स्वीट दही ( स्वीट कर्ड )

Submitted by मनीमोहोर on 10 May, 2015 - 12:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उन्हाळ्यात जेवण झालं की बाहेर एक चक्कर मारताना पाय आपोआपच ऑफिस च्या जवळ असलेल्या मेहेर या अगदी छोट्याशा कोल्ड्रिंक हाऊस कडे वळतात, जिथे लंच टाईम मध्ये अनेक जण लस्सी, ताक आणि हे वर लिहीलेलं स्वीट दही खात असतात. काचेच्या छोट्या ग्लासात विरजलेलं, बेताच गोड, थंड, घट्ट, पांढर शुभ्र दही उन्हाळ्यात खाताना जणुं स्वर्गीय सुखाचा आनंद्च मिळत असतो प्रत्येकाला. ह्या दह्यापासून प्रेरणा घेऊन मी तसं दही घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला म्हणून इथे लिहीत आहे. कृती तशी अगदी सोपी आहे
साहित्य
१/२ लिटर होल मिल्क (मी गोकुळ घेतले )
चार मोठे चमचे साखर
दोन छोटे चमचे डेअरी व्हाईट मिल्क पावडर
विरजणासाठी दही
थोडे बदाम पिस्त्याचे काप आणि दुधात भिजवलेलं केशर (ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

प्रथम दूध उकळून घ्यावे . त्यात साखर घालावी. दुधाचं पातेलं पाण्यात ठेऊन आणि येता जाता ढवळत राहुन ते विरजणाला योग्य अशा तपमानाला आलं की त्यात दूध पावडर मिक्स करावी आणि नॉर्मल आंबट अर्धा चमचा दही त्यात नीट मिसळावे. आता हे दूध आपल्याला आवडत असेल त्या आकाराच्या ग्लास मध्ये ओतावे. एका परातीत पाणी घालुन त्यात हे ग्लास सेट होण्यासाठी ठेऊन द्यावेत. मी सकाळी अकराला विरजण लावल आणि संध्याकाळी चारला दही सेट झालं . खाण्या आथी हे दही कमीत कमी चार पाच तास फ्रीज मध्ये ठेवावे . आपल्याला आवडत असेल त्या ड्राय फ्रूट ने सजवावे. काही न करता पांढर शुभ्र ही छान दिसतं

हा फोटो

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एकेक ग्लास ( छोटा)
अधिक टिपा: 

श्रीखंडाच्या आणि ह्याच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक आहे.
श्रीखंडा प्रमाणे हे पोटाला जड होत नाही.
होल मिल्कच वापरावे.
अर्ध्या लिटर दुधाचे सहा ग्लास ( शॉर्ट ग्लास) तयार झाले.
साखर व्यवस्थित घालावी कारण दही थोड तरी आंबट असतच आणि गार झाल्यावर पदार्थाची गोडी कमी होते थोडी.
डेअरी व्हाईट मुळे दही मस्त घट्ट होतं त्यामुळे ती घालणंआवश्यक आहे.
कमीत कमी चार पाच तास फ्रीज मध्ये ठेवावे म्हणजे अधिक घट्ट होते अणि थंडगारच खावे.
हे एक उत्तम प्रकारचे डेझर्ट होईल.
सजावटी साठी पुदिन्याचे पान ही छान दिसेल.
ड्राय फ्रुट जास्त घालु नयेत . एकसुरी पांढरा रंग मोडण्या पुरतीच घालावीत.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी व फोटो.
हे नक्की करणार. आमच्या इथे अजून उन्हाळा सुरु व्हायचाय पण स्प्रिंग-समरमध्ये करण्यासाठी रेसिपी सेव्ह करुन ठेवते आहे.

मी हे आज विरजण लावून सेट करत ठेवलंय. उद्याला तयार व्हावं. विरजण लावतानाच दुधात केशर घातलंय म्हणजे मस्त पिवळा रंग येईल दह्याला.

रोजचे गोडाचे क्रेविंग शमवण्यासाठी हे बेताचे गोड दही चांगला पर्याय आहे.
हे काल बनवलेले.
IMG_1576.JPG

Pages