पूर्वसूत्र विस्तृतपणे येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53754
कहाणीचा आत्तापर्यंतचा आढावा
- मुंबईत गुंड, भिकारी व टोळ्यांशी संबंधित लोक मेलेले अथवा वेड लागलेल्या अवस्थेत आढळत आहेत. यामुळे टोळीयुद्धास पोषक परिस्थिती आहे. या सर्व प्रकाराचा तपास करण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर महेश जाधव यांच्यावर आहे. पण त्यांना अनिरुद्ध या तरुणाच्या गूढ रीतिने झालेल्या मृत्युमध्ये रस आहे जिचा तपास आता इन्स्पेक्टर शिंदे करीत आहेत. प्रज्ञा ही तरुणी, अनिरुद्धच्या बहिणीची मैत्रिण, जाधवांच्या वतीने खाजगीरीत्या तपास करत आहे, जे तिलाही विचित्र वाटत आहे. रसूलभाईचा शिंद्याना संशय आहे तर रसूल आणि त्याचा अव्वल जुगारी दोस्त किलर यांना जॉनी नावाच्या गूढ जुगार्यात रस आहे. अर्थात मुंबईकरांना मात्र सध्या दोन बातम्यांनी घेरलेले आहे - १) वारंवार होणारे रहस्यमय असे करड्या रंगाच्या कोल्ह्याचे दर्शन, २) डॉ. सायरस दावर यांच्या यशस्वी सर्जरीज आणि त्याबद्दल त्यांना मिळत असलेले सन्मान. प्रज्ञाचा मित्र असलेला आलोक सायरस यांच्याबरोबर काम करतो आहे. याखेरीज आफ्रिकेतून बुसुली, नोम्मो आणि ला ही तीन माणसे मुंबईत आली आहेत आणि तिघांचेही लक्ष्य आहे युरुगुचे पुस्तक - एक रहस्यमय शक्ती जिचे स्वतःचे काही अंतस्थ हेतु आहेत. पण या सर्वात एक अजून व्यक्ती आहे जिचे अस्तित्त्व अजून कोणाला लक्षात आलेले नाही व याचा फायदा घेत तो आपली भूक भागवत मोकाट सुटलेला आहे.
आता पुढे ->
महेश घटनास्थळी येऊन पोचले होते. त्यांना सध्या अशा केसेसची प्राथमिक पाहणी करण्याचा अधिकार होता, कारण नेमके असेच मृत्यु व्हायचे प्रमाण वाढले होते. नाव, पत्ता इ. बाबी पंचनाम्यामध्ये नोंदवल्या जात होत्या पण त्यांच्यासाठी त्या गौण होत्या. जे कोण यामागे होते त्यांनी अमुक एकच गँग किंवा अमुक एकच एरिया असा काही भेदभाव केल्याचे ऐकिवात नव्हते. तो एक जुगारी होता हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.
साब चाय..... चहाचा आस्वाद घेत विचारचक्र चालू होते. यावेळेस गुन्हेगार अनेक चुका करून गेला होता.
प्रथमच प्रेत खून झाल्याच्या इतक्या लवकर - जेमतेम २-३ तासात - सापडले होते. जवळच धारावीची झोपडपट्टी होती. पोलिसी धाक दाखवताच आजूबाजूच्या लोकांकडून बरीच माहिती मिळाली होती. आधीच्या प्रकरणांमध्ये सरळ प्रेतच सापडे. तसेच खूनी आणि मयत दोघे पळताना एकाने बघितले होते.
वर हा गॅम्बल मॅन, गॅम्बल मॅन ओरडत रात्रीचा फिरत असल्याची माहिती मिळाली होती. गॅम्बल मॅन काय मुद्दा आहे? घरच्यांशी भेट घेऊन विचारले पाहिजे, पण ज्या बारमध्ये हा बसला होता त्याच्या मालकाला आपण ओळखीसाठी बोलवला. त्याच्या मते याच्या डोक्यात असला काहीच लोचा नव्हता, मग काय भानगड आहे?
खून्याचे ढोबळ वर्णन देखील यावेळेस मिळाले होते. एकजण मयतामागे धावत होता. साधारण सहा फूट उंच, बांधा सुडौल - ना लुकडा ना जाड - कपड्यांवरून चांगल्या परिस्थितीतील कोणीतरी असा हा खूनी.
पण सर्वात मोठी चूक होती कि खुन्याच्या हातून कोणीतरी जिवंत निसटला आहे. कारण हा गॅम्बल मॅन कोणाला तरी खांद्यावर टाकून पळत होता. या जिवंत निसटलेल्या व्यक्तिला शोधायला हवे.
"साहेब" त्यांची तंद्री भंगली. "साहेब याला बघा काय आठवलंय"
"काय रे? अजून काही बघितलं होतं का या पळापळी शिवाय?"
"साहेब येक सांगायच राहूनच गेलं बगा. ही गडबड सगळी चालू होती आन ते पुढे पळाले तशी माझी नजर शेजारच्या गल्लीत सहज गेली. कोणीतरी होतं तिथं. पता नही कौन पर कोई तो था. काळा सावळा होता रंगाने, उंचीला फार नसेल, पाच - सव्वापाच फूट. पण तो यांच्याकडेच लक्ष ठेवून पळत असल्याचे वाटले. शायद मेरा वहम भी हो सकता है पर आपको बताना जरुरी समझा."
हं, हातानेच त्याला जाण्याची खूण करून महेश विचारात गढला. आता हा तिसरा कोण?
~*~*~*~*~*~
"ये कुणाल ये" कुणालचे स्वागत करत डॉ. गंगाधरांनी त्याचे स्वागत केले.
"ही कोण?" प्रज्ञाकडे बघत त्यांनी साहजिक प्रश्न केला.
"नमस्कार सर. मी प्रज्ञा, कुणालची मैत्रिण. याची गाडी रस्त्यात बिघडली मग याला ड्रॉप करायला आले. माझं या एरियात जरा काम होतं सो म्हटलं कुणालला ड्रॉप करून मग पुढे जाऊया. पण तहान लागली सो ......."
"हो या जग मध्ये पाणी आहे."
पाणी पिऊन प्रज्ञा त्या दोघांना एकटे सोडून गेली. तिला इन्स्पेक्टर महेश जाधवांना पहिला रिपोर्ट द्यायचा होता.
आता दोघे निवांत बोलू लागले.
"सर तुम्ही पाठवलेली कागदपत्रे वाचली मी. सांगितल्या प्रमाणे भाषांतर करण्याचा प्रयत्न केलाय. एकदा तपासून बघायचं?"
"येस ऑफकोर्स!"
गंगाधर नाडकर्णी हे नामांकित इतिहास संशोधक होते. डोगोन जमातीच्या इतिहासात त्यांना रस होता पण आलेल्या भयानक अनुभवानंतर त्यांनी इतर जमातींकडे मोर्चा वळवला होता.
"पहिल्या परिच्छेदाचा अनुवाद तर बरोबर जमलेला दिसतोय."
"कथा माहित असल्याचा देखील फायदा झाला सर, अम्माने जग कसे निर्माण केले याविषयी त्यांची ती कथा. पण खरे सांगू सर ती कथा ........"
"येस, ती कथा?"
"किळसवाणी आहे सर. आय मीन असे कोण जग निर्माण करते. अम्मा पहिल्यांदा पृथ्वी ओकतो मग समुद्र ओकतो मग झाडे अॅन्ड सो ऑन. ओकतो?? आय स्टिल कॅन नॉट गेट यूज्ड टू धिस!"
डॉक्टरांनी डोळे मिटून घेतले. त्यांना आताशा त्या दिवशी पाहिलेल्या सोहळ्याचा अर्थ लागू लागला होता.
त्या तरुणीला अम्मा बनवले होते. तिचे कपडे म्हणूनच पुरुषी होते. मग तिला माती ओकायला लावली. माती पृथ्वीचे प्रतिक. पाणी ओकायला लावले. पाणी समुद्रांचे प्रतिक. त्यांनी हे विचार कुणालला बोलून दाखवले.
"पण मग ते सूप कसले होते?"
"तो कबिला नरभक्षी होता. ते मानव मांसयुक्त सूप असले पाहिजे. कारण अम्मा सर्वात शेवटी माणूस ओकतो आय मीन निर्माण करतो. इथपर्यंत मी लावलेला अर्थ आहे. आता तुला भाषांतर बर्यापैकी जमतंय. खरी गंमत पुढे आहे.
कथा इथेच संपत नाही. अम्मा मानवा आधी अनेक देव जन्माला घालतो, त्याच पद्धतीने. त्यातील तीन देवांना ते अम्माची मुले म्हणून विशेष मान देतात. त्यांची नावे ओगो, यासिगी आणि युरुगु. बाकी सर्व देवांना नोम्मो म्हणतात व ते कमी महत्त्वाचे देव. यातील यासिगी अम्माची सर्वात लाडकी व एकमेव मुलगी. यासिगी व युरुगु जुळे असले तरी स्वभावाने एकदम उलट. युरुगु मुळातच अराजकाचा देव मानला जातो. युरुगुची इच्छा होती कि कोणतीही गोष्ट ही ठरवून नाही घडली पाहिजे. एव्हरीथिंग शुड बी रँडम! त्यावर कोणाचेही नियंत्रण नको अगदी अम्माचे देखील नाही. अर्थातच ही गोष्ट अम्माला सहन होणे शक्य नव्हते. त्यामुळे कथेनुसार अम्मा त्याला दूर पृथ्वीबाहेर एका विशिष्ट लोकात हाकलून देतो. त्यांच्यात पाताळ लोकाला समानार्थी लोक आहे असे समज."
"दंतकथा म्हणून रंजक आहे पण यात आपल्या कामाचे काय आहे?"
"तुला सांगितले होते ना? नंतर आलेल्या लोकांनी करड्या रंगाच्या कोल्ह्याची कातडी परिधान केली होती. युरुगुचे प्रतिक करड्या रंगाचा कोल्हा मानतात. गोंधळाची गोष्ट अशी आहे कि असे कोल्हे माली देशात अस्तित्त्वातच नाहीत मुळी."
कुणाल स्तब्ध होऊन गंगाधररावांकडे बघतच राहिला. त्याला काय बोलावे ते कळेना.
"मी या घटनेला असेच सोडून दिले नाही. हा कोणता तरी खास कबिला आहे. त्या कबिल्याच्या वाट्याला इतर डोगोन जात नाहीत. त्यांचे राहण्याचे नीट ठिकाणही कोणास फारसे ठाऊक नाही. पूर्वी ते माहित होते पण एक मिशनरी तिथे मारला गेल्यापासून त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटल्या सारखा झाला आहे. खूप प्रयत्न करून मी या सर्वांची माहिती काढली, कागदपत्रे जमा केली. त्यांच्या भाषांतरास, अभ्यासास सुरुवातही केली. पण तेवढ्यात माझी ग्रँट रद्द व्हायची पाळी आली. मी काही खूप अत्युच्च मूल्ये असलेला संशोधक नाही. त्यामुळे मी ती रद्द होऊ नये म्हणून माझा मोर्चा डोगोन जमातीच्या इतर पैलूंकडे वळवला आणि वेळ मारून नेली. पण हा अभ्यास मागे पडला तो पडलाच.
पण आता तुझ्यावर ती वेळ येणार नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे कि तू किमान या कागदपत्रांचे भाषांतर करावेस. एवढे जरी केले तरी तुला थीसिस लिहायला पुष्कळ गोष्टी सापडतील अशी माझी खात्री आहे."
कुणालने हे काम स्वीकारले. युरुगु काय विचित्र नाव आहे, प्रज्ञाला पिकअप साठी फोन लावता लावता कुणाल स्वतःशीच पुटपुटला.
~*~*~*~*~*~
प्रज्ञा व महेश कॉफी पीत होते. प्रज्ञाकडे जे काही सांगण्यासारखे होते ते ती सांगत होती.
"इन्स्पेक्टर शिंदे अगदीच काही वाईट गृहस्थ नाही वाटले मला. अर्थात तुम्ही म्हटलात तसे ते फार काही वेगळं डोक लावतील असे मला मुळीच वाटत नाही. त्यांची अशी ठाम समजूत झालेली आहे कि अनिदादाने कोणत्यातरी गँगचा नको तो व्यवहार पाहिला आणि तो मारला गेला."
"आणि तुला ती चुकीची का वाटते?"
"अनेक कारणे आहेत. तुम्हाला ती वेगळ्याने सांगायची खरेच गरज भासते का?"
"हो. कारण तू व्यवस्थित तपास करत आहेस हे मला कसे समजणार?"
"ओके. पहिल्यांदा तर असे समजून चालूया कि अनिदादा खरेच काही कारणासाठी आडबाजूला भटकला आणि त्याने ते काहीतरी पाहिले जे त्याने पाहायला नको होते व म्हणून त्याचा खून करण्यात आला. मग त्याचे प्रेत इतक्या निष्काळजीपणे किल्ल्यातच का टाकून दिले? जर ती गँग असती तर त्यांनी एक तर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली असती. आता किल्ल्यातला त्यांचा हाईडआऊट कॉम्प्रमाईज झाला ना?"
"कशावरून खून किल्ल्यात झाला? जर खून कुठे दुसरीकडे केला असला तर?"
"मग बॉडी किल्ल्यात का हलविली? समुद्रात फेकून देता आली असती किंवा अजून काही. तसेच दादाचे वॉलेट वगैरे अजिबात धक्का न लावता जसेच्या तसे होते. असे का? पोलिसांना लगेच मयताची ओळख पटावी म्हणून का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मर्डर वेपन. इतके विचित्र वेपन एखादी गॅंग का वापरेल? त्यांना कोणीतरी बघितलंय. दे आर किलिंग इन अ स्टेट ऑफ पॅनिक. इट इज नॉट अ प्रीप्लॅन्ड मर्डर विद धिस अजम्प्शन. ते सरळ गोळी नाही घालणार का?"
नॉट बॅड, हे मनातच. "मग शिंदे काय करत आहेत आणि तू काय केलंस?"
"या स्टोरीचा एक फायदा आहे कि निदान शिंद्यांना एक तपासाची दिशा आहे. माझ्या प्राण्याच्या हल्ल्याच्या थिअरीला सपोर्ट करायला एकच वाव होता कि फॉरेन्सिक काहीतरी शोधेल. पण बोथट नखं असलेला प्राणी मी पाहिला नाही. शिंद्यांचा संशय कोणा रसूलवर आहे. त्या गँगच्या अॅक्टिव्हिटीज वर त्यांची सध्या कसून नजर आहे."
"शिंदे इतका अॅक्टिव झाला? विश्वास बसत नाही."
"अजून पुढे ऐका. अनिदादाची अॅक्टिवा! एका बाबतीत शिंद्यांचे आणि आपले एकमत आहे कि ती अॅक्टिवा बहुधा कोण्या दुसर्याने चोरून चोरबाजारात विकली असावी. कारण जर खूनी रसूलप्रमाणे कोणी अनुभवी गुंड असेल तर तो इतक्या सहज रीतिने ट्रॅक होईल असे पुरावे सोडणार नाही. त्याने खूनाची नक्की जागा पण कळेल असा त्यांचा कयास आहे. त्यांनी काही पॉसिबल संशयित निवडले आहे. हा त्या यादीचा फोटो. मी तुम्हाला हा मेल करून ठेवला आहे."
"ओके थँक्स. मी याचे काय करता येतंय ते बघतो आणि याचा रिझल्ट तुला कळवतो म्हणजे तू तपास पुढे नेऊ शकशील. पण तू हे सगळं जमवलं कसं? म्हणजे हा फोटो वगैरे?"
प्रज्ञा हसली. तिने डोक्याला बोट लावत उत्तर दिले
"ग्रे सेल्स. आय सिंपली युज्ड माय लिटल ग्रे सेल्स टू कन्व्हिन्स समवन टू शो मी व्हॉट ही हॅज फाऊंड."
"हाहा. गुड वन लेडी पॉयरो."
~*~*~*~*~*~
डॉक्टर सायरस आपले लेक्चर संपवून बाहेर पडले. अजूनही ते जमेल तसे शिक्षक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करीत. व्हिजिटिंग लेक्चर म्हणून त्यांचा मान मोठा होता. अनेकदा त्यांना बाहेरच्या देशांत सेमिनारची आमंत्रणे येत. आजचे लेक्चरही नेहमीसारखेच छान झाले होते. आता त्यांच्या टीमबरोबर एखादे लाईट स्नॅक घ्यायचा प्लॅन होता.
"लोमडी का आतंक जारी"
"क्या हो रहा है आखिर मुंबई शहर मे? क्या है इस रहस्यमय लोमडी का राज? क्या शहर मे मौतो कि बढोतरी के पीछे भी है इसी लोमडी का हात?"
"लोमडी शैतान का अवतार - बाबा निश्चितानंद स्वामी.
बाबा खुद करेंगे विशेष अनुष्ठान. हफ्तेभर के अनुष्ठान के बाद होगा लोमडी का सफाया."
"खास शिकारी बोलावून या कोल्ह्याचा नायनाट करण्याची महापौरांना विनंती."
ओफ्फो, रेश्माने वैतागून बर्गर खाली ठेवला आणि कपाळाला हात लावला. मॅकडोनाल्ड्स मध्ये येऊन सुद्धा जर बातम्याच, त्याही त्या कोल्ह्याच्या, बघायला लागणार असतील तर कोण नाही वैतागणार?
"काय उत आणलाय त्या कोल्ह्याने. कसला कोल्हा? काही लोकांना भास झाला म्हणजे लगेच मुंबईत एक नरभक्षी जनावर फिरतंय जणू. मीडियावाले आजकाल कोणती न्यूज देतील काही भरोसा नाही राहिला."
"करेक्ट रश्मी" अल्बर्टने री ओढली. " आणि हा बाबा कुठून आला? अनुष्ठानाने कोल्हा पळतो का कधी? हा त्या शिकारी बोलावण्याने मात्र फरक पडेल."
"अरे कसला शिकारी? मुळात कोल्हा पाहिजे ना? गच्च भरलेल्या मुंबईत तो कोल्हा लपून राहिल का? आपल्यासारखे व्हाईट कॉलर कदाचित बघणार नाहीत पण फूटपाथवरची जनता गप्प बसेल का? मुलाखतींमध्ये नुसताच दिसला वगैरे सांगतात. पण मग हा लपतो कुठे ते का नाही सांगत?"
"मला वाटते यात काहीतरी सायकोलॉजीकल भाग असेल." शक्यतो गप्प राहणारा आलोक बोलला.
"म्हणजे एखादा मोठा कुत्रा, जो असणे अगदी सहज शक्य आहे, कोणाला तरी दिसला असेल. आता करड्या फरचा कुत्रा असणे काही अशक्य नाही, तसेच नजर दोष पण असू शकतो. त्याला पहिल्यांदा रिपोर्ट करणारा कोल्हा समजला असणार. आता तो कुत्रा रस्त्यावरचा भटक्या कुत्रा; नाही सापडला चटकन मग जोवर तो पकडला नाही जात तोवर असाच लोकांना मधून मधून दिसणार. ज्यांचा कोल्ह्यावर विश्वास बसला ते त्याला कोल्हाच समजणार आणि त्याच्यापासून लांब पळणार, युज्युअल मेंटॅलिटी. ज्यांचा विश्वास नाही बसला ते निरखून पाहतील, कुत्राच आहे असे म्हणून सोडून देतील. सगळं त्यांच्या सायकोलॉजी वर अवलंबून आहे."
"नाईस पॉईंट आलोक. व्हॉट अबाऊट यू डॉक?"
सायरसनी एकदा घसा खाकरला आणि मग ते म्हणाले, "आलोक म्हणतोय त्यात तथ्य आहे. मानवी मन या पद्धतीने विचार करणारच नाही असे नक्की म्हणता येत नाही. आणि दंतकथा पसरते तसेच हा कोल्हा पसरत आहे. कोणाला तो दुमजली बंगलीएवढा मोठा दिसतो, कोणाला तो भिंतीतून आरपार जाताना दिसतो. इन शॉर्ट मेकिंग इट मोअर अॅन्ड मोअर अनरिअल, सुपरनॅचरल!"
"म्हणजे डॉक यू बिलीव इन आलोक्स थिअरी? - अल्बर्ट
"देअर इज नो रिजन नॉट टू. इट इज क्वाईट लॉजिकल अॅन्ड पॉसिबल. मुंबई इज गेटिंग इट्स व्हेरी ओन अर्बन लेजंड!! पण..........
"पण काय डॉक......"
सायरस काही क्षण थांबले. मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाले
"पण ही थिअरी सध्या बेवारस प्रेतांच्या वाढलेल्या प्रमाणाचे काहीच स्पष्टीकरण देत नाही."
सगळेच यावर विचारमग्न झाले. पण लवकरच रेश्मा फ्रेंच फ्राईज तोंडात टाकता टाकता म्हणाली.
"चक इट एव्हरीबडी. दॅट्स हाऊ अर्बन लेजंड्स आर!! इन एनी केस बर्गर टेस्टी आहेत. त्यांच्यावर लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे."
~*~*~*~*~*~
ला नोम्मो समोर सोफ्यावर बसली होती. ते ज्या घरात आत्ता होते त्या घराचा मालक कसल्याशा ट्रीपवर गेला होता. त्याचा फायदा उठवून त्यांनी इथे बस्तान बसवले होते. मुंबईत आल्यापासून अशाच बंद पडलेल्या घरांमध्ये ते वास्तव्य करत होते. आत्ता ला प्रचंड चिडलेली होती.
"नोम्मो" तिच्या चेहर्यात मार्दव होते पण त्या नाजूक आवाजाला लक्ष देऊन ऐकले तर कळणारी थंड किनार होती.
"नोम्मो. तू नोम्मो असला तरी तू अम्मा वाला नोम्मो नाही. हो कि नै?"
"हो ला."
"तुझे हे पिळदार शरीर, उफ तुझी ताकद मी हिच्यावरच फिदा झाले" त्याच्या खांद्यावर आपला पाय ठेवत ती म्हणाली.
"होय ला." नोम्मो तिच्या चेहर्याकडे पाहत वेड्यासारखा हो हो करत होता.
"पण तुला काडीची अक्कल नाही." त्याला लाथेने दूर ढकलत ती उद्गारली.
ला च्या टोकदार नाकाचा शेंडा लाल झाला होता. ला आता उभी राहिली होती. उंचीने ती नोम्मो इतकीच होती पण बांध्याने अगदी सडपातळ, झीरो फिगर म्हणतात त्यातली. तिचा वर्ण मात्र पुष्कळच उजळ होता. पण सर्वात लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तिचे डोळे. खोल गेलेले तिचे मोठे डोळे वटारल्यावर अधिकच भयानक दिसत वर बाहुलीचा हिरवा रंग यात अजून भर घाली.
"कोणी सांगितलं होतं बाहेर जाऊन शेण खायला? निदान मला सांगायचं तरी."
"अगं पण माझं ऐकून तर घे........"
"काय ऐकून घेऊ? बुसुली इथे आलेला आहे. तो शिकारी कुत्र्याप्रमाणे आपल्याला शोधत असणार आहे. तो तसेही युरुगुला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे युरुगुला शोधण्यापेक्षाही पुस्तकाला जपणे महत्त्वाचे आहे."
"अग हो पण तुझी तब्येत बरी नव्हती आणि मला काय सापडलं ते तर ऐक......"
"ओह्ह. चल बोल एकदाचं......"
...................................................
...................................................
पुढची पाच मिनिटे नोम्मो तिला काहीतरी सांगत होता. तिच्या चेहर्यावरचा राग उडून गेला आणि ती एकाग्रतेने नोम्मोचे बोलणे ऐकत होती. त्याला मध्ये एखादा तपशील पुन्हा सांगायला लावण्यापुरतेच काय ती बोलली.
"........म्हणजे यामुळे मुंबईत अनेक एकदाच वापर होऊ शकेल अशी युरुगुची पुस्तके आली आहेत."
"म्हणजे मला तरी असे वाटते."
" हू. असे असेल तर खेळाची समीकरणे बदलत आहेत. बुसुली मूर्ख नाही तो हे काय चालू आहे हे शोधून काढेलच. त्याला त्यात वेळ लागेल ही आपल्या दृष्टीने जमेची बाजू. तोवरच आपल्याला काय ती हालचाल करावे लागेल. आणि तो माणूस कोण होता?"
"माहित नाही. त्याचा चेहरा मी कधीही विसरणार नाही. ते खुनशी भाव. ओह्ह अम्मा!!"
"जाऊ दे. आपलं काम होईल हे निश्चित. फक्त तू मी सांगते तसेच वागत राहा आधी सारखेच."
"मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का?"
दोघे जोरजोरात हसू लागले. ते हसू इतर कोणालाही भेसूर वाटले असते.
~*~*~*~*~*~
रिपोर्टर आज एका जरा अधिक ध्यान देऊन वेषांतर सजवत होता. खणातून त्याने लिपस्टिक काढून ओठांना लावली. समोर ठेवलेल्या अर्धपुतळ्यावरचा विग बाजूला ठेवला. असे अनेक अर्धपुतळे त्या खोलीत मांडलेले होते. त्या पुतळ्यावरचा सिंथेटिक कातडीच मुखवटा त्याने चेहर्यावर चढवला. तो कुरळ्या केसांचा विग डोक्यावर ठेवला आणि आरशात स्वतःला न्याहाळू लागला. कोणाच्या बापाला सांगता आले नसते कि तो स्त्री नसून पुरुष आहे.
गेटअप एकदा पुन्हा ठीकठाक करून तो बाहेर पडला. एका विशिष्ट बसस्टॉपपाशी तो उभा राहिला.
लवकरच त्याला हवा असलेला इसम तिथे आला. रिपोर्टरही एखाद्या कॉलगर्लप्रमाणेच त्याच्याबरोबर चालू लागला. पैशे देऊन इतर कोणी कॉलगर्ल त्या माणसाला भीक घालणार नाही हे त्याने निश्चित केले होते. गेल्या दोन दिवसांपासून तडफडत असलेला तो माणूस रसूलच्या गँगपैकी एकजण होता.
कुठल्याही प्रकारच्या संघटनेत काही माणसे अशी असतात जी अगदीच फालतु नसतात पण इतकी महत्त्वाचीही नसतात कि त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे. अशा माणसांना जवळपास नेहमीच संघटनेत काय चालू आहे आणि मागचे अंतस्थ हेतू याची किमान माहिती असतेच असते. त्यांना कधीच तपशील माहित नसतात पण त्यांची जी काही तुटपुंजी माहिती असते ती सहसा खोटी नसते. माहिती मिळवायला सुरुवात म्हणून या माणसांना टारगेट करणे सर्वोत्तम!!
रिपोर्टरने कॉलगर्ल्सचा आणि त्यांच्या गिर्हाईकांचा पुरेसा अभ्यास केला होता. त्याला या गिर्हाईकाला कह्यात घ्यायला वेळ नाही लागला. त्याच्या अंदाजाप्रमाणेच हा एकटा होता. शेजारच्या खोलीत असलेला त्याचा साथीदार दुसर्या मुलीबरोबर बिझी होता. हळू हळू त्याने आपल्याला हवे ते प्रश्नांची उत्तरे काढून घ्यायला सुरुवात केली.
"चिकणे, अॅक्टिवापे घुमाता पहले. तू तो सीधा व्हॅनमे डालके लेके आया."
"अॅक्टिवा? बाईक का जमाना है और अॅक्टिवा? साली xxx xx. वैसे अॅक्टिवा दिला सकता तुझे."
"वो कैसे भला?"
"अरे तेरे को क्या करने का है बाप?"
"बता भी दे. ऐसा क्या गहरा राज पूछा है?" त्याचा ग्लास भरत रिपोर्टरने आपले म्हणणे हळू हळू त्याच्या गळी उतरवायला सुरु केले. त्याने आधीच याच्या डोक्यात वाईल्ड आयडीया भरल्या होत्या. त्यामुळे त्याने स्वतःलाच पलंगाला बांधून घेतले होते. आता रिपोर्टरला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळायची तेवढी बाकी होती.
सब्र का फल मीठा होता है. हळू हळू तो बोलू लागला. चोरबाजारात गाड्या डिसेंबल करणारा त्याच्या ओळखीचा होता. अॅक्टिवा व इतर मोपेड्स करणार्या ३ जणांची नावे त्याने दारूच्या नशेत फोडली. त्याच्या मते गेल्या महिन्याभरात अॅक्टिवा कोणी डिसेंबल केल्या असतील तर या तिघांनीच. अर्थातच हे इतके सहजासहजी नाही झाले पण त्याच्या डोक्यात आता घोळ जाणवू लागला होता.
"पर तू इसका क्या करेगी?"
तेवढ्यात रिपोर्टरने आपल्या पर्समधून एक प्लास्टिकची पिशवी आणि ते त्याच्या तोंडावर बांधली. आता तो थंडपणे बोलू लागला.
"वो जानके तू क्या करेगा बाप? अब बस इतना समझ कि इसको लगाई मैने चिमटी और तू दम घुटके गया कामसे. अब बस इतना बता कि रसूल भाईने हाल ही माहिम मे कोई डील की थी क्या?"
त्याने व्यर्थ झटापट करून पाहिली. पण शेवटी प्रत्येकाला जीव प्यारा असतो.
"जहां तक मेरेको मालूम माहिम मे रसूल भाईने कई महिनों मे कोई डील नही की. वैसे भी रसूल भाई को किसी जुआरी मे इंटरेस्ट आया है. वो और किलर उसी को ढूंढ रहे है. इससे ज्यादा मेरेको कुछ नही मालूम. अब तो छोड मेरी मॉं."
"माँ नही बाप" असे म्हणत रिपोर्टरने ती पिशवी बांधून बाहेरून एक क्लिप लावून त्याला तसेच बिछान्याला बांधलेले सोडले. एक खबरदारी म्हणून पर्समधले सायलेन्सर लावलेले पिस्तूल काढून शेजारच्या खोलीतल्या त्याच्या साथीदाराला आणि त्याच्या बेडमधल्या पार्टनरला गोळ्या घालून तो त्या लॉजमधून बाहेर पडला.
थोड्या दूर लावलेल्या गाडीत बसून विग व मास्क काढता काढता तो विचार करत होता. थोडक्यात जर खून किल्ल्यात झाला असला तर रसूलचा काही संबंध नाही. आणि होऊ घातलेल्या गँगवॉर मध्येही रसूल फारसा रस घेत नाहीये. असा कोणता जुगारी पैदा झाला ज्याच्यात रसूल आणि किलर दोघे एवढा रस घेत आहेत?
आणि आपण ही माहिती मिळवण्यासाठी कॉलगर्ल बनून ही पद्धत वापरणे खरंच गरजेचे होते का? का असे वाटते की हे सर्व अधिकाधिक रँडम होत चालले आहे.
~*~*~*~*~*~
जॉनी दारू पित आपल्या खोलीत बसला होता. बाहेर होत असलेल्या दारावरच्या गलक्याकडे त्याने साफ दुर्लक्ष केले. शेजारी बसलेल्या कोल्ह्याकडे पाहून तो हसला.
"जॉनी यू रास्कल. मला माहित आहे तू आत आहेस. दार उघड. आज मी भाडं घेऊनच जाणार आहे."
घरमालक!! जॉनीने एक हास्य करत त्या कोल्ह्याकडे पाहिले. थांब याला कटवून आलो.
"हेल्लो. काय म्हण म्हण म्हण ताय मालक? मालक!"
त्याने लगेच नाकाला हात लावला. दारूचा भपकारा येत होता.
"जॉनी गेल्या ३ महिन्याचे भाडं राहिलं आहे. तेवढे दे. मला काही तुझ्या नादी लागायची हौस नाही."
"देतो ना. हे घ्या " असं करत त्याने ३ हजारच्या नोटा त्याच्या हातावर टेकवल्या.
"हे काय? ३च हजार? अरे हा १०% पण नाही रे जॉनी. तुझा पगार नाही झाला का? का असं करतोयस? असं पण ऐकायला मिळालं कि नोकरी सोडलीस? खरं नाही ना हे?"
"३च हजार? ३च हजार काय करताय. दिले ना पैसे ३ महिने म्हटलात ना मी ३ हजार दिलेत."
"अरे महिने काय पैसे मोजायचे यूनिट वाटले का? अरे अरे "
बाय बाय करत जॉनीने दार लावून घेतले. पोलिसातच जावे लागणार असे म्हणत घरमालक जायला निघाले तेवढ्यात त्यांना समोरच्या जिन्यात ते जनावर जाताना दिसले. भर वस्तीत जनावर? म्हणजे त्या बातम्या खर्या आहेत कि काय? त्यांनी पुन्हा डोळे चोळून बघितले तर तिथे काही नव्हते. छे छे भासच झाला असावा. असे म्हणत ते पायर्या उतरणार एवढ्यात त्यांना तिथे एक पुस्तक पडलेले दिसले. का कोण जाणे त्यांना ते पुस्तक घ्यावेसे वाटले.
"घरी जाऊन बघूया काय आहे याच्यात. तसेही असले केसाळ कव्हर, कातडी बांधणी कुठे मिळते आजकाल! नाही आवडले तर रद्दीवाल्याला विकूया. नाव तर काही धडाचं द्यायला जमलंय म्हणा. युरुगुचे पुस्तक म्हणे!!!"
क्रमशः
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/53880
आता झालेल्या या डोक्याच्या
आता झालेल्या या डोक्याच्या भुग्याचं काय करू?
मस्त झालाय हा भागही!
युरुगु मानवा आधी अनेक देव
युरुगु मानवा आधी अनेक देव जन्माला घालतो, त्याच पद्धतीने. त्यातील तीन देवांना ते अम्माची मुले म्हणून विशेष मान देतात. त्यांची नावे ओगो, यासिगी आणि युरुगु. >> यात पहिले युरुगु ऐवजी अम्मा असे हवे होते ना ?
धन्यवाद टीना, बदल केला आहे.
धन्यवाद टीना, बदल केला आहे.
पायस, हा पण भाग मस्तं
पायस, हा पण भाग मस्तं जमलाय!
संपूच नये असं वाटायला लावणारं लिखाण आहे तुझं!
लिहीत रहा... लवकर येउ दे
लिहीत रहा... लवकर येउ दे पुढचा भाग
छान! आधी आतापर्यंतचा आढावा
छान!
आधी आतापर्यंतचा आढावा दिलात ते फार बर केलंत.
जास्त गोंधळायला झालं नाही त्यामुळे.
हम्म... छान . वाचत रहावस
हम्म... छान . वाचत रहावस वाटत. ..
सही!!
सही!!
पायस, लिहि ना पुढे! प्लीज!!!
पायस, लिहि ना पुढे! प्लीज!!!
अरे देवा.. अंतिम भाग
अरे देवा.. अंतिम भाग आल्याशिवाय वाचायचे नाही असे ठरवले होते.
कुतुहलाने घात केला. :हताश बाहुली:
लोकहो संपादायला घेतला आहे
लोकहो संपादायला घेतला आहे पुढचा भाग. लवकरच तुम्हाला वाचायला मिळेल. बाकी प्रोत्साहनासाठी नेहमीप्रमाणेच धन्स.
@पियु - क्रमशः मुळे हताश कि कथानक रुचले नाही?
क्रमश: झेपेना मला. आता रात्री
क्रमश: झेपेना मला.
आता रात्री झोप लागनार नाही.
कथा पूर्ण होइपर्यंत.
ओह! करतो प्रयत्न लवकर पूर्ण
ओह!
करतो प्रयत्न लवकर पूर्ण करायचा
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
ओ पायसराव.. पुढचा भाग कधी?
ओ पायसराव..
पुढचा भाग कधी?
५ वा आलाय की.
५ वा आलाय की.
कुठाय ? कुठाय ???
कुठाय ? कुठाय ???
पुढ्चा भाग दिसत नाही लवकर
पुढ्चा भाग दिसत नाही लवकर ..... वाचु द्या