा चेहरा मला दाराच्या फटीतून दिसतो आहे आणि ती क्षणभरच हसते. खरे तर तिच्या चेहर्यावर अश्रूंच्या धारा आहेत पण तरी ती हसते, का कुणास ठाऊक. मग काहीतरी फिरते. मी रांगत पुढे गेलो बहुतेक, किती वेळानंतर ते काही आठवत नाही. तो चेहरा अजूनही तिथेच होता, तसाच हसरा. आता तो चेहरा माझ्या हातात होता. कुठेही नेण्याजोगता, एखाद्या चेंडूसारखा.
*****
मी लहानपणी खूपच लाजाळू असलो पाहिजे. कारण मला कोणी मित्र मिळाल्याचे आठवत तरी नाही. मी गावात असा फारसा कधी राहिलोच नाही. याचा अर्थ असा नाही कि मी एकदम जंगली, टारझन सारखा वाढलो. एका गावातून दुसर्या गावात असा मी खूप भटकलो. भूक लागल्यावर मी काय वाटेल ते खायचो. जंगलात कुठल्याही झाडाची पाने, फळे, कंद असे मी काहीही खात असे. असेच कधीतरी मी पाहिले कि एका हरणाचा एक रानकुत्र्यांची टोळी पाठलाग करत आहे. ते हरीण त्यांना चुकवत एका तळ्यात शिरले. ती टोळी कितीतरी तास तशीच तळ्याच्या काठाशी उभी होती. मी बघत होतो. ते हरीण खूप दमले असावे. कारण ते तसेच त्या तळ्यात उभे होते. लवकरच ते बुडले. रानकुत्र्यांचा हरणातला रस संपला असावा बहुधा. मी पाण्यात शिरून ते हरीण बाहेर काढले. तो माझा आठवणीतला पहिला मांसाहार.
*****
असे होत होत मी कधीतरी शहरात आलो. तो प्रदेश फार शांत कधीच नव्हता बहुतेक. हाणामार्या, मुडदे पडणे तिकडे अगदी काही दुर्मिळ नव्हते. पण माझ्यासारख्या लाजाळूला तिथे कोण भीक घालणार? कसे तरी मी सुरुवातीचे दिवस काढले. पण एकदा मला फारच भूक लागली होती. साधारण ३ दिवसांचा मी उपाशी होतो. खिशात दमडी नाही, पारले जी पण खायची ऐपत नाही. असाच भटकत असताना मी पाहिले कि एक मारामारी पेटली होती. एकजण कोणी निसटला होता. योगायोग बघा तो मला दिसला, लपलेला. पण मला कोणी त्याच्याविषयी विचारले नाही. मुंगीला कोणी पत्ता विचारतं का, तिच्याकडे लक्ष दिले तरी खूप आहे. मी त्याच्या जवळ गेलो. त्याने मला खूप विनवण्या करून पाणी आणायला तयार केले. मी थोडा दूरच गेलो असेन तेव्हा माझे डोके गरगरू लागले. मला जवळच एक कोयता दिसला. त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर कायम लाल प्रकाश येतो. पण एक नक्की त्याचे प्रेत कोणालाही सापडले नाही. हां त्यानंतर त्या गल्लीत पुढे काही दिवस कुत्री हाडे नक्की चघळत होती.
*****
मग मी अचानक मुंबईत कसा आलो? इतक्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे थोडीच मिळणार तुम्हाला. मी दुष्ट आहे ना, मग तुम्हाला ताटकळत ठेवण्यातच मला आनंद मिळणार. पण एक नक्की माझ्याशिवाय पण काहीतरी आहे. कारण माझ्या हिशोबाच्या पलीकडे मृत्यु होत आहेत. एक दोनदा मला तो बातम्यांमधला कोल्हा पण दिसला. कोल्हाच होता तो. पण कोल्हा एवढ्या प्रमाणात माणसांवर हल्ला चढवेल? शक्य नाही. असो जोवर तो माझ्या मध्यात येत नाही तोवर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही.
~*~*~*~*~*~
कुणाल आणि गंगाधर आता नवीन कागदपत्रे घेऊन बसले होते. तिथे आता एक नवीन पाहुणा देखील होता.
"कुणाल मी ओळख करून देतो. याचे नाव आहे बुसुली. हा बर्यापैकी मराठी बोलू शकतो. हा आपल्याला हे कागदपत्रे पुरवणार्या सरदाराचा कोणी दूरचा नातलग आहे. त्याची सध्या राहायची सोय माझ्याकडे आहे."
बुसुली अचानक मध्ये पडत म्हणाला " ऐका. तुम्ही युरुगुच्या कहाण्यांचा जो काही अभ्यास करायचा आहे तो करा. पण मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. आणि जास्त खोलात शिरू नका. युरुगुच्या कहाण्या निव्वळ दंतकथा नाही आहेत. तो आमच्या जमातीचा रक्तरंजित इतिहास आहे."
डॉ. नाडकर्णींनी मान डोलावली. कुणाल घसा खाकरत म्हणाला
"मला कल्पना आहे. या जुन्या बाडातली कथा वाचल्यावर कळत आहेच. अर्थात सर मला यातून काही सुसंगत अर्थ काढता आला नाही. म्हणजे म्हटलं तर हा इतिहास आहे, म्हटलं तर कहाणी."
"असो, तू ऐकव काय शोधले आहेस तू. अरे बुसुली......."
"मी मोदिबोला भेटायला चाललो आहे. माझे काम कदाचित झाले असेल." असे म्हणून बुसुली निघूनही गेला.
"जाऊ दे त्याला. तो काही लहान बाळ नाही. तसेही त्याच्या सरदाराने सांगितले होतेच याच्या नादी लागू नका. तू बोल."
"सर. या कागदपत्रांनुसार अनेक वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या डोगोन जमातीच्या एका विशिष्ट राजाला ते अम्माचा अवतार मानत होते. त्याला देखील अम्मा प्रमाणे ३ मुले झाली. एक मुलगा पहिल्या बायकोपासून आणि जुळे मुलगी-मुलगा दुसरीपासून. बाकी यांची स्वभाव वैशिष्ट्ये अगदी ओगो, यासिगी व युरुगुशी जुळतात."
"इंटरेस्टिंग. मग या अम्माने पण युरुगुला हाकलले का?"
"हो. हा खूपच लहरी होता. त्याच्या लहरी स्वभावावर वेळीच उपाय म्हणून राजाने त्याला कबिल्याबाहेर हाकलले. पण तो गप्प नाही बसला. त्याने जंगलात जाऊन नवीन अनुयायी मिळवले. तुम्ही त्या दिवशी पाहिलेले लोक त्याचेच वंशज असावेत. कारण तो युरुगुचा उपासक बनला. त्यामुळे कोल्ह्याची कातडी त्याच्या पेहरावात होती."
"पण मग पुढे काय झाले? राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले?"
"निदान सुरुवातीला तरी. पण इथे राजा चुकला. या नवीन कबिल्याचे काही वेगळेच इरादे होते. त्यांनी एक कठीण तंत्रसाधना केली असे सांगतात. त्याने म्हणे युरुगु सशरीर पृथ्वीवर अवतरला. त्या शक्तीला या मुलाने बंदिस्त केले. त्याचा प्रसाद म्हणून त्याला एक पुस्तक मिळाले. युरुगुचे पुस्तक! त्या पुस्तकात युरुगुची शक्ति आहे असे ही कागदपत्रे सांगतात. पण तो ती शक्ती एका मुलीशिवाय सिद्ध करू शकत नव्हता."
"म्हणजे?"
"होय. त्याने आपल्या बहिणीला पळवून न्यायचा प्रयत्न केला. पण त्याच्या सावत्र भावाने त्याला गाठले आणि त्याला हरवून त्याचा वध केला. पण ते पुस्तक मात्र कायमचे हरवले."
"ते पुस्तक, येस ते पुस्तक या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. कुणाल, जर ते पुस्तक आपल्याला मिळाले तर ही फक्त कथा न राहता खरा इतिहास असू शकतो. बाकीची कागदपत्रे लवकरात लवकर अभ्यास. माय गट फीलिंग सेज वी आर ऑनटू समथिंग बिग!"
~*~*~*~*~*~
त्या आलिशान खोलीत अनेक सुंदर मुली होत्या पण त्या फक्त एकाच व्यक्तीच्या सेवेसाठी होत्या. २ शिष्योत्तम आनंद व साधना स्वामींसमोर उभे होते. निश्चितानंदच्या चेहर्यावर तेच मंद हास्य विलसत होते. पण आता डोळे खोल गेले होते. त्या डोळ्यांवर नशा स्पष्ट दिसत होती. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले; आज नक्की चरस!
"आजचा सत्संग व यज्ञ कसा पार पडला?"
"उत्तम व यथोचित स्वामी. प्रतिसाद अपेक्षेपेक्षाही चांगला आहे. अर्थातच ही सर्व स्वामींवर असलेल्या भक्तीचे फळ आहे. जोवर असे भक्त आहेत तोवर स्वामी जे करतील त्याला असाच प्रतिसाद मिळत राहिल."
शेजारी बसलेल्या मुलीच्या गालावर हात फिरवून तिला फक्त थांबण्याचा इशारा करून इतरांना निश्चितानंदांनी जाण्याचा इशारा केला. ती तयार होण्यासाठी आतल्या कक्षात गेली.
"तुला माहित आहे आनंद, साधना आम्ही हे का करत आहोत?"
"नाही स्वामी." दोघेही एकत्रच म्हणाले.
"बाबा निश्चितानंद स्वामी. मी कधी हे नाव घेतले आता मलाच आठवत नाही. पण आता मी जे काही बोलेन ते ऐकून घेणारा मोठा समुदाय आहे. तुम्ही म्हणता तशी त्यांची माझ्यावर, तुमच्यावर, या आणि देशभरातल्या आपल्या आश्रमांवर व आश्रमातर्फे होणार्या चांगल्या कामांवर श्रद्धा आहे. पण स्वामीजी जेव्हा प्रवचन देत नसतात तेव्हा ते काय करत असतात हे जर बाहेर आले तर काय होईल? स्वामीजी जवळ असलेल्या जमिनींचा एक हिस्सा बिल्डर्सना गुपचूप विकतात व पैसा फेकून या सर्वाचा आवाज बंद करतात हे जेव्हा भक्तांना कळेल तेव्हा काय होईल? माझ्या या रात्रीच्या लीला ज्या अगदी विश्वासु शिष्य वगळता कोणाला ठाऊक नाहीत त्या जर बाहेर आल्या तर काय होईल?"
दोघे मान खाली घालून उभे राहिले. दोघांनाही या प्रश्नाचे उत्तर माहित होते. पण ते द्यायची जरूर नव्हती.
"अर्थातच आम्हास त्यामुळे हा मुखवटा जपावा लागतो. सब निश्चित है, मग आमचा हा मुखवटा निश्चित का नाही? का असे घाबरून जगावे लागते? कारण आमचे भक्त एका मानवास पुजतात. त्यांनी आम्हाला कदाचित देवासारखे मानले असेलही. पण संपूर्ण आंधळी भक्ती फक्त देवाचीच होऊ शकते. आणि देव बनण्याची हीच संधी आहे. तसा कोल्हा मिळाला?"
"अजून नाही स्वामी." आनंदने उत्तर दिले.
"मग लवकरात लवकर मिळवा. तोवर यज्ञ लांबवायची जबाबदारी तुझी."
साधनाने मान हलवून होकार दिला.
"बस एकदा संपूर्ण मुंबईला घाबरून सोडलेल्या या काल्पनिक कोल्ह्याला मूर्त स्वरुप देऊन त्याचा वध केला कि आम्ही अवतारी पुरुष आहोत यावर शिक्कामोर्तब होईल. आणि मग या सर्वांच्या मनावर आमचीच अधिसत्ता राहिल. हे ध्यानात ठेवा. आता आम्हाला विश्राम करू द्या."
दोघेही पावलांचा आवाज न करता विश्राम कक्षातून बाहेर पडले. पण त्या दोघांना वा विश्राम करणार्या निश्चितानंदांना एक गोष्ट माहित नव्हती..................
तो कोल्हा काल्पनिक नव्हता.
क्रमशः
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/54141
मी पहिली मस्त चाललीये कथा.
मी पहिली
मस्त चाललीये कथा. पुढ्च्या भागाच्या प्रति़क्षेत.
भारी सुरुय
भारी सुरुय
उत्कंठा वाढत चाललीये..
उत्कंठा वाढत चाललीये.. मस्त...
मस्त
मस्त
यावेळची जरा कमी गुंतागुंतीची
यावेळची जरा कमी गुंतागुंतीची होती..मागच्या भागाइतकी मजा नाही आली रे पायस!
प्रथम #python syntax import
प्रथम
#python syntax
import comment
comment.thanks_as_always()
#slice of geek life
मागच्या भागाइतकी मजा नाही आली रे पायस! >> अगदी शक्य आहे. हा भाग अचानक पात्र परिचय सारखा येतो आणि सगळ्या अॅक्शन मध्ये वेगळा पडतो. पण हे आवश्यक आहे नाहीतर मग नंतर सगळे सोडवताना गडबडगुंडा होईल. या निमित्ताने एक विचारून घेतो, या कथेला अजून किती गुंतागुंतीची करायची आहे? हिचा प्लॉट खूप ओपन आहे आणि मी अजून स्केल वाढवून गुंतागुंत वाढवू शकतो पण मग तितकी कथा लांबत जाईल. केवळ एक अंत आणि तो वेळेत व्हावा म्हणून आता गुंत्याचे प्रमाण कमी करणार होतो पण अजून गुंता वाढवायचा असेल तर तसे सांगा.
छान चाललिये. पण प्लिज अजून
छान चाललिये. पण प्लिज अजून गुंतागुंत नको.
थोडी अजून गुंतागुंत चालेल,
थोडी अजून गुंतागुंत चालेल, त्याने उत्कंठा वाढते.
फक्त वेळच्या वेळी भाग टाक म्हणजे झालं!
केवळ एक अंत आणि तो वेळेत
केवळ एक अंत आणि तो वेळेत व्हावा म्हणून आता गुंत्याचे प्रमाण कमी करणार होतो >>>>>> हे असं आता कर..
अन ते पुर्ण झालं की स्केल वाढवून गुंतागुंत वाढव अन कथा लांबव..
हा का ना का
मस्त
मस्त
छान!
छान!
ओह्ह.. हाही वाचुन झालाय
ओह्ह.. हाही वाचुन झालाय पायस.
आता यापुढचा भाग कधी?
रायटर्स ब्लॉक एक लिंक कशी
रायटर्स ब्लॉक एक लिंक कशी जुळवावी सुचत नाहीये. तोवर वाट पहावी लागेल, क्षमस्व.
पायस...आजच सगळे भाग
पायस...आजच सगळे भाग वाचले.....मस्त कथा.
मस्त.. मज्जा आली वाचताना ..
मस्त..
मज्जा आली वाचताना ..
पायस, हा भाग सार्वजनिक करायचा
पायस, हा भाग सार्वजनिक करायचा राहिलाय तेवढा कराल का प्लीज?
काय रे मित्रा? लिही की
काय रे मित्रा? लिही की पुढे!!!
रायटर्स ब्लॉक आणि तुंबलेली
रायटर्स ब्लॉक आणि तुंबलेली कामे यामुळे पुढचा भाग जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल. तोवर धीर धरा.
जूनच्या पहिल्या
जूनच्या पहिल्या आठवड्यात???
मेलोच म्हणजे आम्ही सगळे, वाट बघून बघून!
भानुप्रिया +१
भानुप्रिया +१